सूर्य आता चांगलाच वर आला होता आणि तापू लागलेला होता. शेंडेंच्या घरातून बाहेर पडल्यावर रॉबिन आणि हरिभाऊ रस्त्यावरून चालू लागले. शेंडेंच्या घरापासून ते पुढे चालत आले असता त्यांना शेजारच्या घरातून हरिभाऊंना कोणीतरी आवाज दिला.
“ काय हरिभाऊ, दुपारच्या वेळी उन्हातान्हात कुठे हिंडताय, आणी सोबत हे महाभाग कोण ?”
या प्रश्नाकर्त्याकडे माना वळवून दोघेही बघू लागले. एक स्थूल शरीरयष्टीचा माणूस अंगात बनियन आणि लुंगी घालून शेजारच्या घराच्या कुंपणामागे उभा राहून मिश्किलपणे त्यांच्याकडे पाहत होता.
“ओह्ह.. नाना काय म्हणताय.. हे काय साहेबांच्या घराकडूनच येतोय. तुम्ही काय म्हणता” हरिभाऊ त्या इसमाच्या घराजवळील कुंपणाजवळ जात म्हणाले.
“ अच्छा असं होय..” असं म्हणत नाना रॉबिनकडे पाहू लागले. त्यांनी रॉबिनला ओळखलं नाही. त्यांची ती नजर पाहून हरिभाऊंच म्हणाले कि “ हा माझा एका जवळच्या मित्राचा मुलगा आहे. गावात आला आहे भटकायला. मला पण तेवढीच मदत होईल कामात म्हणून म्हटलं ये”
ऐनवेळी रॉबिनची ओळख लपवण्याचं काम हरिभाऊंनी हुशारीने केलं याचं रॉबिनला समाधान वाटलं.
“ या कि मग आत, या चहापाणी घेऊयात “ नाना आग्रह करत म्हणाले.
“ अहो आता एवढ्या उन्हात कसला चहा” हरिभाऊ उत्तरले.
त्यांना खरंतर नानांच्या घरात जायचं न्हवत. रॉबिनला सुद्धा हरिभाऊंच्या चेहऱ्याकडे पाहून तसं जाणवलं.
“ अहो या हो...अग ऐकलं का चहा टाकं बर जरा “ असं म्हणत नानांनी त्यांच्या कुंपणाच फाटक उघडलं आणि पुढे होत घरात गेले.
नाईलाजाने हरिभाऊ आणि रॉबिन फाटकातून आत शिरले. नाना घरात जाताच हरिभाऊनी रॉबिनला जवळ येण्याची खुण केली आणि त्याच्या कानात हळूच बोलले “ या नानाला उगाचच लोकांच्या चौकशा करायची भारी खोड आहे, आत्ता आपण शेंडे साहेबांच्या घरातून या मार्गानेच तेथून आल्याचं त्याच्या लक्षात आलं असणार. म्हणून शेंडेंच्या घरातील काही नवीन खबरबात कळते का हे बघायला उगाचच चहापाण्याचा खटाटोप.”
“ ओह्ह अच्छा..असं आहे तर “रॉबिनने हळू आवाजात बोलत मान डोलावली.
ते दोघेही नानांच्या घरात गेले. घर तसं फार मोठं नसून बैठे प्रकारातलं होतं. हॉलमध्ये २ खुर्च्या आणि एक जुनाट मळकट सोफा ठेवलेला होता. दोघेही तेथे जाऊन स्थानपन्न झाले. आतून पाण्याचा तांब्या घेऊन स्थूल शरीर सावरत नाना बाहेर आले आणी त्यांच्या शेजारी येऊन बसले.
“ मग काय म्हणतायत तुमचे शेंडे साहेब” तांब्या हरिभाऊंच्या हातात देत दात दाखवत नाना बोलले.
नानाच्या हातातून तांब्या घेत हरिभाऊंनी पाणी पिताना रॉबिनकडे सूचकपणे पाहिलं. रॉबिन काय समजायचं ते समजला. नानाच्या चौकशांची फैरी चालू झाल्याचं ते चिन्ह होतं.
“ काही विशेष नाही असंच कामानिमित्त, मी कुठे आणि कोणाकडे काम करतो हे याला दाखवायला घेऊन गेलो तिथे” रॉबिनकडे निर्देश करत हरिभाऊ म्हणाले आणि तांब्यातील पाणी प्यायले.
“ अच्छा असं होय.. बर बाकी काही कळल का कि घरात ते उपद्व्याप कोण करत होतं” चेहरा गंभीर करत नाना हरिभाऊंना म्हणाले.
“ नाही..कसलं काय ..सध्यातरी शांतात आहे घरात” खाली पाहत हरिभाऊ उत्तरले.
“ कसली शांतात अन कसलं काय. शेंडे म्हणजे मुलखाचा भित्रा माणूस आहे. उगाच कोणीतरी पोरासोराने भिंतीवर काईतरी लिहून रंगरंगोटी केली असलं घरात, आणी वस्तू इकडं तिकड फेकल्या असतील घरातल्या लोकांनी घाबरव म्हणून. शेंडे उगाचच घाबरलाय आहे.” नाना बोलले.
“ कोण कशाला असले उपद्व्याप करेल. काहीतरी बाहेरचंच असलं पाहिजे” उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून हरिभाऊ बोलले.
