
कणकेच्या पुरणपोळ्या ...
महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळी साठीचे पक्वान्न म्हणजे पुरणाची पोळी. आज वेळे अभावी पुरणाच्या पोळ्या बहुतेक घरात विकत आणल्या जातात. विकतच्या पोळ्या जरी चांगल्या असल्या तरी त्यात पारी साठी मैदाच वापरला जातो. कणीक वापरून केलेल्या पोळ्या जास्त स्वादिष्ट आणि हरवाळ होतात. अजिबात मैदा न वापरता नुसत्या कणकेच्या पातळ, मऊ, हरवाळ पोळ्या कशा करायच्या हे होळी होऊन गेली आहे तरी इथे लिहून ठेवत आहे. पुराणावर जास्त लक्ष केंदीत न करता फोकस कणकेवर आहे.
पुरण करण्यासाठी
एक वाटी चणा डाळ , एक वाटी गुळ अथवा तुम्ही नेहमी घेता तेवढा , वेलची, जायफळ , किंचित मीठ आणि एक चमचा तेल.
पारीसाठी
वस्त्रगाळ कणीक एक वाटी , थोडं तेल आणि मीठ.
लाटण्यासाठी
तांदळाची पिठी.
एक वाटी चणा डाळ त्यात चमचाभर तेल घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून टाकून नंतर त्यात गुळ घालून कालथा पुरणात उभा राही पर्यंत शिजवा. त्यात चवीपुरतं मीठ आणि स्वादासाठी वेलची जायफळ घालून आणि गरम असतानाच वाटून घ्या. पुरण पूर्ण गार झाले पाहिजे पोळ्या करताना.
कणीक
१) कणीक पातेल्याला मलमल च फडक बांधून त्यावरून वस्त्रगाळ करून घ्या. म्हणजे कोंडा सगळा वर राहिल. हे वाचायला जरी कठीण, वेळखाऊ वाटत असलं तरी खूप वेळ लागत नाही त्याला. मलमल च्या कापडातून पटकन वस्त्रगाळ करून होते कणीक.
२) कणके मध्ये चवीनुसार मीठ घालून पोळ्याना भिजवतो त्या पेक्षा किंचित घट्ट कणीक भिजवा आणि तो गोळा एक फडक्यात बांधून ती पुरचुंडी पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवा दोन तीन तास.
३) दोन तीन तासांनी कणकेचा गोळा पाण्याबाहेर काढून ती परातीत घेऊन थोडं तेल घालून चांगली मळून घ्या. वाटल्यास पाण्याचा हात ही लावा मळताना. पाण्यात भिजवल्यामुळे कणीक मऊ पटकन होते जास्त मळावी लागत नाही. कणकेची आणि पुरणाची कन्सिस्टंसी सेम असायला हवी म्हणजे लाटताना पुरण विनासायास कडे पर्यंत पसरत.
४) पोळी लाटताना वरून लावायला कणीक न वापरता नेहमी तांदळाची पिठी च वापरा. त्यामुळे पोळी मस्त फिरते पोळपाटावर.
५) कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट तरी पुरणाचा गोळा घ्या. वरील प्रकारे कणीक भिजवली असेल तर हे अजिबात कठीण नाही. कणीक वरील पद्धतीने भिजविली असेल तर पोळी सहज लाटता येते अजिबात फुटत नाही मैदा नसला तरी.
इतकी पातळ लाटली आहे की फडक्याच डिझाइन दिसत आहे.
६) पोळपाटाला मलमल किंवा सुती फडकं बांधा व त्यावर poli लाटा . त्याने पोळी पोळपाटाला चिकटत नाही अजिबात. फडकं न वापरता बटर पेपर ठेवला पोळपाटावर तरी तोच रिझल्ट मिळतो. तसेच बटर पेपर सकट उचलून तव्यावर टाकता येते पोळी हा बटर पेपरचा आणखी एक फायदा. जे सोयीचं वाटेल ते घ्या पण डायरेक्ट पोळपाटावर पोळी कधी लाटू नका.
