दांडीचं भांडं
तसा माझा स्वयंपाक घराशी संबंध अधूनमधून येत असतोच, पण बहुतेक वेळा तो "चहा" नामक कॅटेगरी पर्यंतच मर्यादित राहतो. तसा मला स्वयंपाक येतोच (हो! खरंच! कसली शंका?), पण बायको माझ्यावर तशी वेळ येऊ देत नाही. याबद्दल तिचे आभारच मानायला हवेत—स्वयंपाकात प्रयोग करून घर उद्ध्वस्त करण्याचा माझा स्वभाव ती ओळखून आहे बहुतेक.
आता, प्रत्येक घरात एक असं खास भांडं असतं, जे फक्त चहासाठीच वापरलं जातं. बाकी काही त्यात शिजवलं तर स्वयंपाकघरात थेट आणीबाणी लागू शकते. आमच्याकडेही असं एक खास, आदरस्थानी असलेलं चहाचं भांडं आहे—"दांडीचं भांडं"!
माझ्या घरात चहा पिणारा मी एकटाच आहे. बायको नाही, मुलगाही पित नाही..म्हणजे माझं चहा प्रेम असहाय्य, एकाकी! पण मी तरी काय करू? दिवसाला दोन-तीन वेळा अर्धा कप का असेना, पण चहा लागतोच लागतो. आता प्रॉब्लेम असा आहे की, घरात माझ्या या आनंदी चहासत्रावर (हो, हा एक प्रकारचा कार्यक्रमच आहे) बायकोचा प्रखर विरोध असतो. पण जेव्हा ती घरात नसते, तेव्हा मी "स्वतंत्र भारतातला" स्वतंत्र नागरिक बनतो आणि माझं स्वतःच्या हाताने चहा बनवण्याचं मिशन सुरू करतो.
पण खरी समस्या म्हणजे हे दांडीचं भांडं आणि त्याचं अजब वागणं.
मी नेहमीप्रमाणे गॅस सुरू करून भांडं ठेवलं, पाणी ओतलं, साखर आणि चहा टाकला आणि फ्रीजमधून दूध आणायला गेलो, की परत येईपर्यंत भांडं उलटून संपूर्ण चहा गॅसच्या शेगडीवर आणि तिच्या खाली अभिषेक झालेलं असतो!
अगदी काळजीपूर्वक चहा बनवायचा प्रयत्न केला तरीही हे असंच होतं. आणि गंमत म्हणजे, शेगडी कितीही स्वच्छ केली तरी बायकोला कसं काय कळतं, हे मला अजूनही कोडंच आहे. जणू काही CSI ची टीम फिंगरप्रिंट स्कॅन करून गेली असावी, इतक्या खात्रीने ती विचारते—
*"तू चहा केलास ना?"*
मला तर कधी कधी वाटतं, *बायका त्यांच्या कार्यक्षेत्रात इस्राएलच्या "मोसाद" पेक्षाही जास्त कुशल असतात!*
दांडीचं भांडं दुसऱ्यांदा उलटल्यावर मात्र माझ्यातला इंजिनिअर जागा झाला. (हो, मला या गोष्टीचं नीट लॉजिक लावायचं होतं!) मग मी सरळ वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून याचा अभ्यास करायचं ठरवलं.
*"हे असं का होतं?"*
मग मी "सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटी" (आणि यासोबत माझ्या सहनशक्तीचाही अभ्यास) करायला घेतला.
थोडं मंथन केलं आणि मग भांड्याची दांडी वाकवली—म्हणजे त्याचं संतुलन सुधारेल असा माझा विश्वास होता. पण, अजूनही भांडं तिसऱ्यांदा उलटलं! त्या क्षणी, माझ्या मनात डोकावलेला वैज्ञानिक गॅलिलिओ, आर्किमिडीज आणि न्यूटन यांनीही डोकं पकडून घेतलं असतं.
आता पर्याय उरला नव्हता—मी थेट शरणागती पत्करली.
इथं खरी रहस्यकथा आहे—हेच भांडं बायकोच्या हातात गेलं की असं काही होत नाही!
ती अगदी सहजतेने चहा बनवते, आणि कधीही भांडं उलटत नाही! आता हे कसं?
*"हेच ते रहस्य आहे, ज्याचा उलगडा अजूनही झाला नाही!"*
बायकोच्या हातून चहा बनताना भांडं कसं काय स्टेबल राहतं? का तिच्या हातात गेल्यावर हे भांडं एकदम शिस्तीत वागतं?
याचं उत्तर मला कधी मिळेल की नाही, माहीत नाही. पण तोपर्यंत, मी दांडीच्या भांड्याशी मैत्री करण्याचा निष्फळ प्रयत्न करतोच आहे...
-अविनाश कोल्हे
फ्रीजमधून दूध आणायला गेलो, की
फ्रीजमधून दूध आणायला गेलो, की परत येईपर्यंत भांडं उलटून संपूर्ण चहा गॅसच्या शेगडीवर >>> हा फ्रीज नक्की आहे कुठे ? कोपर्यावरच्या दुकानात का?
होतं खरं असं...!
होतं खरं असं...!
मी हौशीने ते दांडीचं तडका पॅन आणलंय, त्याचीही तीच तऱ्हा!!
दांड्याचं वजन पॅन च्या
दांड्याचं वजन पॅन च्या वजनापेक्षा जास्त असतं, ते पडतच फार काही चूक नाही तुमची .
पाणी आटलं तर भांडं डायरेक्ट खाली येत.हातात धरूनच चहा करावा लागतो मला तर
हेहे. होतं खरं असं.
हेहे. होतं खरं असं.
चहा आणि दूध गॅसवर ठेवले की 'नजर हटी दुर्घटना घटी' ठरलेलंच आहे.
त्या भांड्याचा दांडा काढून टाका.
ना रहेगा दांडा ना पलटेगा भांडा.
आमचे दांडेवाले भांडे तर बरोबर
आमचे दांडेवाले भांडे तर बरोबर आहे पण चहात दूध टाकून टीव्हीचा चॅनेल चेंज करायला गेले की दूध नेमकेच तेव्हा वर कसे येते हे समजत नाही.
तेच त्याच्यासमोर छान गॅस मोठा वगैरे करून उभे राहिले तर मात्र लगेच वर येत नाही. आपले पेशंस टेस्ट करते. मला वाटते चहाला सुद्धा संवेदना असाव्यात आणि एखाद्या पुरुषासमोर उतू जायला त्याला संकोच वाटत असावा.
@ दांडीचे भांडे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मॅच करायला भांडे शेगडीवर बरोबर मध्यभागी न ठेवता दांड्याच्या विरुद्ध बाजूला सरकवून ठेवून बघा.
*...दांड्याच्या विरुद्ध
*...दांड्याच्या विरुद्ध बाजूला सरकवून ठेवून बघा.* +१ !
)
फक्त स्वतःपुरता चहा करण्यासाठीच किचनमध्ये येवून तुम्ही त्याचा वापर करता व स्वतः चहा घेत नसूनही ती माऊली तुम्हाला चहा करून देते, हे त्या भांड्याच्या लक्षात येत नसेल का ? मग, त्याची अशी प्रतिक्रिया येणारच ना !! ( आणि हो, आज तर त्या भांड्याच्या वाटेलाच नका जाऊ; ' महिला दिन ' आहे आज !!