एक झुळुक!

Submitted by छन्दिफन्दि on 14 February, 2025 - 01:29

गेल्या वर्षीचा १४ फेब्रुवारी, माझा इकडच्या ( अमेरिकेतील) हायस्कूल मधील पहिलाच व्हॅलेंटाईन डे.. म्हणजे (बदली) शिक्षिका म्हणून!
एरव्हीसुद्धा चिवचिवटाने गजबजणारी शाळा आज तर जास्तच बहरलेली.
फूल, फुगे, मऊ टेडी बेअर्स, चकचकीत गिफ्ट बॅग्स - अगदी “देता किती घेशील दोन करांनी’ अशी बऱ्याच जणींची अवस्था होती - अशी प्रेमसंपत्ती दोन्ही हातांत सांभाळत त्या षोडषा अगदी फुलपाखरांसारख्या भिरभिरत होत्या.
अशा गुलाबी वातावरणातच, दिल्यावर हुकूम वर्ग उरकून मी निघाले. ऑफिसमध्ये किल्ली परत द्यायला म्हणून शिरले तर तिकडच्या दोघीही कोण कौतुकाने काचेच्या दारामधून बाहेर बघत होत्या. हे असं काही इकडे कधी बघितलं नव्हतं.. कोणी कुणाकडे उगाचच किंवा सहजही बघत बसत नाही, त्यांना तेव्हढा उत्साह आणि रस दोन्ही नसतो, अर्थात हे झालं माझं निरीक्षण. पण त्यामुळे निश्चितच काहीतरी विशेष असावे असं वाटून मीही त्यांना सामील झाले.

एखादं मिनिटात लक्षात आलं की,
एक मुलगा चित्रविचित्र पोशाख अणि मुखवटा ( थोडा ताण दिल्यावर दिवा पेटला, की तो बिस्ट झालेला) घालून उभा होता. त्याच्या हातात एक फलक होता - त्यावर “love you, kiss me, hug me… ‘ वगैरे वगैरे काही बाही लिहिलेलं आणि दुसऱ्या हातात होती एक मोठी लालबुंद बदामी आकाराची मऊ ऊशी.
बाहेर हळूहळू गर्दी वाढत होती.. तेवढ्यात ह्या दोघी इकडे पुटपुटायला लागल्या, “बहुदा हिच असावी..”
बघितलं तर एक सुबक ठेंगणी हातातील पुष्पगुच्छ सांभाळत, केसांच्या रंगेबिरंगी बटा उडवत गेट कडेच येत होती.
आता टकामका टेनिस मॅच बघावी तस आम्ही एकदा त्या बिस्टकडे आणि लगेच ह्या सुंदरीकडे आलटून पालटून बघत होतो.

ती तीच होती. जशी ती जवळ आली, धडक त्याच्याकडेच गेली. एव्हाना तोही दोन हात पसरवून शारूखच्या पोझमध्ये गेला… अर्थात एका हातात ते लाल हृदय, दुसऱ्या हातात तो फलक होताच. इकडे ती येऊन सरळ त्याला बिलागलीच, मग त्याने तिचे आणि तिने त्याचे चुंबन घेतले.. तसा त्याने तो बिस्टचा मुखवटा दूर सारला. सर्व बघ्यांनी टाळ्या वाजवल्या.. इकडे ह्या दोघींच्या डोळ्यातून कौतुक ऊतू जात होते. क्षणभर तर मला भास झाला की दोघींच्या डोळ्यातून दोन आनंदाश्रु पण टपकताय.. तोंडाने “हाऊ क्यूट.. सो स्वीट “ असा जप चाललाचं होता. इकडे त्याने तिला ते हृदय, अजून कुठून अचानक काढलेला टेडी, फुले अन् बरच काय काय दिलं. बघितलं तर एक प्रौढा हा सगळा प्रसंग तिच्या मोबाईल मध्ये टिपत होती. जेव्हा ते तिघं एकत्र निघाले तेव्हा ती त्याचीच आई/ मावशी वगैरे कोणी असावी असं लक्षात आलं.

शाळेच्या परिसरात, शिक्षक - शिक्षेतर कर्मचारी - पालक यांच्या सामूहिक साक्षीने दोन अज्ञान ( कायद्याने सज्ञान न झालेले) बालक-बालिकेच्या प्रेमाच्या आणाभाका ह्याची देही ह्याची डोळा अनुभवण्याचे भाग्य पदरी पाडून, सांस्कृतिक धक्का (?) हळुवारपणे झेलत, नव्हे नव्हे तर तो अमेरिकन प्रेमाचा रंग माझ्या भाबड्या मराठी मनाला लावत… आणि हे सर्व करताना स्वतःच्या शाळेतील दिवसांची आठवण अजिबात येऊ न देण्याची कसरत करतच घरी परतले.

घरी पाऊल ठेवताच आमचे शेंडेफळ, ह्यावर्षी त्याचा हायस्कूल मधील पहिलाच व्हॅलेंटाईन डे अनुभवून, घरी आलं होतं. उत्साहाने फसफसतच तो भराभरा सांगू लागला.
आज यश ( असं आपण म्हणुया) ला एक मुलीला गुलाब आणि चॉकलेट द्यायचं होत. सकाळपासून तो इतका नर्व्हस झालेला. त्याला काही सुचतच नव्हतं. सारख्या फेऱ्या मारत होता क्वाड ( मधल्या चौकामध्ये) मध्ये. आम्ही त्याला धीर देत होतो.
शेवटी जेवणाच्या सुट्टीत ती आणि तिची मैत्रीण बसल्या होत्या. तेव्हा एकदाचा धीर करुन तिच्या जवळ गेला. तिला पट्कन गुलाब आणि चॉकलेट दिल आणि तस्संच वळून आमच्याकडे आला. आम्ही थोडं आडोशाला उभं राहून बघत होतो, तिने तो गुलाब बाजूला ठेवून दिला आणि ते चॉकलेट मैत्रिणीला दिले. मैत्रिणीने ते लगेच उघडलं…
तशी इकडे यश लालेलाल झाला.. पूर्ण रडकुंडीला आला..

कानाने ऐकत असताना, आपण आपल्या जीवनात अशी किती पापं केलीयेत ह्याचा जमाखर्च मांडत होते ( मैत्रिणीला प्रेमाने दिलेले चॉकलेट आपण खाऊन दुष्टपणाने एखाद्याचा तात्काळ प्रेमभंग करणे ते ही खास त्या दिवशी…? बहुदा ते पापातच गणत असावेत का…?)

वरकरणी त्याच्या “बिचारा यश..girls are so mean…. rude ..” वगैरे वगैरे वाक्यांना उगाच हुंकार भरत होते.
पलीकडची बाजू इतकी हिरीरीने आजच कोणी मांडून सांगत असावं..

एकाच दिवसात तरुणाईच्या प्रेमाचे (?) हे असे उत्कट दोन रंग अनुभवायला मिळाले - अर्थात त्याला प्रेम म्हणावं का लटकं आकर्षण ( infatuation), ते सुद्धा शालेय जीवनात..? वगैरे तात्विक मुद्दे तूर्तास बाजूला ठेवले,
किंवा व्हॅलेंटाईन डे म्हणजे शेवटी सगळ प्रचंड मोठ अर्थकारण आहे किंवा नसतं स्तोम
असे सर्व व्यवहारिक मुद्दे वगळले तरी -

त्याने रोजच्या चाकोरीबद्ध आयुष्यात एक अनपेक्षितपणे छानशी झुळूक आल्यासारखं वाटून गेलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुभव आवडला आणि अनेकदा फ्लॅशबॅक मधे तुम्ही पण जाता जाता थांबत असल्याने आम्ही पण जाता जाता थांबत होतो वाचताना. आपल्या जुन्या आठवणींच्या पार्श्वभूमीवर हे नवे अनुभव वाचणे हीच नास्टेल्जिक लज्जत आहे या लेखात.

एक मंदस्मित देणारा सुंदर अनुभव दिलात

मा बो वाचक, तुषार जोशी धन्यवाद!

तुषार जोशी विशेष म्हणजे तुम्हाला दृश्य (स्वरूपात ) न दिसताही, तुम्ही ह्या गोष्टीशी कनेक्ट झालात.. चांगलं वाटलं Happy

छान लेख अनुभव किस्से..

अर्थात त्याला प्रेम म्हणावं का लटकं आकर्षण ( infatuation), ते सुद्धा शालेय जीवनात..? वगैरे तात्विक मुद्दे तूर्तास बाजूला ठेवले,
>>>>>>>>

हो बरोबर, हे मुद्दे अश्यावेळी बाजूलाच ठेवावेत. त्या क्षणी त्या वयात त्या व्यक्तीसाठी ही फिलिंग जगात सर्वात भारी असते आणि हेच अंतिम सत्य आहे. ते आकर्षण आहे की प्रेम याने काही फरक पडत नाही. ती व्यक्ती त्यावेळी आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव जगत असते आणि तिला जगू द्यावे.

छान टिपली आहे एक छान, तरल अनुभूती !!
*...आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव जगत असते आणि तिला जगू द्यावे.* पूर्ण सहमत ! ज्या आठवणीचं मोरपीस आयुष्यभर मनाला हुरहूर व हुरूप देत राहील, अशा अनुभूतीला उगीच नांव देण्याच्या भानगडीतच पडू नये !!

तरी पण, असंही असू शकतंच -

अहो, एक गुलाब देवून माझी विकेट घेवून झाली ! आता मला काय उपयोग आहे ' गुगली ' कसा टाकतात व कसा खेळायचा तें दाखवून ! !

20210128_105244.jpg

गुलाब देऊन विकेट काढली आणि आता गुगली टाकायला शिकवतायत
Lol Lol Lol

भाऊ नमसकर मस्त काढलंयत! आवडलं : )

धन्यवाद!

ही कुठल्या अमेरिकन राज्यातली घटना आहे? मी हायस्कूलमधल्या मुलांनी व्हॅलेन्टाइन डेला कॉस्च्यूम वगैरे घातलेला पाहिला/ऐकला नाहीये कधी. हॅलोवीनलासुद्धा कॉस्च्यूम वगैरे घालणं त्यांना चाइल्डिश वाटायला लागलेलं असतं तोवर.
आणि कोणी हग आणि किस केलं म्हणून बघ्यांनी टाळ्या वाजवणं, कोणी टिपं गाळणं वगैरे तर करण जोहरच्या सिनेमाबाहेर कुठेच कधीच झालेलं पाहिलेलं नाही. त्यांनी मग हिरवळीवर जाऊन द्वंद्वगीतही गायलं असेल का? Happy

पण तुम्हाला झुळूक जाणवली हे छान झालं. Happy

रेव्यु धन्यवाद|

स्वाती_आंबोळे वाचल्याबद्दल धन्यवाद!

तुम्हाला इतक अविश्वसनीय वाटावं ह्याच मला भारीच आश्चर्य वाटतंय. तुम्ही कोणत्या राज्यात राहता? तुमचे माहितीस्रोत कोण/ कुठले ह्यावर मी मत मांडू इच्छित नाही.
पण माझा अंदाज व्हॅलेंटाईन (किंवा Halloween ) आठवड्यात तुम्ही हायस्कूल परिसरात शाळेच्या कामकाजाच्या दरम्यान कधी चक्कर टाकली नसावी.

ते त्यांच्या शाळेच्या आवारात त्यांची खास मोमेंट/ क्षण जाहीर रित्या साजरी करत होते, टाळ्या वाजवणारे, कौतुकाने बघणारे कोणी अनोळखी नव्हते पण त्यांना ओळखणारे होते. मीच एकटी अपरिचित/ उपरी होते Happy

त्यांना माहीत नव्हतं ना की त्या करण जोहरच्या चित्रपटात नाहीयेत त्यामुळे त्यांनी अशी प्रतिक्रिया देत काम नये, काही जणांच्या मते त्यावर त्याचा कॉपी राइट आहे. : |
पुढे त्यांनी हिरवळीवर जाऊन गाणी गायली का नाच केला ते बघायला ते थांबले नाहीत आणि मी त्यांचा पाठलाग केला नाही. ते तुमच्या कल्पनाशक्तीवर सोडून देते. Happy

बाकी
कुणाला झुळुक, कुणाला उनाड वारा, तर कुणाला झोंबरा वारा, एखाद्याला पण हललेल पण जाणवणार नाही.
प्रत्येकाची आपापली दृष्टी आणि जाणीव!

****

हॅलोविन दरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणावर मोठ्या माणसांच्या मापाचे पोशाख बघितले आहेत, मोठ्या मुलांना, माणसांना विकत घेतानाही पाहीलय, ट्रिक or ट्रीट साठी हायस्कूल ची मुलंही घरी येतात,
शाळेत शिक्षक/ शिक्षिका, ऑफिसात माणसं त्या दिवशी costume घालून जातात, रस्त्यांवर फिरतात..
काही भाग (स्वयंघोषित ) बुद्धिवादी, बुद्धिजीवी (?) मंडळीसाठी तर काही भागांमध्ये childish लोकांची मांदियाळी असावी. Happy

>>>हॅलोवीनलासुद्धा कॉस्च्यूम वगैरे घालणं त्यांना चाइल्डिश वाटायला लागलेलं असतं>>>
माझ्या गेल्या खेपच्या सॆन रॆमन कॆलिफोर्निया भेटीत मी ही धमाल शाळेत अन घरी पाहिली होती

माझ्या गेल्या खेपच्या सॆन रॆमन कॆलिफोर्निया भेटीत मी ही धमाल शाळेत अन घरी पाहिली होती

Submitted by रेव्यु on 21 February, 2025 - 04:40>>>

Happy

खूप क्युट लिहिलेय टीनेजर्सच्या भावविश्वाबद्दल आवडलं .पण हे अमेरिकेतील आहे हे लगेच डोक्यात आले आमच्या शाळा टीनेज ची आठवन झाली तिथे फारफार ग्रीटिंग दिली जायची तीही लपून छपून उघडउघड काही करणं तर दूर शिक्षकांना कळलं तर शाळेत रक्षाबंधन व्हायचं. Lol

थॅन्क्स सिमरन!

हे हे! आम्हाला शाळेत असताना माहिती नव्हत असा व्हॅलेंटाईन डे वगैरे असतो. Happy
पुढे कधीतरी कॉलेज मध्ये कळले.

छान लिहिलय, झुळूक च वाटली. ज्युनियर कॉलेजाचा रोज डे आठवला. गुलाब, चॉकलेट काय काय मजा असायची. त्या वेळी व्हॅलेंटाईन डे नाही व्हायचा.

मी हायस्कूलमधल्या मुलांनी व्हॅलेन्टाइन डेला कॉस्च्यूम वगैरे घातलेला पाहिला/ऐकला नाहीये कधी. हॅलोवीनलासुद्धा कॉस्च्यूम वगैरे घालणं त्यांना चाइल्डिश वाटायला लागलेलं असतं तोवर.>> किती अविश्वास! तुम्ही पाहिला, ऐकला नाही म्हणजे जगात घडतच नाही का? Happy सिंगापूर ला अगदी ४०+ लोक & २०-३० मधले तर कित्तेक लोक मस्त हॅलोवीन ड्रेस, तोंडाला मेकप लाऊन फिरत असतात. व्हॅ.डे ला ही फक्त तरून च नाही तर लग्न झालेली जोडपी सुद्धा मस्त गुलाब बुके, डिनर अशा जामानिम्यात असतात. छान वाटते बघून हौशी लोकांना.