१. 'April '. जॉर्जिया.
एक गायनॅकोलॉजिस्ट आहे. डिलीव्हरीच्या दरम्यान एका बाळाचा मृत्यू होतो. हॉस्पिटलकडून हिच्यावर चौकशी कमिटी बसते. या चौकशीच्या सेशन्सच्या वेळी मागं सतत घड्याळाची तणावपूर्ण टिकटिक ! ती टिकटिक काढून टाकली असती तर या सेशन्स दरम्यानचा निम्मा इंपॅक्ट कोसळला असता. ही चौकशी एका बाजूला चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तिचं तिचं आयुष्य चाललेलं आहे.
या देशात ॲबॉर्शनला, गर्भनिरोधक गोळ्यांना कायद्यानं बंदी असते. फसवल्या गेलेल्या, नातेवाईकांकडूनच सेक्शुअल ॲब्युज झालेल्या स्त्रिया, मुली. त्या गर्भ पाडण्यासाठी त्या नाही नाही ते उपाय करत असतात. त्यात मृत्यूचे चान्सेस खूप. शिवाय खूप कमी वयात होणारी लग्नं, स्त्रियांमध्ये वैद्यकशास्त्राचं अज्ञान. म्हणून ही डॉक्टर कायद्याविरूद्ध जाऊन खेडोपाडी ॲबॉर्शन्सना मदत करत फिरत असते, अवेअरनेस निर्माण करत असते. कारण ती डॉक्टरकीची नीतिमूल्यं कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानते. अर्थात हे सगळं गुपचूप करावं लागत असतं.
असले फोकनाड कायदे केले की खाली तळागाळातील स्त्रियांनाच दुष्परिणाम भोगावे लागतात. पुरूषाचं काय, करून सवरून रिकामा. तर महत्वाच्या विषयावरचा सिनेमा आहे. आणि चांगला आहे.
यात आणखी एक म्हणजे, यात एका सीनमध्ये एक आख्खा ढग भुईवर उतरलेला दाखवलाय. आणि तो ढग बरसून पूर्ण रिकामा होईपर्यंत सलग चित्रण आहे ! कसा कुठे कॅमेरा लावून ठेवला आहे, काय कळत नाही.
२. 'May be it's true what they say about us'. स्पॅनिश,फ्रेंच. एक सायकॅट्रिस्ट आणि तिच्या दोन मुली. आई व थोरली टीनेजर मुलगी यांच्यात प्रदीर्घ दुरावा, कडवटपणा साचून राहिलेला आहे. ही थोरली मुलगी एका कल्टच्या नादी लागते. काही काळाने घरी परत येते. आणि नंतर तिला शोधत पोलिस येतात. मग हळूहळू उलगडत जातं रहस्य. कथेची बांधणी, पकड फारच मजबूत आहे.
सायकॅट्रिस्ट आईच्या भूमिकेतली अभिनेत्री जबरदस्त आहे. खूप संयमानं आणि परिपक्वतेनं सगळं हाताळते. खरंतर तिनं एकटीनं हा सिनेमा तोलून धरलाय. भोंदू बुवांकडून लैंगिक शोषण. ड्रग ॲब्युज. असा विषय. 'आश्रम' या वेबसिरीजच्या दोन सिझनमध्ये मिळून जेवढा कंटेट आहे, त्यापेक्षा जास्त ताकदीनं हा दिग्दर्शक विषयाला भिडलाय. कुठंही किंचितही फालतूपणा नाही.
३. 'Nothing in its place'. तुर्की.
वैचारिक, राजकीय सिनेमा आहे.
१९७८ साली तुर्कस्तानात डाव्या व उजव्या गटांत धुमश्चक्री. देशभर हिंसेचं लोण पसरलेलं असतं. अशात एका घरामध्ये पाच डाव्या क्रांतिकारकांची एक मिटींग. यापुढे चळवळ कशी पुढे न्यायची? हिंसेचा मार्ग सोडून द्यायचा, राजकीय मार्गानं पुढे जायचं, आणि त्यासाठी एक मॅगझिन काढायचं?, या अनुषंगाने खास डाव्या शैलीतला तुंबळ बौद्धिक वादविवाद.! त्यावेळची तुर्कस्तानातली परिस्थिती काय होती याचा, या चर्चेतून अंदाज येतो.
उजव्यांचे दोन एजंट त्या मिटींगवर हल्ला करतात. 'राष्ट्रद्रोही'. 'रशियाचे एजंट'. वगैरे शेलकी विशेषणं वापरत हे एजंट एकतर्फी भाषणं ठोकतात.
'तुम्ही खूप वाचता-लिहिता, जगाकडे तुच्छ नजरेनं बघता. आमचे लोक मरतात तर त्याचं काय येतं का तुमच्या वर्तमानपत्रात? तुम्ही कम्युनिस्ट कोट्यातून भरती झाले का विद्यापीठात?' वगैरे आरोप.! या आरोपांवेळी या डाव्यांच्या तोंडात बोळे खुपसलेले असतात की त्यांनी प्रतिवाद करू नये म्हणून. कारण बौद्धिक वादविवाद हे काही उजव्यांचं क्षेत्र नाही. राष्ट्रवाद राष्ट्रवाद म्हणून आरडाओरडा करायचा आणि त्याखाली सगळं झाकून टाकायचं, हा हातखंडा.
सध्या तुर्कस्तानात एर्दोगान नामक भामट्याची एकाधिकारशाही आहे. त्यात असला सिनेमा काढून हे लोक रडारवर आले असणार.
४. 'Dog on trial'. स्वित्झर्लंड. फ्रेंच. माणसांना चावल्यामुळे एका कुत्र्यावर केस होते. कुत्र्याला कोर्टात उभं केलं जातं. साक्षी पुरावे सादर केले जातात. सगळ्या धर्मांच्या धर्मगुरूंची एथिक्स कमिटी बसवली जाते. हा कोर्टरूम ड्रामा कॉमेडी अंगानं जातो. यात दाखवलेला कॉसमॉस नावाचा कुत्रा एकदम क्युट आहे.! कुत्र्याला मारायचं की नाही हा निर्णय जज घेणार असतो. कुत्र्याला एका बिवेहरियीस्टकडे सोपवले जाते काही दिवस. तो त्याची भाषा, वर्तणूक जाणतो. जंगलातले कोल्हे जसा चंद्राकडे बघून सूर लावतात, कुत्रेही रात्री तसाच व्याकूळ सूर लावतात. तीस हजार वर्षांपासून त्यांच्या गुणसूत्रांतून वाहत आलेला सूर.! वकील महिलेचा, म्हणजे यातील नायिकेचा युक्तिवाद जोरदार आहे. आपण कुत्र्यांना आपल्या गरजेसाठी माणसाळवलं, आणि ते त्यांच्या निसर्गनियमानुसार वागले तर शिक्षा करणारे आपण कोण? कुत्र्यांना हक्क आहेत ! वस्तू नाहीयेत ते. बाकी, या सिनेमातून कुत्र्यांच्या मनातलं काही समजतं की नाही माहित नाही. पण माणूसजातीबद्दल मात्र बरंच काही समजतं.
५. 'Brief History of a Family.' चीन. मँडरीन.
एक सधन जोडपं. नवरा बायोलॉजिस्ट. बायको फ्लाईट अटेंडंट. चीनच्या वन चाईल्ड पॉलिसीनुसार त्यांना एकच मुलगा आहे. तो हॅपी-गो-लकी टाईपचा आहे. त्याला आपल्या श्रीमंत परिस्थितीची फारशी किंमत नाही. या मुलाचा एक क्लासमेट असतो. त्याचा पूर्वेतिहास काहीसा गूढ आहे. तो परिस्थितीनं गरीब, पण चलाख असतो. तो हळूहळू या जोडप्याचा विश्वास संपादन करतो, त्यांना चांगलंच इंप्रेस करतो. मग ते त्या मुलाला दत्तक घ्यायचा विचार चालू करतात. त्यामुळे स्वतःच्या मुलाकडे यांचं दुर्लक्ष. त्याला आपल्या हक्कावर गदा आल्यासारखं वाटतं. त्यातून काही दुर्दैवी घटना घडतात. हा एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा आहे, बघण्यासारखा आहे. बाकी, चीनमधील शहरांची इमारतींची रस्त्यांची तलावांची झाडांची डोंगरांची दृश्यं निव्वळ सुंदर आहेत.
