गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ५

Submitted by रुद्रसेन on 17 March, 2025 - 12:13

गावातीलच एका छोट्याश्या हॉटेलमध्ये मिसळ खात रॉबिन बसला होता. हॉटेलमध्ये इतर कोणीही गिऱ्हाईक न्हवते. शेंडेंच्या बंगल्यातील होणाऱ्या भुताटकीच्या घटनांमागे नक्की कोण असावे असा विचार करत तो बसला होता. गावात नीट व्यवस्थित चौकशी करावी असा त्याचा विचार होता. भूतबंगल्यावर जाऊन पाळत ठेवणे देखील गरजेचे होते. हरिभाऊ आपली घरातली कामे उरकून नंतर इथेच येणार होते. नंतर पुढचं काय ते ठरवावं रॉबिन असं विचार करत बसलेला असतानाच त्याला बाजूच्या रस्त्यावरून एक गाडी हॉटेलसमोरुन पुढे गेलेली दिसली, त्याची नजर त्या गाडीवर गेली असता गाडीमध्ये शेंडेंचा मुलगा भैरव आणि त्यांचा मेहुणा रावसाहेब बसलेले दिसले, मागच्या सीटवर पाठीमागे गावातीलच दोन तरुण पोरं उगाचच दात काढत बसलेली होती. गाडीला छत न्हवत ग्रामीण भागातील जीप सारखी गाडी होती त्यामुळे रॉबिनला भैरव आणि रावसाहेबांना ओळखता आलं. ते नक्की कुठे जातायत हे पाहावं म्हणून रॉबिन आपलं खाण संपवून उठला आणी हॉटेल मालकाकडे गेला.

“ दादा, मगाशी एक जीप या मार्गावरून पुढे गेली ती नक्की कुठे गेली असेल” रॉबिनने विचारलं.
“ ती जीप व्हय, शेंडे साहेबांच्या पोराची जीप व्हती ती. गेले असतीला उंडारायला तळ्याकड” हॉटेलमालकाने माहिती पुरवली.
“ अच्छा म्हणजे पुढे तळे आहे तिथे जातात तर ते “रॉबिन म्हणाला.
“ हा तित तळ हाये, तित जात्यात, भलतीच अवखळ कार्टी हायती बघा. डोक्याला नुसता उच्छाद आनत्यात.” हॉटेल मालक वैतागून म्हणाला. हॉटेल मालकासोबत बोलून रॉबिनने ती जीप कुठे गेली याची माहिती मिळवली आणि त्यांच्यामागे ते नक्की काय करतायत हे पाहायला त्यांच्यामागे निघाला.

तळ्याच्या परिसर तिथून जास्त काही लांब न्हवता. गावातीलच बाय बापड्या तिथे धुणं धुवायला येत असायच्या. रॉबिन काही मिनिटातच त्या ठिकाणी पोहोचला. समोर त्याला दिसलं कि तळ्याच्या ठिकाणी जीप उभी करून भैरव आणि रावसाहेब तळ्याच्या काठावर धुणं धुणाऱ्या बायांकडे पाहत काहीतरी शेरेबाजी करत उभे होते. सोबतची दोन पोरे उगाचच खी खी करत हसत त्यांना साथ दत होती. गावातील गरीब बाया बिचाऱ्या गपगुमान धुणं धूत होत्या. रॉबिन तिथे पोहोचला आणि त्या जीपच्या जवळ गेला, त्याला भैरव आणि रावसाहेबांच हे वागणं अजिबात आवडलेलं न्हवत. जीपच्या बोनेटवर भैरव आरामात बसला होता, त्याच्या जवळ रावसाहेब उभा होता. रॉबिन जवळ येताच त्या दोघांची नजर त्याच्यावर गेली. रॉबिनला पाहून रावसाहेब भैरवच्या कानात काहीतरी खुसपूसला. रॉबिन त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला.

“ आ..इकड कुट फिरताय म्हणावं आता पाव्हण” बेरक्या नजरेने रावसाहेबाने रॉबिनकडे कटाक्ष टाकत पहिले.
“ अरे वाह मी पण हेच विचारणार होतो, कि इथे कुठे फिरताय तुम्ही” रॉबिनने प्रतिप्रश्न केला.
रॉबिनच्या या उलट बोलण्याने भैरव चांगलाच चिडला. कोण कोठला नवखा माणूस आपल्या गावात येऊन आपल्याला प्रश्न विचारतो म्हटल्यावर त्याची चांगलीच सटकली.

