खरडवहीतील ‘भेळ’ !

Submitted by कुमार१ on 23 March, 2025 - 07:53

शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही. परंतु त्यांचे मुलांनी ठेवलेले टोपणनाव लिहून ते वारंवार गिरवत बसणे हे मात्र आवडीने केले जाई.
बाकी बिंदूचा समूह, रेषा आणि वेगवेगळ्या आकृत्या काढायचा मात्र नाद लागला व तो अजूनही आहे. यामध्ये एकाखाली एक रेघा काढणे, गोलाकार फसलेला गोल, त्रिकोण, चौकोन, चौरस असे काहीही मनाला येईल ते रेखाटायचे आणि गिरवत बसायचे. वहीला पेन टेकवल्यानंतर हात न उचलता आणि कुठलीही रेष दुसऱ्यांदा न गिरवता काही आकृत्या काढायची कोडी त्यावेळी असायची त्यांचाही सराव केला जाई. अशा प्रकारची एक विशिष्ट आकृती (चित्र पहा ) जगात कोणालाही काढता आलेली नाही असे त्या काळी मित्रांनी सांगितले होते. तरी देखील अट्टहास म्हणून तिचा प्रयत्न करत बसायचं. याच्या जोडीला कधी एखादा विनोद लिहिला जाई तर कधी चित्रपटांची नावे.
kharad1.jpg

आतापर्यंतच्या आयुष्यात ही चित्रातली आकृती चाळा म्हणून हजारदा तरी खरडली असावी.

अधूनमधून शाळेत दंगा केल्याबद्दल मास्तरांकडून शिक्षा केली जाई आणि क्वचित मार देखील खावा लागला. मग काय, त्या दिवशीचा तो सगळा राग वहीच्या पानांवर उतरणारच. मास्तरांच्या नावाने सांकेतिक भाषेतील काही अपशब्द, असं ते लेखन असायचं. घरच्या आघाडीवर सटीसामाशी कधीतरी मुलांच्या नकळत त्यांची दप्तरे तपासण्याचे काम पालक मंडळी करायची. त्यातून मग हे मागच्या पानांवरचे प्रताप देखील उघड व्हायचे. मग त्यावरून आपली चंपी होणारच. अर्थात असं काही झालं तरी त्यानंतर फार तर आठ दहा दिवस ‘घरच्या पोलिसांना’ घाबरून वहीच्या मागच्या पानांना आराम दिला जाई. पण मुळातच जी अंगभूत खोड होती ती जाणे कसं शक्य होतं ?

कॉलेजला जायच्या वयात तर ही खरडखोड अंगात चांगलीच मुरलेली होती. त्यामुळे कॉलेजच्या वह्यादेखील याला अपवाद कशा राहणार ? फार तर बारावीचे वर्ष थोडेफार गांभीर्याने घेतल्यामुळे मागच्या पानांचे भरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहिले. पण पुढे एकदाचे व्यावसायिक शिक्षणाच्या मळ्यात जाऊन पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या सवयीने उचल घेतली. आता प्रौढत्वात प्रवेश केलेला असल्यामुळे खरड पानांच्या गुणात्मकतेत हळूहळू वाढ झाली. शालेय वयात टाईमपास किंवा निरर्थक खरडपणा जास्त असायचा. आता आपल्या वाचनातून आपल्याला आवडलेल्या निवडक गोष्टी, मार्मिक वाक्ये आणि सुविचारांची यात भर पडली. तसेच मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषा तिथे प्रेमळ भगिनीगत एकत्र नांदू लागल्या.

वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या वह्या जेव्हा वर्षाखेरीस पहिल्या जात तेव्हा हे अगदी स्पष्टपणे दिसायचे, की जवळजवळ प्रत्येक वहीची एक पंचमांश पाने तरी मागच्या बाजूने सुरुवात करून खरडीनी भरलेली असायची. वरवर पाहता एखाद्याला वाटेल की ही पाने वाया घालवली आहेत. परंतु त्यातून मला जो काही विरंगुळा होत होता ते पाहता ती माझी एक मानसिक गरजच होऊन बसली होती. सरधोपट आणि चौकटीबंद शिक्षणपद्धती कित्येक विद्यार्थ्यांना आवडत नसते. मग त्याबद्दलची त्यांची व्यक्तिगत नाराजी अशाच काही प्रकारांमधून उमटत असावी.

