दुनिया ये दुनिया – मायक्रोव्हेव ओवन

Submitted by तुष्कीनागपुरी on 23 February, 2025 - 11:20

दुनिया ये दुनिया – तुफान मेल
.
आमच्या काळी पण हे गाणे भुले बिसरे गीत विभागातच वाजवले जायचे तरीही सातत्याने ऐकल्याने सवयीचे आणि आवडीचे गाणे आहे. माझ्या एका विचाराच्या मध्ये हे गाणे कुठेतरी वाजायला लागले आणि माझ्या मनातला विचार त्या गाण्याच्या चालीत आकार घेऊ लागला.
.
दुनिया ये दुनिया – मायक्रोव्हेव ओवन
.
आता या नव्या शब्दांमध्ये चाल निट बसत नाही वगैरे काही विचार जे तुमच्या मनात येऊ लागले असतील त्यांना जरा बांधून ठेवा, कारण या वाक्यातली परिस्थिती अशी आहे की तिच्यात आपण जगतो आहोत. आपल्याला हे माहिती आहे का याचाच विचार करून बघुया.
.
जेम्स मॅक्सवेल, हेनरिच हर्ट्झ, निकोला टेस्ला यांच्या महत्वाच्या शोधांवर आधारित गुगलियेलमो मार्कोनी भाऊंनी संदेश वहन करण्यासाठी रेडियो तरंगांचा शोध प्रत्यक्षात करून दाखवला. त्याआधीचे जग कसे होते ते समजायला आपण संथ पाण्याचे उदाहरण घेऊया. संथ पाणी एक खडा टाकल्याने त्यात तरंग निर्माण होतात. त्या तरंगांवर स्वार होऊन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर संदेश पोहोचवता येऊ शकेल का याचा विचार केला तर कदाचित हो.
.
एका काठावर कुणी खडे टाकत असेल आणि काही विशिष्ठ काळाच्या अंतराने ते खडे टाकायचे एक सूत्र पाळले तर किती वेळात तरंग येताहेत हे दुसऱ्या काठावर कुणी मोजू शकले किंवा नोंद ठेवू शकले तर माहिती संदेश पाठवणे शक्य असेल. आता अशी प्रणाली कुणी तयार केली तर त्या पाण्याला त्याने काही फरक पडेल का? तर साधारणतः पडायला नको असे वाटते. त्या पाण्यात राहणाऱ्या मासोळ्या आणि इतर जीवांना त्याने काही फरक पडेल का? तरंग उठल्याने पाणी पाणीच राहते हो ना? फरक काय तो पडत असेल तर त्या पाण्याच्या तरंगांतून शक्ती चे वहन होते त्यातूनच होत असावा नाही का? थोडक्यात आपल्या सामान्य बुद्धिला असे वाटते की पाण्यात काही तरंग उठवले तर कुणावर काही प्रभाव होणार नाही.
.
परिणाम तेव्हा होऊ लागेल जेव्हा सातत्याने आपण असे तरंग तयार करू लागलो, यंत्रे तयार केली जे सतत तरंग उठवत राहतील आणि पाणी कधी संथ राहणारच नाही. तसा विचार केला तर अजूनही मासोळ्यांना त्या सतत च्या तरंगांनी काही फरक पडेल असे वाटत नाही.
.
जरा दिशा बदलून आता जलचरांवरून थलचरांकडे वळुया. आपण पाण्यात राहत नाही, तर हवेत राहतो. दिसत नसली तरी हवा आपल्याला व्यापुन आहे आणि पाण्यात राहणाऱ्या मासोळीप्रमाणे हवेत राहणारे आपण त्या हवेशिवाय जगू शकत नाही.
.
मार्कोनी भाऊंनी या हवेत तरंग उठवायला सुरवात केली आणि ते पाण्यात तरंग उठवले तर मासोळ्यांवर काय फरक पडतो वाले प्रश्न आता आपण हवेत तरंग उठवल्याने आपल्यावर काय फरक पडतो असे विचारू शकतो. तसे तरंग उठवून संदेश वहन करण्याचे शोध लागल्यावर आता आपल्या आजुबाजूला असंख्य तरंग आहेत, हवेत जे अव्याहत पणे तयार केले जात आहेत आणि आपण त्या तरंगांमधेच जगतो आहोत.
.
या तरंगांच्याच एका विशिष्ठ गतीने तयार होण्याला मायक्रोवेव म्हणतात. पर्सी लेबरॉन स्पेंसर भाऊंनी या तरंगांमधल्या काही सूक्ष गतीच्या तरंगांमुळे पदार्थातले रेणु प्रभावित होतात आणि उर्जा तयार होते हे जगाला मायक्रोवेव ओव्हन तयार करून दाखवून दिले.
.
हे सगळे मनात आणल्यावर आपल्याला समजायला सहज आहे की हे जग म्हणजे आपण एक तरंगयुक्त प्रयोगशाळा केलेली आहे, आणि त्या प्रयोगातले गिनि पिग आपण आहोत. या तरंगांनी काय होते हे आपल्याला अजून पूर्ण माहित नाही.
.
या प्रमेयावर अनेक जागी शोधकार्य सुरू असेल, आणि त्यामुळेच कोणत्या फ्रिक्वेंसी चे तरंग रेडियो, मोबाईल आणि सॅटेलाईट संदेशांमध्ये वापरले पाहिजेत यासाठी काही आंतरराष्ट्रीय ठोकताळे आणि नियम तयार केलेले आहेत असे दिसते.
.
पण ही हवा आणि यामचे तरंग यांचेवर कुणाचे नियंत्रण नाही त्यामुळे कुणी यात नवे नवे शोध लावले तर अजून बरीच जागा आहे असे वाटते.
.
तुमच्या आजुबाजुला असंख्य तरंग उमटताहेत आणि आपण एका तरंग युक्त जगात त्या तरंगांना पाहू न शकल्याने अनभिज्ञ वावरतो आहोत ही स्थिती मनात ठेवून जगणे सुरू ठेवुया.
.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
.
तुषार जोशी
नागपूर, रविवार, १२ जानेवारी २०२५
.

Group content visibility: 
Use group defaults