“ हा तसं पण असलं म्हणा, पण शेंडेचे वांदे झालेना त्यामुळे, कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडेना तो जास्त, त्यात शेजारच्या गावात तमाशाचा फड आलाय मस्त.” नाना हळू आवाजात बोलले. आणि मागे वळून किचनकडे पाहत अंदाज घेत कोणी ऐकत नाही ना हे पाहून पुढे बोलले “ नवीन चांगली पाखर आहेत फडात, मस्त आहेत “ डोळे बारीक करत मादकपणे पाहत नाना बोलले.
हे अशा पद्धतीच बोलणं रॉबिन जवळ बसलेला असताना हा नाना आपल्याशी करतोय हे हरिभाऊंना आवडल नाही. रॉबिनला सुद्धा हा नाना एवढा छंदीफंदी असेल असं वाटलं न्हवत. नाना हे जेमतेम शेंडेंच्याच वयाचे असल्याने शेंडेना अरे तुरे करून संबोधत होते.
“ तमाशाचा फडाचा आणि शेंडेसाहेब घराबाहेर न पडण्याचा काय संबंध” हरिभाऊ जरा मुद्दाम जोरात बोलले.
“ अहो शेंडेला पण आहे शौक तमाशाचा, मागच्या खेपेस एकदा असाच तमाशा आलेला असताना मी विचारलं होतं सोबत जायचं का म्हणून. रात्रीचं आम्ही दोघे गेलो होतो तिथे, तेव्हा असली भुताटकीची प्रकरणं झालेली न्हवती तेव्हाची हि गोष्ट” हळू आवाजात नाना बोलले.
“ एखाद वेळेस जाऊन आपलं औत्सुक्यापोटी पाहिला असेल, त्यात नवल ते काय” शेंडे कधीमध्ये असे शौक पुरे करतात हे हरिभाऊंना माहित होतं. उगाचच शेंड्यांची चर्चा अजून व्हायला नको म्हणून हरिभाऊ बोलले.
तेवढ्यात नानाची बायको चहा घेऊन बाहेर आली आणि त्या तिघांना चहा देऊन आतमध्ये निघून गेली.
“ हा असेल तसं, उंडगा पोरगा भैरव आणी रिकामा मेहुणा रावसाहेब यांना वैतागून अधेमध्ये मनोरंजन करत असावेत” नाना म्हणाले.
“ हम्म “ एवढंच बोलून हरिभाऊ गप्प बसले.
“ एवढा काय उंडगेपणा करतो तो भैरव” इतका वेळ ऐकत असलेला रॉबिन चहाचा घोट घेत मधेच संभाषणात सहभागी झालेला होता.
“ अरे काय करतो म्हणून काय विचारतो, काय नाही ते विचार, गावभर त्या रावसाहेबाला घेऊन टवाळगिरी करत फिरत असतो. उनाड मुलाचं टोळक घेऊन रस्त्यात तरण्याताठ्या पोरींना शेरेबाजी करण, कोणाच्याही शेतात जाऊन बळजबरी उस किंवा आंबे खाण आणी कोणी अडवलं तर अरेरावीची भाषा करण. नाही नाही ते उद्योग चाललेले असतात. ” नाना रॉबिनकडे पाहत वैतागत बोलले.
“ हा हे खरं आहे. भैरव अतिपणा करत असतोच नेहमी, गावातली लोकं गरीब आहेत, त्यात शेंडेकडे पाहून आणि त्यांच्या प्रतीष्ठेपुढे गावातील लोक जास्त काही बोलत नाहीत” हरिभाऊंनी पुष्टी दिली.
“ बापरे अजबच आहे हा प्राणी म्हणायचं” रॉबिन मुद्दाम डोळे मोठे करत घाबरल्यासारखे करत बोलला.
“ अजब नाही उपद्रवी कार्ट आहे ते, त्याच्या नादाला लागू नको रे बाबा तू “ नानांनी रॉबिनला सांगितलं.
“ हो हो. नाना मी लक्षात ठेवेन “ नाटकी सुरात रॉबिन म्हणाला. आपण आता बोलण चालूच केलं आहे आणि अनायसे इथे नानांनी स्वतःच घरात यायचं आमंत्रण दिले आहे तर अजून चौकशी करावी या उद्देशाने रॉबिन बोलणं पुढे वाढवत म्हणाला” ते भूतबंगल्याचं का काय ते प्रकरण चालू आहे वाटत त्यांच्या घरात“
“ तुला हरिभाऊंनी काहीच सांगितलं नाही वाटत. अरे त्या शेंड्याने काही महिन्यांमागे शहराकडे जाणाऱ्या मार्गावर एक बंगला विकत घेतला होता आणी त्याची डागडुजी पण केली मस्तपैकी. पण तिथं भयानक किंकाळ्याचे आवाज येऊ लागले. बंगला भुताने झपाटलाय तो. लोकांची टरकते तिथे जायला” नानांनी माहिती दिली. लोकांच्या अशा उखाळ्यापाखाळ्या करण्यात नानांना आनंद मिळत असल्याचे पाहून रॉबिनने चर्चा पुढे चालू ठेवली.
“ तिथे जाऊन नक्की भानगड काय आहे ते कोणीच का बघत नाही. सगळे लोक मिळून तिथे गेले आणी छाननी केली तर कदाचित वेगळीच माहिती मिळेल. असलं भूतबित काही प्रकार नसतो हो” बोलण्यात शहरीपणाचा आव आणत रॉबिन म्हणाला.
“ तू एकदा जाऊन बघ तिथ कळेल तुला लोकं तिथे का जात नाहीत. आधीच्या मालकाच्या घरातली एक बाई तिथे जळून मेली होती, तिचा आत्मा तिथे फिरतो असं लोकं म्हणतात. बऱ्याच लोकांनी पाहिलंय तिला. अरे बाबा हा ग्रामीण भाग आहे. इथे अशा घटनांना लगेच लोकमान्यता मिळते. बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे अनुभव इथे येत असतात, त्यामुळे सगळेजण विश्वास ठेवतात अशा गोष्टीवर आणि अशा प्रकारांपासून शक्य तितके चार हात लांब राहतात.” रॉबिनने भूतावर विश्वास ठेवलाच पाहिजे अशा तावात नाना आपली बाजू मांडत होते.
“ ओह्ह असं आहे तर “रॉबिन नकली चिंता चेहऱ्यावर आणत म्हणाला.
“ मग सांगतोय काय मी.. त्या बंगल्यापासून लांबच राहा तू, सुद्धा उगाच काहीतरी आक्रीत व्हायचं आणि हरिभाऊंना कामाला लावशील” खी खी हसत नाना बोलले.
“ बापरे असं असेल तर त्या बंगल्यापासून लांब राहिलेलंच बर आहे “ नाटकीपणाने घाबरत रॉबिन म्हणाला.
“ चला आता निघुयात “ चहा संपवून हरिभाऊ जागेवरून उठले. नानांची टकळी ऐकत इथे बसायची त्यांना मुळीच इच्छा न्हवती. त्यांच्या मागोमाग रॉबिनसुद्धा तिथून उठला आणि नानाचा निरोप घेऊन ते बाहेर पडले.
गावतील रस्त्यावरून चालत ते वेशीजवळ आले. शेंडेच्या घरात जाऊन गोष्टींचा आढावा रॉबिनने घेतलेला होता. गावात भुताची चांगलीच आवई उठल्याचे नानाच्या घरात चर्चा करताना रॉबिनला जाणवले. त्यात नानासारखी मंडळी त्याला अधिकच खतपाणी घालत असावीत. सकाळपासून घरातून निघालेलं ते दोघे बाहेरच फिरत होते.
“ मग ..शेंडे साहेबांच्या घरातील एकूण गोष्टी पाहून काय मत बनलं तुझं” हरिभाऊंनी चालता चालताच रॉबिनला विचारलं.
“ कोणीतरी नक्कीच शेंडे साहेबांना घाबरवण्याचा प्रयत्न करतंय, आणि त्यामध्ये त्यांना यशदेखील येतंय असं म्हणावं लागेल” रॉबिनने आपल्या भावना सांगितल्या.
“ म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? घरात तो रक्ताने लिहिलेला मजकुर आणी चोरीचा केलेला प्रयत्न हा भुताने नसून कोण्या व्यक्तीने फक्त शेंडेना घाबरवण्याकरिता होता? हरिभाऊ म्हणाले.
“ तसं म्हणायला हरकत नाही, कारण मला तरी ते कोण्या भुताने केलेले प्रकार वाटत नाहीत ”
“ पण एवढ्या खात्रीने बोलतोयस, असं काय आढळलं तुला.”
“ घरामध्ये नोकर मंडळी सोडून इतर कोणीही नसताना भिंतीवर मजकुर लिहिणे किंवा रात्री अपरात्री बंद खोलीत समान इतस्त: विखरणे. असल्या गोष्टी करण्यात कोणत्या भुताला स्वारस्य असेल. भूत असत तर ते आपली ताकत दाखवत शेंडेचा सरळ खातमाच केला असता ना, पण नाही. तसं न करता वेगळाच खेळ कोणत्या तरी व्यक्तीने चालवलेला आहे” रॉबिन म्हणाला.
“ घरातीलच व्यक्तीने हे केलं असेल का मग “ हरिभाऊंनी आपली शंका व्यक्त केली.
“ शक्यता नाकारता येत नाही, घराबाहेरची व्यक्ती पण असू शकते. ती जी कोणी व्यक्ती असेल ती शेंडेंच्या माहितीतलीच असली पाहिजे. कारण घरात्त जाऊन राजरोस खोल्यांमध्ये प्रवेश मिळवून असा प्रकार करणे म्हणजे त्या व्यक्तीला ते घर चांगलेच माहित असावे म्हणून शक्य झाले.” रॉबिन म्हणाला.
“ पण घराबाहेरची व्यक्ती घरात गुपचूप येऊन तो मजकुर कसा लिहू शकेल किंवा खोलीतील वस्तू इतस्त: कशा फेकू शकेल. नोकरांच्या मते मुख्य दरवाजाला कडी होती” हरिभाऊ म्हणाले.
“ हो माझ्या लक्षात आलं ते.. म्हणूनच तर बोलतोय जर हे काम घरातल्या नोकरांनी केलं नाहीये. तर बाहेरची व्यक्ती चोरमार्गाने आली आणी हे काम करून हळूच बाहेर गेली असणार” रॉबिनने उत्तर दिले.
“ आणी ते कसे?“
“ शेंडेचे घर दुमजली आहे, घराच्या वरच्या मजल्यावरील काही खोल्यांना लोखंडी नक्षीदार गॅलऱ्या आहेत. जमिनीपासून वर जाणाऱ्या सांडपाण्याच्या जाडजूड पाईपला पकडून वर जात त्या गॅलरी मध्ये प्रवेश मिळवणे सोपे आहे. घरात नोकर सोडून इतर कोणी नाही हि माहिती मिळवून घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या गॅलरी मध्ये पाईपवरून जाऊन हे काम करण सहज शक्य आहे. ती खोली गेस्ट रूम म्हणून ठेवली आहे असं शेंडे म्हणाले. म्हणजेच तिथे पाहुणा माणूस सोडून दुसरं कोणीही राहत नसणार. तसही मागच्या बाजूला जो सांडपाण्याचा जो पाईप आहे, तो तिथे नीट उभा राहावा म्हणून आधाराला ज्या कड्या ठोकल्या आहेत त्यातली एक कडी निसटून भिंतीला नुसतीच लटकत आहे. घरात येताना चढण्याउतरण्याच्या घाईत त्या व्यक्तीच्या वजनाने पाईपवर पाय घसरून ती कडी तुटली असावी, घरच्या आजूबाजूला असणाऱ्या हिरवळीवर सकाळ संध्याकाळ पाणी मारतात. त्यामुळे त्या व्यक्तीची पादत्राणे आडमार्गाने हिरवळीवरून चालत आल्याने भिजली असतील. त्यामुळे पाईपवर चढणे उतरणे अजूनच निसरडे झाले असावे. याचाच अर्थ कोणीतरी पाईपचा वापर करून वर गॅलरीच्या खोलीमध्ये प्रवेश मिळवला. त्या खोलीतून बाहेर पडून घरात आतमध्ये हळूच जाऊन खालच्या खोलीत रक्ताने मजकुर लिहिला अर्थात ते रक्त कोणत्या तरी जनावरच असेल. नंतर काही दिवसांनी रात्री याच मार्गाने येऊन शेंडेंच्या ऑफिस मधल्या खोलीतील चाव्या घेऊन दुसऱ्या खोलीत जाऊन कपाटे चाव्यांनी उघडून सामान इकडेतिकडे फेकले आणि चोरीचा बनाव केला.. अर्थात हा एक तर्क आहे” रॉबिनने सगळं नीट समजावून सांगितलं.
“ अरे देवा ..असं म्हणतोस. म्हणजे नक्की कोणीतरी मनुष्यप्राणी असावा. बंगल्यातील भूत इकडे घरात येऊन धिंगाणा घालत असल्याचा बनाव रचला आहे असं भासवण्यात आलं आहे बहुधा. पण कोणी केलं असावं हे” हरिभाऊंनी कपाळावर हात लावत उद्गार काढले.
“ हो.. जास्तीत जास्त शेंडेना घाबरवणे हाच हेतू यामागे असला पाहिजे. कदाचित घाबरून शेंडे आपला बंगला स्वस्तात विकतील म्हणून कोणत्या तरी व्यक्तीचं काम असावं असं प्रथमदर्शनी वाटतंय” एवढ बोलून रॉबिन विचार करू लागला.
यापुढे हरिभाऊ काहीही बोलले नाही. सकाळपासून काहीही न खाल्ल्याने दोघांना खूप भूक लागली होती. घराकडे जाईपर्यंत दम न धरवल्याने गावाच्या वेशीजवळच एक छोटस हॉटेल होतं तिथे बसून काहीतरी खावं असा विचार त्यांनी केला. हॉटेलात जास्त वर्दळ न्हवती. एका कोपऱ्यातील टेबलवर बसून दोघेही खाण्यात मग्न झाले.
“ आता पुढे काय करायचंय” हरिभाऊ म्हणाले.
“ खाऊन झालं कि त्या भूतबंगल्याकडे जाऊन जरा चक्कर मारून यावी, बघुयात नक्की तिथे काय काय सापडत” तोंडात घास टाकत रॉबिन म्हणाला.
रॉबिनच्या या वाक्यासरशी हरिभाऊंच्या अंगावर काटा आला कारण मागच्या वेळी जेव्हा ते बंगल्यात गेले होते तेव्हा त्यांना विचित्र अनुभव आला होता. पण ते काहीच बोलले नाहीत. खाऊन झाल्यानंतर हरिभाऊंनी हॉटेलच्या मालकाकडून दुचाकी मागून घेतली. मालकाची दुचाकी त्यांचा काम करणारा पोऱ्या बाहेर घेऊन गेला होता. तो येईपर्यंत दोघांनी चर्चा आणी तर्कवितर्क करण्यात घालवले. हॉटेल मालक हरिभाऊंना ओळखत असल्याने त्याने तो पोऱ्या आल्यावर लगेचच आपल्या दुचाकीची चावी हरिभाऊंना दिली. दोघांनी मग तिथून भूतबंगल्याकडे जाणाऱ्या मार्गाकडे कूच केली. वेशीपासून शहराकडे जाणाऱ्या मार्गाकडे दुचाकी चालवत रॉबिन हरिभाऊंना घेऊन निघाला. काही वेळाने ते दोघेही शहराला जोडणाऱ्या रस्त्याजवळ आले.
आजूबाजूला जास्त घरे न्हवती पण शेते आणी झाडे मात्र भरपूर होती. पुढे काही अंतरावर बंगला होता, काही वेळातच त्यांची दुचाकी वळणे घेत बंगल्यापाशी येऊन पोहोचली. संध्याकाळ झालेली होती, रॉबिनने समोर पाहिलं तर बंगला भव्यदिव्य आणी खरोखरच भयाण दिसत होता. बंगल्याच्या पुढे मोकळी जागा होती आणी चारी बाजूला भिंतीचं कुंपण अर्धवट बांधलेलं दिसत होतं. खरोखरच एक भयाण शांतता इथे जाणवत होती. रस्त्यावरच्या वाहनांचा वावर सुद्धा इथे कमीच होता. म्हणूनच हि शांतात अजूनच भयाण वाटत होती. दिवसासुद्धा इथे असं वातावरण असेल तर रात्रीबद्दल काय सांगावे.
