विज्ञानाचा विकास अनेक दिशांनी होऊ शकतो, त्यातली कोणती दिशा घ्यायची हे वैज्ञानिक नेहमीच अचूक ठरवू शकतील असे नव्हे. किंवा त्यांनी एक दिशा अंगिकारली तर आपल्याला त्याचा हवा तसा लाभ मिळेलच याचे काही निश्चित नसते. विकासाची दिशा ठरवणारे द्रष्टे हे नेहमीच वैज्ञानिक नसतात आणि साहित्यिक म्हणून आपण विकासाची दिशा मांडून ठेऊ शकतो.
.
वास्तुशिल्पी जेव्हा वास्तू कशी हवी याचे स्वरूप कागदावर मांडतात तोच त्या वास्तू चा पहिला जन्म असतो. कल्पनेत ती वास्तू डोळ्यासमोर उभी करण्यास वास्तुशिल्पी महत्वाचे असतात. एकदा ती वास्तू कागदावर उभी झाली की तिला विटा मातीत उभी करायला अनेक कारागिर आणि मिस्त्री मिळतात. वास्तुशिल्पी त्या पहिल्या निर्मितीसाठी आवश्यक असतात.
.
आपल्याला जग जसे हवे आहे त्याचे उदाहरण म्हणून एक प्रतीजग आपल्या कथांमधून साहित्यामधून साहित्यिक लिहून ठेवू लागले तर एक भविष्यातले जग असे असू शकते अशी पहिली निर्मिती आपण करत असतो हे समजणे महत्वाचे आहे.
.
साठ च्या दशकात स्टार ट्रेक नावाची ललित-विज्ञान मालिका प्रसारित व्हायची त्यात आपण समोर उभे राहताच आपोआप उघडणारी दारे दाखवली होती. त्या काळात ते तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. त्या मालिकेच्या शुटिंगचे किस्से सांगतांना लिहिलेले आहे की त्या दारांच्या मागे दोन माणसे उभी असायची आणि सीन च्या शुटिंग च्या वेळी ती दारे दोन्ही बाजूंनी मागून ओढून ती आपोआप उघडताहेत असा भास तयार केला जायचा.
.
नंतर जेव्हा विज्ञानाच्या विकासात सेंसर या तंत्राचा शोध लावला गेला असेल तेव्हा त्याचा उपयोग कशात करायचा याचे उत्तर शास्त्रज्ञांकडे आधीपासूनच उपलब्ध होते नाही का? आपोआप उघडणारी दारे ही लोकप्रिय कथेव्दारे आधीच रूढ झालेली संकल्पना होती. ती संकल्पना अस्तित्वात आणणारे या तर्काने साहित्यिक होते वैज्ञानिक नव्हे, ही एक महत्वाची जाणीव आहे.
.
आपल्याला आता ते कसे करायचे माहित नसेल तरीही आपण आपल्या साहित्यात आपल्याला हवे तसे जग अस्तित्वात आणायचे आहे हे ठरले म्हणजे आपण आपल्याला हव्या असलेल्या आदर्श जगाचे विश्वामित्र आहोत हे आपल्याला कळेल.
.
मग तुम्हाला हवे तसे जग निर्माण करायला घेताय ना?
.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
.
(विश्वामित्र)
तुषार जोशी
नागपूर, गुरूवार, ३० जानेवारी २०२५
विश्वामित्र होऊया
Submitted by तुष्कीनागपुरी on 26 February, 2025 - 01:45
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा