खरडवहीतील ‘भेळ’ !

Submitted by कुमार१ on 23 March, 2025 - 07:53

शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही. परंतु त्यांचे मुलांनी ठेवलेले टोपणनाव लिहून ते वारंवार गिरवत बसणे हे मात्र आवडीने केले जाई.
बाकी बिंदूचा समूह, रेषा आणि वेगवेगळ्या आकृत्या काढायचा मात्र नाद लागला व तो अजूनही आहे. यामध्ये एकाखाली एक रेघा काढणे, गोलाकार फसलेला गोल, त्रिकोण, चौकोन, चौरस असे काहीही मनाला येईल ते रेखाटायचे आणि गिरवत बसायचे. वहीला पेन टेकवल्यानंतर हात न उचलता आणि कुठलीही रेष दुसऱ्यांदा न गिरवता काही आकृत्या काढायची कोडी त्यावेळी असायची त्यांचाही सराव केला जाई. अशा प्रकारची एक विशिष्ट आकृती (चित्र पहा ) जगात कोणालाही काढता आलेली नाही असे त्या काळी मित्रांनी सांगितले होते. तरी देखील अट्टहास म्हणून तिचा प्रयत्न करत बसायचं. याच्या जोडीला कधी एखादा विनोद लिहिला जाई तर कधी चित्रपटांची नावे.
kharad1.jpg

आतापर्यंतच्या आयुष्यात ही चित्रातली आकृती चाळा म्हणून हजारदा तरी खरडली असावी.

अधूनमधून शाळेत दंगा केल्याबद्दल मास्तरांकडून शिक्षा केली जाई आणि क्वचित मार देखील खावा लागला. मग काय, त्या दिवशीचा तो सगळा राग वहीच्या पानांवर उतरणारच. मास्तरांच्या नावाने सांकेतिक भाषेतील काही अपशब्द, असं ते लेखन असायचं. घरच्या आघाडीवर सटीसामाशी कधीतरी मुलांच्या नकळत त्यांची दप्तरे तपासण्याचे काम पालक मंडळी करायची. त्यातून मग हे मागच्या पानांवरचे प्रताप देखील उघड व्हायचे. मग त्यावरून आपली चंपी होणारच. अर्थात असं काही झालं तरी त्यानंतर फार तर आठ दहा दिवस ‘घरच्या पोलिसांना’ घाबरून वहीच्या मागच्या पानांना आराम दिला जाई. पण मुळातच जी अंगभूत खोड होती ती जाणे कसं शक्य होतं ?

कॉलेजला जायच्या वयात तर ही खरडखोड अंगात चांगलीच मुरलेली होती. त्यामुळे कॉलेजच्या वह्यादेखील याला अपवाद कशा राहणार ? फार तर बारावीचे वर्ष थोडेफार गांभीर्याने घेतल्यामुळे मागच्या पानांचे भरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहिले. पण पुढे एकदाचे व्यावसायिक शिक्षणाच्या मळ्यात जाऊन पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या सवयीने उचल घेतली. आता प्रौढत्वात प्रवेश केलेला असल्यामुळे खरड पानांच्या गुणात्मकतेत हळूहळू वाढ झाली. शालेय वयात टाईमपास किंवा निरर्थक खरडपणा जास्त असायचा. आता आपल्या वाचनातून आपल्याला आवडलेल्या निवडक गोष्टी, मार्मिक वाक्ये आणि सुविचारांची यात भर पडली. तसेच मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषा तिथे प्रेमळ भगिनीगत एकत्र नांदू लागल्या.

वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या वह्या जेव्हा वर्षाखेरीस पहिल्या जात तेव्हा हे अगदी स्पष्टपणे दिसायचे, की जवळजवळ प्रत्येक वहीची एक पंचमांश पाने तरी मागच्या बाजूने सुरुवात करून खरडीनी भरलेली असायची. वरवर पाहता एखाद्याला वाटेल की ही पाने वाया घालवली आहेत. परंतु त्यातून मला जो काही विरंगुळा होत होता ते पाहता ती माझी एक मानसिक गरजच होऊन बसली होती. सरधोपट आणि चौकटीबंद शिक्षणपद्धती कित्येक विद्यार्थ्यांना आवडत नसते. मग त्याबद्दलची त्यांची व्यक्तिगत नाराजी अशाच काही प्रकारांमधून उमटत असावी.

यथावकाश शिक्षण संपले आणि पोटापाण्याचा कामधंदा चालू झाला तेव्हा क्षणभर असे वाटले होते की आता आपली ही खरड सवय बहुदा संपुष्टात येईल. पण कुठलं काय? साधारण दरवर्षी एखाद दुसरी डायरी घरी येऊन पडायची. तिचा वापर करताना बालपणापासून मुरलेलं तेच धोरण आता देखील चालू राहिलं. डायरीच्या पुढच्या बाजूने ज्या काही दैनंदिन व्यावसायिक/ व्यावहारिक नोंदी असायच्या त्या केल्या जायच्या परंतु फावल्या वेळात डायरीची मागची बाजू वर करून पाने उलटून तिकडे आपली खरड पुन्हा एकदा जोमाने चालू झाली. असेच एकदा कागदावर पेनाची फिरवाफिरवी करताना एक भन्नाट कल्पना सुचली. एरवी आपण कुठलाही मजकूर डावीकडून उजवीकडे शिस्तीत लिहित जातो. तो मजकूर जर आरशासमोर धरला तर त्याची त्यातली प्रतिमा उलटी दिसते. मग गंमत म्हणून वहीवर उजवीकडून डावीकडे आणि सर्व अक्षरे उलटी काढत काही गमतीदार लेखन करत बसायचो. हळूहळू त्यात गती आली आणि एकदा एका मित्राला ते दाखवले. त्यावर तो म्हणाला,

“अरे, छानच की. अशी सवय लिओनार्दो दा विंचीला होती, बरंका”, असे म्हणून त्याने मला आपले थोडेसे खुलवले.

संगणकपूर्व काळात हस्तलेखन ही बऱ्यापैकी गरज होतीच. त्यामुळे उपयुक्त लेखनाच्या जोडीला हे निरर्थक खरडकाम देखील उत्साहाने चालायचे. संगणकयुग अवतरल्यानंतर हस्तलेखनाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हे खरे. परंतु गेल्या तीन-चार वर्षात असे जाणवले की गरजेपेक्षा जास्त काळ संगणकात डोके खूपसून बसणेही बरोबर नाही. त्यावर जे काही वाचन झाले त्याचे मनन करता करता त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा मुद्दे पुन्हा एकदा कागदावर लिहायला सुरुवात केली आहे. दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणाने अनेक पाठकोरे कागद जमा होत असतात. ते गोळा करून एका पॅडवर लावून ठेवलेत आणि त्याची कोरी बाजू ही अशा खरडीसाठी वापरतोय आणि हळूहळू त्याची आवड पुन्हा एकदा वाढू लागलेली जाणवते आहे.

एकेकाळी आपण केलेल्या अशा खरडी जर जपून ठेवल्या तर कालांतराने सहज ती वही उघडून त्या पाहणे हे मात्र जबरी स्मरणरंजन असते. विशेषतः जर जुन्या खरडी पाच-सात वर्षे उलटून गेल्यानंतर चाळल्या तर कधी आपलेच आपल्याला हसू देखील येते. त्या खरडीमध्ये आपण करून ठेवलेल्या गमतीजमती पाहून आपण अगदी अचंबित होतो.

“काय हो, असे असते तरी काय खरडींमध्ये तुमच्या?”
असे जर तुम्ही विचाराल तर त्याचे प्रथमदर्शनी उत्तर हे असेल, की काय नसते या खरडींमध्ये ते विचारा !