बंगल्याला काही ठिकाणी खिडक्या न्हव्त्याच चौकटी ह्या मोकळ्याच होत्या. बंगला आकाराने खूप मोठा वाटत होता. आतमध्ये बऱ्याच खोल्या असाव्यात असा अंदाज रॉबिनने बांधला. बंगल्याच्या मागच्या बाजूला उसाची शेते होती. तर बाजूला खुरटी झाडे आणी झुडुपे. बांधकाम पूर्ण झालं नसल्याने कामे अर्धवट राहिली होती पण आता इथे भूतांचा वावर असल्याने कामाला कोणीही येत न्हवत.
दुचाकीवरून उतरून रॉबिन कुंपणाच्या आतमध्ये शिरला. हरिभाऊ त्याच्यासोबत चाचरतच कुंपणातून आतमध्ये गेले. मातीचे ढिगारे, लाकडाची फळकुटे आणि इतर बांधकाम साहित्य आसपास पसरलेले होते. बंगल्याच्या डावीकडे एक छोटंसं पत्र्याच शेड होतं, ते सुद्धा भकास दिसत होतं. ठिकठिकाणी काम अर्धवट पडलेलं होतं.. बंगल्याला खूपच मोठी जागा मिळालेली होती तसचं आजूबाजूला सुद्धा जागा खूप मोठी ऐसपैस होती. संध्याकाळ झालेली होती आणी थोड्याच वेळात रात्र होणार होती. इथे बंगल्यात विजेची सोय साहजिकच नसणार होती आणी बंगल्यासमोर रस्त्यावर सुद्धा दिवे वगेरे काही न्हवते. त्यामुळे आत्ता रात्र पडायच्या आत बंगल्याची पाहणी करावी असा विचार रॉबिनने केला आणी तो बंगल्याच्या आतमध्ये जाऊ लागला.
“ हरिभाऊ तुम्ही इथेच थांबा मी जरा आतमध्ये जाऊन पाहणी करून येतो. “ एवढ बोलून रॉबिन आतमध्ये जाऊ लागला.
“पोरा जरा जपून रे... मी सुद्धा असाच आतमध्ये गेलो होतो शेतीची अवजारे शोधत. मला कसा अनुभव आला हे तुला माहितीच आहे. जास्तवेळ आतमध्ये थांबू नकोस म्हणजे रात्र व्हायच्या आत निघुयात इथून” हरिभाऊ काळजीयुक्त स्वरात म्हणाले.
“ हम्म” असा उद्गार काढून रॉबिन बंगल्यात शिरला.
मुख्य दरवाजाला दरवाजा न्हवता फक्त चौकट होती. त्यामधून रॉबिन आतमध्ये आला. हॉलमध्ये सगळीकडे वाळू पसरलेली होती. भिंतींना अर्धवट प्लास्टर करण्यात आलेलं होत. काम पूर्ण करायच्या आधीच कामगारांनी येथून पोबारा केलेला दिसत होता. रॉबिन हळुवारपणे हॉलमधून पुढे आला. येथून दोन पॅसेज दिसत होते एक डावीकडे आणी दुसरा उजवीकडे जात होता. प्रत्येक पॅसेज मधून पुढे गेल्यावर खोल्या असाव्यात असं वाटून रॉबिन आधी डावीकडच्या पॅसेज मधून पुढे चालू लागला. थंडगार वाऱ्याचे झोत रॉबिनच्या शरीराला स्पर्शून जात होते. चालताना पाय वाळूत धसत होता. डावीकडच्या भागात दोन खोल्या एकमेकांना लागून होत्या. त्या दोन्ही खोल्यांना दरवाजे बसवलेले होते आणी ते पुढे सरकवलेले होते. एका खोलीचा दरवाजा रॉबिनने हाताने हळूच ढकलला तसा कर्ररर आवाज करत दरवाजा उघडला आणि रॉबिनने आतमध्ये प्रवेश केला. खोलीत टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतात होती. समोरच्या भिंतीवर खिडकीसाठी बनवलेली उघडी चौकट होती, त्यातून रॉबिनने बाहेर पाहिलं तर बाहेर बऱ्यापैकी अंधार पडायला सुरुवात झालेली होती. खोलीमध्ये जमिनीवर मातीत जागोजागी खड्डे पडलेले होते, भिंतींवर चरे पडलेले दिसत होते, जणूकाही जाणीवपूर्वक कोणीतरी ते ओढलेले असावेत.
रॉबिन त्या खोलीतून बाहेर पडून बाजूच्या खोलीत गेला, या खोलीचा दरवाजा मात्र जरा उघडाच होता. रॉबिनने आतमध्ये प्रवेश करताच कोपऱ्यात त्याला काही बोचकी ठेवलेली दिसली. हळूच जवळ जाऊन त्याने पायानेच डिवचून पाहिलं असता त्यात मऊमऊ काहीतरी लागतं होतं. रॉबिनने बोचक्यांच्या उघड्या फटीतून हात घालून आत पाहिलं तर आत फक्त कापडी चिंध्या हाताला लागल्या. बाजूला कोपऱ्यात एक खुर्ची उताणी पडलेली दिसली. रॉबिन खोलीच्या बाहेर आला आणि पुढे जाऊ लागला. पुढे थोडी रिकामी जागा होती डाव्या आणि उजव्या पॅसेजकडचा मार्ग येथे येऊन मिळत होता. त्या रिकाम्या जागेला ओलांडून पुढे अजून काही खोल्या होत्या. रॉबिनने पुढे जात पाहिलं तर रिकाम्या जागेवर जमिनीवर मोठं भगदाड पडलेलं होतं त्यात सिमेंटची पोती आणि सिमेंटने बरबटलेल्या काही लांब पल्ल्याच्या प्लास्टिकच्या ताडपत्री होत्या. त्या ओलांडून रॉबिन पुढे गेला. समोर एक विना दरवाजाची खोली होती, आकाराने जरा मोठी खोली वाटत होती. रॉबिनने आतमध्ये जाऊन पाहिलं तर एक चांगलं मोठ्ठ लोखंडी जाडजूड कपाट होतं त्याचं हॅन्डल वाकलेलं असून ते कपाटाला लटकलेले होते. त्याच्या बाजूलाच छोट्या आकाराची पण मजबुत अशी अजून काही कपाटे होती त्यांचे बाह्य आवरण चपटलेले दिसत होते. कोपऱ्यात एक टेबल उभा केलेला होता. रॉबिनने जवळ जाऊन निरीक्षण केले तर टेबलाच्या खाली त्याला काहीतरी लांबट बोटभर नळीसारखे आकाराचे पडलेले दिसले. जवळ जाऊन रॉबिनने ते लांबट हातात घेतले तर त्याला दिसले कि ती हाडे होती.
ओह्ह.. रॉबिनने उद्गार काढला. उंदीर किंवा अन्य कोणत्यातरी प्राण्याची हाडे असल्यासारखी वाटत असल्याने रॉबिनने ते हाड बाजूला फेकले. त्या खोलीतून रॉबिन आता बंगल्याच्या कोपऱ्यात आला होता जिथे ऐसपैस जागा होती आणी काही लाडकी सोफे तिथे ठेवलेलं दिसत होते. शेंडे साहेबांनी बंगला पूर्ण व्हायच्या आतच बरच समान आतमध्ये आणलेलं दिसत होतं. पण नंतर बंगल्यातील भुतांच्या अफवांमुळे ते तसचं इथे सडत पडलेलं होतं. लाकडी सोफ्याच्या जवळ एक मोठी खिडकीची चौकट होती आणि त्यातून थंडगार वाऱ्याची झुळूक आतमध्ये येत होती. रॉबिनने खिडकीतून बाहेर पाहिलं समोर लांबच लांब उसाची शेते होती, बंगल्यापासून शेतांच अंतर दूर आहेत त्याकडे पाहत रॉबिन शांतपणे विचार करत उभा होता. त्यातली काही शेते हि स्वतः शेंडेची होती. तर बाकीची आजूबाजूच्या राहणाऱ्या शेतकऱ्यांची होती. बाहेर बऱ्यापैकी अंधार पडलेला होता. रॉबिन तिथून आता उजवीकडच्या पॅसेज मधून पुढे आला. तिथे काही खोल्या होत्या पण आतमध्ये फक्त वाळूचे ढिगारे आणी विटा पडलेल्या होत्या. त्या खोल्या ओलांडून रॉबिन पुढच्या भागात म्हणजेच हॉलच्या मागे आला जिथून एक जिना वरच्या मजल्यावर जात होता. हाताने धरायला जागा नसलेला फक्त सिमेंट आणी खडी यांनी बांधलेला तो जिना हळूच चढत रॉबिन वर आला.बाजूला एक मोठ्ठी हॉलसारखीच खोली होती. या हॉलवजा खोलीच्या तिन्ही भिंतींना उघड्या खिडकीच्या मोठ्या चौकटी होत्या आणी त्यामधून वाऱ्याचा घु घु.. असा आवाज आतमध्ये येत होता. या खोलीमधून बंगल्याच्या समोरचा, बाजूचा आणी मागच्या भाग व्यवस्थित बघता येत होता. याचं ठिकाणी अनेकांनी केस मोकळे सोडलेली बाई उभी असलेली पाहिलेली असावी असं रॉबिनला वाटलं कारण यातली एक खिडकी रस्त्याकडे तोंड करूनच होती. या खोलीत बरेच कापडाचे बोळे पडलेले दिसत होते. भिंतीवर ठिकठिकाणी हातोडा मारल्यासारखे व्रण होते, बाकी तिथे अजून लक्षात येण्याजोगं काहीच नसल्याने रॉबिन माघारी वळला.
बाजूला हात पकडायला आधार नसलेल्या त्या सिमेंटच्या जिन्याजवळ रॉबिन आला, खाली उतरायला सुरुवात करणार एवढ्यात.. त्याला कसलातरी खरखरल्याचा आवाज आला. जणूकाही वाळूमधून कोणीतरी काहीतरी वस्तू हळुवारपणे खरडत पुढे आणतंय. रॉबिनने कान टवकारले कोण असावं बर? अगदी सावकाशपणे तो आवाज येत होता. बंगल्यातील शांततेमुळे त्याल तो आवाज टिपता आला होता. पण तो आवाज कसला आहे याचा पत्ता लागेल, काय असावं बरे भूत कि अन्य कोणता प्राणी? तो आवाज खालून हॉलच्या जवळून येत होता. रॉबिन श्वास रोखून आपल्या सगळ्या हालचाली थांबवून कान देऊन कानोसा घेऊ लागला. आता खरडण्यासोबत कर्रकर्र असा आवाज येऊ लागला. नक्कीच खाली कोणीतरी होते. रॉबिनच्या श्वासाची गती वाढलेली होती, खाली कोण होतं याचा थांग लागेना, खाली मेलेल्या अवनीच भूत तर नसेल ना? रॉबिनच्या मनात अचानक विचार आला. छे.. काय विचार करत आहोत असं म्हणून तो विचार त्याने झटकला. मग कोण असावं एखादा हिंस्र प्राणी तर न्हवे, बिबट्या किंवा कोल्हा. ओह्ह शिट्ट एखादं जंगली जनावर असेल तर उगाचच हल्ला करेल आपल्यावर असं वाटून तयारी म्हणून प्यांटच्या खालच्या चोरकप्प्यात हात घालून आपला चाकू काढण्याचा रॉबिनने प्रयत्न केला.
पण हाय रे दैवा... आज रॉबिन चाकू हरिभाऊंच्या घरातच विसरला होता. चोरकप्पा रिकामाच होता. सकाळी निघताना फक्त शेंडेच्या घराकडे जाऊन परत येऊ असं म्हणून निष्काळजीपणे त्याने तो चाकू घरातच सोडला होता. आणी आत्ता त्याला त्या चाकुची नितांत गरज होती. करकरीचा आणी खरडण्याचा आवाज हळूहळू जवळ येऊ लागला. रॉबिन जिन्याच्या पायरीजवळ थांबलेला होता. रॉबिनने स्थिर डोक्याने विचार केला, दोनच शक्यता असल्या पाहिजेत कि एकतर जंगली जनावर असेल किंवा कोणीतरी भटका माणूस किंवा चोर इथे रिकामा बंगला पाहून आश्रयासाठी आलेला असावा. कोणताही माणूस असेल तर एवढ घाबरण्याच कारण नाही. समोर येताच तोंडावर एक ठोसा देऊन गार करू त्याला, पण जंगली जनावर असेल तर? चाकू तर आपल्याकडे नाहीये किंवा इतर कोणतही शस्त्र, मग आता काय? त्या प्राण्याने हल्ला केला तर काय करावे?
रॉबिनने क्षणभर विचार केला. जे होईल ते होईल. खाली कोणी भटक्या असेल तर ठोसा आणी जर का जनावर असेल तर या जिन्याने हळूच आवाज न करता खाली उतरून हॉलमधून बाहेर जोरात पळत सुटायचं. जनावराला समोरून कोण आलंय हे कळणार नाही आणि ते बेसावध असल्याने गांगरून जाईल. ते बेसावध असल्याचा फायदा घेऊन जोरात पळत दरवाजातून धूम ठोकायची. एकदा बंगल्याच्या बाहेर गेलं कि पुढचं पुढ बघू. हा विचार पक्का करून रॉबिन जिन्याची एक एक पायरी हळुवारपणे उतरू लागला. गरज पडली ठोसा नाहीतर पलायन एवढ्या दोनच गोष्टी डोक्यात असल्याने त्याने दोन्ही मुठी मुष्टीयोध्याप्रमाणे घट्ट पकडून समोर धरलेल्या होत्या. खरखरीचा आवाज आता जवळ येऊ लागला होता. आता रॉबिन जिन्याच्या शेवटच्या पायरीवर आला भिंतीच्या पलीकडे काही अंतरावरच कोणीतरी असणार होतं.
रॉबिन शेवटची पायरी उतरला हीच ती वेळ होती, थोडसं खाली वाकून वेगाने बाहेरच्या दिशेने त्याने पळायला सुरुवात केली. पळायचा आवाज ऐकून बाहेरची खरखर थांबली. बाहेर जे काही होतं ते गांगरल असेल, योजना यशस्वी होणार म्हणून हॉलच्या जवळ येताच रॉबिनने पळायचा वेग वाढवला. हॉलमध्ये शिरताच एक लाकडी बांबू अचानक रॉबिनच्या समोर आला प्रसंगावधान राखून रॉबिनने पळता पळताच त्या बांबूलाच ठोसा दिला तसा तो बांबू बाजूला पडला आणि घाबरून जोरात कोणाच्यातरी ओरडण्याचा आवाज रॉबिन आला. त्या ओरडण्याने बाजूला बघण्याच्या नादात लक्ष विचलित झाल्याने रॉबिनचा तोल गेला आणि खाली वाळूवरून घसरत तो हॉलच्या दरवाजाकडे गेला. घसरत जाताना स्वतःला सावरत त्याने मागे वळून पाहिलं तर हॉलच्या त्या दरवाजाच्या बाजूला जिथून तो धावत आला होता तिथे कोणीतरी उताणा पडलेलं होतं. बंगल्यात अंधार पडल्याने स्पष्ट काही दिसत न्हवत. पण जे कोणी होतं ते हिंस्र श्वापद नसून माणूस होता. कदाचित रॉबिनने मगाशी बांबूला दिलेल्या ठोश्यामुळे तो बांबू त्या माणसाला लागला असेल आणि अचानक रॉबिनला पळत आलेलं पाहून तो घाबरून किंचाळला होता. रॉबिनने उठून स्वतःचे कपडे झटकले आणी त्या पडलेल्या माणसाच्या जवळ गेला. वेदनेने कण्हण्याचा आवाज येत होता. अंधारात जास्त काही दिसत न्हवत, पण जरा जवळ जाऊन पाहिलं तर रॉबिनला दिसलं ती उताणी पडलेली व्यक्ती म्हणजे हरिभाऊ होते ....
