
मनोज मोहिते
कलानिर्मितीची प्रक्रिया ही तशी देखणी नसते. पण त्यात सौंदर्य असते. देखणी या अर्थाने की, कला पूर्ण रूप आकार घेते तेव्हा ती सुटीसुटी असते. तिच्याभोवती अस्ताव्यस्तपणा असतो. तिच्यात अस्ताव्यस्तपणा असतो. कलावंत अस्ताव्यस्त असतो. अस्ताव्यस्तपणा फारसा कुणाला आवडत नाही. देखणेपणा हवाहवासा असतो. पण, या अस्ताव्यस्ततेचा अर्थ ज्याला पुरेसा ठाऊक असतो, यातले सौंदर्य जो शोधतो, तो त्यात रमतो. न ठाऊक, तो कलेत रमण्यापासून वंचित राहण्याचा धोका उद्भवतो.
कोणत्याही कलेच्या निर्मितीची प्रक्रिया ही त्या कलेप्रती उत्सुकता निर्माण करते. या उत्सुकतेला उत्कटतेची जोड असते. ही उत्कटता त्या अस्ताव्यस्ततेत लपलेली असते. चटकन्दिसत नाही. आपली तयारी बघते. आपली मनोभूमिका तपासते. ही उत्सुकता बघणाऱ्यांत टिकून राहण्यासाठी संयमही लागतो. आताच्या मनांत हा संयम सहसा दिसत नाही. दिवसेंदिवस तर हे कठीणच होऊ चाललेले...
रसिकांपुढे कला सादर करण्यापूर्वीपर्यंत कलावंत टाकीचे घाव सोसत असतो. शब्दश: नाही, पण भाव हाच असतो.
या घावांत, या सोसण्यात त्याचा आनंद असतो. समाधान असते. सौंदर्य असते. सृजनाच्या; सौंदर्यनिर्मितीच्या या प्रवासास या पहिल्या स्ट्रोकपासून, पहिल्या घावापासून, पहिल्या मुद्रेपासून, पहिल्या पदन्यासापासून, पहिल्या क्लिकपासून प्रारंभ होतो. नंतरचा रियाझ/सराव कलावंताला पारंगत करत जातो. या सतततेत कलावंताला स्वत:ची एक शैली गवसत जाते. कुणी कलावंत या शैलीत रमतो. कुणी शैलीतून बाहेर पडण्याचा; नवी शैली अंगवळणी पाडण्याचा प्रयत्न करतो. हीही प्रक्रिया असते. निर्मितीमागची प्रक्रिया.
कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीच्या पहिल्या क्षणापासून सुरू होणारे काम जेव्हा पूर्ण होते आणि ते रसिकांपुढे येते, तेव्हा ते काम एक पूर्णत्व घेऊन येते. या पूर्णत्वाचे समाधान कलावंतास नसते. पण एक विराम हवा असतोच. हा विराम कोणत्या तरी क्षणी स्वीकारावा लागतो. त्या स्वीकारक्षणी हातून घडलेल्या वा सादर केलेल्या कलाकृतीवर समाधानी राहावे लागते. हे समाधान दृश्यरूपी असते. आतून असमाधानाचीच धार वाहती असते. कलावंताच्या आत पूर्णत्व नसते. कलावंत पूर्णत्वाच्या आभासाशी आणि अपूर्णत्वाच्या अस्तित्वाशी झगडत असतो. कलाकृती एकदा का रसिकांपुढे सादर झाली की, कलावंत त्या कलाकृतीपासून स्वत:ला विलग करतो. आणि तेव्हा रसिक त्या कलाकृतीला आपलीशी करतो. हे देणे. हे घेणे. कलावंत देत असतो. त्याला देण्याचे भान हवे. रसिक घेत असतो. हा त्याचा हक्क असतो. या हक्काची जाणीव त्याला हवी. ती येण्यासाठी कलाकृतीला समजून घेतले पाहिजे. कलावंताची अंतिमाच्या आधीची, सादरीकरणाच्या मागची मेहनत जाणली पाहिजे.
संधी मिळाली तर निर्मितीची प्रक्रिया पाहिली पाहिजे.
निर्मितीची प्रक्रिया पाहता यावी म्हणून संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
निर्मितीची प्रक्रिया पाहण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. कुणाच्या वाट्याला कधी तरी हा अनुभव येतो. यात योगायोग अधिक असतो. हा अनुभव जेव्हाकेव्हा येतो, तेव्हा तो अविस्मरणीय असाच असतो. शिकवण असते यात. कलावंताचे कष्ट दिसतात. त्याचा ध्यास दिसतो. त्याची साधना दिसते. अशावेळी आपण तटस्थतेने बघत राहावे. मिळाली संधी तर दोन शब्द बोलावे. दोनच शब्द. आपल्या लुडबुडीने कलावंताची साधना भंगणार नाही, याची काळजी आपण घ्यायची असते. रसिकांनी कलावंताला जपायचे असते. कलावंतांनी रसिकांची काळजी घ्यायची असते. जपण्यात जबाबदारी असते. काळजीत आपुलकी. या दोहोंमध्ये एकभाव महत्त्वाचा असतो.
काही कलावंत रसिकांसाठी स्वत:ला मोकळे सोडतात. काही मन आखडते घेतात. कधी कधी तेव्हाची परिस्थिती तशी नसते. शिवाय स्वभाव आपला आपला. मोकळेपणाचा स्वभाव प्रत्येक कलावंतात असतो असे नाही. या उपरही स्वत:ला मोकळे सोडणे म्हणजे कलाकृतीला अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा स्वत:हून प्रयत्न करणे. मन आखडते ठेवणे म्हणजे रसिकांनी त्यांच्याकडून कलाकृतीला समजून घेण्याचा स्वत:हून प्रयत्न करण्याची अपेक्षा करणे. मधले काही सांधता आले पाहिजे. ही दोहोंची गरज असते. ती बरेचदा लक्षात येत नाही. तेव्हा एकमेकांना एकमेकांशी भेटता आले पाहिजे. भेटत राहिले पाहिजे. म्हणूनच कलावंतानेही निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखविण्याची तयारी आणि शक्य तितकी तत्परता दाखविली पाहिजे. कलावंताला ते साधले नाही तर कलावंताभोवतीच्या पूरक व्यवस्थेने ही संधी वेळोवेळी उपलब्ध करून दिली पाहिजे. ही संधी उपलब्ध करून देणाऱ्यांना हरतऱ्हेने बळ दिले पाहिजे.
‘आपल्या मनात हे आहे, पण हे आपल्याला कलात्मकरित्या सांगता येत नाही.’
‘रसिकाच्या मनात हे आहे आणि हेच मी माझ्या कलेद्वारे सांगू पाहत आहे.’
या दोन वाक्यांतील अंत:संबंध समजून घेतला पाहिजे. रसिकाच्या मनात अनेक भावना उमटत असतात. अनेक विचार येत असतात. या बोलण्याला/सांगण्याला स्वशब्दांचा आधार असतो तसेच समभाव व्यक्त करणाऱ्या अन्य कुणाच्या ओळींची मदत असते. पाहिल्या वा अनुभवल्या त्या कलेत आपले आतले असे काही जाणवले की मग, ‘मला हेच तर म्हणायचं होतं’, अशी प्रतिक्रिया उमटते. अगदी उत्स्फूर्तपणे. ही प्रतिक्रिया त्या कलावंताला मिळणारी अस्सल दाद असते. ही दाद दृश्य-अदृश्य/व्यक्त-अव्यक्त अशा दोन्ही रूपांत वा माध्यमांत असते. मनात आलेले भाव उघडपणे व्यक्त करण्याचा स्वभाव प्रत्येकाचा नसतो.
सांगणे एकच, आपण कला सतत समजून घ्यावी. ती समजून घेता घेता कलाकार समजून घ्यावा. कलाकारानेही स्वत:ला आत्ममग्नतेच्या परिघातून जरा बाहेर फिरायला नेत प्रेक्षक/श्रोत्यांशी संवाद साधते राहावे. कला समजून सांगत राहावे. मनातले एकमेकांनी, एकमेकांच्या मनातल्याशी जुळवून पाहावे. पडताळून पाहावे. कुणाला काही तरी गवसत राहील. सामान्य प्रेक्षक/श्रोता समृद्ध होईल. कलावंत सृजनाच्या नव्या सजीव-जाणिवांपाशी पोहोचेल. हे असे होण्याची शक्यता दाट असते.
अशा संवाद-प्रक्रियेतून कला कळते. कला कळणे हे सामूहिक हिताचे असते. सार्वहिताचे असते. हे सामूहिक-सार्वहित एकमेकांच्या सोबतीने जाणले पाहिजे. जाणून घेता घेता जपतही राहिले पाहिजे. हेच कलाकलांचे सांगणे आहे!