“ ए...आर बसतो का गप..उलट प्रश्न विचारतोस का आम्हाला” भैरव कडाडला.
“ असू द्या भाचं, आपल्या हरिभाऊकड आलंय हे बेणं, नवीन मानसाला आपली अजुक वळक न्हाही” रावसाहेब छद्मी हास्य करत म्हणाला.
“अरे हो ओळखीवरून आठवलं, तुम्ही शेंडे साहेबांचे सुपुत्र आहात ना, कामधंदा करता कि नाही काही? कि आत्ता जे करताय हेच काम आहे तुमचं. हे शेजारी उभे असलेले तुमचे मामा ना ? तुम्हाला काही चांगला उपदेश देत असावेत असं वाटत नाही” रॉबिनने अतिशय तिखट आवाजात भैरवला सुनावलं होतं.
त्याच्या या बोलण्याने तळ्याकाठी धुणं धुणाऱ्या बायकासुद्धा हा कोण नवीन माणूस शेंडेंच्या मुलाला बोलतोय म्हणून काम सोडून पाहून लागल्या. रॉबिनचं हे बोलण भैरवच्या जिव्हारी लागलं होतं.
“ ए याला इथून हाकलून द्या रे, लयच चुरूचुरू बोलतोय” भैरवने बाजूच्या दोन हडकुळ्या अंगाच्या पोरांना सांगितल.

तसं ती दोन पोरं रॉबिनकडे त्याला इथून हाकलून देण्यासाठी जवळ आली. त्यातील एकाने रॉबिनच्या कॉलरला हात लावायला हात पुढे केला. पण रॉबिनने चपळाईने त्याचा हात पकडला आणि त्याची बोटे पुढे वाकवून अगदी सहज त्याला बाजूला केल. ते हडकुळं पोरगं बोंबलत हाताला पकडून बाजूला जाऊन पडलं. त्याला तसं पडलेलं पाहून दुसरं पोरगं रॉबिनच्या जवळ त्याचा हात पकडायला आलं. जसं त्या दुसऱ्या पोराने हात रॉबिनजवळ आणला तसं त्याच्या मनगटाला पकडून रॉबिनने असं काही वाकवल कि त्या पोराच्या मस्तकातच कळ गेली आणि जोरात ओरडून ते पोरगं बाजूला झालं. अगदी उभ्याउभ्या जागेवरून न हलताच रॉबिनने त्या दोन्ही लुकड्या सुकड्या पोरांना बाजूला केलं होतं. त्याला तसं करताना पाहून भैरव आणि रावसाहेब तर चकितच झाले होते. त्यांना वाटलं होतं हरिभाऊंच्या घरात कोणीतरी लहान सहान कामे करणारा माणूस आला असावा त्याला सहज उडवून लावूयात पण त्यांना रॉबिनची खरी ओळख माहित न्हवती. भैरव आता जीपच्या बोनेटवरून खाली उतरला होता आणि रागातच रॉबिनकडे पाहत होता. रॉबिन मात्र अगदीच शांतपणे त्यांच्याकडे पाहत त्या दोघांच्या अगदी नजीक गेला.

“मला इतकंच म्हणायचं होतं भैरव कि, आपल्या वडिलांची गावात प्रतिष्ठा आहे ती अशी वाह्यात वागून धुळीला मिळवू नये काहीतरी उद्योग करावा नसेल तर वडिलांना कामात हातभार लावावा. नसेल तर बंगल्यावर जाऊन तिथे खरंच भुते आहेत कि नाहीत याचा छडा लावावास” भैरवच्या नजरेला नजर देत रॉबिन स्पष्ट शब्दात म्हणाला आणि आपल्या अंगावरचं जॅकेट काढून त्याने दुसऱ्या हातात धरलं. जसं रॉबिनने जॅकेट काढलं तसं फक्त टी-शर्ट आणि प्यांटवर उभं राहिलेल्या रॉबिनकडे पाहत भैरव चपापलाच, रावसाहेबांनी तर आ च वासला.

रॉबिनची शरीरयष्टी भलतीच पिळदार होती, त्यातूनच त्याचे पोट पूर्ण सपाट आणि त्यांचे दोनही दंड भरलेले आणि जाडजूड भासत होते. अंगातील जॅकेटमुळे रॉबिनची शरीरयष्टी सहसा दिसून येत नसे. त्यांना मुद्दाम धाक दाखवण्याच्या उद्देशाने रॉबिन तसं वागत होता. आपला एक हात रॉबिनने रावसाहेबांच्या खांद्यावर ठेवला आणि मुद्दाम त्यांच्या खांद्यावर जोर दिला. तसं रावसाहेबांना खांद्यात जोरात कळ आली आणि ते जरासे कण्हू लागले. तळ्यावरील धुणं धुवायला आलेल्या बायका सुद्धा तोंडावर पदर घेऊन खुसपुसून हसू लागल्या.

“ तुम्हाला दोघांना कुस्ती खेळण्याची आवड आहे हे मला माहित न्हवत, काय आहे ना आमच्या शहरात कुस्त्यांचे आखाडे नसतात. इथे कुठे आखाडा असेल तर सांगा मला. सोबतच सराव करू आखाड्यात काय म्हणता?” शेवटच वाक्य एकदम हळुवारपणे म्हणत भैरवच्या नजरेत नजर रोखत चेहऱ्यावर करारीपणा आणत रॉबिन म्हणाला. बोलत असताना रॉबिनने रावसाहेबांच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताने जोरात दाब दिला तसं रावसाहेब कळवळला त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसून आली. आधीच अधू झालेल्या हाताला पकडून थांबलेली पोरं पाहून भैरव गांगरला होता, त्यातच रावसाहेबांच वेदनेने भरलेल तोंड पाहून भैरवने आवंढाच गिळला काय बोलावे हे त्याला सुचेना. काहीही न बोलता आपलं भय लपवत तो जीपच्या सीटवर जाऊन बसला.

“ चल मामा असल्या लोकांसोबत आपल्याला तोंडी लागायचं नाहीये”
पण रॉबिनने रावसाहेबांच्या खांद्यावरचा हात तसाच दाब ठेवला होता. आणि तो त्याने सोडावा अश्या अर्थाचं तोंड करून रावसाहेब रॉबिनकडे पाहत होता.
रॉबिनने रावसाहेबांच्या खांद्यावरचा हात सैल करत “ जावा रावसाहेब भाचे बोलावतायत” असं म्हणाला.

रॉबिनने खांद्यावरचा हात काढताच रावसाहेबाने सुटकेचा निश्वास टाकला आणि दुखरा खांदा हलवत पटकन जीपमध्ये जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ ती दोन पोरसुद्धा एक हात दुसऱ्या हातात घेऊन जीपमध्ये जाऊन बसली. क्षणार्धातच जीप रॉबिनपुढून निघून गेली. रॉबिन मात्र गालातल्या गालात हसत होता. तळ्यावरील बायका कौतुकाने रॉबिनकडे पाहत होत्या. आज भैरव आणि रावसाहेबांना गावात अद्दल घडवणारा कोणीतरी भेटला होता.

तळ्यावरून रॉबिन परत निघाला. मगाशी थांबलेल्या हॉटेलमध्ये तो परत आला होता. तिथे हरिभाऊ त्या हॉटेलमालकासोबत गप्पा मारत उभे होते. रॉबिनने हरिभाऊंना तळ्यावरील घडलेला प्रसंग सांगितला तसं हरिभाऊ चकित होऊन ऐकतच राहिले. पण एका अर्थी बरंच झालं त्या दोघांचं जरा अतीच झालेलं होतं त्यांना अशा प्रकारें अद्दल घडवणारा कोणीतरी हवाच होता. गप्पाटप्पा झाल्यावर रॉबिनने आज रात्रीच्या वेळी बंगल्यावर पाळत ठेवायला जायची योजना हरिभाऊंना सांगितली, तसं काहीसं चाचरतच हरिभाऊंनी त्या गोष्टीला मान्यता दिली. त्यानुसार संध्याकाळ झाल्यावर दोघेही हॉटेलमालकाच्या गाडीवरून बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. काही वेळातच बंगल्याच्या परिसरात ते दोघे येऊन पोहोचले. बंगल्याच्या आसपास नेहमीसारखीच स्मशानशांतता होती कसलाही आवाज न्हवता. मंद वारा वाहत होता. आपली गाडी बाजूच्या झाडीत कोणाला दिसू नये अशी लावली. रॉबिन आणि हरिभाऊ बंगल्याच्या बाजूला जिथे पत्र्याचं शेड उभं होतं तिथे येऊन पोहोचले. तिथून पुढे उसाची शेते चालू होत होती. शेडच्या मागून बंगला व्यवस्थित दिसत होता, तिथे एका दगडावर रॉबिन बसला.

“ आपण इथे बसलो आहोत खरे पण नक्की कोण येत असेल इथे रात्रीच्या वेळी काय माहित “ बाजूच्याच एका दगडावर बसत हरिभाऊ बंडीतून पानाचे पुडकं काढत म्हणाले.
“ जे कोणी असेल ते लवकरच समोर येईल “ रॉबिन शेडच्या आडूनच बंगल्याकडे पाहत बोलला.
“ पण ते जे कोणी असतील हे आपल्याला कसं समजणार, आणि समजल्यानंतर नक्की आपण करणार काय आहोत.” हरिभाऊ बोलले.
“ बंगल्यात ते कोणत्या तरी मार्गाने येत असावेत आणि परत त्याचं मार्गाने जात असावेत, जात असताना एका बेसावध क्षणी त्याचावर झडप घालून त्याच्या मुसक्या आवळायच्या, या शेडमध्ये दोरखंड असेलच ना” रॉबिन म्हणाला.
“ हो आहे, बांधकामाच्या साहित्यासाठी लागतो तो दोरखंड आणि अजून सामानदेखील आहे” हरिभाऊ तोंडात पान टाकत म्हणाले.
रॉबिनने आपल्या प्यांटच्या चोरकप्प्यात हात घालून चाकू व्यवस्थित जागेवर आहे कि नाही ते पाहिलं. हरिभाऊंनी ते पाहिलं आणि म्हणाले “ तू या चाकूचा वापर करावा अशी वेळ येऊ नये “
“वेळ आली तर करावाच लागेल हरिभाऊ, या ठिकाणी चाकूच पुरेसा आहे. नाहीतर गरज पडली तर मी छोटंसं पिस्तुल देखील जवळ बाळगून असतो.” रॉबिनने माहिती पुरवली.

ते दोघे बोलत असतानाच बंगल्याच्या समोर रस्त्यावर एक मोटारगाडी येऊन थांबली. त्यातून एक बाई उतरून गाडीजवळूनच बंगल्याकडे पाहू लागली. गाडीच्या आवाजाने रॉबिन आणि हरिभाऊ याचं लक्ष बंगल्यासमोरच्या रस्त्याकडे गेलं.
“ हि तर ती मिस शीला आहे. हि तिथे उभं राहून काय करतेय” हरिभाऊ जरा डोकं वर काढत म्हणाले.
“ पाहूयात नक्की ती काय करतेय इथे” भुवया ताणत रॉबिन रस्त्यावरच्या त्या गाडीकडे पाहत म्हणाला.
बंगल्याकडे एकटक पाहत निरीक्षण करत मिस शीला उभी होती जणू काही बंगल्याच्या आतमधे लांबून काहीतरी बघत असावी. असंच काहीवेळ निरीक्षण करून मिस शीला आपल्या गाडीत परत बसली आणि रस्त्यावरून निघून गेली.
“ हि बाई परत आली तशीच निघून गेली” हरिभाऊ डोळे बारीक करत बोलले.
“नक्कीच ती काहीतरी पाहत उभी होती हरिभाऊ, कदाचित तिच्याच सांगण्यावरून कोणीतरी बंगल्यात चित्रविचित्र आवाज काढत असणार, ते काम नीट होतंय का ते पाहायला ती आली असणार “ शेडच्या पत्र्याच्या मागे लपत रॉबिन म्हणाला.

संध्याकाळ सरून आता चांगलाच अंधार पडलेला होता. रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. रॉबिन आणि हरिभाऊ शांतपणे पत्र्याच्या शेडमागे बसलेले होते. कोणत्याच बाजूने ते तिथे बसलेल आहेत हे लक्षात येत न्हवत. बंगल्याच्या मुख्य दरवाजापासून ते मागच्या भागापर्यंतचा सगळा भाग या जागेवरून नजरेच्या टप्प्यात येत होता. मध्ये बराच गेला हरिभाऊंना आता डुलकी येऊ लागली होती. रॉबिन मात्र टक्क नजर लावून बंगल्याच्या सगळ्या बाजूला पाहत बसला होता, रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसतं न्हवत. म्हणून तीक्ष्ण नजरेने तो सगळीकडे पाहत होता.
अजून किती वेळ असं बसायचं म्हणून हरिभाऊ विचारणारच होते पण तितक्यात बंगल्याच्या मागच्या बाजूला शेताच्या बाजूने काळ्या आकृत्या पुढे येताना दिसल्या. रॉबिन सावध झाला आणि त्याने हरिभाऊंना हलवून सावध केलं. पुढे जाऊन शेडच्या मागे चिकटून रॉबिन हळूच त्या बाजूला पाहू लागला. अगदी सावकाशपणे चालत त्या आकृत्या बंगल्याच्या मागच्या भागातील खिडकीतून बंगल्यात गेल्या.

“ कोणीतरी गेलंय बंगल्यात रॉबिन, आता काय करायचं आपण” भेदरलेल्या अवस्थेत हरिभाऊ म्हणाले.
“ थोडावेळ वाट पाहूयात काय होतंय ते “ रॉबिन आपली नजर न हटवता तिथे पाहत म्हणाला.
काही वेळाने बंगल्यातून मोठ्याने कुsss असा आवाज ऐकू आला. आवाज एवढा भयानक होता कि हरिभाऊ घाबरून रॉबिनच्या मागेच येऊन उभे राहिले. थोडावेळाने चित्रविचित्र आवाजात किंकाळी मारल्याचा आवाज आला.

रॉबिन आणि हरिभाऊ शांतपणे आवाज ऐकत उभे होते. फारच विचित्र आवाजात त्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. कोणीतरी अशा आवाजात ओरडत होते कि ते ऐकून कोणालाही वाटेल कि इथे भुते वावरत आहेत. काही वेळ आवाज काढल्यानंतर शांतता पसरली. रॉबिनची विचारचक्रे फिरू लागली, बंगल्यात ठिकठिकाणी उघड्या खिडक्यांच्या जागा आहे तिथूनच कोणीतरी आतमध्ये शिरलं आहे, जे कोणी बंगल्यात आहे ते जिथून आलंय तिथूनच मघारी परतेल असं समजून चाललं तर ते जातानाच त्याच्यावर झडप घालणं योग्य होईल. रॉबिन विचारात मग्न असतानाच काही किंकाळ्या आणि ओरडण्याच्या आवाजाने बंगला दणाणून गेला, रात्रीच्या त्या भयाण शांततेत या आवाजाने अजूनच भीती वाटत होती. हरिभाऊ रॉबिनच्या मागेच उभे होते. काही वेळ शांततेत गेला आणि आवाज येणे बंद झाले.

“ हरिभाऊ आता तयार राहा जे कोणी बंगल्यात मागच्या बाजूने गेलंय ते माघारी जाताना सुद्धा त्याचं बाजूने जाणार कारण तो मार्ग त्याला सुरक्षित वाटत असणार” कुजबुजत्या आवाजात रॉबिन हरिभाऊंना म्हणाला. यावर हरिभाऊंनी फक्त मान डोलावली. किंकाळ्याचे आवाज बंद आले तसे रॉबिन आणि हरिभाऊ तयारीत उभे राहिले कारण आता बंगल्याच्या मागून ती व्यक्ती कधीही बाहेर येऊ शकत होती. रॉबिनने पत्राच्या शेडमधून लांब दोरखंड घेऊन तो हरिभाऊंच्या हातात दिला आणि सावकाशपणे चालत ते दोघे बंगल्याच्या बाजूच्या भागात गेले. तिथून बंगल्याच्या मागचा भाग स्पष्ट दिसत होता. भिंतीला चिटकून रॉबिन आणि हरिभाऊ उभे होते. काही वेळाने बंगल्याच्या मागच्या भागात जिथे खिडकीसाठी जागा बनवली होती तिथून परत काळ्या आकृत्या हळूच बाहेर पडल्या आणि शेताच्या दिशेने जात आतमधे गडप झाल्या.

“ चला हरिभाऊ सावज निघालंय” एवढं बोलून रॉबिनने प्यांटच्या चोरकप्प्यातून आपला चाकू बाहेर काढला आणि चपळाईने शेताच्या आतमध्ये घुसला. शेतात इतका अंधार होता कि डोक्यात बोट घातलं तरी दिसू नये तरीसुद्धा अंदाज घेत घेत रॉबिन पुढे सरकत होता. आजूबाजूला भयाण शांतात होती, रातकिड्यांची किरकिर फक्त ऐकू येत होती. समोर असणाऱ्या त्या काळ्या आकृत्यांना आपली चाहूल लागू नये याची दक्षता घेत रॉबिन त्यांचा पाठलाग करू लागला. मागोमाग दोरखंड हातात घेऊन सावकाशपणे हरिभाऊ त्याच्या मागोमाग येत होते खरंतर मनातून घाबरलेले होते. शेतात उसाच्या पाचटांच्या जवळून जात असताना शरीराला पाचट घासून खुसपूस असा आवाज येत होता. त्या काळ्या आकृत्या आता जलदगतीने पुढे चाललेल्या होत्या. शेतांची रांग सोडून आता एक बांध ओलांडून ते दोघे दुसऱ्या शेतात घुसले होते. रॉबिन त्या आकृत्यापासून अंतर राखून पुढे चालू लागला पण थोड्या वेळाने त्या आकृत्या नजरेच्या टप्प्यातून दिसेनाशा झाल्या. रॉबिन आता जरा घाईने पुढे जाऊ लागला हरिभाऊ आणि त्याच्या मधले अंतर कमी होऊ लागले. उसाच्या पाचटातून मार्ग काढत रॉबिन पुढे चालला होता. तेवढ्यात रॉबिनला बाजूच्या उसाच्या शेतातील गर्दीत खुसपूस ऐकू आली, जवळच कोणीतरी होतं आणि हळूहळू पुढे सरकत होतं. रॉबिन जागीच थांबून श्वास रोखून तिकडे कान देऊन ऐकू लागला. बाजूच्या उसाच्या रांगांमधून कोणीतरी पुढे येत होतं. हळूहळू खुसपूसण्याचा वेग वाढला. रॉबिन हातातला चाकू घेऊन तयार होताच,

तेवढ्यात उसाच्या त्या गर्दीतून पुढे उडी घेत कोणीतरी रॉबिनच्या पुढ्यात आलं आणि आल्याआल्याचं त्या व्यक्तीने रॉबिनवर काठीचा वार केला, रॉबिन आधीच सावध होता, वरून येणाऱ्या काठीचा वार पाहून जवळच्या चाकूने बरोबर काठीचा लक्षभेद करत रॉबिनने त्या काठीचे दोन तुकडे केले होते. अंगात बंडी आणि पायजमा घातलेलं कोणीतरी रॉबिनच्या बाजूला उभं होतं. रॉबिन त्या व्यक्तीकडे डोळे बारीक करून त्याला ओळखण्याचा प्रयत्न करू लागला. ती व्यक्ती हातातल्या तुटलेल्या काठीकडे पाहत जराशी गोंधळून उभी होती, एका काठीचे तुकडे होऊन त्या आता दोन काठ्या झालेल्या होत्या. पण काही क्षणानंतर काठीचे दोन्ही तुकडे हातात घेऊन ती व्यक्ती रॉबिनवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावली. रॉबिनवर अजून एक वार होणारच होता करणार इतक्यात मागून हरिभाऊंचा आवाज आला.

“ केशव थांब, ते माझ्यासोबत आहेत, मी हरिभाऊ आहे “ अंधारात ओळख पटण्यासाठी हरिभाऊ बोलले
त्या आवाजासरशी रॉबिन आणि ती व्यक्ती हातातली हत्यारे हवेतच रोखून मागे पाहू लागली. हरिभाऊ धपापत्या उराने त्या दोघांजवळ येऊन पोहोचले.
“ रॉबिन हा केशव आहे, बाजूलाच याचं शेत आहे, रात्री शेताला पाणी द्यायला तो इथे येत असतो आणि केशव हा माझ्या घरात पाहुणा म्हणून आलेला माझा मित्राचा मुलगा रॉबिन आहे” हरिभाऊंनी एका दमात सांगून टाकलं.
“ ओह्ह हरिभाऊ मी ओळखलंच नाही तुम्हाला. मला वाटलं शेतात रानटी जनावर फिरत आहेत कि काय म्हणून मी बघायला आलो, परत यांना पाहून वाटलं कि कोणी चोर उस चोरायच्या उद्देशाने शेतात घुसला कि काय. कारण तुम्ही दोघे यायच्या आधीपण काहीतरी खुसपुसत इथून पुढे गेलं होतं” केशवने रॉबिनकडे पाहत सांगितलं.
रॉबिन आणि केशव आता व्यवस्थित उभे राहिले होते. केशव अंगापिंडाने चांगलाच मजबूत असा तरुण होता. हरिभाऊंनी आपण इथे का आलो आहोत याचं कारण सांगितलं.
“ आपल्याला त्या काळ्या आकृत्यांना पकडायला हवं आहे केशव “ हरिभाऊ म्हणाले
“ आपल्याला गप्पा मारायला वेळ नाही हरिभाऊ, त्या काळ्या आकृत्या समोर जिथे गेल्या आहेत, तिथे आपल्याला वेळ न दवडता लवकर जायला हवं” रॉबिन चाकुवरची पकड मजबूत करत म्हणाला.
“ काळजी करू नका इथला सगळा परिसर माझ्या पायाखालचा आहे. रात्रीच्या अंधारात सुद्धा मला इथल्या सगळ्या पाउलवाट चोख माहिती आहेत, त्यांना जास्त दूर जाता येणार नाही कारण नुकतंच शेतात पाणी सोडलं आहे गाळात पाय रुतून त्यांची गती मंदावेल ” असं म्हणून केशव सुद्धा त्या दोघांसमवेत त्या आकृत्यांच्या मागावर निघाला. जाताना त्याने रॉबिन आणि हरिभाऊंना याच मार्गाने पुढे जात एका बांधावरून पुढे सरकायला सांगितलं आणि स्वतः दुसऱ्या बाजूने जात पुढे गेलेल्या त्या अनोळखी आकृत्यांच्या मागावर गेला. दोन्ही बाजूंनी पुढे जात त्या अनोळखी आकृत्यांना कोंडीत पकडायचा डाव त्यांनी आखलेला होता. रॉबिन आता वेगात पुढे जात होता, केशवच्या मते पुढच्या शेतांना पाणी दिल्याने आतमध्ये बराच गाळ साठला असून तिथून जे कोणी गेलंय वेगात पुढे कोणालाच जाता येणार न्हवत. तरीसुद्धा हि आलेली संधी सोडायची नाही म्हणून रॉबिन शेताच्या बाजूबाजूने अंदाज घेत पुढे निघाला होता.

