हरवलेले दिवस

Submitted by शिल्पा गडमडे on 21 March, 2025 - 23:48

खूप दिवसानंतर ती आज माहेरी आली होती. तिच्या माहेरी रंगकाम करायला काढलं होतं त्यामुळे बरंचसं सामान माळ्यावरून खाली आलं होतं. दरवर्षी ती माहेरी आली आणि हाताशी जरा वेळ लागला ती दोन गोष्टींना आवर्जून वेळ देत असे. एक म्हणजे जुना फोटो अल्बम आणि दुसरा म्हणजे तिचा कोलाज बॉक्स. यावेळेस तर तिचा बॉक्स सामानाच्या ढिगाऱ्यात समोरच विराजमान झाला होता. तिच्या अनेक जुन्या वस्तूंपैकी तिचा बॉक्सवर विशेष जीव होता. बॉक्सवरच्या कोलाजसाठी तिने कुठूनकुठून रंगीत पुरवण्या गोळा केल्या होत्या. त्याकाळी रंगीत पुरवण्या सहजासहजी उपलब्ध नसत. तिने खूप खटपट करून वेगवेगळ्या चित्रांच्या, रंगसंगतीच्या पुरवण्या गोळा केल्या होत्या. त्यातली चित्रं कसेही न फडता एक एक तुकडा तिने सुबकपणे आणि विचारपूर्वक फाडून चिटकवला होता. तो बॉक्स पूर्ण झाल्यावर कौतुकाने ती कितीतरी वेळ त्या बॉक्स कडे बघत बसली होती.

पुढे तिला येणारी पत्रं, सुंदर ग्रीटिंग्ज यांना साठवून ठेवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून या बॉक्सची निवड झाली होती. सुरवातीला पत्रं, ग्रीटिंग्ज, फ्रेंडशीप बँन्डस असा सगळा पसारा त्यात होता. हळूहळू फक्त खास पत्रं, मनाजवळच्या लोकांचीच ग्रीटिंग्ज अशा निवडक गोष्टींनाच तिथे प्रवेश मिळू लागला. आता तो बॉक्स ‘दिल के पास’ असणाऱ्या वस्तूंचा खजिना होता. म्हणून ती माहेरी आली कि तो बॉक्स उघडून वस्तू न्याहाळत बसे. आज बॉक्स उघडल्यावर अनेक आठवणी, प्रेमाने ठेवलेली पत्रं, ग्रीटिंग्ज याची फुलपाखरं उडून तिच्या सभोवताल फिरू लागली. एकेका आठवणीचं फुलपाखरू तिच्या तळहातावर येऊन बसू लागलं. पत्रं कशी लिहितात याचा शोधही तिला लागला नसताना लिहिलेली पत्रं.. म्हंटलं तर ओबडढोबड म्हंटलं तर सच्ची.. मनापासून, मनातलं सांगणारी खरी पत्रं.. समज आल्यापासून सच्चाई हा एक गुण आजवर तिने जीवापाड जपला होता..
एक फुलपाखरू उडत गेलं ते थेट त्या दोघींच्या फोटोजवळ. ती आणि तिची जिवलग मैत्रीण.. ‘मैत्री बित्री फक्त तुमची लग्न होईपर्यंतच.. नंतर सगळ्याजणी संसारात अशा गुंततात कि एकमेकींची आठवण काढायची पण आठवण होत नाही’ असे अनुभवाचे बोल त्या दोघींना कोणीतरी ऐकवले होते. अशी शक्यताच अस्तित्वात नसलेल्या त्यांच्या जगात असा विचार म्हणजे मोठा भूकंपच होता. ’हे अजिबात शक्य नाही’, ‘जग बदललं तरी आपण बदलणार नाही’ असं एकमेकींना समजावत त्या शक्यतेला त्यांनी हद्दपार केलं होतं.. यथावकाश मैत्रिणीचं लग्न झालं आणि अलिखित नियम पूर्ण करण्यासाठीच जणू पण मैत्रीण हरवली. काही वर्षात तिचं लग्न झालं, ती आपल्या आयुष्यात व्यस्त झाली. वर्षामागून वर्ष सरत असताना फेसबुक, WhatsApp सारखी संवादाची नवीन साधनं आली.. पण त्यांच्यातला संवाद संपला तो कायमचाच.. नाही म्हणायला तिने मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्या फ्रेंडलिस्ट मध्ये पुन्हा स्वतःला समाविष्ट करून घेतलं पण तिथे ती उरली ती केवळ नावाला.. ती फ्रेंडलिस्टमध्ये असली तरी मैत्रिणीच्या जगातलं तिचं अस्तित्व तर कधीच हरवलं होतं.. अधूनमधून जुन्या दिवसांचे फोटो हाताला लागले कि कोणीतरी ते शेअर करत असे.. त्याला शीर्षक असे ‘गोल्डन डेज’.. तिला त्यावेळी आठवत राहत ते सोनेरी दिवस.. पण ज्या नात्यांना केवळ भूतकाळ असतो, ज्यांना वर्तमानाचा, भविष्याचा आधार मिळत नाही अशा आठवणी कालांतराने मानगुटीवर बसतात.. ओझं बनून राहतात.