७) लागेल तशी पिठी घेऊन हलक्या हाताने पोळी लाटा. आणि अलगद पणे तव्यावर टाकून मध्यम गॅस वर पोळी भाजून घ्या. मस्त मऊ, हरवाळ स्वादिष्ट पोळ्या तयार होतात.
बदामी रंगाच्या स्वादिष्ट पुरणपोळ्या तयार
१) वस्त्रगाळ कणीक च घ्याची आहे पण हे तुम्ही चार दिवस आधी ही करू शकता. पुरण ही दोन दिवस आधी करून फ्रीज मध्ये ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळी ताण येणार नाही.
२) पाण्यात भिजवल्यामुळे कणीक एकदम मऊ होते, जास्त मळावी लागत नाही आणि तेल ही जास्त घालावे लागत नाही मैद्यात घालावे लागते तसे.
छान.
छान.
कणकेची पुरचुंडी पाण्यात ठेवण्याची आयडिया चांगली आहे.
पण पुरण आधी करून फ्रीजमध्ये ठेवलं, की बाहेर काढल्यावर त्याला पाणी सुटतं. ते सैल होतं. यापायी एकदा मला जाम वैताग आला होता. तेव्हापासून हे करणं सोडून दिलं.
कणीक वस्त्रगाळ केली, कोंडा काढून टाकला की ती अॅज गुड अॅज मैदाच होईल ना?
कणकेची पुरचुंडी पाण्यात
कणकेची पुरचुंडी पाण्यात ठेवण्याची आयडिया चांगली आहे.>>+१
मी मैदा नं वापरता कणकेच्याच करते नेहमी. पुरण पण आदल्या दिवशी केलेलं असतं.
कणिक अशी पाण्यात ठेवली नाही कधी. एकदा करून बघेन.
मी काल कणकेच्या पाव पट मैदा
मी काल कणकेच्या पाव पट मैदा घालून पाण्यात तो घट्ट गोळा 2 तास बुडवून, मग तेल-पाण्याच्या हाताने तिंबून मग पोळ्या केल्या. तार सुटून कणीक ओघळून आली की "वाहत्या कणकेची" पोळी करायची. म्हणजे कन्सिस्टन्सी तशी हवी असं साबा म्हणतात.
कालच्या पोळ्या खूप छान झाल्या. पुढच्या वेळी मैदा पूर्ण वगळून करून बघेन.
(सपीटीच्या चाळणीने चाळून घ्यायची कणीक. आणि सुती कापड पोळपाटाला बांधून तांदळाच्या पिठीवर लाटायची पोळी. हे केल्यावर पोळी सहसा बिघडत नाही.)
धन्यवाद ललिता , शर्मिला...
धन्यवाद ललिता , शर्मिला...
ललिता पुन्हा एकदा ठेवून बघ फ्रीज मध्ये. डब्याच्या आतून किचन टॉवेल वगैरे लावून ठेव म्हणजे moisture कागद शोषून घेईल. पुरण आदल्या दिवशी केलं तर एकाच दिवशी खूप काम पडत नाही.
वस्त्रगाळ कणकेच texture मैद्यासारखं होतं पण रंग आणि चव नाही होत मैद्यासारखी, म्हणून जास्त छान लागतात चवीला.
पुरचुंडी पाण्यात ठेवल्यामुळे तार चांगली येते कणकेला, किती ही पात्तळ लाटता येते.
कणीक वस्त्रगाळ करून घेणे आणि पुरचुंडी पाण्यात भिजत ठेवणे ह्या दोन गोष्टींमुळे फरक पडतो.
शर्मिला, एकदा पाण्यात ठेवून बघ मळावी लागत नाही आणि भारंभार तेल ही घालावे लागत नाही.
पुरण आदल्या दिवशी केलं तर
पुरण आदल्या दिवशी केलं तर एकाच दिवशी खूप काम पडत नाही.>> शिवाय शिळ्या (murlelya) पुरणाच्या ताज्या पोळ्या जास्त चवदार लागतात.
मी कणिक पाण्यात ठेवूनच करते.
मी कणिक पाण्यात ठेवूनच करते. अशी केली की भरपूर पुरण मावते हे खरं आहे.
पण कधी पुरचुंडी बांधली नाही किंवा वस्त्रगाळ केली नाही कणिक. आता ते करून पाहीन.
कधी पुरचुंडी बांधली नाही
कधी पुरचुंडी बांधली नाही किंवा वस्त्रगाळ केली नाही कणिक. आता ते करून पाहीन.+1
मला पण वाटलं वस्त्रगाळ म्हणजे मैदाच पण टेस्ट गव्हाची लागत असेल तर या पद्धतीने करून बघायला हव्या.आमच्याकडे(गव्हाची) कणकेचीच करतात फक्त तेल लावून जास्त वेळ तींबून घेतात मग पोळी छान मऊ होते.
आमच्या घरी कणकेचीच पुरणपोळी
आमच्या घरी कणकेचीच पुरणपोळी बनते.
मी मैद्याची पुराण पोळी खाल्लेली आठवतच नाही.
आणि कुटून वैगेरे नाही बनवत. कणिक थोडी जास्त वेळ भिजवून ठेवून सैल मळलेली असते.
अशे पद्धत काहि नवीन नाही आहे.
अशी पद्धत काहि नवीन नाही आहे. पण आजकाल सगळीकडे तुनळीवर फिरतेय हि रेसीपी.
https://youtu.be/QBvYWcPVBjk?si=o0iDAXaaphuWopfL
मला वाटते मायबोलीवरील तुनळीकरने पण कोणीतरी पाण्यात कणीक भिजवायची रेसीपी टाकलेली आहे.
https://youtu.be/JJu4qudgzoM?si=2Iku5MRWrzf9jzvG
आणि, मांडे करताना सुद्धा कणीक चाळून घेतली तर मस्त तार येते असे एका मैत्रीणीकदे पाहिलेय.
अरे व्वा . माझी मावशी करते या
अरे व्वा . माझी मावशी करते या पद्धतीनी पुपो. खूप छान नरम होतात पोळ्या
आहा, काय सुरेख, अलवार
आहा, काय सुरेख, अलवार पुरणपोळ्या!
मी मांडे करतानाही कणिक अशीच
मी मांडे करतानाही कणिक अशीच वस्त्रगाळ केलेली पाहिलीय.
वस्त्रगाळ केल्यावर कणकेचा मैदा होईल कदाचित पण मैदा ब्लिच करतात तशी आपली कणिक ब्लिच केलेली नसल्याने त्यातल्या त्यात इतकेतरी म्हणुन चालवुन घेता येईल.
अशी वस्त्रगाळ न करता पोळ्या करता येतील का?
मी नुसत्या कणकेच्या करायचा प्रयत्न केलेला पण पुरण पिठात मिक्स होते आणि पोळी लाटताच येत नाही. माझ्या अजुन जादाच्या चुकांमुळेही असे घडत असेल पण दोन तिनदा हा अनुभव घेतल्यावर कणकेवर काट मारली.
अशी वस्त्रगाळ न करता पोळ्या
अशी वस्त्रगाळ न करता पोळ्या करता येतील का?>> करता येतात.
मस्त आहे. पुपोंचा फोटो मस्त
मस्त आहे. पुपोंचा फोटो मस्त आला आहे. टेक्श्चर जाणवतंय फोटोतसुद्धा.
छान लिहिले आहे. मस्त दिसत आहे
छान लिहिले आहे. मस्त दिसत आहे पोळी.
कृष्णा+१
आमच्याकडे मैद्याच्या करत नाहीत आणि पिठात हळदही घालत नाहीत. कुठे कुठे घालतात असं ऑनलाईनच पाहिलंय.
मस्त लिहिल आहे.
मस्त लिहिल आहे.
आमच्याकडेही कणकेचीच पुरणपोळी करतात. मैदा अजिबात वापरत नाही.
कणिक भरपूर पाणी लावून पाट्यावर आपटून चांगली तिंबून घेतात.
पुरणपोळी होळीलाच नाही तर जवळजवळ सगळ्याच सणांना केली जाते.
कृष्णा+१
आमच्याकडे मैद्याच्या करत नाहीत आणि पिठात हळदही घालत नाहीत.+११
आमच्याकडेही पुर्वापार कणकेची
आमच्याकडेही पुर्वापार कणकेची पुरणपोळी बनते.. वर्शभरात घरी इतके कुळाचार असतात आणी सगळ्याला पुरणपोळिच असते त्यामुळे फक्त होळिच्याच नाहि तर गौरी,रोठ्,नवरात्र सगळ्याच्या नैवेद्याला पुरणपोळिच असते. बाहेरची खाण्याचा प्रश्नच आला नाही त्यामुळे मैद्याची करतात का कसली हे माहिती पण नाही..
मला लग्नाआधी पुरणपोळी करता
मला लग्नाआधी पुरणपोळी करता येत नसे. पण लग्न झाल्यावर कुळाचारासाठी वर्षातून 10 - 12 वेळा केल्यामुळे आता अगदी सोपी वाटते.
मस्त! मी कणकेचीच करतो. मला
मस्त! मी कणकेचीच करतो. मला नुस्त्या गुळाची आवडत नाही.अर्धा गूळ अर्धी साखर घेते.
प्रत्येक सणाला पुपो म्हणजे
प्रत्येक सणाला पुपो म्हणजे दुसरे पक्वान्न बनवत नाही की दुसर्यासोबत पुपो सुद्धा??
आमच्या कोकणात पुपो होळीशिवाय इतर वेळी नाहीच. आणि होळीलाही हौशी मंडळीच बनवतात. होळीचा मुख्य पदार्थ तर रस शिरवाळ्या आहे. परवा होळीला गावात प्रत्येकाच्या घरी हेच होते. मी पुपो बनवुन घरी नेल्या होत्या . ८ मार्चचा महिला दिन सोयीने १५ मार्चला साजरा केला व बचत गटांना प्रत्येकी एक पदार्थ बनवुन आणायला सांगितला तेव्हा त्यात काही गटांनी पुपो आणलेली.
प्रत्येक सणाला पुपो म्हणजे
प्रत्येक सणाला पुपो म्हणजे दुसरे पक्वान्न बनवत नाही की दुसर्यासोबत पुपो सुद्धा?? >> दोन्ही करावे लागतात.
पुपो च्या बर्याच रील्स मधे
पुपो च्या बर्याच रील्स मधे बडिशेप, काळी मिरी, सुंठ घालतात असे पाहिले. हळद पण होती कणीक मळताना. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती बघायला मजा येते.
आमच्याकडे कणीक चाळून घेतात आणि घट्ट मळुन ठेवतात. नंतर तेल आणि मीठ फेसून घेऊन मग तेल आणी पाणी लावून तार येइस्तोवर मळतात. अजून एक म्हणजे पु पो करत असतील त्या खोलीत काकडी कोचवत नाहीत. तार जाते म्हणे कणकेची. ख खो दे जा.
ममो, छान दिसतेय पु पो.
ओके.
ओके.
फोटोवरून मऊसुततेचा अंदाज
फोटोवरून मऊसुततेचा अंदाज येतोय. तुमची सगळी रेसिपी परफेक्ट असते.
पुढच्या वेळी कणीक चाळून घेणे आणि पोळपाटला सुती कापड बांधून लाटणे करून बघते. माझ्या पोळ्या गरम असताना चांगल्या मऊ होतात पण गार झाल्यावर कडक सिंग! मैदा नाही घालत मी अजिबात आणि कणिक पण तेल पाण्यात बुडवून ठेवते (आजीची ट्रिक) पण चाळली नव्हती कधीच.