फोनवर कोणाशी बोलता बोलता लिहून घेतलेले अन्य कोणाचे नंबर्स आणि पत्ते, एखाद्या कामाची/घटनेची स्मृतिनोंद, आवडत्या व्यक्तींची अनेकदा गिरवलेली नावे, सुविचार अन सुवचने, बाळबोध स्वरूपाची चित्रकला अन फरकाटे, गाण्यांचे मुखडे, काही अक्षरे जुळवून केलेली मजेदार दीर्घरुपे, सामान्य बेरीज वजाबाक्या अन गुणाकार भागाकार, काही कुजबुज स्वरूपाचा मजकूर . . . आणि कधीतरी डोसकं फिरल्यागत या सगळ्यावर अत्याचार करणाऱ्या संपूर्ण पानभर मारलेल्या मोठाल्या फुल्या, अशा असंख्य गोष्टी इथे एकमेकांमध्ये घुसलेल्या असतात. काही परस्परविरोधी गुणधर्माच्या गोष्टी तर शेजारी शेजारी सुखाने नांदत असतात. एखाद्या रम्य सुभाषिताच्या पोटात काटकोन त्रिकोणाचे टोक शिरलेले असते किंवा एखाद्या झकास विनोदाशेजारीच एखाद्या गाजलेल्या शोकांतिकेचे नाव कोरलेले असते. इथल्या लेखनात शिस्त नावाला सुद्धा नसते. गिचमिड हा खरडीचा स्थायीभाव. आकृत्या आणि शब्द यांची एकमेकात अक्षरशः घुसखोरी झालेली असते. लिहिण्याची पद्धतही अत्यंत मनमानी. सरळ, उभे, आडवे, तिरके असे कुठल्याही कोनातून इथे लिहिले जाते. तसेच पेन, बॉलपेन, पेन्सिल आणि कधीकधी स्केचपेन ही सर्व लेखन साधने वापरुन त्यांचे एकमेकांत छानपैकी जुंपलेले फराटे पण असतात.

लहान मुलाचे हस्ताक्षर खराब असले की त्याला आपण, “काय रे, कुत्र्याचा पाय मांजराला आणि मांजराचा पाय डुकराला”, या प्रकारची उपमा देतो अगदी तसाच हा प्रकार असतो. पण आपण या सगळ्याकडे जर चिकित्सक चष्म्यातून पाहिले तर मग त्यातले आंतरिक सौंदर्य जाणवते. हा सगळा सावळा लेखनगोंधळ कालांतराने पाहणे हे फारच मनोरंजक असते आणि कधीकधी ते चिंतनीय सुद्धा ठरते. नित्य अशी ‘खर्डेघाशी’ करणाऱ्या माणसांच्या दृष्टीने ते त्यांचे ‘खरड-साहित्यच’ म्हणायला हरकत नाही !

शैक्षणिक वयातील अशी खरडपाने आता जवळ नसल्याचे कधीकधी दुःख होते. एक दोन नमुने तरी ठेवायला हरकत नव्हती असे राहून वाटते. पदवी शिक्षणानंतरच्या विवाहपूर्व एकटेपणाच्या काळातील काही खरड-मनोगते तशी हृद्य होती पण ती केव्हाच रद्दीत गेली. असो. तेव्हाच्या आयुष्यात प्रेमप्रकरण वगैरे काहीच न घडल्याने त्या आघाडीवर मात्र खरडवही आसुसलेलीच राहिली. जर का ते घडते तर मात्र या पानांवर प्रेमाचे आलाप अगदी ओसंडून वाहिले असते, हे काय सांगायला पाहिजे? आयुष्याच्या पुढील टप्प्यात केलेल्या काही खरडी मात्र अजूनही जवळ आहेत त्यातला हा एक नमुना :
kharad2.jpg