६. 'Joqtau'. कझाकस्तान. जकताऊ म्हणजे स्मृतीगीत. एक कझाकी तरुण, त्याच्या आजारी आजोबांना भेटण्यासाठी विदेशातून कझाकस्तानात येतो. सोबत त्याची युरोपिअन प्रेयसी असते. तिच्या नजरेतून सिनेमा सरकतो.
हा मंगोल वंशाचा पूर्वीचा जिप्सी, पशुपालक समाज. मध्ये कधीतरी इस्लाम स्वीकारला असला तरी आधीचंही सोडलेलं नाही. नजर जाईल तिकडं दूरपर्यंत माळरानं विस्तीर्ण ! मध्येमध्ये सावली धरून ठेवणारं एखादं तुरळक झाड. कुसळं. पिवळं गवत. उघडेबोडके डोंगर. मध्येच एखादा टिटवीसारखा पक्षी तारस्वरात त्या शांततेला छेदत जातो. हे खडबडीत सौंदर्य. या छोट्या छोट्या सडका. धूळ. मेंढ्या, मेंढपाळ, आरवणारे कोंबडे. अंगणात सडा घालणाऱ्या स्त्रिया. जणूकाही माणदेशच आहे हा.
आजोबांचा मृत्यू. अंत्यसंस्कार. मयतासाठीचं शोकगीत. महिला बसून एकमेकींचा हात पकडून डुलत डुलत आर्त गीतं आळवतात. बाकी, कसलाही भावनिक ड्रामा, ॲक्शन, धडामधूड म्युझिक वगैरे काही नाही. शांत फिल्म आहे. तिथलं लोकजीवन, आहार, गाणी, भाषा, वेश, प्रदेश दाखवणं हा या सिनेमाचा उद्देश असावा. कारण भाषांच्या मरण्याची प्रक्रिया जगभर वेगानं सुरू आहे. कझाक भाषाही मरतेय. नवीन पिढी रशियन बोलतेय, तिथे शाळा-विद्यापीठांत रशियनच चालते.
गुंथर सोंथायमरनं १९८६ साली आपल्याकडच्या फलटण, जेजुरी भागातील धनगर समाजावर एक अप्रतिम डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे. यूट्यूब वर बघितलेली पूर्वी. हा सिनेमा बघितल्यावर पुन्हा एकदा आठवण झाली.
७. 'Reset'. पोलंड. डिस्टोपियन मूव्ही.
२०३० मध्ये पोलंडमध्ये एकाधिकारशाही अवतरलीय. आपलंही भविष्य हेच आहे. मोबाईलच्या नव्या थ्रीडी आवृत्त्या. सगळं जगणं डिजीटल. आपण ज्याच्याशी बोलतोय तो हाडामांसाचा माणूस आहे की मानवी रूपातला बॉट आहे, हे कळायला मार्ग नाही.
इंटरनेट, अल्गोरिदम्समुळं कधी नव्हे ते हुकुमशहांना नागरिकांच्या जगण्यावर सर्वंकष ताबा मिळवणं शक्य झालंय. या खेळापुढं हिटलर, स्टॅलिन वगैरे अगदी बच्चे वाटावेत, अशी परिस्थिती. डिजीटल डिक्टेटरशिप. बायोमेट्रिक डाटा जिथं तिथं मँडेटरी. तुमच्या सगळ्या सुविधा-लाईट, अन्न-पाणी, हगणं-मुतणं सगळं क्षणात बंद करण्याचे सरकारकडे अधिकार.
यातली ती मुलगी मोबाईलवर ऑनलाईन बॉटकडून शिकत असते.
आई मुलीला म्हणते, आमच्या वेळी जिवंत खरेखुरे शिक्षक असायचे.
मुलगी म्हणते की ते सगळे फ्रस्ट्रेटेड शिक्षक होते, त्यांचं फ्रस्ट्रेशन मुलांवर काढायचे. त्यांना कोण miss करणार?
यावर आई म्हणते, असेलही तसं. पण त्यांच्यासोबत रिस्पेक्ट, प्रेम, बॉंडींग हेही सगळं गेलं.!
मिनिस्ट्री ऑफ सुपरव्हिजन.
home-bot च्या माध्यमातून घरातही सतत सर्वेलन्स. प्रत्येक हालचाल निरखली जाते. 'Algorithm is safe for our country.' वगैरे जाहिराती डिजीटल स्क्रीन्सवर रस्तोरस्ती, चौकाचौकात. सतत इन्स्ट्रक्शन्स. सतत उद्घोषणा. आणि हे सगळे डोळ्यांतली ठिणगी विझून गेलेले नागरिक.! नागरिक आहेत की मेंढरं.?
बॉट इंटरोगेशन.! सांगा तुम्ही कुठल्या anti-state, Terrorist चळवळीशी सहानुभूती बाळगून होता का? Terrorist कुणाला म्हणायचं? व्याख्याही तेच ठरवणार. एखाद्याकडून कबुलीजबाब घेण्यासाठी शारीरिक छळ करण्याची गरज नाही. मानसिकरित्या छळून, संभ्रमात टाकून त्याच्याकडून काहीही कबूल करून घेता येणं सहज शक्यय. राग आला तरी शिव्या देता येत नाहीत. लगेच सोशल क्रेडिट्स मधून आपोआप बॅलन्स कटतो. व्यक्तिस्वातंत्र्य अनमोल आहे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य, सरकारविरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य हे कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त मोलाचं आहे. त्याच्याशी कसल्याही परिस्थितीत तडजोड होता कामा नये.
हायवे बांधताना तुम्ही मानवांनी मुंग्यांशी शांतता करार केला होता का? मग अल्गोरिदम्सनी तुम्हा मानवांशी शांतता-करार करावा, अशी अपेक्षा का बाळगता? ती आल्गोरिदमिक बाई सिनेमातील नायिकेला विचारते. प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
८. 'To a Land Unknown'. पॅलेस्टाईन, अथेन्स.
वास्तववादी सिनेमा.! अगदीच इंपॅक्टफुल. यातले ते दोन तरुण अभिनेते सुपर्ब आहेत. पॅलेस्टाईनमध्ये नरक आहे. तिथले दोन तरूण चांगल्या आयुष्याच्या शोधात तिथून अवैधरीत्या निसटतात आणि अथेन्समध्ये येऊन अडकतात. हे म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पाडण्यासारखं. इथलं आयुष्य खराब आहे. जीवन अवघड आहे. फेक डॉक्युमेंट्स. ड्रग्स ओव्हरडोस. एका गलिच्छ रूममध्ये दहाबारा जण. सगळे बेकायदेशीर निर्वासित. सिरीया,लेबनॉन कुठून कुठून आलेले, अवैधरीत्या युरोपात जाण्याच्या प्रयत्नात, ठिकठिकाणी नागवले गेलेले. यात रिस्क प्रचंड. आपल्याच नागरिकांना कुत्र्यासारखं ट्रीट करणारे देश.
एका लहान मुलाला पॅलेस्टाईनमधून काढून अथेन्सच्या रस्त्यावर वाऱ्यावर सोडून स्मगलर गायब झालेला असतो. हे दोघेजण त्याला इटलीला पाठवण्याच्या खटपटीत असतात. हे मनानं चांगले पण परिस्थितीच अशी की तग धरून राहण्यासाठी चोऱ्यामाऱ्या करण्याशिवाय गत्यंतर नाही. या दोघांना फेक पासपोर्ट बनवण्यासाठी पैसे जमवायचे असतात. जर्मनीत जाऊन रेस्टॉरंट उघडण्याचं स्वप्न. स्वप्नांबद्दल बोलताना माणूस चांगला दिसतो कारण थोडावेळ तरी नैराश्य विसरलेला असतो.!
''तू तुझ्या फॅंटसीच्या दुनियेतून बाहेर ये. कुणी तुला हवं ते आणून देणार नाही. आजूबाजूला बघ जरा लोक कसे जगतायत ते." एक डायलॉग.
'ह्युमन ट्रॅफिकींग' या विषयाचे बरेच अंतरंग पैलू खोलवर दाखवलेत. बॅकएंड्ला बराच रिसर्च केला गेला असणार. यात उद्धृत केलेली महमुद दारविशची कविता खतरनाक आहे. हा पॅलेस्टीनी कवी आता शोधून वाचायला पाहिजे. एवढा मोठा कवी आजवर आपल्याला माहितीच नव्हता, ही शरमेची गोष्ट आहे.
९. 'Another end.' स्पॅनिश.
गंडेक्स मूव्ही. प्रिय व्यक्ती मेलेली असेल आणि तिचा विरह सहन होत नसेल, तर तिला वेगळ्या रूपात पुन्हा काही काळ जिवंत करता येतं. भविष्यात तसं तंत्रज्ञान आलेलं आहे. मुळात हा कन्सेप्टच गंडलेला आहे. जिच्याशी बोलतोय ती व्यक्ती म्हणजे जिवंत माणूस नाहीये, हे आतून माहित असेल तर कसं कनेक्ट होणार तिच्याशी? थोडासा विषय उगाच पाणी घालून वाढवला आहे. बात कुछ हजम नै हुई.
१०. 'सिसिलीयन लेटर्स'. इटली. यात 'गॉडफादर'सारखी एक पिढीजात माफिया फॅमिली दाखवलीय. माफियांच्या दुनियेतील सांकेतिक व्यवहार कसे चालतात, हे रोचक पद्धतीने दाखवलेय.
एक म्हातारा डॉन मरतो. त्याचा मुलगा टेक-ओव्हर करतो. मुलाला बापाची पोकळी फार जाणवत असते. एक रिटायर्ड मुख्याध्यापक त्या फॅमिलीचा एकनिष्ठ असतो. तो त्या सध्याच्या डॉनची बापाची पोकळी भरून काढण्यासाठी त्याला पत्रं लिहितो. ही पत्रं अगदी उच्च साहित्यिक मूल्यं असलेली, डॉनला इंप्रेस करणारी असतात. डॉनही त्याला पत्रं लिहितो. पोलिस त्या मुख्याध्यापकाला डॉनपर्यंत वापरतात. डॉनला भेटण्यासाठी बोलावून फिल्डींग लावतात. पण नक्की कोण कुणाला वापरून घेतंय?, हे सिनेमातूनच बघायला पाहिजे. यातले डायलॉग्ज भारीयेत, पण फारच फास्ट पळतात. सबटायटल्स वाचेपर्यंत पुढचा डायलॉग्ज येतो. आणि इटालियन अजिबातच समजत नाही. त्या मुख्याध्यापकाची म्हातारी बायको नवऱ्याला फार इरसाल टोमणे मारत असते. फारच आवडले!! म्हातारपणापर्यंत नवरा-बायकोचं नातं मुरत असं मस्त मुरत जात असणार. एकमेकांचं सगळंच माहिती झालेलं असल्यामुळे काहीही बोललं तरी ईगो हर्ट होत नसणार.
११. 'इन रिट्रीट'. हिंदी-लडाखी.
मैसम अली हा FTII चा तरुण दिग्दर्शक. लेह-लडाखची पार्श्वभूमी. नॉर्मली सिनेमात लेह-लडाखचं गुडी-गुडी निसर्गसौंदर्य दाखवतात. यात तसं नाही. तिथली खेडी, अंतर्गत रस्ते, बोलीभाषा, अशी नेहमीपेक्षा वेगळी झलक दिसते. डायलॉग्ज अत्यंत कमी आहेत. पण जे आहेत ते प्रभावी आहेत. संवांदाच्या ऐवजी स्वगत आहे. हे स्वगत म्हणजे महमुद दारविश या पॅलेस्टाईनी कवीची 'If I Were Another' ('अगर मैं कोई और होता') ही कविता आहे.
डिटॅचमेंट उदासपणे ठिबकत राहते संपूर्ण सिनेमाभर. मानसिकदृष्ट्या निर्वसनाची, कुठेही असलो तरी आपण उपरेच आहोत, ही जी भावना असते, तिला हा कवी अत्यंत तरल शब्द देतो. एकाच जागी रुतून बसण्याची अवस्थाही चांगली नाही, निर्वासित होण्याची अवस्थाही चांगली नाही. कुठलीच अवस्था चांगली नाही. आज जगभर निर्वसनं, स्थलांतरं प्रचंड वेगानं होतं आहेत. गावातून शहरात, शहरांतून महानगरांत, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात!
ही भावनिक निर्वसनाची कथा आहे. परकेपणाचा एकच एक मूड पकडलाय. आणि सुरूवातीपासून शेवटपर्यंत सलग धरून ठेवलाय. त्या मूडला बाधा आणणारं इतर अनावश्यक सगळं छाटून टाकलंय. शुद्ध एकटेपण समोर ठेवलंय.!
यातला तो प्रोटॅगॉनिस्ट बऱ्याच वर्षांनी मूळ गावी परततो आणि रात्री भटकत राहतो गल्ली बोळातून. भकास. भूमी सुटलेला माणूस कधीच पूर्णपणे परतून येऊ शकत नाही. फक्त तशी कोशिश करू शकतो.
स्थलांतरीत बिहारी मजूर आणि लोकल्स यातला कॉन्फ्लिक्ट. 'या लग्नात तुमचं काय काम? तुम्हाला कळत नाही का? या आऊटसाईडरला कशाला आणलं लग्नाला?' एका सीनमध्ये हा संवाद आहे. या सीनमधलं उपरेपण अंगावर येतं.!
शिवाय आणखी एक संवाद. त्याचा प्रोटॅगनिस्टचा पुतण्या म्हणतो, 'याचा भाऊ जिवंत होता तेव्हा विचारलं नाही. आता कशाला आलाय हा? काय पाहिजे याला ?''
म्हणजे काही पाहिजे असेल तरच येतो का माणूस घरी/गावी?
समोर स्क्रीनवर जे चाललंय ते कधीच संपू नये, ह्या काळ्या मूडमध्ये आणखी खोल खोल डुबत जावं, असं वाटत राहतं. 'पण तुम्ही परत का आलात?' या प्रश्नाशी सिनेमा थांबतो. सिनेमा उत्तर देत नाही. उत्तराचं काय ते आपापलं शोधावं लागेल. हा सिनेमा आणखी एकदा बघावा लागणार.
(या 'इन रिट्रीट' सिनेमात वापरलेल्या महमूद दारविशच्या कवितेचा एक अंश यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्याची लिंक खाली देतो आहे. हे वाचून कुतूहल जागं झालं असल्यास जरूर पहावा :
https://m.youtube.com/watch?v=pBIjoe0BYes )
छान ओळख.
छान ओळख.
छान ओळख .
छान ओळख .
निवडक मधे नोंदवून ठेवलाय.
निवडक मधे नोंदवून ठेवलाय.
सापडले तर बघते सगळे.
छान ओळख .
छान ओळख .
छान नोंदी आहेत.
छान नोंदी आहेत.
नोंद करून ठेवलीय जमेल तसे बघण्यास.
छान नोंदी !!
छान नोंदी !!
नोंदी तर आवडल्याच पण तुमच्या
नोंदी तर आवडल्याच पण तुमच्या लिखाणाची शैली जास्त आवडली
नोंदी आवडल्या.
नोंदी आवडल्या.
अंगावर येणारं काहीही पाहात नाही हल्ली. पण हे वाचायला आवडलं. ओळख छान करून दिली आहेच पण शैली जास्त आवडली.
Reset चित्रपट सगळ्यात जास्त भयानक वाटला.
महमूद दारविशच्या कविता वाचून/ऐकून पहायला हव्यात. या पॉईंटरसाठी विशेष धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद. हे सगळे
माहितीबद्दल धन्यवाद. हे सगळे कुठे बघायला मिळेल? You Tube, OTT तेही सांगा प्लीज
.
धागा निवडक मध्ये नोंद केला
धागा निवडक मध्ये नोंद केला आहेच.
हे सगळे कुठे बघायला मिळेल? You Tube, OTT तेही सांगा प्लीज..
+१००
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
हे सगळं कुठे बघितलं? ओटीटी? फेस्टिवल्स?
त्यांनी मागे लिहिलं होतं एका
त्यांनी मागे लिहिलं होतं पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०२५ बद्दल.
बहुधा तिकडेच पाहीले असावेत .