लेखासाठी विषय कुठून आणायचे?

Submitted by तुष्कीनागपुरी on 21 February, 2025 - 03:56

.
लिहिण्याची इच्छा आहे पण लेख लिहिण्यासाठी विषय कुठून आणायचे? असा प्रश्न लेखकाच्या मनात येऊ शकतो. एखादा विषय मनात आला तर तो आधीही लिहिला गेला आहे आणि आपण त्यावर लिहिले तर ते काहीच नवे नसेल असे देखील बरेचदा वाटू शकते.
.
आजकाल समाज माध्यमांवर नवी पिढी आपल्या समस्या काही अंशी मांडते तेव्हा त्या वाचून त्यातून असे अनेक प्रश्न वाचायला मिळतात जे मी त्या वयात असताना मलाही पडले होते. आता आपण कुठे आहोत हे मागे वळून पाहता असे कळते की आपले प्रश्न तेव्हा आपण सोडवले आणि आता आपण पुढे आलेलो आहोत आणि बऱ्या स्थितीत आहोत. जर ती प्रश्न विचारणारी व्यक्ती आपल्या समोर आली असती आणि आपल्याला तो प्रश्न विचारू शकली असती तर आपण काय उत्तर दिले असते?
.
आपले ते उत्तर लिहून काढणे हा मला एक महत्वाचा उपक्रम वाटतो. जे लिहायचे आहे ते आपण अनुभवलेले असणार त्यामुळे माहिती आणि ज्ञानाचा अभाव अजिबात नसणार. आपण आपला प्रत्यक्ष अनुभव लिहिणार त्यामुळे ते आधी कुणी लिहिलेले तेच परत लिहितो आहोत असेही होणार नाही कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा अनुभव वेगळा असतो. एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनुभव वाचले तरी प्रत्येक अनुभव वेगळे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तितके अद्वितीय अनुभव याचा आपल्याला इथे फायदा मिळणार.
.
प्रश्न आवश्यक आहेत हे माझ्या लक्षात आले आहे. कुणी प्रश्न विचारला म्हणजे सध्या च्या काळात देखील आपण अनुभवलेल्या स्थिती आणि समस्या आहेत याचे प्रमाण मिळते. आपण दिलेले उत्तर किमान एका व्यक्तीला कामाचे ठरू शकते हा मानसिक आधार असतो. समाज माध्यमांवर चर्चा गटांमधे सध्याची पिढी आणि ज्यांना समाज माध्यमे हाताळता येतात असे लोक प्रश्न विचारताहेत हे उल्लेखनीय आहे.
.
जेव्हा तुमच्या जवळ बरेच काही लिहायला हवे असे असते किंवा खुप आहे पण नक्की त्यातले आधी काय निवडायचे हा प्रश्न कुणाचा असा प्रश्न विचारणारा संदेश, पोस्ट, किंवा मेसेज पाहिला की सुटतो. मला नेहमी मनात घडणाऱ्या एनेलिसिस पॅरॅलिसिस वर दिशादर्शक असे काही बाहेरून मिळाले तर ते पटकन निवडायला सोपे जाते.
.
हे लक्षात आले तेव्हा पासून मी रेडीट, कोरा, फेसबुक, सारख्या समाज माध्यमांवर अश्या गटांमधे सहभाग घेतो जिथे मला सध्याची पिढी आणि अनेक लोक ज्यांना समाज माध्यमे वापरायची कला अवगत आहे ते लिहित असतात हे माहित आहे. मला अश्या जागांवर आपल्याच सारखे प्रश्न भेडसावणारे, उत्तरांच्या शोधात फिरणारे लोक वाचायला मिळतात, त्यातल्या अनेकांना मी इतके जरी सांगितले की हाच नेमका प्रश्न मला पण कधीतरी पडला होता आणि मी अजूनही या जगात जगतो आहे. अमुक अमुक चांगल्या स्थितीत आहे. माझे इतके उत्तर देखील त्या प्रश्नकर्त्यासाठी एक आशेचे किरण ठरू शकते.
.
समस्या जर संवेदनशील असेल किंवा असे काही असेल जे आपल्याला कुणाला कळावे असे वाटत नसेल तर त्या वेळेला समाज माध्यमांवर टोपणनावाने लिहिण्याची पण सोय असते. ही एक अशी जागा आहे जिथे टोपण नावाने का होईना कुणी लिहिलेले असेल तरी असे कुणी तरी आहे ज्याने आपल्यासारखा अनुभव घेतलाय किंवा समस्या सोडवल्या आहेत हे कळते आणि एक दिलासा मिळतो.
.
या पद्धतीने आठवड्यातून एकतरी लेख किंवा पोस्ट करावी असे मी सध्या ठरवले आहे आणि त्याचे मला समाधान वाटते की आपण काही आशेची किरणे जगात सोडतो आहोत. हे एक कारण मला लिहिण्याला बळ देते आणि अशी एक पोस्ट असा एक लेख लिहिला की मला आपण समाजाला जे देणे लागतो त्याच्या साठी काही तरी योगदान दिल्या गेले असे वाटते.
.
मग अश्या लिहिलेल्या लेखावर, पोस्ट वर जेव्हा कधी उत्तरे येतात आणि त्यात आपल्यासारखे अजूनही लोक आहेत इतके वाचूनही लोकांना दिलासा मिळतोय याची ग्वाही मिळते तेव्हा आपला लेख कामी आला याचा अतिरिक्त आनंद होतो. काही लेख तसेच राहतात. त्यांना उत्तरे येत नाहीत पण मी स्वतःला समजावून ठेवलेले आहे की उत्तरे येण्यासाठी तो लेख नव्हता तर जगाला एक उदाहरण लिखित रूपात देण्यासाठी तो लेख होता. तो समाज माध्यमांवर आंतरजालावर तसाच पडून राहील आणि त्या लेखाची गरज असणारा वाचक केव्हातरी त्या लेखापर्यंत पोहोचेल.
.
तो लेख लिहिला गेला हेच माझ्यासाठी एक उपलब्धी आहे. एक प्रश्न मला मिळाला आणि माझ्या आयुष्यात तश्याच अवस्थेत मी काय केले हे मी लिहून पुढे गेलो याला मी वाटेत काटे सापडले तर एक खुण ठेवल्या गेली जेणेकरून मागून येणारा सावध राहील असे समजतो.
.
सलेल काटा तिथेच ठेवा
फूल खुणेचे जर्द गुलाबी
निदान मागुन येणाऱ्यांना
तरी मिळावा स्पर्श सुखाचा
~ प्रसन्न शेंबेकर
.
या ओळी मला नेहमी सोबत असतात आणि मी असा एखादा लेख लिहून झाला की समजतो मी एक खुणेचे फूल ठेवलेले आहे. ते कुणाला मिळाले तर छान आणि नाही मिळाले तरीही मला फूल ठेवण्याची प्रेरणा मिळाली आणि माझ्या हातून लिहिल्या गेले हे देखील माझ्या विकासासाठी आवश्यक असणारे एक साधन होते हे मी नाकारू शकत नाही.
.
समाज माध्यमांना वाचण्याचे माझ्यासाठी आजकाल हे सुद्धा एक कारण आहे. मी लोकांनी मांडलेले प्रश्न शोधत असतो, नोंद घेत असतो. अश्या जागा शोधत असतो जिथे मला माझे अनुभव लिहून ठेवले तर कुणालातरी कामी येतील याची शाश्वती असते. असे प्रश्न मला लेख लिहिण्याचे निरंतर नवे प्रेरक विषय देत असतात. म्हणजेच या जागा माझ्यासाठी एक्शन आयटम जनरेटर्स असतात.
.
#सुरपाखरू
.
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार, २१ फेब्रूवारी २०२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कमाल झाली … मायबोलीवर एकेक धाग्यातुन काही जणांना दहा धाग्यांचे मटेरिअल मिळते आणि त्यांनी असा खजिना हाती लागला असे जाहिर केले की किमान पन्नास जणांच्या पोटात गोळा येतो. माबोवर बागडा म्हंजे असे प्रश्न पडणार नाह्वेत.