कोविडपर्वात मायबोलीवर विविध शब्दखेळ सादर केले होते. त्यातील काही प्रकारांची व्यक्तिगत तयारी करताना पुन्हा एकदा भरपूर खरडी झाल्या होत्या त्यातली ही एक आठवण :

khara3.jpg

कोविड ऐन भरात असताना 2020मध्ये ऑनलाईन ‘Wordle’ या इंग्लिश शब्दखेळाचा आंतरराष्ट्रीय प्रसार खूप जोरात झाला आणि मी देखील त्याचा आयुष्यभरासाठी व्यसनी झालो. पुढच्या पाच वर्षांमध्ये वर्डलचे अनेक सुधारित अवतार आले आणि हळूहळू त्यांच्याही प्रेमात पडलो. गेल्या वर्षभरात ‘Clue Hurdle व Phrazle’ या दोन्ही प्रकारात मुरलोय. फ्रेजलमध्ये जे नवनवे अनौपचारिक (अमेरिकी) वाक्प्रचार सापडतात ते लाजवाब असतात. मग आपले कोडे सुटल्यानंतर जो वाक्प्रचार सापडतो तो हाताने कागदावर स्टायलीत लिहून ठेवण्यातली मजा काही औरच असते. असं काही गवसलेलं आणि आवडलेलं लिहीत गेलं की लिहिता लिहिताच ते ‘आपलं’ होऊन जातं असाही स्वानुभव ! अशा खरडीनी भरलेल्या सुट्या कागदांवरही इतके प्रेम बसते की ते लवकर रद्दीत टाकवतही नाहीत. मग त्यांची छानशी चळत पॅडवर साठत जाते.

khara4.jpg

२० वर्षांपूर्वी एका मासिकात एका पत्रकारांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी दैनिकातल्या दोन स्पर्धक पत्रकारांची एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. त्या दोघांपैकी एक होता दुपारपाळीचा तर दुसरा रात्रपाळीचा. एकाची कामाची पाळी संपली की त्याच टेबल खुर्चीवर दुसरा येत असे. टेबलाच्या खाली एक प्लास्टिकची कचराटोपली होती ज्यात ही मंडळी काही खरडून टराटरा फाडलेले कागद टाकून देत. तर या दोघांची एक गंमत होती. आपण कामावर आलो की जरा वेळाने आधीच्या माणसाने जे काही लिहून फाडून कचऱ्यात टाकलेले कागद असायचे ते मुद्दामून काढून बघायचे. हेतू असा, की हा प्राणी जो मजकूर फाडून टाकतोय तो नक्की काय स्वरूपाचा असतो?
या उद्योगातून ते दोघे एकमेकांचे व्यक्तिमत्व जोखत असत असे त्या लेखकांनी म्हटले होते.

या गोष्टीवर जरा मंथन केल्यानंतर माझ्याही मनात एक विचार आला. ज्यांना लेखनाची सवय आणि आवड आहे अशांच्या बाबतीत त्यांनी खाजगीत केलेल्या अर्थपूर्ण हस्तलेखन आणि निरर्थक खरडलेखन या दोन्ही गोष्टी शक्य झाल्यास पाहायला हव्यात. अर्थपूर्ण लेखन हे मुद्द्याला धरूनच असणार, पण खरं सांगायचं तर ते त्या व्यक्तीचे बाह्यरुप झाले. त्यात वेळप्रसंगी विविध आभासही जाणवणार आणि सार्वजनिक लेखनाच्या बाबतीत कधीकधी वाचकशरणता देखील. परंतु त्या माणसाचे सुप्त अंतरंग समजून घ्यायचे असेल तर त्याच्या निरर्थक खरडी बघण्याला पर्याय नाही. कदाचित अशा माणसाचे खरे व्यक्तिमत्व त्या खरडकामातूनच समजू शकते का, असा एक प्रश्न मनात येतो. विचारपूर्वक स्वतःसाठी खरडलेलं जे काही असतं ते खऱ्या अर्थाने स्वांतसुखाय व प्रामाणिक असतं. अलीकडच्या काळात विद्यार्थीवर्ग वगळता हस्तलेखन हा प्रकार बऱ्यापैकी संपत चाललेला आहे. तरीपण जर एकेकाळी कोणी केलेल्या अशा खरडी जर योगायोगाने नजरेस पडल्या तर त्या बघायला नक्कीच मजा येईल आणि त्यावर थोडाफार विचारही करता येईल.

