मभागौदि २०२५ शशक- मदमस्त - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 23 February, 2025 - 07:29

ग्रीष्मातल्या माध्याह्नी तळपणार्‍या रश्मीकराचे प्रकाशबाण त्या ताटकळलेल्या पथिकांच्या सर्वांगांना घायाळ करत होते. श्रांत पांथांनी त्यांपासून संरक्षणाकरिता आम्रतरू आणि जम्बुफलवृक्षांनाच आपल्या ढाली केल्या आणि 'त्या'ची प्रतीक्षा करत ते तिथेच सैलावले. इतक्यात दूरवरून 'तो' धरणीव्योम कंपित करणार्‍या जडसंथ गजपावलांनी मार्ग क्रमताना दृष्टोत्पत्तीस पडला. 'त्या'ला पाहून सर्वच जण सरसावले व आपापल्या तरुछायेतून बाहेर येत उत्कट अपेक्षांच्या भाराने अल्पसे वाकून उभे राहिले. समीप येताच आपल्या अर्धोन्मिलित नेत्रच्छदांच्या आडून 'त्या'ची दिठी सभोवारच्या व्याकुळ जनसमुदायावर भिरभिरली. जिव्हाग्रावर आलेली शिवी 'त्या'ने क्षणभर गिळून टाकली. 'त्या'च्या तप्तमुद्रांकित मुखमंडळातून सप्तजिव्हा फुत्काराव्यात त्याप्रमाणे रक्तवर्णी तुषार भुईवर उडाले आणि पाठोपाठ आपल्या खर्जगंभीर ध्वनीत मदमस्त होत्साता 'तो' उद्गारला, "डायवर कोने? लायसन बगू."

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी ही शशक 3-4वेळा वाचून हसले पण प्रतिसादच दिला नाहीये हे आता लक्षात आलं. कमाल आहे.

रच्याकने, धमाल आहे हे... Biggrin

एवढ्या सगळ्या व्यक्तिरेखांमधून हे एव्हढ कोपऱ्यातल नाव का घेतलं असेल... असा प्रश्न पडला...प्रोफाईल बघितलं आणि उत्तर मिळालं.
मजा वाटली. मस्त Happy

भारी आहे ही शशक .
मत दिल्यानंतर लक्षात आलं ही वाचायची राहिली होती. निकाल स्पोईल करत नाहीये पण बर्याच शशक मध्ये चुरस आहे तुमच्या या शशकला जोरात मतं मिळत आहेत.

भारी!
कुठल्या कुठे डोकं चालवलंय
Biggrin

नवीन प्रतिसादकांचे आभार.

गणेश, शक्य आहे. मध्ये एकदा एका धाग्यावर मी आणि केशर मडगावकर यांचे लागोपाठ प्रतिसाद आले होते.

छंदीफंदी Happy

Screenshot_20250309_171847_WhatsApp.jpg

अरे व्वा!!
ह पा.
ये तो होनाही था..!!
अभिनंदन. Happy

Pages