
बुऱ्हाणपूरच्या हल्ल्यापासून चित्रपटाची सुरुवात होते. अतिशय वेगवान असा हा चित्रपट अनेक घटनांना, मुद्द्यांना स्पर्श करत अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाशवी हत्येने समाप्त होतो.
क्रौर्याची परिसीमा गाठकलेला औरंगजेब त्यांना मुसलमान बनण्याची ऑफर देतो, तेव्हा अंगाखांद्यावर केलेल्या नखशिखान्त जखमा, त्या जखमांवर मीठ चोळल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना, उपटलेली नखं या अवस्थेतही संभाजी राजे त्याला जे उत्तर देतात त्याने औरंगजेब सटपटतो. संभाजी राजांचे धैर्य, पराक्रम आणि शौर्य अचंबित करून टाकते आणि चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.
चित्रपटा विषयी बोलायचं तर पहिल्या काही मिनिटातच तो तुम्हाला टाईम ट्रॅव्हल करून त्या काळात घेऊन जातो.
उत्तम दिग्दर्शन, सेट्स, पोशाख, कसदार अभिनय सगळ्याच पातळ्यांवर आवडला. अप्रतिम टीम वर्क!
संगीत कुठेच खटकतं नाही पण कुठे उठवही आणत नाही. अजय-अतुल असते तर… त्यांनी नक्कीच काही उठावदार करून अजून एक पीस शिरपेचात खोवले असते.
चित्रपटात विशेषकरून आवडलेली दृश्ये म्हणजे अंधाऱ्या गुहेचा / बोगद्यात ते छोट शंभूबाळ आपल्या मायेचा आसरा शोधत फिरतं आणि महाराजांचा आश्वस्त आवाज त्याला हळुवार साद देतो. … त्या पोलादी पुरुषाची, सिंहाच्या बछड्याची, हळवी छटा फारच खुबीने दाखवली आहे.
कथा, घटना आधीपासूनच माहीत होत्या.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर छावा कादंबरी, इथे ओशाळला मृत्यू, छत्रपती संभाजी मालिका आणि आता हा चित्रपट.. संभाजी राजे कळत गेले - अर्थात कळत गेले म्हणणं धाडसाचं आहे.
अख्खा चित्रपट बघताना तीन गोष्टी सतत डोकं वर काढत होत्या
१. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
निकटवर्तीय किंवा आतलाच शत्रू जास्त धोकादायक अणि दगाबाज असतो. वैयक्तिक लालसेपायी, महत्वाकांशेपायी माणूस ‘मी’ तच अडकून राहतो आणि तो ‘मी’ , ‘मला’ चा धुमसता अग्नि सगळं घर, गल्ली, गाव बेचिराख करत जातो.
२. लाखांचा पोशिंदा..
इतिहासाला वेगळे वळण देण्याची क्षमता असलेली ही उत्तुंग व्यक्तिमत्वे -ज्यांच्या अस्तित्वाने पुढील अनेक पिढ्यांची आयुष्ये लिहिली गेली - दीर्घायुषी असती तर…
३. मुत्सद्देगिरी
अफजलखान भेट, पुरंदर चा (ज्यात २३ किल्ले द्यावे लागले) तह, आग्र्याहून सुटका ह्या व अशा अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांनी अत्यंत मुत्सद्देगिरीने परिस्थिती हाताळली.
तशीच मुत्सद्देगिरी दाखवून, औरंगजेबाच्या क्रूर पकडीतून संभाजी राजांना सोडवता आले नसते का.. ?
अर्थात आज साडेतीनशे वर्षांनी जर - तर चा विचार
करत बसणे निव्वळ भाबडेपणा ठरेल हे खरेच.
पण तरी त्या सिंहाच्या ताकदीच्या त्या वीरांचा कपटीपणाने केलेला हृदयद्रावक अंत बघताना नकळत मन त्या जर-तर च्या खेळाकडे वळतेच..!
चित्रपट जरूर बघा. सर्व टीमने घेतलेले कष्ट, ध्यास पडद्यावर दिसतात.
ही सूचना छोट्या मुलांच्या पालकांसाठी - बऱ्यापैकी(?) हिंसा / रक्तपात आहे.
हा धागा ह्या चित्रपटाच्या चर्चेसाठी वापरू शकता...
वध? वध राक्षसाचा करतात.
वध? वध राक्षसाचा करतात. संभाजी राजांची बदनामी थांबवा.
https://www.shabdkosh.com
https://www.shabdkosh.com/dictionary/marathi-english/%E0%A4%B5%E0%A4%A7/...
चांगलेच शहाणे दिसताय तुम्ही
चांगलेच शहाणे दिसताय तुम्ही छंदीफंदी
छावा सिनेमा थिएटर मध्ये पहिला
छावा सिनेमा थिएटर मध्ये पहिला. संभाजी महाराजांची ओळख भारतभर आणि काही प्रमाणात भारताबाहेर करून देण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यात चित्रपट पूर्णपणे यशस्वी झाला आहे. चित्रपटाची निर्मितीमूल्ये उत्तम आहेत. चांगला भरजरी चित्रपट आहे. ऍक्शन सीन्स चांगले आहेत. चित्रपट रेंगाळत नाही. ह्या सगळ्यासाठी kudos to the team.
मात्र ज्याला हा इतिहास आधीच माहित आहे असा एक मराठी माणूस म्हणून, आणि एक चित्रपट रसिक म्हणून पाहिल्यास the movie leaves a lot to be desired .
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच चित्रपटाची सुरुवात होते. त्यामुळे आग्र्याहून सुटका, युवराज्याभिषेक, महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले असताना कारभाऱ्यांशी होणारा संघर्ष, दिलेरखानाला जाऊन मिळणे आणि परत येणे, महाराजांच्या मृत्यूसमयी पन्हाळ्यावर कैदेत असणे, वगैरे भाग तर नाहीतच. ते ठीक आहे. पण राजा म्हणून ९ वर्षांच्या कारकीर्दीतले अनेक टप्पे, जसे दक्षिण भारत मोहीम, पोर्तुगीझांनविरुद्धची गोव्याला जवळजवळ मुक्त करणारी मोहीम (गोव्याला नुसतेच पार्टी डेस्टिनेशन समजणाऱ्या, आणि तिथल्या ख्रिस्ती धार्मिक अत्याचारांची (इन्क्विझिशन) माहिती नसलेल्या भारतीयांना संभाजी महाराजांचे गोव्याप्रती असलेले योगदान दाखवण्याची सुवर्णसंधी गमावली), सिद्दीविरुद्धची मोहीम वगैरे दाखवले नाही. संभाजीच्या व्यक्तिमत्त्वाचे इतर पैलू जसे बुधभूषणम, नायिकाभेद वगैरे संस्कृत साहित्य निर्मिती (हे निव्वळ एखाद्या संवादातून सांगता आले असते). एकूण संभाजीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काही नीट दाखवले नाही.
बरं चित्रपटाचा फोकस फक्त औरंगजेबाविरुद्धच्या संघर्षावर ठेवण्याचे ध्येय असेल तरी ठीक आहे. त्यासाठी वरचे सगळे मुद्दे माफ. पण त्यातसुद्धा औरंगजेबाचे धार्मिक अत्याचार अजिबात दाखवले नाहीत, किंवा त्यांचा उल्लेख सुद्धा नीट केला नाही. स्यूडो सेक्युलॅरिझमचा दबाव असा विचित्र की सेक्युलरिझमच्या अगदी विरुद्ध असणाऱ्या धर्मांध औरंगजेबाचे यथार्थ चित्रण दाखवायला सुद्धा दिग्दर्शक भ्याला आहे. नशीब, जाताजाता "तुम्हे अपना धर्म छोडना होगा" असा कोमट संवाद औरंगजेबाच्या तोंडी नाईलाजाने दिला आहे. संभाजीच्या तोंडी "हम किसी धर्म के खिलाफ नही " असे अनेकदा वदवले आहे पण औरंगजेबाने त्याच्या काझींची एक समिती बसवून तिने दिलेल्या शरियावर आधारित फतव्यानुसार संभाजीला ठार केले हे मसिरे आलमगीरी ह्या औरंगजेबाच्या अधिकृत दरबारी इतिहासात लिहिलेले असून सुद्धा चित्रपटात दाखवले नाही. भारताच्या इतिहासात औरंगजेबाचा धर्मांधपणा नाही दाखवायचा तर कुणाचा दाखवायचा? आणि तोही संभाजी चित्रपटात नाही दाखवायचा तर मग कुठे? ह्या walking on the eggshells approach मुळे चित्रपटाचा फोकस असलेल्या संघर्षाची धार कमी होते.