आपल्या वाचकांपैकी कुणाला अशी सवय होती किंवा आहे का? असल्यास आपल्या खरडीचे (आणि सार्वजनिक करायला हरकत नसलेले) काही नमुना फोटो इथे जरूर दाखवा. ते पाहणे रोचक असेल.

मित्रहो,
अशी आहे ही कागदावरील खरडाखरडीची गंमतजंमत अर्थात, फावल्या वेळात तिथे बनवलेली एक लेखन-भेळ. ही भेळ तुमच्यासमोर सचित्र सादर केली. आता ती चवीला कशी वाटली, हे मात्र तुम्हीच सांगायचे आहे !
***********************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजय ते आहेत.. दिव्यदृष्टी मला कशी असेल >>> हाच प्रश्न मलाही पडला होता Lol

येस, संजय, आता दिसत आहेत फोटोज. भरपूर हसून घेतलं आहे Lol

मला यावरून घरी खूप ओरडा पडायचा..
सुरुवातीला मलाही ओरडा पडायचा पण माझी सगळी पुस्तके रंगवुन झाल्यावर पुढच्या रंगकामासाठी मोठ्या बहिणीच्या पुस्तकांकडे मोर्चा वळवल्यावर पुढे मारही खावा लागला आणि माणसाने "नकटं असावं पण धाकटं असु नये" असे का म्हणतात ह्याचे प्रत्यंतर पुढे वेळोवेळी मला येत गेले!

मी पाचवीत होतो तेव्हा मोठी बहिण आठवीत होती. ती दहावी पास होउन कॉलेजमध्ये जाई पर्यंत म्हणजे मी आठवीत जाईपर्यंत शाळेच्या समस्त शिक्षकवृंदाने माझा मानसिक छळा कराययचा अटोकाट प्रयत्न केला होता पण (त्यांच्या दुर्दैवाने घरच्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर मी अत्यंत 'कोडगा' वगैरे असल्याने) त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते 😀

अरे ठीक आहे, होते / आहे तीचे हस्ताक्षर मोत्याच्या दाण्यासारखे अगदी फाँट बनवावा इतके सुंदर आणि मिळायची तिला दरवर्षी त्यासाठी बक्षिसे, फिरवता तुम्ही तीच्या वह्या प्रत्येक वर्गात कौतुकाने दाखवत, आणि असेल माझे हस्ताक्षर कोंबडीच्या पायांसारखे! पण त्यावरुन मला ऐकवणार्‍या शिक्षकांपैकी एकाचे तरी हस्ताक्षर तीच्या हस्ताक्षराच्या जवळपास पोहोचण्याच्या लायकीचे तरी होते का? बरं हे स्पष्टपणे त्यांना विचारले तर माझ्यावरच उद्धटपणाचा ठपका ठेवला गेला! भलाईका जमानाच नही रहा 😀

>>कोणी हसत असेल त्याचा एक दात काळा करून त्याला दातपडके बनवणे हा फेवरेट आयटम होता>>
तो माझा ऑलटाईम फेवरीट आयटम आहे... 😂

बरी आहे खरडवही.
आता तुमच्याकडे पेन वापरता येणारा टॅब हवा. म्हणजे छंद सुरू राहील कागद न वापरता.
............
कॉलेजमध्ये गेल्यावर वह्यांचे ओझे संपले. तुम्ही काय लिहिता आणि लिहून घेता की नाही याचे प्रोफेसरांना सोयरसुतक नसते. वह्या घेऊन जाणे आणि त्या उगाचच भरणे हे कामही संपले. शाळेत शिक्षकांचे न ऐकणे यातच आनंद असतो.

