
मनोज मोहिते
पाणी वाहताना काय वाहून ते आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी हाती काय देते? पाऊस पडतो, पाणी वाहते. पावसाचे पाणी वाहते राहते. ते अडते. अडखळतेही. पण मार्ग शोधून घेते. कोसळणाऱ्या पावसात मार्ग शोधता येत नाही. समोरचे नीट दिसत नाही. आतला गोंधळ संपत नाही. पावसाचे आणि पाण्याचे हे असे वागणे नेहमीचेच. त्याची सवय किती लावावी आणि त्याच्या नाद कसा सोडवावा.
वाहत्या पाण्याचे एक बरे असते. ते जमिनीवर आडवे वाहत असते. जमिनीवर आपण उभे असतो. पाण्याशी भू-कनेक्टेड असतो. पायांस पाणी लागले की पाय वाहत्याचे होतात. पाय चालतेच असतात. सतत. थांबतात. आराम करतात. विराम घेतात. पण चालणे हा त्यांचा स्वभाव. स्वभावाला औषध नाही. स्वभावापुढे बरेचदा कुणाचे काही चालत नाही. चालणे हा पायांचा स्वभाव. आणि पावसाचा...
पावसाचा स्वभाव कोसळण्याचा. ढगांना रिते सोडून जमिनीकडे झेपावण्याचा. शरीर त्याला झेलते. कच्चे मन, कच्चे छत त्याला सोसते. पायांस पावसाचे थेंब लागले की पावले पळतात. आडोसा शोधतात. मिळाला तर बरे, न मिळाला तर ओले हाल. इतकेच असे असत नाही. पावसाचा नेम कुणाला सांगता येत नाही. पाऊस धुवांधार पडू लागला की वाहते पाणी धावते होते. या धावत्या पाण्याचा वेग सहसा हाती लागत नाही. माणूस तरीही धडपडतो. स्वत:वर अतिविश्वास ठेवतो. एक पाऊल टाकतो. पाऊल घसरते. पाण्यास भुलते. शरीर पाण्यात; पाण्यातला देह होते. नकोच हे असे कुणाच्या वाट्याला. नकोच इतका पाऊस कुणाकुणाच्या वाट्याला.
पण आपल्या हाती काय! तो आभाळातून पडतो. आपण आभाळाकडे केवळ बघतो. आभाळ हो म्हणतो खरे, आभाळ होताच येते असे नाही. आभाळ कितके आणि आपण कितके! कधी कधी हिमतीचा आणि वास्तवाचा ताळमेळ साधत नाही. दरवेळी हिंमत सोबत देईलच असे नाही. खचतो माणूस. ओला होतो. अश्रूओला. नाहीच थांबत ते अशावेळी. धीर कोण कुणाला देणार आणि कोण कुणाला सावरणार अता.
हे असे सारे वाहत्या नि कोसळत्या पाण्याचे. यात माणूस थेंबाएवढा. निसर्ग कायम तत्त्वमोठा. तो जाणीव करून देतो. स्वीकारायला लावतो. माणूस स्वीकारण्यास अडतो. माणूस स्वीकारण्यास सज्ज नसतो. मग हिंमत खचते. दिठी शून्यताठर. पण एक जन्म खुणावू लागतो. हाका मारतो. हा धावतो. मदत करतो. सुरुवातीला अडखळतो. लेकाच्या मरणाचे ओझे उरावर घेतलेला; ऊर हळू-आता सैलसुटा. गाठ आता सुटते आहे. ओल आत सुटते आहे. हाती एक देवगुण. हात आता राबते आहेत. मन त्यात गुंतते आहे. एक जीव नाळओला. बाहेर येऊ पाहतो आहे. मरणमलम हात आता, जन्ममऊ होत आहेत. पाण्यापायी गेला जीव. पाण्यासाठी हाक आहे. पाणी पाणी मागविणे आहे... एका जिवाच्या मरणाला पाणी निमित्त. आता एका जिवाच्या जन्मालाही पाणी हवेच आहे. पाणी तसेही; पाणी असेही आहे. पाणी वाहते आहे. पाणी कोसळते आहे... जन्मयातना तशाच मरणयातनाही तशाच! हे असेच घडत आले आहे. निसर्ग तो. निसर्ग असाच आहे.
आतां आमोद सुनांस जाले।
श्रुतीसि श्रवण रिघाले।
आरिसे उठिले।
लोचनेंसी।।
‘आता आमोद सुनांसि आले’... दि. बा. मोकाशी यांची कथा. ही कथा पहिल्यांदा भेटली. उशिराने भेटली, पण भेटली. आपल्याला हवा तो पाऊस आपल्याला हवाच असतो तेव्हाच भेटतो असे नाही. त्याला जेव्हा वाटतो तेव्हा भेटतो. भेटला. कथा भेटली. कथेमागची कथाही भेटली. दिबांच्या कथेला कथेची दाद. वाहत्या पावसाला कोसळत्या पावसाची दाद! कथा अरविंद गोखले यांची. ‘फुलेचि झाली भ्रमर’. एका लेखकाची दुसऱ्या लेखकाला दाद. आत्मीय लिहून. मनभरून. या दोघांनी कथांत ओतलेला ओलसर जीव. गोखले आणि मोकाशी. गोखल्यांच्या कथेत मोकाशी मुख्य पात्र. आणि मोकाशींच्या या कथेत... ‘दिठी नि:शब्द दाटे। पाऊस पाझर फुटे’
सारे सारे डोळ्यांपुढे घडत आहे. पाऊस कधी कधी कसाही येतो. पाऊस कधी कधी बेभरवशाचा आपल्या आत येतो. पाऊस बाहेरच पडतो असे नाही, पाऊस आतही कोसळतो... बाहेर पाऊस, आत बधिरता. अशी ही अवस्था. मनसुन्न. आतल्या बधिरतेला आर्त हाक... रामजीऽऽऽ
फुलेंचि जालीं भ्रमर।
तरुणीची जाली नर।
जाले आपुलें शेजार।
निद्राळुची।।
आता सारे बधिर बधिर. सारे संथसे झाले आहे. पाऊस हट्टी आत शांतावलेला. पाणी तेवढे वाहते आहे. उरले थेंबपाणी पडू पाहे- डोळ्यांत कुठेतरी अडते आहे. आता आमोद सुनांसि आले, फुलेचि झाली भ्रमर... ‘सुनांसि’त सि ऱ्हस्व आहे. ‘फुलेचि’चा ‘चि’ ऱ्हस्व आहे. ऱ्हस्वातही कधी कधी दीऽऽर्घ अर्थ सामावलेला असतो. या दोन्ही कथांत हा दीर्घ गहिराखोल अर्थ आहे. एक कोसळपाऊस अनुभव आत वाहता झाला आहे. आत वाहता राहणार आहे... सुगंध... भोग... फुले... भ्रमर... माउली माउली!
सुंदर!
सुंदर!