तुम्ही डोळस आहात? की आंधळे आहात?

Submitted by तुष्कीनागपुरी on 14 February, 2025 - 00:00

आज हा लेख वाचल्यावर तुम्ही कदाचित एका नव्या संकल्पनेला सामोरे जाणार आहात. मी ज्या विषयावर बोलतोय तशी स्थिती फक्त चार टक्के लोकांमधे आढळते असे सध्याचे उपलब्ध गणित आहे. ते गणित चुकीचे देखील असू शकते पण फार कमी लोकांमधे ही स्थिती आढळते इतके नक्कीच बरोबर धरता येईल. त्यामुळे असे गृहित धरुया की तुम्ही त्या छोट्या गटामधे मोडत नाही आणि त्यामुळे तुमच्यासाठी हा एक नवा विषय आहे.

नवे काही ऐकू आले किंवा वाचायला मिळाले की आपण नेहमीच साशंक असतो आणि ते बरोबर देखील आहे कारण आजकाल जुनाच माल नवा करून पुन्हा सादर करायचा धंदा सगळीकडे सुरू आहे. पण तरीही वाचून बघा तुम्हाला हे आधी माहित होते का ते.

नुकताच आमच्या मित्रमंडळींमधे झालेला एक संवाद ऐकवतो.

मी: मित्रांनो मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मला इतक्यातच कळले की मला अफॅंटॅसिया आहे.
मित्र१: अफॅंट-काय?
मी: अफॅंटॅसिया, म्हणजेच मी माझ्या मनात कल्पना दृष्य स्वरूपात बघू शकत नाही. जेव्हा आपण म्हणतो ना की कल्पना कर, डोळ्यासमोर चित्र आण, किंवा कल्पना करा की आपण जंगलात आहोत किंवा प्राणिसंग्रहालयात आहोत, तेव्हा जसे एक चित्र डोळ्यासमोर उभे राहते, तसे माझ्या मनात माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहत नाही, अंधार असतो कशाचेच चित्र दिसत नाही, काळा पडदा असावा तसा अंधार असतो.
मित्र२: काय सांगतोस, म्हणजे जेव्हा तू पुस्तक वाचतोस तेव्हा ते प्रसंग तुझ्या डोळ्यासमोर घडतांना तुला दिसत नाहीत?
मी: अगदी तेच, मला गोष्टीतले प्रसंग कळतात, मला भावना कळतात, संकल्पना कळतात, पण मला ते मनात दिसत नाहीत, कल्पनेत दिसत नाहीत. मी तथ्यांमधे, शब्दांमधे, भावनांमधे, संकल्पनांमधे विचार करतो, चित्रांमधे नाही.
मित्र१: हे विचित्रच वाटते आहे. सगळ्यांनाच मनात चित्र दिसते, नाही का? तू कदाचित काहीतरी चूक करतो आहेस लक्ष केंद्रीत केलेस आणि प्रयत्न केलास तर तुला पण चित्र दिसेलच. कदाचित तू आवश्यक तितका प्रयत्न करत नाहीयेस.
मी: मला पण आधी असे वाटले होते की मी काहीतरी चुकतोय किंवा निट करत नाहीये. पण या विषयावर अधिक वाचन केल्यावर आणि काही तपासण्या केल्यावर मला कळलेय की माझा मेंदू वेगळा आहे, ही एक मेंदूभिन्नता[२] आहे, कमतरता नाही.
मित्र२: म्हणजे जर तुला निळा रंग आठव किंवा प्रिय व्यक्तीचा चेहरा आठव म्हटले तर तुला डोळ्यांसमोर काही दिसत नाही का?
मी: नाही. मला निळा रंग ही संकल्पना ठाऊक आहे, मला प्रिय आणि ओळखीच्या लोकांचे चेहरे पाहिल्यावर ओळखता येतात पण आठवताना ते चित्रात्मक दिसत नाहीत. आठवणी या फक्त चित्रांत्मक नसतातच, आठवणी भावना, घटना, संवाद अश्या अनेक पदरी असतात माझ्यासाठी फक्त त्यात चित्रमय काही नसते.
मित्र२: मग तुला स्वप्न कशी पडतात?
मी: मला स्वप्न पडतात आणि बरेचदा आठवलेली स्वप्ने पाहता त्यात मला रंग आणि चित्रे देखिल दिसतात असा माझा अंदाज आहे. पण अफॅंटॅसिया असणारे सगळेच स्वप्नांमधे चित्रे पाहू शकतात असे नाही असे मी वाचलेय.
मित्र२: हे विचित्रच आहे, मला जाणिव नव्हती असे देखील असू शकते. चित्र दिसत नाहीत यावर विश्वास बसत नाहीये
मित्र१: हो विश्वास बसत नाहीये, हे तू काहीतरी आपल्याच मनाने तयार करून सांगतो आहेस असे वाटते आहे.
मी: मान्य आहे की हे वेगळे आहे. पण हे खरे आहे आणि माझी स्थिती असणारे बरेच लोक जगात आहेत. त्यावर सध्या अनेक जागांवर लिहिले आणि बोलले जातेय. मेंदूभिन्नता आणि या स्थितींबद्दल सध्या जागरूकता वाढवणे सुरू आहे आणि असे लोक जगात आहेत हे आपल्याला माहित असायला हवे. मला आशा आहे की तुम्ही माझ्या अनुभवांवर विश्वास ठेवाल.
मित्र२: मला विश्वास आहे तुझ्यावर. तसेही प्रत्येक व्यक्ती निराळा असतोच.
मित्र१: बरं गड्या, मला अजून या बद्दल अधिक वाचावे लागेल असे दिसते आहे, मला याबद्दल अजून सांगशील.
मी: धन्यवाद मित्रांनो मला ऐकून घेतल्याबद्दल मला माझा हा भाग तुम्हाला कळावा हीच माझी इच्छा होती.