अचानक पुढे जोरात कण्हण्याचा आवाज आला. आवाज ऐकून रॉबिन आणि हरिभाऊ वेगात पळत त्या बाजूने पाळायला लागले. पळता पळता हरिभाऊंचा पाय शेतातील पाणी दिलेल्या भागात अडकू लागल्याने त्यांचा वेग मंद होऊ लागला. रॉबिन मात्र सरावाने पुढे जात आवाज आलेल्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात तो एका उसाच्या रांगेतून पुढे आला तिथे त्याला केशव हातात तुटलेलं दांडका घेऊन दिसला त्याच्या समोर एक अंगावर काळा कपडा पांघरलेला एक व्यक्ती उभा असलेला दिसला ज्याच्या हातात भला मोठा चाकू होता आणि अजून एक व्यक्ती तिने सुद्धा काळा कपडा अंगावर पांघरलेला होता जमिनीवर लोळत कण्हत होती.
हातात चाकू घेतलेला तो माणूस केशववर चाल करून जाणार होताच तेवढ्यात रॉबिनने मागून येऊन अशी काही ढुशी त्या माणसाला मागून दिली कि तो त्याच्या तोंडावर जाऊन पडला. मग क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातील चाकू काढून बाजूला फेकला आणि रॉबिनने हाताने एक जोरदार फटका त्या पडलेल्या माणसाच्या कानावर दिला तसा तो माणूस देखील कानाला हात लावून कण्हत पडला. काही वेळात हरिभाऊ दोरखंड घेऊन पळत पळत आले.

“ इथे जवळपास कुठे विसाव्यासाठी जागा आहे का?” रॉबिनने केशवला विचारलं.
“ हो जवळच माझं एक छोटं खोपट आहे, रात्री पाणी द्यायला शेतात आलं कि आम्ही तिथे आराम करतो” केशवने माहिती दिली.
“ अच्छा मग आता यांना तिथेच नेऊन बांधून ठेवूयात आणि यांची चांगली चौकशी करूयात” असं म्हणत रॉबिनने हरिभाऊंकडून दोरखंड घेतला आणि कण्हणाऱ्या त्या दोन्ही इसमांचे हात बांधून त्याची टोक पुढे केशवच्या आणि मागे स्वःतच्या हातात बांधून त्यांना घेऊन केशवच्या खोपटाकडे निघाला. खोपट जवळच असल्याने ते लवकरच तिथे पोचले. ते एक छोटस खोपट होतं आतमध्ये एक लाकडी बेड आणि शेतीची अवजारे होती, केशवने आतमध्ये जाऊन दिवा लावला. रॉबिनने त्या दोन्ही इसमांचे हात आणि पाय बाजूच्या खांबाला दोरखंडाने बांधून टाकले. हरिभाऊ दारातच उभे होते.

“ बोला आता, कोण आहात तुम्ही दोघं आणि बंगल्यात काय करत होतात” बाजूच्या बेडवर बसत रॉबिनने प्रश्न विचारायला सुरुवात केली.
ते दोघेजण दिसायला चांगलेच बदमाष वाटत होते. दोघे अजूनही कण्हत होते, केशवच्या दांडक्याचा प्रहार एकाच्या कपाळावर बसल्याने तिथली जागा सुजून चांगलीच लालसर दिसत होती. त्यातल्या एकजण वजनाने चांगलाच जाडजूड असून दुसरा मध्यम शरीरयष्टीचा होता. दोघांच्या अंगात जुनाट मळकट कपडे होते जेणेकरून अंधारात ते उठून दिसू नयेत त्यातच अंगावर काळे झगे असल्यासारखे कापड घातलेलं होते.

“ अ..आ..आम्ही चोर आहोत, बंगल्यात क.. काही मिळते का हे बघायला आम्ही चोरून आत शिरलो होतो” माझं नाव रंगा आणि हा माझा साथीदार बाळू “ रंगा कण्हत म्हणाला.
“ अस्स... मग बंगल्यात गेल्यावर मोठमोठ्याने आवाज का काढत होतात, किंचाळत का होतात” हाताची घडी घालत गंभीरपणे रॉबिनने प्रश्न केला.
केशव आणि रॉबिनला पाहून ते दोघे चांगलेच घाबरले होते.

“ ते.. ते..असंच कोणी इथे येऊ नये म्हणून.. आम्हाला पकडू नये म्हणून..आम्हाला सोडून द्या आम्ही परत इथे येणार नाही कधी” रंगा चाचरत्त म्हणाला. तो धादांत खोटे बोलत होता हे रॉबिनला ठावूक होतं आणि बऱ्या बोलाने तो सांगणार न्हवता म्हणून रॉबिन म्हणाला” केशव मला वाटतं तुझा मगाच्या दांडक्याचा प्रसाद यांना अजून हवाय त्याशिवाय हे खरं बोलणार नाहीत” रॉबिनच्या या वाक्यासरशी केशवने बाजूला पडलेले दांडके उचलले आणि काही कळायच्या आत दोघांच्या नडग्यांवर जोरात हाणले. तसे रंगा आणि बाळू मोठ्याने ओरडले.
“ सांगतो सांगतो... आम्हाला रात्री तिथे मोठमोठ्याने आवाज काढण्यासाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठी पैसे दिले होते” कण्हत रंगा पटकन बोलला.
“ कोणी दिले होते पैसे” रॉबिनने विचारलं.
“ आम्हाला नाही माहित त्याचा चेहरा नीट पहिला नाही आम्ही” बाळू तडफडत म्हणाला. हात बांधल्याने त्याला दुखऱ्या भागावरून हातदेखील फिरवता येत न्हवता.
“ म्हणजे...नीट काय ते स्पष्ट सांगा” रॉबिन म्हणाला.

कण्हत कुथत ते दोघेही गडबडा लोळत होते. आणि तशाच अवस्थेत ते बोलू लागले.
“ काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधून आम्हाला काही पैसे दिले होते आणि रात्री अपरात्री बंगल्यात जाऊन चित्रविचित्र आवाज काढायला सांगितले होते. त्या व्यक्तीचा चेहरा त्याने लपवला असल्याने आम्हाला कळले नाही कि तो कोण आहे”
“ ओह्ह असं आहे तर ... म्हणजे रात्री अपरात्री तुम्ही तिथे जाऊन ओरडत होतात का?
“ अ..हो रात्री तिथे थांबायचो, कधी कधी उशीर झाला कि जाताना जेवणाचं पार्सल नेऊन जेवण सुद्धा तिथेच करायचो “ जाड शरीराचा रंगा म्हणाला.
“ चिकन खाऊन हाडांचे तुकडे तुम्हीच टाकले आहेत तर तिथे, बऱ मग तुमच्या सोबत दुसरी कोणी बाई पण सामील आहे काय यामध्ये जी साडी घालून खिडकीत उभी राहून लोकांना घाबरवते” रॉबिन म्हणाला.
“ न.. ना.. नाही नाही बाई कोणी नाही आम्ही दोघेच आहोत” दोघेही एकदम म्हणाले.
थोडासा विचार करून रॉबिनने परत प्रश्न केला – “बंगल्यात आतमध्ये खड्डे कशाला पाडलेत तुम्ही?”
“ ना..नाही आम्हाला माहित नाही ..आम्हाला नाही माहित खड्डे का पडलेत तिथे, आम्ही तिथे रात्री जायचो त्यामुळे एवढ काही कळत नसायचं, तसंपण आम्ही इतर कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता पैसे मिळतात म्हणून गपचूप सांगितलेलं काम करून निघून यायचो” रंगा केविलवाणा भाव करत म्हणाला.
“ मी सुद्धा रात्री पाणी द्यायला यायचो तेव्हा उसाच्या शेतात फिरायचो, उसाच्या पाचटातून खुसपुसत जातानाचे आवाज अनेकदा मी ऐकले पण मला वाटलं कोणतातरी जंगली जनावर किंवा सरपटणारा प्राणी असेल म्हणून दुर्लक्ष केलं होतं. आजपण तसाच आवाज ऐकून मी जवळ जाऊन पाहावं म्हणून आलो होतो. तेव्हा तुम्ही दिसलात ” केशवने सांगितलं

एकंदरीतच हे चोर कोणाच्यातरी सांगण्यावरून बंगल्यात रात्री घुसून किंकाळ्या मारत असावेत जेणेकरून हा बंगला भूतबंगला वाटावा. पण हे करायला त्यांना कोणी का सांगितले बरे असावे असं रॉबिनला वाटून गेलं.
रॉबिन खोपटच्या बाहेर आला. बाहेर सगळीकडे अंधार पसरलेला होता. समोर पसरलेल्या शेतांकडे पाहत विचार करू लागला. रॉबिनच्या मागोमाग हरिभाऊ खोपटातून बाहेर आले.
“ आता यांचं काय करायचं रॉबिन” प्रश्नार्थक मुद्रा करून हरिभाऊ म्हणाले.
“ उद्या सकाळ झाली कि यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकूयात.” रॉबिन शांतपणे म्हणाला.
“ हो ते करूच ..पण यांना हे कृत्य करायला कोणी सांगितलेलं असेल, संध्याकाळी आपण पाळत ठेवताना मिस शीला तिथे आली होती, तिनेच तर नाही ना कोणाकडून तरी यांना पैसे देऊन हे काम करायला सांगितलं ” हरिभाऊ म्हणाले.
“ मिस शीलाची पण चौकशी करूच सत्य काय ते लवकरच समजेल, पण भूतबंगल्यात कोणती भुते आहेत हे आपल्याला समजलं आहे त्यामुळे आता तिथे जायला घाबरण्याची गरज नाहीये” रॉबिन म्हणाला.

हे दोघे बोलत असतानाच खोपटातून केशव बाहेर आला आणि रॉबिन जवळ उभं राहून त्याला जवळून निरखून पाहू लागला. तो असं का पाहत होता हे दोघांना पण कळेना.
“ तुम्ही शहरात काम करणारे गुप्तहेर रॉबिनच आहात ना “ केशव स्मितहास्य करत म्हणाला.
त्याच्या या प्रश्नासरशी रॉबिन आणि हरिभाऊ एकमेकांकडे आश्चर्याने पाहतच राहिले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults