एक्सचेंज

Submitted by शिल्पा गडमडे on 28 February, 2025 - 23:10

एक थकलेला दिवस, तिच्या थकलेल्या खांद्यावरुन घेऊन ती निघाली.

नेहमीचाच रस्ता तिला लांब वाटत होता. डोकं जड झाल्यासारखं, पायात त्राण नसल्यासारखं वाटत होतं. मानगुटीला बसलेल्या वैतागाला घेऊन तिने प्रयत्नपूर्वक झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली.
तेवढ्यात तिच्या कानावर शीळ पडली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर सायकलवरून एक मुलगी तिच्या दिशेने येत होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी गळ्यात स्कार्फ, डोक्यावर टोपी होती. आपल्याच तालात मस्त शीळ वाजवत सायकल चालवत होती. तिच्या निळसर डोळ्यातून, चेहऱ्यावरून आनंद झळकत होता.

ती क्षणभर त्या मुलीकडे कुतुहलाने पाहातच राहिली. किती आनंदी दिसतेय ही मुलगी, नाहीतर आपण? सतत वैतागलेले..

खरं तर तिचा स्वभाव आनंदी होता. पण जसजशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या तशी ती आनंद साजरा करायला विसरत गेली. आता कालचीच गोष्ट, तिच्या मुलीने कागदाचा पक्षी तयार केला होता आणि तो आईला उत्साहाने दाखवायला आली. पण ती कामं पटपट संपवण्याच्या मागे लागली होती की तिने चिडून, ‘नंतर बघते’, म्हणत रियाला दुसरीकडे पळवलं होतं. रिया हिरमुसली हे देखील तिच्या लक्षात आलं नाही.

आज या सायकलवरच्या मुलीला पाहताना तिच्या मनात विचार आला की, कोणाच्या आनंदी असण्याचं कुतूहल का वाटावं? ती मनापासून वाजवत असलेली शीळ समोरच्यालाही आनंद देऊन जात आहे ही किती सुंदर आहे.
पण हिच्या खांद्यावर पण आपल्यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पडल्या की कोमेजून जाईल का ही देखील? किंवा मीच आत्ता हिच्या जागी जाऊ शकले तर? म्हणजे मी सायकलवरून मस्त शीळ वाजवत जाईन आणि ही शाळा बंद व्हायच्या वेळेआधी पोहचण्याच्या धडपडीत..

तिला तिच्या विचारांचं हसू आलं. लहानपणी ती आणि तिची मैत्रीण सायकलने शहरभर फिरायच्या, रस्तावर चढ आला की तो सोपा व्हावा म्हणून कुठलासा मंत्र म्हणायच्या आणि जादूने समोरचा रस्ता सरळ आणि सोपा झाला अशी समजूत करून घ्यायच्या. समोर कितीही चढवाचा रस्ता असला तरी तो या जादूने हसतखे ळत पार करत असत. आज सायकलवरच्या मुलीला बघून तिला लहानपणीची ही गोष्ट आठवली. कितीही खुळचटपणा वाटला तरी गंमत म्हणून तिने लहानपणीच मंत्र पुटपुटलाच.

आणि..

काही क्षणातच तिला हलकं वाटू लागलं. मनावरचा ताण हलका झाला. सायकलवरच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला. सकाळपासून घेऊन फिरणारा अदृश चढ हलका झाला.

‘आपण आनंदी झालो पण आपला वैताग खरोखरच त्या मुलीकडे तर गेला नाही ना?’ या विचाराने ती चपापली. तिने लांबवर गेलेल्या मुलीच्या दिशेने पाहिलं.. सायकल अजूनही तालात पुढे जात होती आणि शिळेचा अस्पष्ट आवाज येत होता.

सायकलवरच्या मुलीच्या आनंदाचे आणि तिच्या वैतागलेल्या मनाचे ‘एक्स्चेंज’ झाले नाही हे बघून तिला हायसं वाटलं. जीवनातील चढावाचा रस्ता सोपा करण्याचा मंत्र तिला पुन्हा गवसला होता. शीळ वाजवत सायकल चलवणाऱ्या मुलीने नकळतपणे पायाखालचा रस्ता सोपा करायच्या ट्रिकची आठवण करून दिली.

तिच्या पायांना गती आली.. आणि तिला प्रतीक्षा होती रियाच्या कोवळ्या मिठीची..

#सुरपाखरू

@शिल्पा गडमडे
०१.०३.२०२५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त.आवडली.

छान. आवडली.
एक्सचेंज नावावरून नीलकांती पाटेकरांचा "आत्मविश्वास" चित्रपट आठवला.

मस्त आहे ही.. आवडली Happy

मलाही आत्मविश्वास आठवला.. आणि तसेच तर आहे हे. काही जादू मंत्र नाही तर आपल्याच ठरवण्यावर सारे काही आहे.

किट्टू, नानबा, सिमरन, सामी, स्नेहा, ऋन्मेऽऽष, वावे धन्यवाद. ऋन्मेऽऽषने सारांश एका वाक्यात पर्फेक्ट मांडला आहे- काही जादू मंत्र नाही तर आपल्याच ठरवण्यावर सारे काही आहे.
इथे आत्मविश्वासचा उल्लेख आल्यामुळे शोधाशोध करून बघून आले. पुन्हा एकदा धन्यवाद.