चित्रकाराची चौकट चर्चा

Submitted by मनोज मोहिते on 25 March, 2025 - 14:03

मनोज मोहिते
चित्रकार चित्रात मनस्वी रंगत असला तरी, चित्र काढून झाल्यावर त्याला भानावर यावे लागते. हे भान म्हणजे कलात्मक ट्रान्समधून वस्तुस्थितीत्मक भवतालात येणे. ही सद्यस्थिती त्याच्या चित्राच्या पुढच्या प्रक्रियेसाठी गरजेची असते. त्या दिवशी हे प्रकर्षाने जाणवले.

शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात गेलो असता, एक प्रतिभावंत युवा चित्रकार दोन आकारांच्या दोन फ्रेम घेऊन आला होता. एक लहान, एक मोठी. मागे एक वर्कशॉप झाले असता, तेव्हा त्यात सहभागी चित्रकारांच्या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. त्या चित्रांना लहान चौकट घ्यावी की मोठी, हा निर्णयाचा विषय होता. बहुमत मोठ्या चौकटीकडे होते. पण त्यानिमित्ताने लहान चौकट आणि मोठी चौकट अशी चौकट चर्चा झाली. चौकट हाताळली गेली. अनेकांनी ती पाहिली. फील केली. लाकूड पाहिले. लाकडाच्या क्वॉलिटीवर चर्चा झाली. मजबूत हवे लाकूड, हे मत व्यक्त झाले.

चित्रकाराचे चित्र हे चौकटीत असते. आणि ती चौकट महत्त्वाची असते, हे चित्र बघताना रसिकाच्या सहसा लक्षात येत नाही. चित्राचा मूर्त-अमूर्त विचार करून झाल्यावर, चित्र पूर्ण झाल्यावर चौकटीचा अतिशयच विचार करावा लागतो आणि हा विचार महत्त्वाचा असतो, हे त्या क्षणी आवर्जून कळले. ही फ्रेम घेतली तर आत चित्राच्या बाजूला किती जागा उरेल आणि ती फ्रेम घेतली तर बाजूला किती जागा उरेल याचे दोन-चार बोटांनी मिळून मोजमाप झाले. मोजमाप मोघम असले तरी, ते मोजमाप होते. ते गरजेचे होते, ते गरजेचे असते हेही जाणवले त्या क्षणी.

चौकटीची लांबी-रुंदी किती, जाडी किती, चौकटीसाठी वापरलेले लाकूड कोणते, ते परवडणारे आहे की नाही, चित्र त्यात बसेल तेव्हा, आजूबाजूला किती जागा सुटलेली असेल, किती सुटायला हवी असा सारा विचार करावा लागतो. हा असा विचार सामान्य माणूसही त्याच्या रोजच्या जगण्यात कळत-नकळत करीत असतो. लांबी-रुंदीचा संबंध नसलेल्या माणसालाही लांबी-रुंदीचा विचार करावा लागतो किंवा तो विचार करण्याची वेळ त्याच्यावर कधी ना कधी येत असते. अनेकांच्या लेखी हे तितकेसे महत्त्वाचे नसते. जगण्याचा तो सहजसा भाग असतो. ती व्यक्ती फार इतका विचार करीत नाही. तेवढ्यापुरती गरज आहे. ती निभावली गेली. संपला विषय. लांबी-रुंदीच्या मोजमापात जेव्हाकेव्हा पुन्हा पडण्याची वेळ येईल, तेव्हा पडू. तब की तब!

चित्राभोवतीचा आकार हा आपल्या अभिव्यक्तीचा अभिन्न भाग असतो, हे चित्रकाराला आधीपासून ठाऊक असते. चित्रकाराच्या मनात चित्र घोळू लागते, तेव्हा कॅनव्हासचा आकारही पक्का पक्का होत जातो. चित्रकार सराईत झाला की, त्याला आकारांची सवय होऊन जाते. मग तो अगदी भिंतीएवढा कॅनव्हासही वापरतो आणि अगदी फुटा-दीड फुटाचाही. अभिव्यक्तीची गरज जशी, तसा कॅनव्हासचा आकार. तशीच मग चौकट. कविता लिहिताना ती दीर्घ कविता होणार की लघु, याचा विचार कवी लिहू लागला की करीत नाही. जितके सुचले, तितके लिहीत जावे. रिते झाले की थांबावे, असा त्याचा थॉट असतो. तो हा थॉट सोबत घेऊन लिहिण्याच्या प्रक्रियेत चालू लागतो. ज्या क्षणी थांबला, त्या क्षणी थांबला. कविता पूर्ण.