यथावकाश शिक्षण संपले आणि पोटापाण्याचा कामधंदा चालू झाला तेव्हा क्षणभर असे वाटले होते की आता आपली ही खरड सवय बहुदा संपुष्टात येईल. पण कुठलं काय? साधारण दरवर्षी एखाद दुसरी डायरी घरी येऊन पडायची. तिचा वापर करताना बालपणापासून मुरलेलं तेच धोरण आता देखील चालू राहिलं. डायरीच्या पुढच्या बाजूने ज्या काही दैनंदिन व्यावसायिक/ व्यावहारिक नोंदी असायच्या त्या केल्या जायच्या परंतु फावल्या वेळात डायरीची मागची बाजू वर करून पाने उलटून तिकडे आपली खरड पुन्हा एकदा जोमाने चालू झाली. असेच एकदा कागदावर पेनाची फिरवाफिरवी करताना एक भन्नाट कल्पना सुचली. एरवी आपण कुठलाही मजकूर डावीकडून उजवीकडे शिस्तीत लिहित जातो. तो मजकूर जर आरशासमोर धरला तर त्याची त्यातली प्रतिमा उलटी दिसते. मग गंमत म्हणून वहीवर उजवीकडून डावीकडे आणि सर्व अक्षरे उलटी काढत काही गमतीदार लेखन करत बसायचो. हळूहळू त्यात गती आली आणि एकदा एका मित्राला ते दाखवले. त्यावर तो म्हणाला,

“अरे, छानच की. अशी सवय लिओनार्दो दा विंचीला होती, बरंका”, असे म्हणून त्याने मला आपले थोडेसे खुलवले.

संगणकपूर्व काळात हस्तलेखन ही बऱ्यापैकी गरज होतीच. त्यामुळे उपयुक्त लेखनाच्या जोडीला हे निरर्थक खरडकाम देखील उत्साहाने चालायचे. संगणकयुग अवतरल्यानंतर हस्तलेखनाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हे खरे. परंतु गेल्या तीन-चार वर्षात असे जाणवले की गरजेपेक्षा जास्त काळ संगणकात डोके खूपसून बसणेही बरोबर नाही. त्यावर जे काही वाचन झाले त्याचे मनन करता करता त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा मुद्दे पुन्हा एकदा कागदावर लिहायला सुरुवात केली आहे. दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणाने अनेक पाठकोरे कागद जमा होत असतात. ते गोळा करून एका पॅडवर लावून ठेवलेत आणि त्याची कोरी बाजू ही अशा खरडीसाठी वापरतोय आणि हळूहळू त्याची आवड पुन्हा एकदा वाढू लागलेली जाणवते आहे.

एकेकाळी आपण केलेल्या अशा खरडी जर जपून ठेवल्या तर कालांतराने सहज ती वही उघडून त्या पाहणे हे मात्र जबरी स्मरणरंजन असते. विशेषतः जर जुन्या खरडी पाच-सात वर्षे उलटून गेल्यानंतर चाळल्या तर कधी आपलेच आपल्याला हसू देखील येते. त्या खरडीमध्ये आपण करून ठेवलेल्या गमतीजमती पाहून आपण अगदी अचंबित होतो.

“काय हो, असे असते तरी काय खरडींमध्ये तुमच्या?”
असे जर तुम्ही विचाराल तर त्याचे प्रथमदर्शनी उत्तर हे असेल, की काय नसते या खरडींमध्ये ते विचारा !

फोनवर कोणाशी बोलता बोलता लिहून घेतलेले अन्य कोणाचे नंबर्स आणि पत्ते, एखाद्या कामाची/घटनेची स्मृतिनोंद, आवडत्या व्यक्तींची अनेकदा गिरवलेली नावे, सुविचार अन सुवचने, बाळबोध स्वरूपाची चित्रकला अन फरकाटे, गाण्यांचे मुखडे, काही अक्षरे जुळवून केलेली मजेदार दीर्घरुपे, सामान्य बेरीज वजाबाक्या अन गुणाकार भागाकार, काही कुजबुज स्वरूपाचा मजकूर . . . आणि कधीतरी डोसकं फिरल्यागत या सगळ्यावर अत्याचार करणाऱ्या संपूर्ण पानभर मारलेल्या मोठाल्या फुल्या, अशा असंख्य गोष्टी इथे एकमेकांमध्ये घुसलेल्या असतात. काही परस्परविरोधी गुणधर्माच्या गोष्टी तर शेजारी शेजारी सुखाने नांदत असतात. एखाद्या रम्य सुभाषिताच्या पोटात काटकोन त्रिकोणाचे टोक शिरलेले असते किंवा एखाद्या झकास विनोदाशेजारीच एखाद्या गाजलेल्या शोकांतिकेचे नाव कोरलेले असते. इथल्या लेखनात शिस्त नावाला सुद्धा नसते. गिचमिड हा खरडीचा स्थायीभाव. आकृत्या आणि शब्द यांची एकमेकात अक्षरशः घुसखोरी झालेली असते. लिहिण्याची पद्धतही अत्यंत मनमानी. सरळ, उभे, आडवे, तिरके असे कुठल्याही कोनातून इथे लिहिले जाते. तसेच पेन, बॉलपेन, पेन्सिल आणि कधीकधी स्केचपेन ही सर्व लेखन साधने वापरुन त्यांचे एकमेकांत छानपैकी जुंपलेले फराटे पण असतात.