मुगलांविरुद्दच्या लढायांमध्ये बुर्हाणपूरची पहिली लढाई उत्तम दाखवली आहे (of course with a lot of cinematic liberty), सिंहाबरोबर लढाई वगैरे टाळ्या शिट्ट्या वसूल करणारी दणकेबाज सुरुवातआहे. कमर्शिअल सिनेमा आहे म्हटल्यावर हे acceptable आहे. पण नंतर अकबरावर उगीच बरेच फुटेज वाया घालवले आहे. त्याला थोडक्यात उरकायला हवा होता. टिपिकल पान खाण्याची ऍक्शन वगैरे करून दिव्या दत्ताने तिचे सोयराबाई म्हणून कास्टिंग सपशेल चुकल्याचे सिद्ध केले आहे. औरंगजेबाला इथे तिथे जमिनीवर चालत जाताना दाखवलं आहे. हे बादशहा लोक पालखीशिवाय असे चालत कुठे जात नसत. आणि तो आपल्या हाताने त्याच्या सरदारांना मारतो असं दाखवणं हास्यास्पद वाटतं. ह्या लहान गोष्टींनी त्याच्या भूमिकेचं वजन कमी होत असलं तरी अक्षय खन्नाचं काम चांगलं आहे. विकी कौशलच्या एनर्जीला त्याचा थंडपणा बॅलन्स करतो.
रहमानचे संगीत सपशेल आपटलेले आहे. Rahman has made a negative contribution to the movie. संगीत मराठमोळं नाही. ते एक असो. पण जे काही आहे तेही चांगले नाही. संभाजीच्या बऱ्याच दृश्यांमध्ये बॅकग्राऊंड मध्ये अरेबिकसदृश सुरात मोठ्याने विव्हळणारी बाई असह्य होते. एकही गाणे मनाचा ठाव घेत नाही. ह्याऐवजी इतर कुणीही चालला असता असं म्हणण्याइतकं वाईट संगीत वाटलं.
त्यानंतर सिनेमाभर सतत येणाऱ्या एकामागोमाग लढाया (पाण्यातून बाहेर येणारे मावळे, झाडांवरून खाली येणारे मावळे, साड्या नेसून लढाई करणारे मावळे वगैरे गिमिक्स) कथेच्या दृष्टीने विनाकारण वाटतात. मुख्य म्हणजे सतत इतक्या लढाया, त्यातला सतत गर्जना करणारा संभाजी आणि लढाईतले gore (बीभत्सपणा) ह्यामुळे बोर व्हायला होते. आता पुरे असे म्हणावेसे वाटते. त्यामुळे क्लायमॅक्सचा इम्पॅक्ट कमी होतो. माझ्या बरोबरचे काही (मराठी इतिहास फारसा माहित नसलेले) प्रेक्षक इतक्या लढाया बघून झोपले आणि त्यांनी क्लायमॅक्स पहिलाच नाही.
संभाजीला पकडण्याचा प्रसंग मात्र अगदी उत्कृष्टपणे घेतला आहे. जास्त नाट्यमय आहे. पण चित्रपटाच्या प्रकृतीला सुसंगत आहे, आणि तिथे विकी कौशलची एनर्जी कमाल आहे. तिथून पुढे क्लायमॅक्स पर्यंत चित्रपट पकड घेतो. आधीच्या सततच्या लढाया कमी केल्या असत्या तर क्लायमॅक्सचा इम्पॅक्ट फारच वरच्या पातळीवर गेला असता. विकी कौशलला भूमिकेसाठी १००% गुण.
इतक्या सगळ्या गोष्टी राहून गेल्याची चुटपुट लागली असली तरी it is a must watch movie. Way better than an average Hindi movie. It could have been a lot better . तरी जे आहे ते चांगले आहे. ह्या विषयावर हिंदी चित्रसृष्टीत आताआतापर्यंत दुष्काळ होता. तुम्ही वाळवंटातून जात असताना तहानेने व्याकूळ होऊन एका घरापाशी थांबलात, घरमालकाने थंडगार पाण्याच्या विहिरीतून पाणी काढून पाण्याचा पेला पुढे केला, बघता तर काय, पेला अर्धाच भरलेला. तर त्याला नाही का म्हणणार?
छावा पाहिला.
माझी चिकवावरची पोस्ट इथे रिपीट करतेय..
==========================================================
छावा पाहिला.
विकी कौशल दिग्दर्शकाने जी भुमिका दिलीय ती जगलाय. तो संभाजी वाटतो.
आशुतोष राणा - इतरवेळी त्याचे डोळे भीतीदायक वाटतात पण इथे हंबीरराव मोहित्यांच्या भुमिका तेच डोळे आश्वासक, आधार देणारे वाटतात. कलाकार तर तो उत्तम आहेच.
रश्मिका मंदाना येसूबाई म्हणून दिसते उत्तम. पण तिने तोंड उघडलं नसतं किंवा तिचं डबिंग इतर कुणाकडून करून घेतलं असतं तर बरं झालं असतं. शेवटच्या प्रसंगात तिला मिनीमल संवाद आहेत हे उत्तम.
दिव्या दत्ता मात्र सोयराबाई न वाटता नववारी नेसलेली सदरेवर बसून पान खाणारी बडी बेगम वाटते. तिची निवड/बेअरींग/मेकप यापैकी काहीतरी नक्की चुकलंय. तिच्या जागी सौंदर्याचा व कुळाचा अभिमान असणारी करारी स्त्री म्हणून किशोरी शहाणे चालली असती.
अक्षय खन्नाचं बेअरींग उत्तम आहे, एखाद प्रसंग सोडल्यास संवादफेकही ठीक आहे. पण अभिनय दाखवण्याची त्याला फारशी संधी नाही. तो फक्त संभाजीच्या असण्याची, पराक्रमाची, हिंमतीची रिॲक्शन देत राहतो. काही प्रसंगात त्याचं पडद्यावरचं वय व बॉडी लॅंग्वेज मेळ खात नाहीत. पण तो उतरणीला लागलेला व पुढच्या पिढीकडून होप्स नसलेला बादशाह प्लस वय झालं तरी हिंदूस्तानवर हुकूमत असलेला बादशाह असं कॅरॅक्टर असल्याने ते चालून जावं.
मोजून दीड एक्स्प्रेशन देत डायना पेंटी झीनतच्या भुमिकेत का आहे आणि मुळात नीटशी न बांधता ही भुमिका इथे का आहे हे दिग्दर्शकालाच ठाऊक.
लढाया आजकालच्या ट्रेंडप्रमाणे गनिमी काव्याच्या न वाटता रोहित शेट्टी प्रोड्युस्ड एमएमए फाईट्स वाटतात. आणि मध्यंतरानंतर त्यांना लास्ट ऑफ मोहिकन्सची फोडणी दिलीय. तरीही संभाजीराजांना पकडण्याचा प्रसंग व लढाई मला आवडली. त्यातही एक्झॅगरेशन असले तरी जीवाच्या कराराने लढणारी माणसं दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय. माझ्या लेखी हा हाय पॉईंट होता.
या पिक्चरमध्ये लढायातला किंवा औरंगजेबाने पकडल्यावर एखाददुसऱ्या प्रसंगातला आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा टाळला पाहिजे होता.
संभाजीराजेंच्या जीवनातले काही प्रसंग जसं की गोवा स्वारी, त्यांची विद्वत्ता, ग्रंथरचना वगैरे इथे नाहीत कारण औरंगजेब विरुद्ध संभाजी असा संघर्ष दिग्दर्शकाला दाखवायचा असावा.
कवि कलशासोबत त्यांचे काव्यमय संवाद ठीक कॅटगरीत आहेत. हे ओरिजिनल संवाद नसावेत.
वेशभुषा ओव्हरॉल चकचकीत वाटली तरी साड्यांचे पोत, संभाजी राजांचे कपडे, मावळ्यांचे व मुगलांचे कपडे वगैरे नीट आहेत. सरसकट सगळ्या मावळ्यांनी चिलखतं घातलीत. पण एवढ्या लढाया करताहेत तर घालू दे बापडे म्हणून मी सोडून दिलं.
रहमानचं म्युझिक मात्र साफ निराश करतं. संभाजी राजांच्या प्रसंगात पार्श्वभुमीवर अतर्क्य ऑपेरासदृश शब्दरचना, मुगली प्रसंगाच्या पार्श्वभुमीवर उर्दू/फारसी किंवा तत्सम भाषेतली शब्दरचना, लढायांच्या वेळी तुफान आया वगैरे रहमानने गायलेली रचना टुकार आहेत. त्याने ढोल बिल वाजवून पाहिलेत. पण हा वीरा राजा वीरा किंवा जोधा अकबरचा रहमान नाही. इथे अजय अतूलच पाहिजे होते.
ओव्हरऑल नवरा म्हणाला की संभाजी राजे या विषयावर नॉन महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा स्टार्टर पॅक आहे. शिवाजी आणि नंतरचे मराठा साम्राज्य यातली काही गॅप हा पिक्चर थोडीशी भरून काढतो.
लक्ष्मण उतेकरने बाकी काहीही केलेलं असलं तरी संभाजी महाराजांचा शेवट कसा झाला हे दाखवण्याचं धाडस केल्याबद्दल त्याचं अभिनंदन. धर्मांतराची अट पहिली होती व ती जरा लेट टाकलीय. पण त्या संवादाला टाळ्या पडल्या थिएटरमध्ये.
पिक्चर बघायला हरकत नाही. आणि बघणार असाल तर मोठ्या पडद्यावरच बघा.
बघणार असाल तर मोठ्या
बघणार असाल तर मोठ्या पडद्यावरच बघा.>> +१
बघणार असाल तर मोठ्या
बघणार असाल तर मोठ्या पडद्यावरच बघा.>> +१
आणि सहकुटुंब बघा, मुलाना जरूर दाखवा
आमच्या शेजारचे थिएटर मध्ये आता रात्रीचे १०.३०…११…११.३० हे तिन्ही शो हाऊस फुल आहेत. आताच चेक केले. बुक माय शो वर छावा सोडून कुठला चित्रपटच दिसत नाहीये नवी मुंबईत तरी तिकीट मिळायचे वांधे.. शनिवारचे मिळते की नाही टेन्शन येऊ लागले आहे आता.
bmitted by रॉय on 18 February
bmitted by रॉय on 18 February, 2025>>>>>
शब्दकोशात वध आणि हत्या हे दोन्ही समानार्थी शब्द दाखवले आहेत.
मराठीत एक लोकरूढ संकेत आहे की,
‘हत्या’ शब्द चांगल्या माणसांच्या संदर्भात तर ‘वध’ राक्षसाच्या संदर्भात वापरावे..
त्याला मराठी शब्दकोश, तसेच संस्कृतव्याकरणाचा आणि प्रयोगांचा आधार नाही.
***
Madhav Deshpande ह्यांना हत्या/ वध ह्या संदर्भात विचारले असता खालील उत्तर मिळाले.
मराठीत हत्त्या आणि वध या शब्दांचे असे अर्थ झाले आहेत हे खरे आहे. पण संस्कृत प्रयोगांत असा अर्थभेद दिसत नाही. हन् धातूला काही ठिकाणी वध् असा आदेश [replacement] पाणिनीने सांगितला आहे. रामाने रावण मारला या अर्थी संस्कृतात हन् आणि वध् या दोन्ही धातूचा प्रयोग दिसतो.
***
तुम्हाला काही संदर्भ/ प्रमाण मिळाल्यास कळवावे. धन्यवाद
चांगलेच शहाणे दिसताय तुम्ही
चांगलेच शहाणे दिसताय तुम्ही छंदीफंदी
Submitted by आशुचँप on 18 February>>>
चांगल्याच शहाण्या..