अजून एक म्हणजे पु पो करत
अजून एक म्हणजे पु पो करत असतील त्या खोलीत काकडी कोचवत नाहीत. तार जाते म्हणे कणकेची. ख खो दे जा.>>हे आमच्याकडेपण असतं म्हणे, पण मी सगळा स्वयंपाक झाला की नैवेद्य वाढायच्या आधी काकडी कोचवून दही-मीठ-कूट-साखर घालून लगेच कोशिंबीर कालवून पानं वाढते. पोळ्या झालेल्याच असतात त्यामुळे टेन्शन नाही.
हळद घालतात कणकेत हे मी सासरी बघितलं, आईकडे नाही घालत.
पहिला होळीला दुसरा एका उ.प्र
पहिला होळीला दुसरा एका उ.प्र. मित्रासाठी आणि आज भाचीसाठी पुपोचा तिसरा हप्ता.
भारीच मंजूताई. सगळ्यांचे बघून
सर्वांना धन्यवाद...
सर्वांना धन्यवाद...
मंजू, पुपो अप्रतिम दिसत आहेत. एकदम मऊ लुसलुशीत दिसतायत. किती पातळ लाटली आहेस.
काही ठिकाणी पुरणाच्या पोळ्या जाडच आवडतात . तश्या आवडत असतील तर कणकेवर एवढी मेहनत घेतली नाही तरी चालेल. पण पातळ पोळ्या आवडत असतील तर त्या साठी कणकेला तार यायला हवी . कणीक वस्त्रगाळ करून पुरचुंडी पाण्यात ठेवल्याने कणीक लवचिक होऊन छान पातळ लाटता येते.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/1BjE2NhH41/?mibextid=oFDknk
इथे हेमाताईंच्या नावासकट ही रेसिपी दिली आहे. तुम्ही पाहिलंय का हेमाताई? मी कमेंट पण लिहिली आहे पूर्व परवानगीबाबत.
(तुमचं पेज वाटलं नाही ते.)
होळीला पोळी केली त्याचे पुरण
होळीला पोळी केली त्याचे पुरण उरले होते. थोडेसेच होते म्हणुन परत एका वाटीचे पुरण केले. कणकेची पुपो याआधी फसलेली पण तरीही करुन पाहु म्हणुन कणिक भिजवुन पाण्यात घालुन ठेवली. (वस्त्रगाळ केली नाही).
तासाभराने काढुन मळल्यावर छान तार आली. पोळपाटाला तलम कॉटन साडीचे फडके गुंडाळुन पुपो लाटली. तांदुळ पिठी नव्हती म्हणुन कणिक लावुनच लाटली. खालुन अजिबात चिकटली नाही पण काही वेळा वरुन लाटण्याला चिकटत होती. पुपो पातळ लाटल्या गेल्या (मला पातळच आवडतात) पण खुप तलम होत होत्या त्यामुळे तव्यावर टाकणे व पहिल्यांदा उलटवणे म्हणजे माझ्यासाठी कसरतच. त्या भानगडीत दुखावल्या गेल्या तरी जमवल्या. पुपो फूट्बॉलसारखी टम्म फुगल्याचा आनंद घेता आला नाही तरी काही चांगल्या फुगल्या. कणकेची पुपो तुलनेत चवीला जास्त आवडली. याआधी अशी पुपो करुन बघितल्याचे आठवतेय खरेतर. पण ठिकाय. आता महिन्यातुन एकदातरी पुपो करायची असे ठरवलेय.
ममोच्या पद्धतीने मोदकही करायचे आहेत. मी पुपो केल्यात खुपदा पण मोदक कधी केले नाही. माझ्या घरच्या गणपतीला नेहमी आई मोदक करायची. आता मी करुन पाहिन.
Pages