व्यसन
मागच्या वर्षाप्रमाणे नवं वर्ष सुरू होतं. तीच व्यवधानं , तीच धावपळ, तशीच खूप कामं.. असं करत मागच्या पानावरून पुढे म्हणत धकाधकीचं आणखीन एक वर्ष सुरू होतं. मनात अनेक वर्षापासून थकवलेल्या फाईल्स आपापली प्लाकार्ड्स घेऊन मध्ये मध्ये डोकं वर काढत असतात. पण आपण एखाद्या निष्णात हुकूमशहा सारखे त्यांना वारंवार गप्प करत असतो. “ काय्ये ??” असं मनातल्या मनात त्यांच्यावर खेकसतो. आपल्यापैकी बहुतांश लोकं व्यस्ततेचा बागुलबुवा सोबत घेऊन “ मी व्यस्त आहे.” हा बोर्ड सोयीस्करपणे इतरांना आणि स्वतःला दाखवत फसवत असतात. मग ही व्यस्तता कधी एखादी करायची गोष्ट पुढे ढकलण्याचे एक फसवं रूप असतं तर कधी निव्वळ आळशीपणा. फार कष्ट ना करता पण नियमित सरावाने आपण व्यस्ततेच्या व्यसनाधीन होतो.
मित्र मैत्रिणींना फोन करायचा बरेच दिवस राहिलेलं असतं. कधी पुन्हा चित्रं काढायची असतात. नियमित गाण्याचा रियाझ करायचा असतो. नवी भाषा शिकायची असते. बरेच दिवस मनात असलेलं एखादं सामाजिक काम करायचं असतं. मैत्रिणीसोबत दोन तीन तास मजेत वेळ घालवायचा असतो. अनेक पुस्तकं कपाटातून खुणावत असतात. पण आपण स्वतःला समजावत असतो, ‘ आपण व्यस्त आहोत.’ बरेचदा आपला मोबाईल, पोटापाण्यासाठी करत असलेलं काम यात आपण स्वतःला रममाण करून घेतो. पुस्तकातल्या छापील सुविचारसारखं ‘ माणूस जगाला फसवू शकतो स्वतःला नाही.’ असं आपण म्हणतो खरं, पण प्रत्यक्षात स्वतःला बेमालूम फसवत रहातो.
निरोगी आयुष्य जगण्यासाठीच्या सवयी असोत, छंद जोपासायचे असोत, किंवा नाती जपण्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि परिश्रम असोत बहुतेक ठिकाणी आपण आपला व्यस्ततेचा पाढा गिरवत रहातो. ‘ थोडा निवांत झालो/ झाले की अमुक अमुक करणारच आहे.’ असं म्हणत स्वतःला सुट देणं सुरू ठेवतो.
आपल्या रहात्या घराच्या आसपास, जिन्यात, लिफ्टमध्ये इमारतीत भेटलेल्या लोकांना स्मित द्यायलाही कित्येकदा वेळ नसतो आपल्याला. आपण मग्न असतो आपल्या व्यस्ततेत! अशी व्यस्तता दिमाखाने मिरवणारी लोक पाहिली की इस्त्री केलेला चेहरा घेऊन वावरणं आता फॅशनेबल झालं असावं अशी शंका येते. व्यस्त असणं जणू बुद्धिमत्तेचं आणि बुद्धिजीवी असल्याचं प्रमाण झालं असावं असे मजेदार अनुभव येतात. गंमत वाटते.
‘ व्यस्त व्यस्त ‘ असा जप करत नक्की कशात व्यस्त असतो आपण ? खरं तर या प्रश्नाचं आजच्या काळातलं उत्तर बऱ्यापैकी सार्वत्रिक असावं. पोटापाण्याचं काम , तंत्रज्ञान, भविष्याची अतिरिक्त काळजी यांनी आपलं जगणं अमरवेलीच्या पिवळ्या जाळीसारखं वेढून टाकलं आहे. स्वतःत प्रामाणिकपणे डोकावलं आणि दिसेल ते सत्य स्वीकारायची हिंमत ठेवली तर आपापली व्यस्ततेची बुजगावणी आपल्याला नक्की सापडतील.
स्वतःला विरंगुळ्यासाठी वेळ काढण्यासाठी , जगण्याशी जोडलेले रहाण्यासाठी , प्रवास करण्यासाठी व्यस्ततेतून वेळ काढण्यात मजा आहे. सतत काम आणि विरंगुळ्याचे कोणतंही साधन नसलेला मरगळलेला जॅक होणं ज्याचं त्याला टाळता येऊ शकतं. जगण्याची असोशी रिचार्ज करता येऊ शकते. फक्त आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःसाठी स्वतःच्या मनात व्यसनमुक्ती केंद्र उघडावं लागेल. कामासाठी आपण की आपल्यासाठी काम या अनुषंगाने मोबाईल, तंत्रज्ञान, भौतिक सुख आणि आपलं जगणं यांचा संबंध वरचेवर तपासून बघावा लागेल. आपल्या सगळ्यांकडे जगण्यासाठी मर्यादित काळ आहे. व्यसनात हरवलेल्या स्वतःला शोधून काढू आणि ‘ व्यस्त व्यस्त ‘ नव्हे ‘ मस्त मस्त ‘ जगू.
मेघा देशपांडे.
25-02-25
#सुरपाखरू
व्यस्त नव्हे, व्यग्र.
व्यस्त नव्हे, व्यग्र.