दरवेळी सारखं या फोटोवरून हात फिरवतांना तिचे डोळे भरून आले. पुन्हा आठवण, मैत्रिणीचं आपल्या जगातून हरवणं तिला दुखावून गेलं.. तिने पटकन फोटो बॉक्सच्या तळाशी ठेवला आणि तेवढ्यात अजून एक फुलपाखरू भिरभिर करत तिच्या तळहातावर येऊन बसलं. संध्याकाळचे रंग झरत असतांना एका मैत्रिणीच्या घराच्या पायऱ्यांवर बसून काढलेला फोटो.. सगळ्यांचे हसरे चेहरे.. फोटोसाठी प्रयत्नपूर्वक न खिदळता शांत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे चेहरे.. एकमेकांच्या असण्यानेच आनंदित असणारे चेहरे.. तेव्हा दिवसांना वेळ कळत नसे, ना भीती असे विषयांना संपून जाण्याची, ना आनंदाला सीमा.. मैत्रीच्या आठवणीची सुंदर ऊबदार दुलई करून पांघरावी अशा ऊबदार आठवणी.. एक एक आठवण उलगडत गेली तर तो आपुलकीचा गंध मनभर पसरत जाई. पण हल्ली ते मित्रमैत्रिणी हरवलेत.. कोणी म्हणतं कामाचा व्याप वाढलाय, कोणी म्हणतं जगण्याच्या प्राथमिकता बदलल्यात... पण एकेकाळी छोट्यामोठ्या ऊन्हात एकमेकांची सावली सोधणारे मित्रमंडळी वर्षानुवर्ष भेटू नये एवढे व्यस्त झालेत का? नाही म्हणायला सगळ्या तंत्रज्ञानाने संपर्कात आहेत सगळे.. पण एकमेकांपर्यंत पोहचू शकतोय का? ती पुन्हा हरवली विचारात. तिला आठवलं लहानपणी तिच्या वडिलांनी घेऊन दिलेलं किमती घड्याळ कुठेतरी हरवलं. नेमकं कुठे, कसं हरवलं हे तिला आठवतच नव्हतं. ती खूप आठवायचा प्रयत्न करत असे कि नेमकं घड्याळ कुठे हरवलं ते.. सवयीच्या जागांवर पुन्हा पुन्हा पाहत राही.. घड्याळ सापडलं नाही कि त्याच्या आठवणीने कासावीस होई.. तिला घड्याळ काही केल्या सापडलं नाही. आत्ताही काय वेगळं होत होतं. हरवलेल्या मित्रमंडळींच्या शोधात ती पुन्हा पुन्हा आठवणींजवळ येऊन शोध घेत राही कोण, कधी, कुठे, कसं हरवलं याचा.. उत्तर सापडलं नाहीच तर सैरभैर होत असे..

आयुष्याच्या या टप्प्यापर्यंत तिने इतका प्रवास केला कि आता त्या प्रवासातील अधली-मधली ठिकाणं धूसर होऊ लागली होती. या प्रवासात ती बदलत गेली पण जुने दिवस तिला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे ओढून आणत. ती स्वतःला नवीन प्रवासात, नवीन माणसात गुंतवून घेत होती पण जुने हरवलेले दिवस तिला आठवत राहत. कधीतरी ती त्या दिवसांच्या आठवणीत अश्रू ढाळत असे. पण मनात साचलेलं हरवलेल्या दिवसातल्या कोणाजवळ तरी बोलून दाखवायची इच्छा अनावर होत असे.