“ हरिभाऊ अहो तुम्ही इथे आतमध्ये काय करताय...तुम्ही तर बाहेर गेटजवळ होतात ना..? “ प्रचंड आश्चर्याने रॉबिनने त्यांना विचारलं, पण काहीच प्रतुत्तर आलं नाही. फक्त कण्हण्याचा आणी जोरजोरात श्वास घेण्याचा आवाज येत होता.
अरे देवा मगाशी बांबूला दिलेला ठोसा यांच्या डोक्याला तर लागला नाही ना? रॉबिनच्या मनात विचार आला. रॉबिनने हरिभाऊंना आधाराने उठवलं, काहीही न बोलता हरिभाऊंनी आपलं शरीर रॉबिनच्या अंगावर टाकून दिलं. त्यांचा हात खांद्यावर घेऊन रॉबिनने बंगल्याच्या बाहेर आणलं. गेटजवळ येऊन दुचाकीच्या सीटवर त्यांना टेकून बसवलं. त्यांना कुठे लागलं कि नाही ते पाहिलं. डोक्याला छोटस टेंगुळ आलेलं होतं बाकी कुठे काही इजा न्हवती.
“ अहो हरिभाऊ.. तुम्ही आतमध्ये कशाला आलात मला वाटलं कि कोणी चोर किंवा जंगली जनावर आला कि काय म्हणून म्हणूनच मी पळत बाहेर आलो. नशीब तुम्ही बाजूला उभे होतात नाहीतर माझा ठोसा बांबूच्या ऐवजी तुमच्या तोंडावर पडला असता.” कमरेवर हात ठेवून भुवया ताणत हरिभाऊंकडे पाहत रॉबिन बोलला.
हरिभाऊंना श्वास लागायला थोडा वेळ लागला. रॉबिन तसाच उभा होता. काही मिनिटांनी हरिभाऊ जरा स्थिर झाले. रॉबिन यांच्याकडे पाहत ते कधी बोलतायत याची वाट पाहत थांबला होता.
“ अरे बाहेर थांबलो होतो पण आतमध्ये तुला खूप वेळ लागत होता. अंधार पण पडायला लागलेला होता. बाहेर भीषण शांतात होती. मला तुझी काळजी वाटली आणी थोडी भीतीसुद्धा कि आतमध्ये तूला एवढा वेळ का लागतोय. इतका वेळ झाला म्हणून मग मी धाडसाने आतमध्ये जायला निघालो. आतमध्ये आल्यावर वाळूवर माझ्या कातडी चपलांचा कर्रकर्र आवाज येत होता, म्हणून मग मी हळू हळू पावले टाकत चालत आतमध्ये येत होतो. तेवढ्यात मला वरच्या जिन्यावर कसलीतरी चाहूल लागली. मी घाबरून धूम ठोकणार होतो पण तू आतमध्ये होतास तुला सोडून कसं जाणार, म्हणून बाजूला पडलेला मोठा बांबू हातात घेऊन तो जमिनीवर टेकत हळूहळू पुढे येऊ लागलो. तेवढ्यात कोणीतरी पळत येत असल्याचा आवाज आला मी बाजूला होत संरक्षणासाठी बांबू वर धरला. अचानक कोणीतरी पळत येऊन बांबूला ठोसा दिला आणी तो बांबू उसळून माझ्याच डोक्याला लागला. काय होतंय हे न समजून मी एक घाबरून ओरडलो आणी खाली उताणा पडलो. परत तू जवळ येऊन पाहिल्यावर समजलं कि तो पळत येणार तूच आहेस म्हणून” एका दमात हरिभाऊ सांगून मोकळे झाले.
त्यांचं हे बोलणं ऐकून खरंतर रॉबिनला हसू आवरल नाही. बाहेर उभे असलेल हरिभाऊ आपल्या काळजीने आतमध्ये पाहायला आले होते आणि आपण त्यांना चोर आणी हिंस्र जनावर समजून बसलो. इथे बंगल्यातील निरीक्षणाचे काम पूर्ण झाल्याने हरिभाऊंना गाडीवर मागे बसवून रॉबिनने दुचाकी चालू केली आणि तिथून जायला निघाला. रस्त्याच्या वळणावरून दुचाकी नेताना रॉबिनने सहज मागे वळून बंगल्याच्या दिशेने पाहिलं तर बंगला पूर्ण अंधारात बुडून गेला होता. लांबून तर तो अजूनच जास्त भयानक दिसत होता अगदी भूतबंगला असल्याप्रमाणेच.
क्रमशः
तिन्ही भाग वाचले. उत्सुकता
तिन्ही भाग वाचले. उत्सुकता वाढली आहे.
जाई+१
जाई+१
छान चाललीय. भैरव व
छान चाललीय. भैरव व मेहुण्यावर संशय आहे.
मचकुर असा शब्द नाहीय, कृपया मजकुर असे लिहा .
@साधना चूक सांगितल्याबद्दल
@साधना चूक सांगितल्याबद्दल धन्यवाद.. सांगितलेला बदल केला गेला आहे.
शेवटचा भाग आल्या शिवाय
शेवटचा भाग आल्या शिवाय वाचायचे नाही असे ठरवलेले पण आज तिन्ही भाग वाचले. उत्सुकता वाढली आहे. लवकर पुढचे भाग लिहा .
मस्त माहोल तयार झाला आहे...
मस्त माहोल तयार झाला आहे... मजा येणार हे नक्की...