पण का?
वर अजबराव आणि माझेमन ह्यांनी
वर अजबराव आणि माझेमन ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे सोयराबाईचे दिसणे, हावभाव, पान खाणे सगळेच खटकले होते.. पण ती सिनेमात अल्पजीवी भूमिका होती म्हणू जास्त विचार नाही केला.
संभाजी राजे मालिकेतील सोयराबाई खूप च उजवी होती आणि येसूबाई म्हणून प्राजक्ता गायकवाडच डोळ्यासमोर येते.
बऱ्याच जणांचे असेच मत पडले की संगीत अजय अतुल ह्यांनी द्यायला हवे होते.. माझेही.
मला अजय अतुल च कौतुक वाटलं - त्यांच्या सैराट नंतरच्याही काही मुलाखतीत AR च नाव त्यांनी आदराने/ गुरुस्थानी टाईप घेतलेलं..
पण काहीच वर्षात लोकांना AR ऐवजी अजय अतुल असते तर बरे as वाटण ह्यातच त्याचं केव्हढं तरी यश आहे.. ठसा सोडण म्हणत ते ह्यालाच
का म्हणजे? असू नये का?
का म्हणजे? असू नये का?
संभाजी राजे मालिकेतील
संभाजी राजे मालिकेतील सोयराबाई खूप च उजवी होती
>>>>
मी संभाजीराजे मालिका पाहिली नाही.
मला राजा शिवछत्रपती मालिकेतली नीलम शिर्के आवडली होती. तिथे निगेटीव्ह शेडस् नव्हत्या जे कालसुसंगत होते व ती कर्तबगार, अभिमानी राणी वाटत होती. अशी व्यक्ती पुढे महत्वाकांक्षी होऊ शकते.
अजबराव, तुमची पोस्ट आवडली.
अजबराव, तुमची पोस्ट आवडली.
धन्यवाद rmd . छावा सिनेमा खूप
धन्यवाद rmd . छावा सिनेमा खूप अपेक्षेने बघायला गेलो होतो म्हणून जे जे मिस झाले असे वाटले ते लिहिले. कुणाला थोडे निगेटिव्ह वाटेल.
परंतु सिनेमा करायचा तर बरीच व्यवधाने असतात, व्यावसायिक आणि सेन्सॉर सर्टिफिकेटची गणिते असतात. सगळ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. ते सर्व सांभाळून जे शक्य होते त्यामानाने चांगला सिनेमा केला आहे. मुख्य म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत संभाजी महाराजांचे बलिदान पोहोचवण्यात यशस्वी झाला आहे हेही नसे थोडके!
आत्ताच छावा बघितला. काय मजा
आत्ताच छावा बघितला. बरोबर नाही वाटलं. सगळा चित्रपट पाहताना वास्तव यापेक्षा वेगळेच काहीतरी होते हे सारखं वाटत राहतं.
छावा बघितला. ठीक आहे. खूपच
छावा बघितला. ठीक आहे. खूपच भारावून जाणे असं काही झालं नाही. पहिली बुर्हाणपूरची लढाई खूपच ताणली आहे. सुरवातीला इंटरेस्ट वाटतो नंतर आता आवरा असं झालं. सोयराबाईचे कास्टिंग, पेहराव साफ फसलेलं आहे. कुठेही ती महाराणी, राजमाता वाटत नाही. टी.व्ही. सिरियलमधील कारस्थानी बाई वाटते. रश्मिका दिसायला छान दिसते, तिचा कपडेपट, दागिने चांगले आहेत. वेल्वेट, जरदौसी वगैरे भानगडी नाहीत. पण तोंड उघडलं की माती खाते. तिचे डायलॉग डब करायला हवे होते. विकी कौशल, अक्षय खन्ना दोघांची कामं आवडली. दोघांनीही प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
नंतरच्या लढायांचा कंटाळा येतो. पाण्यातून उडणारे मावळे, सूरपारंब्या खेळणारे मावळे, तसेच साड्यांच्या पदराच्या प्रहाराने मुघल मरतात हे काहीही वाटतं. एकही गाणं लक्षात राहात नाही. शेवट चांगला घेतला आहे, धर्मांतराची अट शेवटी येते हे जरा अनाकलनीय आहे पण ठीक. आधीचा अचाटपणा जरा कमी केला असता तर शेवट अजून उंचीवर गेला असता.
चित्रपटाची ओळख चांगल्या
चित्रपटाची ओळख चांगल्या प्रकारे करून दिली आहे 👍
मला बिग बजेट भव्य-दिव्य सिनेमे मोठ्या पडद्यावरच पाहायला आवडत असले तरी 'डंकर्क' हा अत्यंत सुमार चित्रपट पाहिल्यापासून ऐतिहासिक सत्यघटना/व्यक्तिमत्वे वगैरेंवरचे चित्रपट, चित्रपटगृहांत जाऊन पाहण्याचा खरंतर धसकाच घेतला आहे. त्यात विकी कौशल आणि रश्मीका मंदाना हे दोघेही कलाकार मला आवडत नाहीत, त्यामुळे पुढे-मागे ओटीटी वर आल्यावर 'छावा' पाहण्याचा आधी विचार केला होता, परंतु गेल्या आठवड्याभरात हा चित्रपट पाहिलेल्यांकडून त्याबद्दल बरेचकाही चांगले ऐकल्यामुळे आज दुपारी हा चित्रपट पाहायचे नक्की केले आहे. अपेक्षाभंगाचे दुःख फार मोठे असते, ते टाळण्याच्या दृष्टीने तुमचा हा 'चित्रपट परिचय' आणि अजबराव आणि माझेमन ह्यांचे प्रतिसादही उपयुक्त ठरणार आहेत.
कुठल्याही अपेक्षा न बाळगता आज 'छावा' पाहिल्यावर तो चित्रपट कसा वाटला ते नंतर दुसऱ्या प्रतिसादात खरडतो 😀
नंतरच्या लढायांचा कंटाळा येतो
नंतरच्या लढायांचा कंटाळा येतो. पाण्यातून उडणारे मावळे, सूरपारंब्या खेळणारे मावळे, तसेच साड्यांच्या पदराच्या प्रहाराने मुघल मरतात हे काहीही वाटतं.>>> +११११
पदराच्या प्रहाराने मुघल मरतात
पदराच्या प्रहाराने मुघल मरतात हे काहीही वाटतं >>> अच्छा. हे मी मिस केले वाटते.
. पाण्यातून उडणारे मावळे,
. पाण्यातून उडणारे मावळे, सूरपारंब्या खेळणारे मावळे, तसेच साड्यांच्या पदराच्या प्रहाराने मुघल मरतात हे काहीही वाटतं.>>> मी अशावेळी विचार करते की त्यांना काही ठराविक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे दाखवतायत. किंवा गनिमीकावा दाखवायचं तर काही जास्त मनोरंजक (?) दाखवतायत.
मी मागे लिहिलं आहे तसेच हा
मी मागे लिहिलं आहे तसेच हा रेडिमिक्स बाहुबली मसाला आहे
तो हिट झालाय ना मग वापरा सगळीकडेच
तान्हाजी ला तोच, बाजीराव ला तोच आणि छावा ला तोच
जोवर लोकं बघत राहणार तोवर ते दाखवत राहणार
सगळी परीक्षणे आणि त्यावरील
सगळी परीक्षणे आणि त्यावरील प्रतिसाद वाचता छावा चित्रपट बघणार नाही. छावा कादंबरी परत एकदा वाचेन.
OTT वर आल्यावर बघेन, नको ते टाळून हवे ते पहाता येईल.
असे करणार असाल तर फक्त शेवटच
असे करणार असाल तर फक्त शेवटच बघा. व्हिज्युअल इफेक्ट म्हणाल तर Crouching tiger hidden dragon बघत आहोत असे वाटेल. रेहमानने संगीताचा पुरा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. अरबी कोल्हेकुई संगीत सतत वापरले आहे. टेबल टॉप सेट वापरल्याचा फिल जाणवतो.
फेसबुकवरील या अभिप्रायात
फेसबुकवरील या अभिप्रायात काही वेगळे मुद्दे आहेत.