चित्रकाराचे अभिव्यक्तीच्या पातळीवर असेच असते. त्याचे सारे काम एका चौकटीत चालते. या चौकटीत तो सारा रंगाविष्कार मांडत असतो. चौकटीच्या सारे भावविश्व. चित्रकार सरावलेला असेल तर विकसित झालेल्या आपल्या शैलीला तो जाणिवेच्या उंचखोलीत नेण्याचा प्रयत्न करतो. स्वत:ची एक खूण चित्रात पेरतो. ही खूण त्याला ठाऊक असते. चित्र बघणाऱ्याने ती ओळखली की, चित्रकाराला आनंद होतो. हळूहळू ठरावीक शैली विकसित होते. आकृती-प्रतिमा कायम ठेवून नवे अर्थ रेखाटण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांना त्या एका क्षणाला संकेत मिळाला की चित्रकार थांबतो. चित्र पूर्ण होते. चित्रकार पॅलेटपासून अलग होतो. ओला कॅनव्हास वाळण्यास सज्ज होतो. चौकटीचा विचार बरेचदा इथून सुरू होतो.

चौकटीवर काम करणारी चित्रकाराची नेहमीची माणसे असतात. त्यांच्या हाती चित्र सोपविताना एक विश्वास लागतो. हा विश्वास चित्रकार चौकट तयार करणाऱ्यावर ठेवत असतो. विश्वास, आपल्या कलेला तो सांभाळणार याचा. कलेला इजा पोहोचणार नाही याची काळजी घेणार याचाही. असे स्ट्रेचर बनवून देणाऱ्यांवर किती हा भरवसा! या भरवशाचे चौकट करणाऱ्यावर दडपण येत असावे का? आपण कोणत्या चित्राची चौकट करतो आहे, याची त्याला कलात्मक जाण असते का, ती हळूहळू त्यात विकसित झालेली असते का, की या चौकटकर्त्याने स्वत:ला या कलेपासून विलगच ठेवले असेल? त्याने विलग ठेवले असेल तर... म्हणजे त्याला हे साधले असले तर, त्याच्यातल्या संयमाचे-तटस्थतेचे कौतुक करावे की कलेने त्याला आपल्यात ओढून कसे ना घेतले, याचे आश्चर्य व्यक्त करावे!

चित्र काढू लागणे ते चित्र चौकटबद्ध करणे यातला मधला जितका काळ असतो, तो चित्राच्या निर्मितीचा; सृजनाचा काळ. या सृजनाला व्यवहाराची जोड लागते. सृजन व्यवहारापासून वेगळे राहू शकत नाही, हा याचा अर्थ का? चित्राची चौकट असते, तशी पुस्तकाची बांधणी-मांडणी असते. लेखकाने केवळ लिहून मोकळे होऊन चालत नाही. पुढच्या सोपस्कारांसाठी; म्हणजे व्यवहारांसाठी स्वत:ला सज्ज करावे लागते. ही सज्जताही चौकटीबद्ध असते. गरजेची असते. पुस्तकही चौकटीत असते. नाटकातही नेपथ्याची चौकट असते. कुठलेही सादरीकरण एका ठरावीक चौकटीतच होते. चौकटीच्या आतला मुक्ताविष्कार. चौकटीच्या आतला कलाकाराचा कॅनव्हास. त्याचा कसा वापर तो करणार, ही त्याची सृजनशक्ती.

तर, चित्रकाराला चौकट ही अशी गरजेची असते, चित्र अॅब्स्ट्रॅक्ट असले तरी, नसले तरी! मूर्त-अमूर्ततेच्या मधल्या चौकटजागा गवसण्याची आस ठेऊन असतातच...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान !
प्रभाकर बर्वे ह्यांनीही त्यांच्या "कोरा कॅनव्हास" पुस्तकात चित्राबाहेरील जागेचं ( space) आत्यंतिक महत्त्व अधोरेखित केल्याचं आठवतं .