लहान मुलाचे हस्ताक्षर खराब असले की त्याला आपण, “काय रे, कुत्र्याचा पाय मांजराला आणि मांजराचा पाय डुकराला”, या प्रकारची उपमा देतो अगदी तसाच हा प्रकार असतो. पण आपण या सगळ्याकडे जर चिकित्सक चष्म्यातून पाहिले तर मग त्यातले आंतरिक सौंदर्य जाणवते. हा सगळा सावळा लेखनगोंधळ कालांतराने पाहणे हे फारच मनोरंजक असते आणि कधीकधी ते चिंतनीय सुद्धा ठरते. नित्य अशी ‘खर्डेघाशी’ करणाऱ्या माणसांच्या दृष्टीने ते त्यांचे ‘खरड-साहित्यच’ म्हणायला हरकत नाही !

शैक्षणिक वयातील अशी खरडपाने आता जवळ नसल्याचे कधीकधी दुःख होते. एक दोन नमुने तरी ठेवायला हरकत नव्हती असे राहून वाटते. पदवी शिक्षणानंतरच्या विवाहपूर्व एकटेपणाच्या काळातील काही खरड-मनोगते तशी हृद्य होती पण ती केव्हाच रद्दीत गेली. असो. तेव्हाच्या आयुष्यात प्रेमप्रकरण वगैरे काहीच न घडल्याने त्या आघाडीवर मात्र खरडवही आसुसलेलीच राहिली. जर का ते घडते तर मात्र या पानांवर प्रेमाचे आलाप अगदी ओसंडून वाहिले असते, हे काय सांगायला पाहिजे? आयुष्याच्या पुढील टप्प्यात केलेल्या काही खरडी मात्र अजूनही जवळ आहेत त्यातला हा एक नमुना :
kharad2.jpg

कोविडपर्वात मायबोलीवर विविध शब्दखेळ सादर केले होते. त्यातील काही प्रकारांची व्यक्तिगत तयारी करताना पुन्हा एकदा भरपूर खरडी झाल्या होत्या त्यातली ही एक आठवण :

khara3.jpg

कोविड ऐन भरात असताना 2020मध्ये ऑनलाईन ‘Wordle’ या इंग्लिश शब्दखेळाचा आंतरराष्ट्रीय प्रसार खूप जोरात झाला आणि मी देखील त्याचा आयुष्यभरासाठी व्यसनी झालो. पुढच्या पाच वर्षांमध्ये वर्डलचे अनेक सुधारित अवतार आले आणि हळूहळू त्यांच्याही प्रेमात पडलो. गेल्या वर्षभरात ‘Clue Hurdle व Phrazle’ या दोन्ही प्रकारात मुरलोय. फ्रेजलमध्ये जे नवनवे अनौपचारिक (अमेरिकी) वाक्प्रचार सापडतात ते लाजवाब असतात. मग आपले कोडे सुटल्यानंतर जो वाक्प्रचार सापडतो तो हाताने कागदावर स्टायलीत लिहून ठेवण्यातली मजा काही औरच असते. असं काही गवसलेलं आणि आवडलेलं लिहीत गेलं की लिहिता लिहिताच ते ‘आपलं’ होऊन जातं असाही स्वानुभव ! अशा खरडीनी भरलेल्या सुट्या कागदांवरही इतके प्रेम बसते की ते लवकर रद्दीत टाकवतही नाहीत. मग त्यांची छानशी चळत पॅडवर साठत जाते.