संजय
अत्यंत भारी प्रतिसाद व उत्कृष्ट चित्रे !!
इथे पहिला सचित्र प्रतिसाद आल्याने अत्यंत खूष आहे Happy

**भलाईका जमानाच नही रहा >> सही रे सही Happy

**L.L.B' (Lords of the last benches) ही मानाची पदवी
>> या पदवी बद्दल विशेष अभिनंदन .!
मी तसा पहिल्यापासून कायम मधल्या बाकांवरचाच. परंतु मला या L.L.B' लोकांबद्दल विलक्षण उत्सुकता आणि प्रेम देखील आहे.

दरवर्षी आम्ही शाळेच्या संपूर्ण इत्तेतले मित्र एकत्र जमतो त्यावेळी एकेकाळच्या L.L.B' मुलांनी आज विविध क्षेत्रात मिळवलेले देदीप्यमान यश पाहून मी भारावून जातो.
. . .
*पेन वापरता येणारा टॅब>>> अच्छा ! चांगली सूचना

संभा..एकदम nostalgic केल तुम्ही...असले प्रकार चिक्कार केलेत शाळेत असताना..
कुमार सर नेहमी प्रमाणे मस्त लेख आणि विषय पण

आज वाचला हा लेख. निवांत वाचवा म्हणून ठेवला होता.
एका वेगळ्याच विषयावर खूप छान लिहिल आहे.
अगदी नॉस्टॅल्जिक केलंत.
शेवटच्या पानावर मोठी गमतीदार माहिती असे.
शाळेत असताना शाई पेन वापरत असल्याने रेघा मारून शाई ओली असताना ती फिस्कटवून त्याच्या विविध डिझाइन बनवायचो. डुडल्स (त्याला हे म्हणतात हे नुकताच काही वर्षापूवी कळलं), स्केचिंग , फुली गोळा किंवा मित्रांची वेगवेगळ्या फॉन्ट मधे नावे लिहिणे चालायचे.
कॉलेजमध्ये लेक्चर्स ला मोठ्या बाकावर पाच सहा जण बसत मग न बोलता शेवटच्या पानावर चक्क एकदुसऱ्याशी लिहून संवाद चाले.
फोन नंबर तेव्हा मोबाईल नसल्याने फार नाहीं पण वर्गातल्या जोड्या जुळवा, बदाम त्यात बाण असली फालतुगिरी बरीच होती.
काही वह्या आहेत. शोधतो.सापडलं काही तर नक्कीच डकवतो.

या लेखामुळे अनेकांचे स्मरणरंजन झालेले पाहून आनंद वाटला. मनमोकळे प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद !
. . .
* बदाम त्यात बाण >>> हे जागतिक संकेतचिन्ह आहे Happy
* नक्कीच डकवतो>>> जरूर !
मजा येईल बघायला

खूप शोधाशोध करून जपून ठेवलेली क्लासची डायरी सापडली आणि त्यातल्या त्यात इथे टाकण्यासारखं शेवटचं खरड पान ,खरंतर माझी जी थोडीफार चित्रकला बहरण्याला ही शेवटची पानंच कारणीभुत आहेत .
IMG_20250329_193412.jpg
डोळे दात रंगवलेली पुस्तकं मी पण वापरायचे पण मला ती कलाकुसर करता यायची नाही कारण माझ्या आधीच 2 वर्ष मोठ्या भावाने ती केलेली असायची मला बर्याचदा लहान असल्याने सेकंड हँड गोष्टी पुस्तकं वह्या मिळायच्या, ही फोटोत अश्मयुगीन काळातली दिसतेय तीही वडिलांची होती, वरती संजय म्हणतायत ते खरंय नकटं असावं पण धाकटं असू नये.ही वही मी कधी कधी क्लासला न्यायचे सर कधी चेक करायचे नाहीत, त्यामुळे बिंदास काहीही कलाकुसर काढली जायची .हा बुद्धिबळाचा पट सरांच्या हस्तक्षेपामुळेच अर्धवट रंगावायचा राहिलाय .डोळे मात्र काढायचं खूप ऑबसेशन होतं पण माणसांची चित्र जमायची नाहीत त्यामुळे प्रत्येक वहीच्या मागे डोळे असायचेच . अजूनही परफेक्ट डोळे जमलेले नाहीत . Happy ह्या ज्या उजवीकडे खाली टिकल्या दिसतायत, त्या आम्ही मैत्रिणी दररोज वेगवेगळ्या (गंध जो गोल बारा कलर मध्ये मिळायचा )टिकल्या लावून यायचो त्याचे डिजाईन जी की मी मैंत्रिणींना काढून द्यायचे .
तसंच आई पहिल्यांदाच पंजाबी ड्रेस शिवणार होती त्याचे लेटेस्ट गळ्याचे डिजाईन मैत्रिणींनी मिळून सुचवले होते ते आहेत.
फोटोत एक दोन सोपी स्पेलींग होती जी फोटोतून एरेज केलीत तुम्ही म्हणाल हिला एव्हडही इंग्रजी येत नाही म्हणून Lol

गाण्याबद्दल राहिलंच .गाणी लिहिणं तर प्रत्येक वहिवर व्हायचं एका वही वर तर 50 पेक्षा जास्त गाणी आम्ही एका ऑफ पिरियेड लिहून काढली होती. जलमार्ग वायूमार्ग कितवीला होतं ते आठवत नाहीये पण गाणं 99 सालातलं आहे हे नीट आठवतंय Proud थोडक्यात अभ्यास सोडून बाकी सगळंच जास्त लिहिलं जायचं.

मस्त, सिमरन, तुमचं शेवटचं वहीचं पान बघून मला माझ्य वह्या आठवल्या.. मी पण डोळे काढायची कारण तेवढेच जमायचे नाकाला खूप प्रयत्न करू नाही नीट नाही जमायचं.
मेंदीची नक्षी पण असायची
त्या व्यतिरिक्त त्रिमितीतील इंग्रजी मुळाक्षरे, भौमितिक चित्रे, आणि
खूप सारे तारे... बहुदा सगळा वेळ दिवा स्वप्न बघण्यातच जात असावा..

आमच्याकडे आठवड्याला बदलत राहायच्या जागा म्हणजे रोटेट व्हायचं एक एक बाक पुढे करत.. त्यामुळे कुणालाच LBB च बहुमान मिळायचा नाही Happy ... त्यावेळी आठवी नववी दहावी तीन वर्ष आम्ही आणि आमच्या मागे बसलेल्या दोघीजणी आणि पुढे वसलेल्या दोघीजणी कायम एकत्र तसेच राहिलो त्यामुळे इतकी गट्टी जमली ती आत्तापर्यंत ...

Submitted by सिमरन. on 29 March, 2025 - 21:45>>>> सिमरन मी तुमचे खरडवहीचे मागचे पान फाडून माझ्या खरडवहीच्या मागील पृष्ठावर चिटकवले तर कदाचित काही वर्षांनी हे मी खरडलेले नाही यावर माझा स्वतःचाही विश्वास बसणार नाही....इतके साम्य....काही आकार जसे त्रिमीतीय क्युब्ज आणि सममिती असलेल्या पर्णिका फक्त मिसिंग दिसतायत. Happy

सिमरन, झक्कास खरड!

* फोटोत एक दोन सोपी स्पेलींग होती जी फोटोतून >>>
पूर्ण हस्तलेखानाच्या काळात काही स्पेलिंग अगदी घोटून घ्यावी लागायची. committee या शब्दात तीन अक्षरे डबल आहेत हे अनेक वेळा लिहून पक्के केले होते ते आठवले.

कुमार सर,मी आताही कमिटी च स्पेलिंग commity असं लिहू शकते इतकी स्पेलिंग्ज लक्षात नाही राहात .वरती पाहा purple चं स्पेलिंग काय लिहिलंय ते Lol
आता इंटरनेट मुळे लगेच स्पेलिंग बरोबर करता येतात तेव्हा डिक्शनरी शिवाय पर्याय नव्हता.

फार्स, तुम्ही डिझाइन किंवा क्रिएटीव्ह फिल्ड मध्ये आहात का Light 1
इतकं सेम खरडपान असेल तर बघावसं वाटतय ,असेल तर येउद्या फोटो.

छन्दिफन्दि
केवढा मोठा सेम पिंच..
आमच्याकडे कडे सुद्धा मध्ये एखादा दुसरे वर्षे असे बाक रोटेट व्हायचे. आणि आमची सुद्धा दोन गुणिले दोन बाक अशी चौघांचीच चांडाळ चौकडी आजपर्यंत टिकून आहे.

या रोटेशन पद्धतीमध्ये प्रवाह मागून पुढे यायचा. ज्या दिवशी पहिल्या भागावरून पुन्हा शेवटच्या बाकावर जायचो तेव्हा सकाळी वर्गात आल्या आल्या आनंदाने आरोळी ठोकली जायची.
आणि हो, ऑफ पिरेडला मात्र पहिल्या बाकावर असलो तरी मागच्या बाकावर बसायला जायचो.

नंतर ही रोटेशन पद्धती बंद पडली, कारण बाईंनाच आमचे चेहरे पहिल्या बाकावर नको असायचे. त्यांना त्यांची हात वर करून उत्तरे देणारी लाडकी पोरेच पुढे असलेली आवडायची.

आणि मला वाटते हेच चांगले. उगाच सेहवागला द्रविड आणि द्रविडला सेहवाग बनवण्यात अर्थ नाही. जो जिथे कम्फर्टेबल आहे तिथे त्याला जगू द्यावे.

* बाक रोटेट व्हायचे
>>> आता बाक हा मुद्दा आला आहे तर माझी पण एक आठवण.

आमच्या वैद्यकीयच्या पहिल्या वर्षाला व्याख्यानगृह थेटरप्रमाणे होते आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या अनुक्रमांकानुसारच बसायचे हा नियम केलेला होता. यामुळे विद्यार्थी लिहून घेत असताना एक कारकून सगळीकडे फेरी मारून फक्त रिकाम्या बाकांवरचे नंबर अनुपस्थित म्हणून टिपून घ्यायचे.

वरील पद्धतीत काही ठिकाणी मुलगा व मुलगी शेजारी शेजारी येतात. वयाच्या 17 व्या वर्षी या प्रकाराचे भारी अप्रूप असते.
या मुद्द्यावरून एका मुलाने आमच्या वर्गाचे दोन गटात वर्गीकरण केलेले होते : नशीबवान आणि बिच्चारे Happy
(पुढे दुसऱ्या वर्षानंतर वर्गात बसण्याची पद्धत मुक्त स्वरूपाची होती).

फार्स, तुम्ही डिझाइन किंवा क्रिएटीव्ह फिल्ड मध्ये आहात का Light 1
इतकं सेम खरडपान असेल तर बघावसं वाटतय ,असेल तर येउद्या फोटो.>>> हो आधी ग्राफिक्स डिझायनर होतो नंतर वेब डिझायनिंग, ते सोडूनही आता जवळजवळ दशक ओलांडून गेलयं, सध्या एक्सेल भरण्याचे क्रिएटीव्ह काम करतो.....मालकी घर पुनर्विकासाधीन असल्याने भाड्याच्या घरात शिफ्ट करताना बहूतेक सर्वच 'रद्दी फेकून दिली, काही वह्या असतीलही पण आता त्या कुठे कोडंल्या गेलेल्या असतील त्याचा पत्ता नाही...तरीही पहातो.
एक गोष्ट मी या बाबत मार्क केली की समोरुन कुणीतरी कही एक्सप्लेन करत असेल तर किंवा एकूणच विचारमग्न अवस्थेत खरडकाम जास्त होते.

मस्तच ...
या विषयावर लेख बघूनच छान वाटले. थोडीफार सवय होती मला पण .
कॉलेजात असताना काढलेले हे एक रंगीत सापडले
PICT lady.jpg

Pages