समन्वयाच्या दिशेने एक पाऊल

Submitted by तुष्कीनागपुरी on 28 February, 2025 - 05:28

एका समाजाचे एकत्र राहताना काही आदर्श गुण मान्य झालेले असतात. त्या सगळ्या आदर्श गुणांचा गोषवारा करून त्या समाजातल्या सगळ्या व्यक्तींच्या गुण काढण्याचे जर एक सूत्र असेल तर त्या समाजातल्या सर्व लोकांचे गुण काढून त्यांना एका तक्त्यावर मांडले तर एक ग्राफ तयार होईल.
.
समाजातले फार कमी लोक सगळ्यांच्या साठी आदर्श गुण घेऊन असणार असे गृहित धरले तर या ग्राफ मधे फार कमी लोक उच्चबिंदू वर असतील आणि बहुतांश लोक त्या उच्चबिंदू पेक्षा खाली असतील. ही एम विचार करण्याची पद्धत सध्या मांडतोय.
.
local-maxima.png
यात नक्की कोणते गुण आदर्श म्हटले गेले आहेत ते त्या समाजा साठी स्थानिक तथ्य असेल हे गृहित धरलेले आहे. अश्या काही लोकांचा त्या समाजामध्ये सन्मान अधिक होणार आणि त्यांच्या सारखे होण्याचा प्रघात रूढ होणार हे सहज समजता येते.
.
सर्वसाधारण लोक एका विशिष्ट उंचीवर पोहोचू शकतील तसे अनेक जण असतील कारण तसे होते चांगले मानले जाईल, पण त्याहूनही अधिक उंचीवर काही लोक पोहोचतील पण ते कमी असतील त्याचे कारणच तिथे पोहोचणे सोपे नसेल त्यासाठी त्याग आणि कष्ट अधिक करावे लागतील त्यामुळे काही लोक तिथे पोहोचू शकतील. ते लोक या समाजाचे आदर्श लोक किंवा मान्यवर ठरतील आणि त्यांच्या कथा सांगितल्या जातील.
.
या उलट काही लोक या पातळीवर घसरतील आणि वाइट कृत्ये केल्यामुळे या ग्राफ वर बरेच खाली जातील पण तसे कमी लोक असतील. फार कमी लोक खाली आणि फार कमी लोक वर असे त्या ग्राफ वर दिसतील.
.
यापद्धतीने जर आपण आपल्या समाजातल्या आदर्शांचा आणि पूजनीय लोकांचा विचार केला तर जे गुण त्या गुणांकनासाठी निवडले गेले त्यांना समाजाची संस्कृती किंवा मापदंड म्हणता येतील. ते मापदंड त्या समाजाच्या स्थळ काळ आणि इतिहासाशी जोडलेले असतील आणि त्यावर कालांतराने तयार होत आलेले असतील.
.
यात आपण एखादा धर्म, पंथ आणि समुदाय सुद्धा गृहित धरू शकतो. ही विचार पद्धती तिथे लावून पाहता येते. त्या समुदायाच्या संदर्भात बोलताना हे वर दिसणारे काही लोक आदर्श आहेत आणि पूजनीय आहेत हे त्या समाजातल्या सर्व घटकांना सहज मान्य असणार हे समजता येते.
.
हीच विचारपद्धती एका वेगळ्या समुदायाला लावून पाहिली तर त्या समुदायासाठी सुद्धा, असेच काही लोक स्थानिक उच्चबिंदू घेऊन असतील आणि काही निम्न बिंदू वर असतील आणि साधारण बहुतांश लोक एका पातळीवर असतील.
.
प्रवास आणि समाजांचे एकामेकात मिसळणे सुरू होते तेव्हा त्या दोन्ही समाजांमधले लिखित साहित्य जेव्हा आपापल्या थोर मंडळींबद्दल लिहिलेले वाचते ते असे सापेक्ष उच्चबिंदू असतात. एका समुदायाच्या लिखित दस्तावेजात मांडलेल्या थोर लोकांबद्दल ते थोर आहेत, यावर शंका नसतेच. ते थोर त्यांच्या समुदायाच्या संदर्भ कक्षेत सत्य असणारे तथ्य असते. त्या समाजाचा आदर करायचा असेल तर त्या समाजाने आदर्श मानलेले लोक त्या समाजासाठी स्थानिक उच्चबिंदू असल्यामुळे आदर्श आहेत हे समजून घेतले तर समजून घेता येईल.
.
एका समाजासाठी आदर्श असलेले गुण स्थल काल इतिहास यांच्या संदर्भात सापेक्ष असतात त्यामुळे, त्या आदर्शांची तुलना करून दोन वेगवेगळ्या समाजांमधल्या आदर्श व्यक्तींना समोर ठेवून त्यांची तुलना करणे मुळातच तितके सोपे नसणार.
compare-local-maxima.png
असे दोन वेगवेगळ्या समाजाचे सापेक्ष उच्चबिंदू यांच्यात तुलना करायची असेल तर त्या समाजाचे गुणांकन कोणत्या तत्वांवरून झाले त्यांचा आधी मागोवा घ्यावा लागेल आणि त्यात तांत्रिक आणि वैचारिक अडचणी येतील. सध्या अनेक वर्षांपासून सर्व धर्म आणि पंथांची आमचा पंथ कसा अधिक विकसित आणि चांगला आहे हे सिद्ध करण्याची अहमहमिका सुरू असताना हे काम अधिकच किचकट होते.
.
आपला उच्चबिंदू आणि त्यांचा उच्चबिंदू यात कोण अधिक उच्च आहे याचा निकाल जोपर्यंत आपण त्या तत्वांची पातळी किंवा तुलना करू शकत नाही तोपर्यंत अचूक होणार नाही. पण हे लक्षात न घेता आपण आमचे आदर्श अमुक करतात म्हणून थोर आणि तुमचे आदर्श ते करत नाहीत म्हणून थोर होऊच शकत नाही या प्रकारचे तर्क देऊ लागतो तेव्हा ती कधी न सुटणारी विचारांची गुंतागुंत होत असते.
.
सुरवात आपल्याला प्रत्येक समाजाचे काही उच्चबिंदू असतात आणि ते त्या समाजासाठी प्रस्थापित आदर्श असतात हे समजून त्यांना मान्य करून आणि त्यांचा आदर करून करावी लागेल. हेच सूत्र त्या समाजाला देखील लागू होईल. आणि ही पातळी गाढल्या गेली तर तिथून समन्वयाची एक दिशा मिळू शकेल.
.
मनात चालत असलेले काही विचार मांडण्यासाठी आधी एक विचारांची चौकट तयार करण्याच्या उद्देशाने ही सुरवात करतोय. या संकल्पनेला पुढच्या लिखाणात वाढवत नेता येईल आणि त्यावर आधारित अजून पुढचे संबोध विचारात घेता येतील. ही विचारप्रक्रिया सदोष असू शकते आणि सुज्ञ वाचक तसे काही सापडल्यास दाखवून देतील याची आशा करतो आणि यावर येणाऱ्या सूचनांना ग्रहण करून या विचार पद्धतित हवे ते सुधार आणि फेसबदल करून याला पुढे नेण्याची इच्छा आहे हे नमूद करतो.
.
#सुरपाखरू
.
तुषार जोशी
नागपूर, शूक्रवार २८ फेब्रुवारी २०२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults