एक्सचेंज- भाग १

Submitted by शिल्पा गडमडे on 21 February, 2025 - 17:58

एक्सचेंज- भाग १

काम करता करता केबिनमध्ये अंधारल्यासारखं वाटल्यामुळे ती थांबली. समोरच्या लॅपटॉपवरून नजर वळवून तिने खिडकीबाहेर बघितलं. सूर्य मावळतीला आला होता, आजूबाजूच्या उंच इमारतीच्या ऑफिसात लाईटचा उजेड, तर इमारतीच्या काचांवर मावळत्या सूर्याच्या छटा उमटल्या होत्या. क्षणभर त्या दृशात हरवून गेली.

पण क्षणभरच..

तिने नजर पुन्हा लॅपटॉपकडे वळवली, इनबॉक्समधल्या न वाचलेल्या ईमेल्स, दिवसभर मीटिंगच्या गडबडीत बाजूला पडलेली ‘टू-डू लिस्ट’ तिला एका झटक्यात वास्तवात घेऊन आले.

तिने घड्याळात पाहिलं आणि ती दचकलीच. रियाची शाळा सुटायला थोडाच वेळ राहिला होता. कामाच्या गडबडीत तिला वेळेचं भान कसं राहिलं नाही याबद्दल स्वतःचाच राग आला. आता अजून थोडा उशीर झाला तर आपण वेळेत पोहचणार नाही याची जाणीव होऊन तिने पटकन लॅपटॉप बंद केला, भिंतीवर लटकवलेला कोट अंगावर चढवून तिने लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. जाता जाता ट्रेन आणि त्यानंतरची बस यांच्या वेळा पहिल्या- पाच मिनिटात ट्रेन होती. ट्रेन स्टेशन ऑफिससमोरच असलं तरीही तिने वेग वाढवला.

बाहेर पडताच बोचरी थंड हवा तिच्या अंगावर आली. गडबडीत टी कानटोपी, मफलर, हातमोजे ऑफिसमध्येच विसरली होती. पण थंडी कितीही बोचरी असली तरी आपण वेळेत पोहचलो नाही तर शाळा बंद होईल, सगळी मुलं घरी जातील आणि हिरमुसल्या चेहऱ्याने शाळेच्या दाराजवळ रिया आपली वाट बघत असेल, असं चित्र तिच्या डोळ्यासमोर आलं आणि या विचाराने तिला अपराधी वाटायला झालं- आपसूक बोचऱ्या थंडीकडे तिने दुर्लक्ष केलं.

धावत धावत ती प्लॅटफॉर्मवर पोहोचली, ट्रेन आलेलीच होती. ती ट्रेनमध्ये चढताच ट्रेनचे दरवाजे बंद झाले. ट्रेनने वेग घेतला तसं तिच्या डोक्यात पुढच्या कामांची यादी फिरू लागली... स्वयंपाक, जेवण, आवराआवर, रियाला झोपवणं, मग पुन्हा ऑफिसचं काम.. रोहित कामानिमित्त दौऱ्यावर असल्यामुळे तिच्या एकटीवर सगळ्या कामांची जबाबदारी आली होती. आज फक्त तिचं शरीर नाही, तर तिचं मनही दमलं होतं.

ट्रेन पोहचली. तिथून शाळा अजून एक किलोमीटरवर होती. त्यामुळे बसने जाणं सोयीचं होतं. पण पुढची बस तब्बल १५ मिनिटं उशिरा येत आहे असे डिस्प्लेवर झळकलं. १५ मिनिटं? बस आलीच नाही तर त्यापेक्षा चालत जावं म्हणत तिने कोटची टोपी डोक्यावर घेतली, हात खिशात टाकले आणि झपाझप पावलं टाकत निघाली.

एका थकलेल्या दिवसाला, तिच्या थकलेल्या खांद्यावरुन घेऊन ती निघाली.

-अपूर्ण- भाग १

#सुरपाखरू

@शिल्पा गडमडे

२१.०२.२०२५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults