Submitted by गंधकुटी on 14 March, 2025 - 10:19
मनात कधी कधी भिरभिरतात
नकोशा आठवणींच्या पाकोळ्या
दाटतो निराशेचा अंधार, त्याला
औदासीन्याच्या झिरमिळ्या
पसरते असुयेची धूळ अन
साठतात दुःखाची जळमटे
अपमानाची भावना, तिला
रागाची आणि द्वेषाची पुटे
अशा वेळी प्रयत्नपूर्वक
मनाची कवाडे तू उघड
घेरून येणाऱ्या अंधाराला
सर्व शक्तिनिशी भीड.
त्या कवाडातून येऊ देत
झळाळणारा सूर्यप्रकाश
फाकेलं बघ लक्ख प्रभा
घेऊन आशा आणि उल्हास
त्या कवाडातून येईल मग
सळसळणारा रानवारा
राग, असूया, अन द्वेषाला
नसेल मग कधीच थारा
त्या कवाडातून बरसतील
पावसाच्या अमृतधारा
न्हाऊ घालतील प्रेमाने
दुःख जाईल देशांतरा
त्या कवाडातून कधी
चंद्राचे किरण झरतील
शांतवतील क्षोभ, अन
दुखऱ्या मनाला सावरतील
कदाचित कधी येईलही
एखादे पाखरू वेल्हाळ
शीळ त्याची जादुभरी
बनेल कवितेची ओळ...
बनेल कवितेची ओळ.
विद्या गोरक्षकर
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान. शेवटचं कडव आवडलं.
छान.
शेवटचं कडव आवडलं.
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_