नागपुरात माझ्या सभोवती कवितांचे वातावरण सुरू झाले ते १९८७ पासून. त्याचे कारण त्यावेळी मला कविता आवडायच्या असे काही नसून ते वेगळेच होते. झाले असे की मीच काही लिहून काढले जे मला कवितेसारखे दिसू लागले. आपण कविता लिहिलीय ही भावना खूपच आनंददायी होती, आता ती कविता ऐकून तिला दाद देणारे श्रोते हवे होते आणि त्यासाठी काही जवळचे मित्र कामी यायला लागले. ती कविता वाचून दाखवण्यासाठी एक वही करायची कल्पना साहजिकच सुचली आणि माझ्या कवितांच्या वहीची अश्या प्रकारे सुरवात झाली.
आता कविता या विषयाकडे मन वळू लागले, अभ्यासात असणाऱ्या कवितांचे नव्याने वाचन सुरू झाले. बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता वाचून तसेच लिहावेसे वाटू लागले. एकूण माझ्या कवितांचा प्रवास आटोपशीरच होता कारण इतरांच्या कविता ऐकण्याची साधने बेताचीच होती.
१९९३ च्या दरम्यान कॉलेजात असताना, कवितांवर प्रेम करणारे काही मित्र लाभले आणि कवितांचा अधिक अभ्यास होऊ लागला. मित्रमंडळीमध्ये कवी मित्र आल्याने कट्यावर, भेटींमधे, फोनवर कविता केल्यावर ती ऐकवून दाद आणि सूचना घेण्याची ओढ लागली. वाढदिवसाला कवितासंग्रह भेट म्हणून मिळायला लागले, अनेक कवींच्या कवितांचे संग्रह संग्रहात जमा होऊ लागले आणि सुरेश भट, कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकर, सुर्वे, चंद्रशेखर गोखले अश्या अनेक लोकप्रिय कविंच्या कविता वाचून सहज मनाला भावेल अशी कविता कशी असते ते कळायला लागले.
या दरम्यान अनेक कविता लिहून झाल्या आणि ओघानेच अनेक कवितांच्या वह्या भरत गेल्या. त्या कविता मित्रांना ऐकवण्याच्या जागा म्हणजे कधी काळी मित्रांच्या घरी घडणाऱ्या कवितांच्या मैफिली किंवा आम्ही मित्रांनीच आयोजित केलेला एखादा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम.
माझा कवितांचा प्रवास कदाचित इथेच थांबला असता आणि इतपतच मर्यादित राहिला असता जर मला इंटरनेट चे महाजाळे मिळाले नसते. २००० सालच्या आसपास व्यवसायाच्या निमित्ताने कंप्यूटर आणि इंटरनेट वर वावर वाढला आणि साहजिकच आपल्या आवडीच्या जिनसा आपण जातो तिथे शोधतो त्याप्रमाणे मी इंटरनेट वर मराठी कविता कुठे आहेत का शोधल्या तेव्हा मला ‘मायबोली डॉट कॉम’ (www.maayboli.com) “मायबोली” हे संकेतस्थळ सापडले.
मायबोली वर देश विदेशातले मराठी भाषिक लोक साहित्य लिहिताना दिसले आणि ती जागा एक पर्वणी ठरली. त्याच मायबोलीवर ‘हितगुज’ नावाचा विभाग होता जिथे सदस्य आपल्या स्वलिखित कविता पोस्ट करायचे. मायबोली माझ्यासाठी मराठी कवितांच्या इंटरनेट वरच्या विश्वाचे महाद्वार ठरले. मायबोली ने मला ईकवितेच्या विश्वात आणले आणि माझ्या कवितांच्या अनेक वह्यांमधल्या कवितांना आता एक नवे घर मिळाले. मायबोली वर साहित्य वाचण्यासाठी डेक्सटॉप किंवा लॅपटॉप असणे त्यावेळी आवश्यक होते कारण इंटरनेट वर वेब साईट वाचणे याच साधनांनी शक्य होते. सहसा विदेशात नोकरी करणारे भारतीय मराठी भाषिक किंवा विदेशात स्थाईक झालेले पण मराठी भाषेची आस्था असणारे मराठी भाषिक ज्यांना संगणक आणि इंटरनेट इपलब्ध होते तेच या स्थळावर येऊ शकत आणि साहित्य पोस्ट करू शकत आणि वाचू शकत. तसे असले तरीही हा वाचक वर्ग बराच मोठा होता आणि माझ्या कवितांना अचानक एवढा मोठा वाचक वर्ग मिळाल्याने तो सृजनासाठी सुयोग्य काळ ठरत होता.
मायबोली वर कविता पोस्ट करण्यासाठी खाते तयार करून त्या खात्याला एक नाव द्यावे लागे. ते नाव काय असावे याचे काही बंधन नव्हते म्हणून कच्चालिंबू, लिंबूटिंबू, मेघधारा, अज्जुका, योग, परागशीर, हवाहवाई अश्या नावाची खाती तिथे होती आणि त्यातले काही कविता पोस्ट करायचे. मी पण साळसुद व्यक्तीसारखा स्वतःच्या नावाने एक खाते तयार केले आणि माझ्या कविता पोस्ट करू लागलो. मायबोलीवर कविता पोस्ट करणे म्हणजे नाटकात प्रवेश सादर करण्यासारखे होते, अभिनेत्याला जसे प्रवेश झाल्या झाल्या एकतर टाळ्या मिळतात किंवा हूटींग मिळते तसेच मायबोलीवर कविता पोस्ट केल्याच्या काहीच काळानंतर वाचकांचे कवितेखाली अभिप्राय येत आणि कविता आवडली, नाही आवडली, काय वाटले काय नको काय हवे असे अनेक सृजनात्मक विचार तिथे वाचायला मिळायचे.
कवितांना वाचून कवी ला ओळखणारे या महाजालावर भेटतात. आधी तुम्ही कविता वाचता आणि मग त्या कवीशी हळूहळू ओळख होत जाते. मला आठवते आहे की माझ्या एका कवितेच्या ओळींना लक्षात ठेवणारे एक कवी मला खूप वर्षांनी प्रत्यक्ष भेटले पण माझ्या त्या कवितेमुळे ते मला वर्षांपासून ओळखत होते त्यामुळे घनिष्ठ भेट झाली.
ती कविता होती - अभ्यास
निश्चल देही मन ना रमते
वादळाचा ध्यास मला
सुखाहूनही बरा वाटतो
दुःखाचा अभ्यास मला
कळ्या फुले खुडताना होतो
किंकाळी चा भास मला
गर्दीमध्ये असून होतो
एकाकी आभास मला
ईकवितांची ही मैफिल चोवीस तास चालणारी मैफिल असते. जगभरातून वाचक वाचणार त्यामुळे तुम्ही अगदी रात्री दोन वाजता जरी कविता पोस्ट केली तरीही अमेरिकेतले वाचक त्या लगेच वाचायला हजर असतात. ईकवितांच्या विश्वात मायबोली चे काम असे महत्वाचे आणि भरीव काम आहे.
कालांतराने मायबोली च्याच उदाहरणाने कल्पना घेत मग अनेक संकेत स्थळे सुरू झाली मनोगत (मनोगत डॉट कॉम ), मिसळपाव (मिसळपाव डॉट कॉम ), ऐलपैल, ऐसी अक्षरे, उपक्रम, सुरेश भट डॉट इन ही त्यातली मला माहित असलेली ठळक नावे. या सर्व संकेत स्थळांवर मराठी साहित्य पोस्ट करता येते आणि कवितांचा त्यात मोठा विभाग असतो. आपले खाते तयार करून त्या स्थळांवर कविता पोस्ट करता येतात आणि इतरांच्या कविता वाचता येतात.
याच ईकवितांच्या साईट वर अनेक समकालीन इंटरनेट वर लिहिणाऱ्या कवींच्या कविता वाचायची संधी आणि त्यातून नवे बरेच काही शिकायची संधी मला मिळत गेली. अनेक प्रभावी कवी जसे ‘वैभव जोशी’, ‘प्रसाद शिरसागर’ त्यावेळी मायबोलीवर लिहायचे आणि आता त्यांच्या कर्तत्वाने खूप लोकप्रिय झालेत.