साधना +७८६
शीर्षक वाचून अर्ध्या मायबोलीच्या डोक्यात हाच विचार आला असावा Happy

तुमच्या कडून लेख खूप कमी लिहीले गेले असतील.
आता लिहावंसं वाटतंय तर येऊ द्यात. लेखनसंयम शिकवणारा लेख आधी लिहा.

गेल्या वर्षी मभागौ दिनाला कुमार१ ह्यांनी एक
मराठी लेखन घडते कसे म्हणू. धागा काढला आहे. तो वाचलाय तर तुम्हाला लोकांची लिखाणाची स्फूर्ती स्थाने, विचार, प्रवास माहिती होईल...

>> लेखासाठी विषय कुठून आणायचे?

ऋन्मेष सरांना गुरुस्थानी ठेवा. सध्या त्यांच्याकडे विषय खूप आहेत पण लिहायला वेळ नाहीय.

@साधना, @ऋन्मेष, @रानभुली, @अ’निरू’द्ध, @छन्दिफन्दि, @प्रविणपा, @किल्ली,
प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार.
.
> मायबोलीवर एकेक धाग्यातुन काही जणांना दहा धाग्यांचे मटेरिअल मिळते
.
मी पूर्वी मायबोलीवर असा बागडायचो, तेव्हा वेळ अधिक मिळायचा, सध्या मायबोली माझ्या लिखाणाच्या स्रोतांमधे तितके उत्कटतेने शामिल नाही कारण इथे मी दिवसाला एकदा किंवा एक दोन दिवसांनी फेरफटका लावू शकतोय. इतरत्र मिळालेल्या प्रेरकांच्या मुळे जे काही लेखन होते त्यातील काही इथे पण पोस्ट करायचे असा सध्या बेत आहे ज्यामुळे लेखाला शाश्वत दुवा मिळतो आणि तो मला सामाजिक माध्यमांवर देता येतो.
.
> लेखनसंयम शिकवणारा लेख आधी लिहा.
.
याबाबत अधिक माहिती मिळवायला आवडेल, नक्की काय हवे आहे याबद्दल अधिक कळले तर याचा विचार करतो