khara4.jpg

२० वर्षांपूर्वी एका मासिकात एका पत्रकारांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी दैनिकातल्या दोन स्पर्धक पत्रकारांची एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. त्या दोघांपैकी एक होता दुपारपाळीचा तर दुसरा रात्रपाळीचा. एकाची कामाची पाळी संपली की त्याच टेबल खुर्चीवर दुसरा येत असे. टेबलाच्या खाली एक प्लास्टिकची कचराटोपली होती ज्यात ही मंडळी काही खरडून टराटरा फाडलेले कागद टाकून देत. तर या दोघांची एक गंमत होती. आपण कामावर आलो की जरा वेळाने आधीच्या माणसाने जे काही लिहून फाडून कचऱ्यात टाकलेले कागद असायचे ते मुद्दामून काढून बघायचे. हेतू असा, की हा प्राणी जो मजकूर फाडून टाकतोय तो नक्की काय स्वरूपाचा असतो?
या उद्योगातून ते दोघे एकमेकांचे व्यक्तिमत्व जोखत असत असे त्या लेखकांनी म्हटले होते.

या गोष्टीवर जरा मंथन केल्यानंतर माझ्याही मनात एक विचार आला. ज्यांना लेखनाची सवय आणि आवड आहे अशांच्या बाबतीत त्यांनी खाजगीत केलेल्या अर्थपूर्ण हस्तलेखन आणि निरर्थक खरडलेखन या दोन्ही गोष्टी शक्य झाल्यास पाहायला हव्यात. अर्थपूर्ण लेखन हे मुद्द्याला धरूनच असणार, पण खरं सांगायचं तर ते त्या व्यक्तीचे बाह्यरुप झाले. त्यात वेळप्रसंगी विविध आभासही जाणवणार आणि सार्वजनिक लेखनाच्या बाबतीत कधीकधी वाचकशरणता देखील. परंतु त्या माणसाचे सुप्त अंतरंग समजून घ्यायचे असेल तर त्याच्या निरर्थक खरडी बघण्याला पर्याय नाही. कदाचित अशा माणसाचे खरे व्यक्तिमत्व त्या खरडकामातूनच समजू शकते का, असा एक प्रश्न मनात येतो. विचारपूर्वक स्वतःसाठी खरडलेलं जे काही असतं ते खऱ्या अर्थाने स्वांतसुखाय व प्रामाणिक असतं. अलीकडच्या काळात विद्यार्थीवर्ग वगळता हस्तलेखन हा प्रकार बऱ्यापैकी संपत चाललेला आहे. तरीपण जर एकेकाळी कोणी केलेल्या अशा खरडी जर योगायोगाने नजरेस पडल्या तर त्या बघायला नक्कीच मजा येईल आणि त्यावर थोडाफार विचारही करता येईल.

आपल्या वाचकांपैकी कुणाला अशी सवय होती किंवा आहे का? असल्यास आपल्या खरडीचे (आणि सार्वजनिक करायला हरकत नसलेले) काही नमुना फोटो इथे जरूर दाखवा. ते पाहणे रोचक असेल.

मित्रहो,
अशी आहे ही कागदावरील खरडाखरडीची गंमतजंमत अर्थात, फावल्या वेळात तिथे बनवलेली एक लेखन-भेळ. ही भेळ तुमच्यासमोर सचित्र सादर केली. आता ती चवीला कशी वाटली, हे मात्र तुम्हीच सांगायचे आहे !
***********************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. >> मला पण.
शालेय वयात फुलं पानं असायची आणि कॉलेजच्या वयात कविता.

… उजवीकडून डावीकडे आणि सर्व अक्षरे उलटी + आरसा ….

हे भारी आहे. करून बघीन.

नोंदी वगैरे नाही लिहित पण डायरी-वहीच्या शेवटच्या पानांवर Doodling करण्याची सवय आहे. अर्थहीन आणि unplanned काहीही रेघोट्या काढत बसायचो,

अजूनही करतो, बोअर मीटिंग्स, सेमिनार वगैरे मधे गंभीर चेहरा ठेवून. Happy

माणसाचे खरे व्यक्तिमत्व त्या खरडकामातूनच समजू शकते का, असा एक प्रश्न मनात येतो.>>> पूर्ण व्यक्तिमत्व नाही पण एकंदर अंदाज बांधता येऊ शकतो जसा आवडीनिवडीवरून किंवा बोलण्यावरून स्वभावाचा बांधता येतो.
वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. >> मला पण.>>+1
मागून पानं भरायची सवय मला अजूनही आहे . त्यात लहान डिझाईन्स अगदी टाईमपास म्हणून काढलेले भुवयांसहित डोळे बऱ्याच पानावर दिसतात . फोटो टाकला असता पण काही नोंदी खूप पर्सनल आहेत आणि मी खूप सिक्रेसिव. पण माझ्या डायरीतही लपवण्यासारखं काही नसतं जास्त करून कोट्स आवडती वाक्य असतात पण तरीही ती कोणी वाचू नये असंच वाटतं.

अरे वाह मस्त...
या विषयावर एवढा मोठा लेख बघूनच छान वाटले.

मलाही बेकार सवय होती वहीच्या शेवटच्या पानांवर चित्रे काढायची. माझी चित्रकला तर अशी होती की चित्रकलेच्या बाई माझी वही भिरकावून द्यायच्या. पण तरीही माझी शेवटची पाने विनोदी चित्रांनी भरलेली असायची कारण मी त्या चित्रांना कॅप्शन मजेशीर द्यायचो आणि त्यासाठी फेमस होतो.

एक खेळ आम्ही वहीच्या मागच्या पानांवर खेळायचो तो म्हणजे चित्रविचित्र फॉन्ट मध्ये एखादा शब्द लिहायचा आणि समोरच्याने तो ओळखायचा. मी आणि माझ्या एका मित्राने हा खेळ सुरू केला होता आणि हळूहळू तो वर्गातील रिकामटेकड्या पोरांमध्ये फेमस झाला होता.

तसेच आम्ही ऑफ पिरियडला वर्गात जुगार खेळायचो. हो कल्पना आहे वाईट सवय होती. पण तेव्हा होती, आता नाही. तर त्याचे हिशोब मागच्या पानांवर लिहिले जायचे. वर्गातली काही सिन्सिअर मुले सुद्धा अध्येमध्ये जुगार खेळायला यायचे. पण ती सिन्सिअर असल्याने वही माझी वापरली जायची.

एकदा आमच्या इंग्लिशच्या बाईंनी माझी ती वही पकडली होती. वही पूर्ण चाळली. मला वाटले आता मजबूत ओरडा पडणार. पण त्यांनी त्यापेक्षा वाईट केले. मला म्हणाल्या तुझ्याकडून मला वेगळ्या अपेक्षा सुद्धा नाही म्हणून तुला ओरडणार सुद्धा नाही.
पुढचे कित्येक दिवस महिने वर्ष वर्गातील मुले मला त्यांच्या या डायलॉग वरून चिडवायचे Happy

शाळेत / कॉलेजात शिकवत असताना आणि नंतर मीटिंग/ ट्रेनिंग चालू असतांना काही खरडण्याची बहुदा (सुमार) चित्र काढायची सवय होती... ते आठवले. फोन वही अगदी पूर्वी घरात एक असायची... त्यातही कोपरे, मागची पाने खरडल्याचे आठवते आहे. फोन वर बोलताना.. वायरशी शाळा किंवा पेनची चाळा..
पुढे त्याला doodling म्हणतात हे कळले. तसेच तुम्ही जे व जसे खरडता त्यावरून तुमची त्यावेळची मनस्थिती कळते या आशयाचे पण काही वाचनात आले होते..
आजकाल पेन क्वचित हातात घ्यावे लागते.. Happy

वरची केशरी / मातकट रंगाची आकृती आहे तसे प्रकार आम्ही पण खूप खेळायचो...

दुसरा अत्यंत वेळ काढू प्रकार म्हणजे रांगोळीचे ठिपके काढून चौकोन बनवायचे... वर्गात अत्यंत कंटाळवाणे शिक्षक/ शिकवणे चालू असताना हा प्रकार गुपचूप चाले.. Happy

Happy
अगदी मस्त लिहिले आहे. मी कंटाळवाण्या मीटिंग मध्ये हमखास रांगोळी, फुले, ती वरची क्रॉस ची आकृती असे काढत बसते.
शाळेत असताना वहीच्या शेवटच्या पानावर,

खूप झोप येत आहे,
झोप: आंतरिक शक्तीचा झरा
क्रिकेट स्कोअर, चित्र विचित्र नावे, हिंदी गाण्यांच्या ओळी, आमचे एक ट्युशन चे सर मधेच आत घरात जाऊन नाश्ता करून यायचे, तर ते काय असेल हे वासावरून ओळखून तो लिहिलेला पदार्थ ...अशा मज्जा मज्जा असायच्या.
शेजारील मैत्रिणीशी गप्पाही लिखित स्वरूपात मारलेल्या असायच्या. कारण वर्गात बोलायला मनाई.

Happy
पण हे सगळे पब्लिकली दाखवावेसे मात्र वाटणार नाही.
ती एक खास आपली जमाडी जंमत असायची ना...

अकरावीत असताना एकदा वहीत मी गाणी लिहिली मागच्या पानांवर. पूर्ण नाही, सुरवातीच्या दोन चार ओळी. चार पाच पाने गाणी लिहिलेली.
एकदा वर्कशॉप मध्ये ( अकरावी बारावीला मी व्होकेशनल कोर्स निवडला होता जीवशास्त्राऐवजी) काही नोंदी करताना त्या वहीत केल्या. आणि त्या तपासण्यासाठी सरांनी माझी वही घेतली. ती पडली उचलून ते बघताफ तर शेवटी त्यांना ती गाणी दिसली. अरे काय रे हे? गाणी लिहितोस वहीत असे म्हणत त्यांनी पाने उलटली एकामागुन एक. मला काही सुचतच नव्हते काय बोलावे. त्यांच्या सोबत वर्कशॉप अटेंडंट होता. तो म्हणाला कॅसेट रेकॉर्डिंग साठी लिहिले असतील. मी लगेच आवंढा गिळुन हो हो अशी मान हलवली, आणि तोंडातून केविलवाणा हो निघाला.
सरांनी "हंss, वेगळी वही करावी ना त्यासाठी, ही पानं काढुन टाक" असे म्हणुन विषय मिटवला.

मी सुद्धा या कळपात… मागची पाने भरणे शालेय काळापासून ते अजुनही ऑफिसच्या नोटपॅड मध्ये चालूच आहे. उलटे लिहिणे, डाव्या हाताने लिहिणे, दोन्ही हाताने एकाचवेळी लिहिणे …

वा ! एकाहून एक सुंदर असे मस्त प्रतिसाद आलेले आहेत.
त्याबद्दल सर्वांना धन्यवाद !
अनेकांना हा चाळा असल्याचे पाहून बरे वाटले Happy
तसेच वर्गातील कंटाळवाण्या तासाला किंवा सक्तीच्या कंटाळवाण्या कार्यालयीन बैठकीला वेळ काढण्याचे विविध मार्ग वाचूनही स्मरणरंजन झाले.
हे खरे आहे की आपल्या सर्व खर्डी सार्वजनिक करता येणार नाहीत आणि खाजगी खर्डीमध्ये तर आपले खरे अंतरंग दडलेले असते.

क ट्युशन चे सर मधेच आत घरात जाऊन नाश्ता करून यायचे, तर ते काय असेल हे वासावरून ओळखून तो लिहिलेला पदार्थ >>
:D. हे म्हणजे फारच झाले ना!!

पहिल्या वर्षाला 'कम्युनिकेशन स्किल्स' च्या शिक्षिका होत्या. इतक्या कंटाळवाण्या स्वरात एक सुरी भाषण चालू राहायचं त्यांचं..
आम्ही एकदा असच ३-४ जण मागे बसून गुपचूप ठिपक्यांच्या खेळ खेळत बसलेलो. नेमकं त्यांनी पकडलं.... पण माझ्या बाजूला बसलेल्या दोघांना, ते चांगलेच आडदांड होते. माझ्यावरती बहुदा तिला (भूत) दया आली असावी म्हणून सोडून दिल असावं..

लेखातल्या पहिल्या चित्रांत जी आकृती आहे ती दिलेल्या अटीनुसार काढता येत नाही यामागे काहीतरी गणिती सूत्र आहे असे कोणीतरी एकदा सांगितले होते. पण ते आता नीट आठवत नाही.
( अर्थात एक लबाडीचा मार्ग वापरून, म्हणजे ती आकृती जरा विस्तारित करून त्यांच्या अटीनुसार काढता येते असेही काहीतरी आहे ?).

कोणाला नक्की माहिती असल्यास सांगा.

Happy हो छंदिफंदी...
आम्हाला पण इतकी भूक लागलेली असायची खरे तर त्या वेळेस...सकाळी नऊ ला!
त्यांची बायको पडद्याच्या आडून त्यांना खूण करायची. ते त्यांच्या आधी आमच्याच लक्षात यायचे! " सर.... , आत बोलावत आहेत.....!" आमच्यातलीच कुणीतरी भोचक सांगायची. आम्ही मग रजिस्टरचे शेवटचे पान उघडून त्यावर "पोहे", "थालिपीठ" असे लिहायचो.
Lol

हो ती हात न उचलता काढता येत नाही.. पण त्याला एक फाटा फोडून एकदा पेन्सिल बाहेरून फिरवून काढायची.. पण ते काही खरे नाही.