मायबोली, मनोगत आणि अशीच बरीच संकेत स्थळे कविता पोस्ट करणाऱ्यांसाठी मासिकांप्रमाणे होती पण एक महत्वाचा फरक होता. या संकेत स्थळांवर कविता पोस्ट करण्यासाठी कोणत्याही संपादकाची परवानगी लागत नसते. कुणीही अगदी कुणीही केव्हाही इथे कविता पोस्ट करू शकते. त्यात खरेच सकस आणि दर्जदार लिहिणाऱ्यांना मुबलक दाद आणि मिळते आणि नवीन लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन देखील मिळते.
साल २००५ नंतर ऑरकूट नावाचे संकेत स्थळ भारतात आणि खासकरून अनेक मराठी भाषिक लोकांच्यात लोकप्रिय झाले. अनेक लोक या संकेत स्थळावर खाती तयार करू लागली आणि सोशल नेटवर्किंग या नव्या संकल्पनेच्या उदयात हातभार लावू लागली. ईकवितांसाठी ही एका नव्या रचनेची नव्या दिशेची सुरवात ठरली. ऑरकूट वर कवितांचे गट तयार झाले आणि हजारोंनी रसिक या गटांचे सदस्य होऊ लागले. या कवितांच्या गटात कविता पोस्ट केल्यावर त्या अनेक रसिक वाचत आणि लगेच दाद मिळत असे. ऑरकूट म्हणजे अधिक जवळच्या मित्रांच्या मैफिलीसारखे ठरत गेले. इथल्या गटांमधे कविता लिहिण्याचा आनंद काही औरच होता. काव्यांजली, मराठी कविता, मराठी कविता प्रेमी असे अनेक गट मराठी कवितांना व्यासपीठ देण्यासाठी सज्ज झाले. मी ‘काव्यांजली” नावाच्या गटात २००५ पासून कविता पोस्ट करायला लागलो आणि मराठी कविता या गटाशी आज ९ वर्षांपासून अजूनही संलग्न आहे इतका जिव्हाळा इथे मिळाला.
ऑरकुट मधल्या कवितांच्या गटात काही सृजनशील कवींनी उपक्रम सुरू केले. प्रयोगशील मनाने घेतलेली ती झेप होती. आठवड्याची ओळ देऊन लिहा ओळीवर कविता, विषय ठरवून आमंत्रित केलेल्या कविता अश्या अनेक उपक्रमांमध्ये लोक जोडले जाऊ लागले.
समविचारी कवी आणि रसिक एकत्र येऊन ऑरकुट वर रोज भेटू लागले, ओळखी वाढल्या, दृढ होत गेल्या आणि हे सगळे आभासी मित्र प्रत्यक्ष एकत्र यायची एकमेकांना भेटायची इच्छा लपवू शकले नाही. ऑरकुट च्या मराठी कविता गटांचे मेळावे सुरू झाले. मला आठवतेय मी अश्या मेळाव्याला पहिल्यांदा गेलो ते नागपुर हून पुण्याला २००६ साली काव्यांजली गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात. या मेळाव्यांमधे रोज ज्यांच्या कविता वाचायला मिळतात अश्या अनेक कवींना चेहेरे मिळाले, ओळखी वाढल्या. त्यावेळेपासून आजतागायत हे मेळावे नियमित भरताहेत आणि अनेक कवी आणि रसिक या मेळाव्यांचा अनेक शहरांमध्ये लाभ घेताहेत. मराठी कविता समूह या गटाच्या मेळाव्यांमध्ये तर मी पूणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, डोंबिवली आणि इंदौर इतक्या शहरांमध्ये भाग घेतला आहे.
याच दरम्यान कवितांशी संबंधित अनेक चळवळी इंटरनेट वर सुरू झाल्या. इबुक तय़ार करणे ही त्यातली महत्वाची मोहिम. अनेक कवी संपादक होऊन गटांवर पोस्ट होणाऱ्या कवितांचे पीडीएफ फारमेट मधे इबुक तयार करू लागले. काही सक्रीय लोकांनी एकत्र येऊन संस्था तयार केल्या, ईसाहित्य ही त्यातली एक महत्वाची संस्था. नेटाक्षरी नावाचे मराठी कवितांना वाहिलेले एक अनियतकालिक बरीच वर्षे चालत होते. इसाहित्य या संस्थेच्या माध्यमाने अनेक नवोदित आणि जाणत्या कवींचे पहिले कवितासंग्रह इबुक रूपात प्रकाशित झालेले आहेत.
याच ऑरकुटच्या काळात फक्त कविता लिहिणे आणि त्या वाचणे इतकेच न होता अनेक कवी लोकांच्या आपापसात चर्चा घडू लागल्या, कवितेच्या दिशा आणि स्वभावावर तर कवितेच्या मांडणी आणि रूपावर चर्चा आणि साधक बाधक वा घडू लागले. गटावरच्या उपक्रमांमध्ये मुक्त कविता छंदबद्ध कविता, वृत्तबद्ध कविता, कवितेच्या अनेक विधा जसे भावकविता, पोवाडे, आरत्या, ओव्या, लावण्या अश्या अनेक विषयांवर माहिती देणारे अभ्यासपूर्ण लेख मायबोली, मनोगत, आणि ऑरकुट कविता गटांवर प्रकाशित होऊ लागले. हे सगळे कवींसाठी खूप उपयुक्त ठरत गेले आणि अनेक कवी या इंटरनेट वर विकसित झाले आणि आता लोकप्रिय होऊन जगभरात ओळख प्राप्त झालेले दिसतात.
साल २०१० नंतर इंटरनेट च्या जगात एक महत्वाची क्रांति झाली ती म्हणजे स्मार्ट फोन सहज उपलब्ध झाले आणि मायबोली, मनोगत अशी संकेत स्थळे वाचकांना हातात उपलब्ध झाली. याच दरम्यान फेसबुक हे संकेत स्थळ लोकप्रिय झाले आणि त्याची वाचक संख्या अफाट वाढत गेली कारण त्याला वाचण्यासाठी डेक्सटॉप किंवा लॅपटॉप असण्याची मर्यादा संपुष्टात आली होती. फेसबुक मोबाईल वर सुद्धा सहज वाचता येऊ लागले होते आणि फेसबुक वर पण गट तयार करण्याची सुविधा होती. ऑरकुट साईट गुगल कंपनीने बंद केल्याने तिथले सगळे कवी फेसबुकवर लिहिते झाले आणि तिथले कवितांचे सगळे गट फेसबुक वर पुन्हा तयार झाले आणि आपली कवितांची मैफिल कवी आणि रसिकांनी अविरत सुरू ठेवलेली आहे.
आता फेसबुक वर स्वतःची वॉल (भिंत) हे स्वतःचे मुखपत्र झाले आहे आणि साहित्यिक तिथे हवे तेव्हा हवे ते साहित्य पोस्ट करू शकतात. इतरांना त्या साहित्यिकांना फालो करता येते आणि त्या साहित्यिकांनी काही नवे लिहून पोस्ट केले की सर्व चाहत्यांना जे त्यांना फालो करताहेत त्यामच्या न्यूज फीड पानावर ते साहित्य उपलब्ध असते.
कवितांच्या गटांप्रमाणेच एका वेगळ्या पद्धतीने पण कविता लेखन आणि वाचन फेसबुकवर होत असते. जाणकार कवी स्वतःच्या वॉल वर कविता पोस्ट करतात आणि त्यांना फॉलो करणारे त्यांचे चाहते त्यांना लाईक करतात आणि शेयर करतात. या प्रकाराने चांगली कविता अनेक वाचकांपर्यंत पोचते आणि त्या कवीचे फॉलोअर वाढत जातात. वाचकांनाही नवे नवे चांगले लिहिणारे यातून मिळत जातात. सध्या अनेक लोकप्रिय कवी आणि नव्यानेच उदयास आलेली कवींची एक खास ओळख म्हणजे गझलकार यांच्या वाल वर जाऊन त्यांचे नवे ताजे लिखाण रोज वाचायला मिळणे ही मराठी कविता रसिकाला मिळालेली मोलाची उपलब्धी आहे. मोबाईल वरून सुद्धा हे साहित्य सहज वाचायला मिळणे रसिकांच्या खास सोयीचे झालेले आहे आणि त्यामुळेच, संगणकाशी फार संबंध येत नसलेल्या साहित्यिकांनाही ही वाट मोकळी झाली आहे, म्हणूनच मराठी कवितांची एक खास जागा या इंटरनेट वर तयार झालेली आहे.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
तुषार जोशी, नागपूर
शुक्रवार १० जानेवारी २०२५