तिच्या बॉक्समध्ये तिच्या आवडत्या कवितादेखील तिने जपून ठेवल्या होत्या. तिच्या हाताला लागली ती शांताबाईंची पैठणी कविता.. ज्यात कवियित्री फडताळातल्या गाठोड्यात जपून ठेवलेल्या आजीच्या पैठणीबद्दल लिहिते. पैठणीचं वर्णन, त्यासभोवताल वसलेल्या आजीच्या आठवणी याचं वर्णन आहे. कवितेच्या शेवटी शांताबाईं लिहितात कि आजीची पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा..

तिच्या कथेत मात्र पैठणी ऐवजी तिच्याजवळ होते बॉक्समध्ये जपून ठेवलेले पण हरवलेले दिवस. ती जेव्हा जेव्हा बॉक्स उघडून बसत असे तेव्हा तेव्हा हरवलेल्या दिवसांमधला आणि तिच्यातला पडदा गळून पडत असे. हरवलेल्या दिवसांना तिला घट्ट मिठी मारता येत असे. हरवलेल्या दिवसातील हरवलेली माणसं, हरवलेले क्षण तिला तितक्याच उत्कटतेने भेटत असत. पण आठवणीतील माणसं पांगली आणि त्यांच्या परत येण्याची कुठली चिन्ह नसली तर त्या आठवणींना काही अर्थ उरत नाही.. संध्याकाळ झाल्यावर सावल्या रेंगाळत राहतात तशा या आठवणी.. आठवणी कितीही सुखकारक असल्या तरीही त्यांचं मनावर ओझं होतंच.. ती ते ओझं घेऊन जगत होती. कितीतरी वेळा ती दुःखी होत असे, दुखः कमी करण्यासाठी कागदावर काहीबाही खरडून काढत असे, रडून त्यानंतर पुन्हा स्वतःचीच समजूत घालत असे. पुन्हा पुन्हा स्वतःशी निर्धार करत असे कि आत्ता बस्स.. स्वतःला त्रास द्यायचा नाही.. आठवणींना सोडून द्यायचं.. पण पुन्हा पुन्हा ती अडकत राहायची..

संध्याकाळ होत आली तशी घरात काम करणाऱ्या लोकांची घाई वाढली. तिने गाडी काढली आणि घराजवळच्या तलावाजवळ जाऊन बसली. सोबत नेलेल्या बॉक्सला तिने घट्टपणे छातीशी कवटाळलं.. हळूच पुटपुटली, ‘हरवलेल्या दिवसांना माझे कुशल सांगा’. आणि एकेक करत बॉक्समधले पत्रं, ग्रीटिंग्ज, आठवणी पाण्यावर सोडत राहिली.. आता अंधारून आलं होतं.. लांबवरून मंदिरातल्या घंटा कानावर येऊ लागल्या.. तिच्या हातावर येऊन बसलेली फुलपाखरं कुठेतरी दुरवर उडून गेली होती.. दीर्घ श्वासासोबत सगळ्या हरवलेल्या पण आजवर जबरजस्तीने बंदी करून ठेवलेल्या दिवसांना तिने मोकळं सोडलं होतं.. तो बॉक्स आता मोकळा झाला होता.. आणि ती देखील..

@ शिल्पा गडमडे
२२.०३.२०२५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शेवटचं क्लोजर जबरदस्त होतं.
चटका लावणारं असलं तरी आपल्या आयुष्यातल्या कित्येक वस्तु आपण त्यांना आपली भावनिक ऊर्जा देऊन अमूल्य करून ठेवतो. आपण नसताना इतरांना त्यांची काही किंमत वाटेल का निदान एवढतरी विचार करून आपल्या त्या वस्तूंवरच्या प्रेमाची बूज आपणच राखावी.
अश्या अमूल्य गोष्टींना आपल्या हातानेच आपल्या हयातीतच अलगद मोकळं करावं.. तिच्यासारखं !!

कॉलिंग अनिंद्य आणि त्यांचा 'डाय एंप्टी' धागा Happy

ता.क. 'आपल्या प्रेमाची बूज आपणच राखणे' हा वाक्प्रचार माझ्या आयुष्यात लेखक शिवराज गोर्ले यांनी आणला.
मी या वाक्प्रचारासाठी त्यांची अत्यंत ऋणी आहे.

सगळ्यांचे खूप खूप आभार. काही गोष्टी कितीही प्रिय असल्या तरी आपण आपल्याला त्यातून सोडवत क्लोजर देणे महत्वाचे असते.. तेच व्यक्त झालंय.. तुम्ही खूप सुंदर प्रतिक्रिया दिल्यात.. आभारी आहे मंडळी