.आम्हाला पण इतकी भूक लागलेली असायची खरे तर त्या वेळेस...सकाळी नऊ ला! >>> बिचारी मुलं
त्यांनी पण आधी खाऊन घ्यायचं ना.. नाहीतर नंतर खायचं .. रोज काय.

वहीची मागची पाने भरण्याच्या शालेय उद्योगांमध्ये आम्ही मुले चौकटी आखून एक विमानांचा खेळ खेळायचो.
त्यामध्ये मिग, नॅट व अन्य दोन प्रकारची विमाने होती; त्यांची नावे विसरलो.

छान होता तो खेळ. बाकावर शेजारी बसले असता थोडंफार सांकेतिक बोलून तो गुरुजींच्या नकळत खेळता यायचा.
1971 च्या भारत -पाक युद्धानंतर तो खेळ एकदम तेजीत होता.

मस्तच ...
या विषयावर एवढा मोठा लेख बघूनच छान वाटले. +१२३

वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. >> +१
माझ्या बहुतांश वह्यांमधे डूडल्स आणि कविता असायच्या. कधीकधी कोणाचा फोन नंबर, एखादा रिमाइंडर वगैरे. कॉलेजात रफ कोडिंग पण केलेलं असायचं Happy
एका वहीत तर चक्क स्वतःशी खेळलेला फुलीगोळा पण सापडला मला मागाहून Lol

मी पण खेळलाय फुली गोळा स्वतःशी . Happy दुसरयांशी तर सगळेच खेळतात पण स्वतःशी फुली गोळा खेळणारे लेजेंड असतात Lol

डॉक्टर साहेबांचा एका वेगळ्याच विषयावरचा लेख. ही खरडवहीची भेळ आवडली आणि इतरांनी त्यात भर घातल्याने चटकदार झाली आहे.

मला वहीच्या पानावर यादृच्छिकपणे (म्हणजे मराठीत randomly) बिंदू काढून ते रेषेने जोडून वेगवेगळ्या भौमितिक आकृती करायला आवडायचे. प्रत्येक वेळी निराळीच आकृती तयार व्हायची. रंगीत शाईचा पेन उपलब्ध असेल तर त्याच आकृतीवर वेगळ्या रंगाचा वेगळा पॅटर्न तयार होत असे.

शाळेत असताना प्रत्येक विषयाला वेगळी वही होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात एकच "भेळ" वही वापरायला लागलो. दिनांक आणि विषयाचे नाव लिहून नोट्स काढायचो. पुढच्या लेक्चरसाठी नेहमी वहीच्या उजव्या पानावरूनच सुरवात करायचो, डावीकडील पानावर अगदी एक दोन ओळीच लिहिल्या असल्यातरी हा नियम पाळायचो कारण शोधणे तुलनेने सोपे व्हायचे. वही भरली की १, २, ३ असे क्रमांक द्यायचो. अभ्यासाला बसताना वह्यांचा गठ्ठा घेऊन बसावे लागे. परंतु एकच वही घेऊन महाविद्यालयात जायचे हे फारच "कूल" वाटायचे त्यापुढे हा त्रास काहीच नसे.

ह्या लेखाच्या निमित्ताने थोडे फार स्मरणरंजन झाले. Happy

छान !
* यादृच्छिकपणे
आता हा शब्द लिहून गिरवण्यात येईल Happy

>>अशी आहे ही कागदावरील खरडाखरडीची गंमतजंमत अर्थात, फावल्या वेळात तिथे बनवलेली एक लेखन-भेळ. ही भेळ तुमच्यासमोर सचित्र सादर केली. आता ती चवीला कशी वाटली, हे मात्र तुम्हीच सांगायचे आहे !>>

कुमार सर,
भलतीच नॉस्टॅल्जीक करुन गेली हो तुमची ही 'भेळ'!

शाळेत वहीच्या शेवटच्या पानांवर खरडी वगैरे कधीच लिहिल्या नाहीत. (तशा त्या घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने समाधानकारक म्हणता येतील अशा प्रकारे जिथे लिहायला पाहिजे होत्या त्या पुढच्या पानांवरही कधीच लिहिल्या नाहीत हा भाग वेगळा 😀) पण तो 'खास' विभाग वेगळ्याच गोष्टींसाठी वापरात होता.

आमच्या शाळेत 'ढ' किंवा 'हुशार' असले 'फालतु' निकष न लावता वर्ग शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांच्या 'उंची' नुसार (टिंगु लोक्स पुढे, लंबु लोक्स मागे अशी) बैठक व्यवस्था केली जायची त्यामुळे 'L.L.B' (Lords of the last benches) ही मानाची पदवी इयत्ता पाचवीत असतानाच माझ्यासहीत अन्य काहीजणांना मिळाल्याने आमच्या वहीच्या शेवटच्या पानांवर फुली-गोळा हा 'युनिव्हर्सल' प्रकार तर असायचाच पण त्या व्यतिरिक्त सापशिडी आणि लुडोचे बोर्डही आम्ही चितारायचो. फासे वापरता येणे शक्य नसायचे म्हणुन वर्गात बसल्या बसल्या 'क्रिकेट' खेळण्याचा जो प्रचलीत प्रकार होता, तो म्हणजे एखाद्या पुस्तकाचे कुठलेही पान रँडमली उघडायचे आणि ० ते ९ पैकी जो कुठला पृष्ठक्रमांक येईल तेवढ्या 'रन्स', ह्याच हिशोबात सापशिडी किंवा लुडो खेळताना जो पृष्ठक्रमांक येईल तेवढी घरे सोंगटी (जी सहसा खोडरबर असायची) पुढे सरकवायची असे चालायचे 😀

बाकी चित्रकला हा भयंकर आवडीचा विषय असल्याने ज्या कुठल्या विषयाच्या पाठ्य पुस्तकांत आकृत्या, चित्रे, रेखाचित्रे असतील त्यांत (बॉलपेनने निळा किंवा काळा) रंग भरण्याचा छंद खुप दांडगा होता राव! लैच मजा यायची त्यात. विज्ञान हा विषय आवडीचा होताच पण इतिहास आणि भुगोलासारखे रुक्ष विषयही माझ्या आवडीचे होण्यात कदाचीत ह्या छंदाने महत्वाची भुमिका बजावली असावी!

मेंदु, स्पायरोगायरा पासुन नेहरु, गांधी, मौलाना आझाद, हिटलर, मुसोलीनी पर्यंत जे जे कोणी तावडीत सापडले त्यातल्या कोणालाच रंगवायचे सोडले नाही! त्यात बाकी काही क्रिएटीव्हीटी असो की नसो पण चित्रातल्या प्रत्येकाच्या गालावर एक मोट्ठा 'मस', दिसत असलेल्या दातांपैकी एखाद दोन दात किडल्यासारखे गडद करणे, एका डोळ्यावर आय पॅच, गांधीजींसारखा टकलु असेल तर त्याला टोपी किंवा विपुल केशसंभार, वेणी वगैरे (ह्या अत्याचारातुन झाशीची राणी किंवा अन्य स्त्री पात्रे देखील सुटली नाहीत बरं का 😀)

दुर्दैवाने कलेची पारख नसलेल्या आमच्या पालकांनी रद्दीत दिलेल्या त्या अलौकीक कलाकृतींचे प्रत्यक्ष दाखले उपलब्ध नसल्याने केवळ त्या कलाकारीतेची कल्पना यावी म्हणुन काही प्रतिकात्मक नमुने खाली पेश करत आहे, कृपया ते गोड मानुन घ्यावेत 😂

संजय भावे भारी आहे Proud

मला यावरून घरी खूप ओरडा पडायचा.. चित्रकला माझी वाईट होती. पण आधीच असलेल्या चेहऱ्यांना दाढी मिशी चष्मा तीळ वगैरे काढणे सोपे जायचे आणि काहीतरी कला केल्याचे समाधान मिळायचे.

कोणी हसत असेल त्याचा एक दात काळा करून त्याला दातपडके बनवणे हा फेवरेट आयटम होता Proud

संजय ते आहेत.. दिव्यदृष्टी मला कशी असेल Happy

जोक्स द अपार्ट,
त्यांनी शेअर केलेल्या फोटोतील तिन्ही व्यक्ती आता हयात नाहीत. मी राक्षस गण असण्याची शक्यता आहे जे ते मला दिसत आहेत.

>>ऋ, तुला दिव्य दृष्टी आहे की काय?>>
अय्यो... ऋ लाच प्रतिसाद द्यायला आलो होतो आणि हे वाचले. ती इमेज postimg वरुन टाकली होती, पण सध्या त्या साईटचे आय.पी. पुल्स बर्‍याच देशांत ब्लॉक केले आहेत म्हणे त्यामुळे दिसत नसावी... योग्य तो बदल केला आहे, आता दिसत आहे का?

Pages