या संवादातून तुम्हाला कल्पना आली असेल की जगात काही व्यक्ती अश्या असतात माझ्या सारख्या ज्यांना मनातला डोळा नसतो. म्हणजे चित्ररूप काही मनात आणता येत नाही. दिसत नाही. आठवणी सुद्धा चित्रमय नसतात तर शाब्दिक, घटनात्मक आणि भावनात्मक असतात.

मला वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षापर्यंत ही गोष्ट माहित नव्हती. आजुबाजुला बोलल्या जाणारे शब्द जसे कल्पना करा की तुम्ही समुद्र किनाऱ्यावर आहात वगैरे बोलले गेले की मला वाटायचे की ही एक शाब्दिक क्रिया असते. शब्दशः आणि तत्थ्यात्मक तपशीलांच्या आधारावर मनात हे आणले जाते, तेव्हा मला हे ठाऊक नव्हते की इतर सगळे प्रत्यक्ष चित्र मनासमोर आणतात. ज्या दिवशी मला हे कळले की तसे नाही. आपल्याला मनातला डोळाच नाही, आपण मनात चित्र पाहू शकत नाही तेव्हा माझी विश्वसंकल्पना[१] अमुलाग्र बदलली.

आपण जगत असलेले शब्द आणि संकल्पना अश्या एका क्षणात जेव्हा बदलुन जातात तेव्हा आपण एकदम कोसळतो. असे वाटायला लागते की आता पर्यंत आपण जे काही जगलो ते खोटे होते, आपले आतापर्यंतचे आयुष्यच एक असत्य होते, आणि आपल्याला जे जग दिसते आहे (गम्मत आहे की हे शब्द पण माझ्या आयुष्यात शब्दच आहेत चित्र नाहीत हे मला आता माहिताय) ते तसे नाहीच. किंबहुना इतरांचा अनुभव याहून फारच वेगळा आहे तेव्हा तो धक्का पचवायला वेळ द्यावा लागतो.

एकदा तसा वेळ मिळाला आणि आपण सुरवातीच्या धक्यातून सावरलो की मग खरी शोधाशोध सुरू होते. हे काय आहे, असे अजून कुणी आहे का? सध्याच्या आंतरजालीय साधनांमुळे हे सोपे झाले आहे त्यामुळे आपल्यासारख्याच स्थितीत असणाऱ्या लोकांचे गट आणि लिखाण शोधता येते. त्यांचे अनुभव वाचून आपल्या अनुभवांशी पडताळता येतात. त्यातूनच आपल्या सारख्याच अवस्थेत असणारे लोक कसे जगतात, त्यांचे जगण्याचे शोधलेले कोणते ठोकताळे आहेत असे सगळे शोधून काढता येते आणि मग एक नवा जन्म सुरू होतो.

मी काय म्हणतोय हे अजूनही नक्की समजले नाही असे वाटत असेल तर मेंदूभिन्नतेची जागरूकता प्रसार करणारे अफॅंटॅसिया असलेल्या लोकांचे एक संकेत स्थळ आहे जिथे एक उपयुक्त पान आहे https://aphantasia.com/guide/ जे अधिक माहितीसाठी वाचता येईल.

जसे आधीच्या काळात डाव्या हाताने लिहिणाऱ्यांना छळले जायचे, ते चूक आहे किंवा पाप आहे इतके पण टोक गाठले जायचे पण आता आपण डावखोऱ्या लोकांना मेंदूभिन्नतेचा एक भाग समजून स्वीकारतो. तसेच अनेक न दिसणाऱ्या भिन्नता असतात हे पण आपण आता समजून घेतले पाहिजे. अशी भिन्नता एक दोष नसून फक्त भिन्नता म्हणजे जगण्याची एक वेगळी पद्धत तऱ्या इतकेच समजणे आवश्यक आहे.

मला ही गोष्ट कळल्यावर माझ्या आयुष्यातली कितीतरी कोडी सुटत गेली. जसे मला माईंड मॅप पद्धत कधी वापरता आली नाही, ते का हे मला समजले. आपली पाठ करायची आणि लक्षात ठेवायची पद्धत वेगळी आहे हे समजले. इतरांचे ठोकताळे किंवा पद्धती मला जश्याच्या तश्या वापरता का येत नाहीत हे समजले. आपल्या वेगळ्या पद्धती समजून घेता आल्या.

मला मनात चित्र दिसत नाहीत पण मी चित्रकार आहे, मी कवी आहे, मी कथाकार आहे त्यामुळे या भिन्नतेमुळे माझ्या कल्पनाशक्ती मधे काही कमतरता नाही. मी नव्या कल्पना नवे विचार मांडू शकतो आणि लिहू शकतो त्यात भिन्नता इतकीच आहे की ते मला चित्ररूप दिसत नाही तर शाब्दिक, भावनिक आणि सैद्धांतिक पातळीवर मांडता येते.

असेही काही लोक असतात ही माहिती सगळ्यांना असणे आवश्यक यासाठी आहे कारण तुमच्या घरात ओळखीत आणि आसपास असे काही व्यक्ती हमखास असू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवतांना हे समजून घेतले पाहिजे की काही विद्यार्थी चित्रांच्या आधारे का शिकू शकत नाहीयेत, त्यांना लिखित उतारे अधिक लवकर लक्षात येतात.

मला विडियो किंवा चित्रमय माध्यमांपेक्षा लिखित आणि शाब्दिक माध्यमांमधून माहिती अधिक पटकन आत्मसात करता येते. साधारण[३] सगळ्यांना चित्रमय पद्धतीने अधिक चांगले शिकता येते ही समज त्यामुळे तितकी बरोबर नाही हे माझी स्थिती समजली की लक्षात येते.

#सुरपाखरू

(अफॅंटेसिक)
तुषार
नागपूर, शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५

[१] विश्वसंकल्पना – वर्ल्ड व्ह्यू
[२] मेंदूभिन्नता - न्यूरोडायवर्जन्स
[३] साधारण – नॉर्मल, टिपिकल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दृश्यम चित्रपटाच्या बेसिक संकल्पनेलाच सुरुंग लावलात Happy

प्रत्येकाची शब्द किंवा चित्र मेमरी एकसारखी नसते, कोणाला शब्द चांगले लक्षात राहतात तर कोणाला चित्रे याची कल्पना होती.. पण ते कमी जास्त प्रमाणात असे वाटायचे.
चित्रे मनात तयारच होत नाही हे इतके टोकाचे असू शकते काही जणांबाबत याची बिलकुल कल्पना नव्हती.
छान आणि नवीन माहिती मिळाली.

आपल्या आसपास असा एखादा मुलगा असेल ज्याला आपल्या मदतीची गरज असेल तर तो शोधायचा कसा? त्याच्याबाबत हेच घडतेय हे पडताळायचे कसे? आणि त्याची मदत करायची कशी?

मला अ‍ॅफँटसिआ आहे हे आत्ताच हे वाचुन कळले. धक्का वगैरे बसला नाही Happy कारण मला डोळे बंद केल्यावर ज्ञानचक्षुंपुढे काहीही दिसत नाही हे माहित होतेच. त्याला आज नाव मिळाले. हा त्रास बर्‍याच जणांना आहे हे ऐकुन बरे केवळ ह्यासाठी वाटले की आपण एकटे नाही हे कळले. असेच बरे मला तेव्हा वाटले होते जेव्हा कळले की उजवा व डावा चटकन लक्षात न येणारे माझ्यासारखे खुपजण आहेत Happy हेही म्हणे मेंदुत काहीतरी मिसिण्ग असल्यामुळे होते.

This is new to me ! Thank you for making me aware of this.

Being left-handed person born in wrong time and wrong country, could relate to few things you talked about; especially the acceptance and adoptability.

हे माहिती नव्हतं.

मी दृश्यकल्पना करू शकते, मात्र
काही विद्यार्थी चित्रांच्या आधारे का शिकू शकत नाहीयेत, त्यांना लिखित उतारे अधिक लवकर लक्षात येतात. >>> यावरून आठवलं, की मी पारंपरिक लिखित पुस्तकांइतकी ग्राफिक/ऑडिओ पुस्तकं तितकी एन्जॉय करू शकत नाही.

अ‍ॅफँटसिआ ही संकल्पना पहिल्यांदाच कळली. ज्यांना हे आहे त्यांना मुळात इतरांना चित्रे दिसतात हे कळायला वेळच लागत असावा.

डावा उजवा ह्या बाबत तर माझा अजूनही गोंधळ होतो. केसांच्या वळणावरून लक्षात ठेवते आता.
ह्याच विषयावर मी 'उजवा हात ' ही कथाही (मायबोलीवर )लिहिली आहे.

यावरून आठवलं, की मी पारंपरिक लिखित पुस्तकांइतकी ग्राफिक/ऑडिओ पुस्तकं तितकी एन्जॉय करू शकत नाही.>>>

सेम हिअर.. मला तर किंडलही जमत नाही. ऑफिसातुन भेट म्हणुन मिळालेय ते तसेच पडुन आहे.

अफॅंटासिया प्रकार पहिल्यांदा कळला.
मला नाही. पण एक गोष्ट मला खटकत आलेली. कुणा व्यक्तीच्या वर्णनावरून चित्र काढतात. तर मला नेहमीच असे वाटत आले की असे कसे करू शकतात. उद्या मला कोणी गुन्हेगार दिसला आणि मग मला पोलीसांनी सांगितले त्याचे वर्णन कर आमचा एक्प्सपर्ट त्याचे चित्र काढेल तर मला अजिबात जमणार नाही. मला त्याचा चेहरा मनात पूर्ण दिसेल. अगदी ठळक काही असेल जसे खूप मोठे किंवा खूप छोटे नाक वगैरे सांगता येईल, पण बाकी काही नाही.
तसेच दागिने वगैरे ओळखणे तर अजिबात जमत नाही. घरात चोरी झाली आणि चोर सापडला, मला बोलावले दागिने किंवा इतर वस्तु, टीव्ही सुद्धा ओळखायला. तर मी आमचा असेलही नसेलही असेच सांगेन, खात्रीलायक नाही सांगु शकणार.
हा पार्शल अफॅन्टासिया किंवा तत्सम कुठला प्रकार असु शकेल का?

@मानव, Aphantasia आणि बरेचसे मेंदूभिन्नता क्षेत्रात येणाऱ्या स्थिती या spectrum असतात, त्यामुळे तुम्ही त्या रेषेत मधे कुठेतरी असू शकता.

मी सगळ्यांचे फोटो फोन मधे का गोळा करतो ते मला हे समजल्यावर कळले. मी फोटो पाहून चित्र काढू शकतो हे कळल्यावर मला त्याचा अहो आनंद झाला होता पण चेहऱ्यांचे चित्र काढायची प्रेरणा कदाचित ते चेहरे मनात दिसत नाहीत ही अधिक असावी हे नंतर कळले.

या स्थितीचा एक फायदा असा की मला जुने चांगले किंवा वाईट काहीच डोळ्यांसमोर दिसत नाही त्यामुळे PTSD हा प्रकार मला कमी त्रास देतो. जेवताना शी शू च्या गोष्टी केल्या की घरातल्या इतरांना इतका का त्रास होतो ते मला आता कळले, मला दिसत नाही पण बोललेले इतर लोक प्रत्यक्ष डोळ्यांसमोर अनुभवतात हे कळल्यावर.

अजून एक ही स्थिती चित्र, स्पर्ष, स्वर/ध्वनी (डोक्यात गाणे वाजत राहणे), वास या सगळ्या संदर्भात आढळते, जसे मी multimodal aphant आहे म्हणजे मला चित्र, स्वर, स्पर्ष, गंध काहीच पुन्हा मनात आणता येत नाही, पुन्हा जगता येत नाही.

अ‍ॅफँटसिआ असे काही असते हे नव्यानेच कळले, मला ही हे आहे हे.
मला डोळे बंद केल्यावर ज्ञानचक्षुंपुढे काहीही दिसत नाही हे माहित होतेच. त्याला आज नाव मिळाले. हा त्रास बर्‍याच जणांना आहे हे ऐकुन बरे केवळ ह्यासाठी वाटले की आपण एकटे नाही हे कळले. >> +११११

या spectrum असतात, त्यामुळे तुम्ही त्या रेषेत मधे कुठेतरी असू शकता.>> हो, तसेच असावे.

अजून एक ही स्थिती चित्र, स्पर्ष, स्वर/ध्वनी (डोक्यात गाणे वाजत राहणे), वास या सगळ्या संदर्भात आढळते, जसे मी multimodal aphant आहे म्हणजे मला चित्र, स्वर, स्पर्ष, गंध काहीच पुन्हा मनात आणता येत नाही, पुन्हा जगता येत नाही.>>> किती विचित्र आहे हे सगळं..

मेंदूभिन्नता क्षेत्रात येणाऱ्या स्थिती या spectrum असतात, त्यामुळे तुम्ही त्या रेषेत मधे कुठेतरी असू शकता>>> मला वाटतं‌ मी या स्पेक्ट्रम च्या अगदी विरुद्ध टोकाला असेन....शब्द समजत नाही असे नाही पण प्रतिमा/दृष्ये कधीच पुसली जात नाहीत (ट्रॉमॅटीक इनसिडंस याबाबतीत फार छळतात)......म्हणजे रणरणत्या दुपारी ऑफिसच्या कॉरिडोरच्या उंच काचेतून पलीकडच्या रस्त्यावरचं गोंगाट करणारं ट्राफिक पुसून त्याजागी लांबवर पसरलेली शुभ्र पुळण आणि पुढे क्षितीजापर्यंतचा निळाशार समुद्र त्याच्या खाऱ्या वासासकट मी कित्येकदा कल्पनेत भान हरपून अनुभवला आहे.....कधी मधी असाही विचार मनात चमकून जातो की मला चुकूनमाकून वेड लागलं तर काय भयानक तिव्रतेचे हॅलुसिनेशन्स मला होतील.....सगळचं विचित्र!!!
खरचं आज काहीतरी नवीन कळलं.

@तुषार A for Apple हे घोकून पाठ होऊ शकते पण फक्त Apple without context of A अगदी सुरुवातीला पुन्हा चित्र पाहिल्यावर रीकॉल कसे होते?? याबाबत काही माहीती आहे का?? की त्याची त्रिमीतीय रचना त्यासोबत सलग्न होऊन ते रीकॉल होते?

लहानपणी कधी दोन वेगवेगळ्या वस्तूंत आकारातील (शेप) साधर्म्या मुळे ओळखण्यात गल्लत झाल्याचे आठवणीत आहे का??

इटरेस्टिंग! याची माहिती नव्हती.
मला मल्टीमोडल मेमरी आहे तर. मला दृश्यं, चवी, पोत, ध्वनी, गंध हे सगळं आठवतं.

@स्वाती_आंबोळे, तुम्ही म्हणता तशी स्मृती साधारणतः सगळ्यांची असत असावी असा अंदाज आहे, अफॅंटॅसिया स्पेक्ट्रम मधे फक्त चार टक्के लोक मोडतात.

मला कादंबऱ्यांमधले निसर्गाची वर्णने का आवडत नाहीत आणि मी ते पानेच्या पाने का सोडतो ते आता मला कळते. मला सूट्स सारखे संवाद प्रधान धारावाहिक का अधिक आवडतात हे पण कोडे यातून सुटले

@फार्स (काय बा किती मोठे ते नाव लिहिताना थकायला होते ना)
तुम्ही म्हणता त्या दुसऱ्या टोकाला हायपरफॅंटासिया म्हणतात. केऑस वाकिंग[१] नावाचा चित्रपट आला होता त्यात जसे काल्पनिक दिसणे दाखवले आहे तसेच इतरांना दिसत असावे असा मी अंदाज लावतो

Screenshot 2025-02-14 at 7.04.57 PM.png

[१] https://en.wikipedia.org/wiki/Chaos_Walking_(film)

इटरेस्टिंग! याची माहिती नव्हती.
मला मल्टीमोडल मेमरी आहे तर. मला दृश्यं, चवी, पोत, ध्वनी, गंध हे सगळं आठवतं.>>>+1 मलापण . चाळाच आहे म्हटलं तरी चालेल.
तुम्हाला व्हिज्युअल्स दिसत नाही हेही मी व्हिज्युअलाईज केलं.तसं "दिसत" नसलं तरीही तुम्ही कविता याचं करता कौतुक आहे त्या तर कित्येकदा "दिसणाऱ्या" व्यक्तिलाही जमत नाहीत .

> ऑन a सिरियस नोट, प्रेमभंगात हे वरदान करत असेल ना..
@ऋन्मेष, खरे आहे. मी जेव्हा विचार करत होतो की प्राकृतिक निवड प्रक्रिये[१] मध्ये ही जनुके का उरली आहेत आणि अजुनही असे लोक का टिकले आहेत, तेव्हा मला असे जाणवते की हा क्षत्रिय आणि सैनिक लोकांसाठी गुण म्हणून उपयोगी असावा. च्यायला काही दिसतच नाही पुन्हा समोर आणता येतच नाही त्यामुळे बेफिकिरी आपोआपच येते. PTSD सारखे त्रास कमी असतात.

पण यामुळे मी माझ्याच आयुष्यातले कितीतरी मोलाचे क्षण पण पुन्हा जगू शकत नाही हो. याउपर ही मेंदूभिन्नतेची भुते एकेकटी कधीच नसतात माझ्या राशीला अशी चार भुते आहेत त्यातले अफॅंटेसिया बरोबर SDAM पण माझ्या मानगुटीवर बसलेले आहेत त्याबद्दल पुन्हा कधी सविस्तर लिहेन

[१] नेचुरल सिलेक्शन

@सिमरन, माझी ही बाजू कळल्यावर माझ्या कविता कुणी पुन्हा वाचल्या तर त्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही की माझ्या कवितांमधे फार निसर्ग नाही, वर्णने नाहित, मानवी संवाद आणि भावनांचेच सगळे खेळ उमटलेले दिसतात.

माझ्या आई कवितेत मी लिहिलेले शब्द आता वाचले तर त्या प्रतिमा दृष्य नाहीत हे प्रकर्षाने जाणवेल.

माझी आई
.
मायेची गोड गोड
हाक माझी आई
छोटेसे गोल गोल
नाक माझी आई
.
गुरगुट्टा मऊ ताक
भात माझी आई
केसातून फिरणारा
हात माझी आई
.
तत्वांचे धारदार
टोक माझी आई
भीती घालवणारा
श्लोक माझी आई
.
तुष्की नागपुरी

तुषार,

एका दृष्टीने तुम्ही दुर्दैवी आहात व एका दृष्टीने सुदैवी! अर्थात, हा लेख व सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर हे मत बनवू शकलो आहे.

(या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल कोण जाणे) (सहज उत्सुकता वाटली, अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती माहीत आहेत असे नव्हे)

@फार्स,
अफॅंटॅसिया वर आता आता संशोधन सुरू झाले आहे, मी अश्या काही संशोधकांना माझी माहिती पुरवलेली आहे आणि बरेच लोकांचा गिनि पिग झालेलो आहे, आपल्या अश्या असण्याचा कुणाला तरी फायदा होतोय याचे तरी समाधान मिळते.

मला गणित, तर्क, सृजनशील आणि चौकटीबाहेर जाऊन विचार करणे अश्या कामात अधिक गती आहे, मी कदाचित इतरांच्या सारखा चित्रांमधे गुंतून पडू न शकल्याने मला काही वेगळी दालने खुली होतात असे दिसते.

@साधना,

मी हा लेख लिहिला तेव्हाच मायबोलीवर माझ्यासारखे काही सापडतीलच असा अंदाज होताच.
वेलकम टू द क्लब!

मी दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन अधिक माहिती नक्की घ्या आणि घरच्यांनाही वाचायला सांगा, बरीच जुनी कोडी सुटतील आणि रहस्ये उकलतील.

@बेफ़िकीर,
मला जेव्हा प्रथम हे कळले तेव्हा तर मी उद्ध्वस्त झालेलो काही दिवस. आपल्याला एक अवयवच नाही आणि इतर सगळे मजा करताहेत ही जाणीव पोखरून टाकत होती मनाला. मग सपोर्ट गट शोधून काढले इतरांचे अनुभव वाचले आणि कालांतराने सावरलो तेव्हा तुम्ही लिहिले तेच वाक्य बोललो स्वतःला.

हा शाप आहे आणि वरदान देखील आहे.

>>> SDAM
मी कधीतरी गमतीने म्हणत असे की good health and bad memory is the key to happy old age. पण आता असं म्हणताना अडखळेन.

तुम्ही म्हणता त्या दुसऱ्या टोकाला हायपरफॅंटासिया म्हणतात.>>> हे आता नक्कीच शोधायला हवं......केमिकल लोचा Biggrin

मी कदाचित इतरांच्या सारखा चित्रांमधे गुंतून पडू न शकल्याने मला काही वेगळी दालने खुली होतात असे दिसते.>>>> निसर्गात प्रत्येक गोष्टीचा काहीतरी ट्रेडऑफ असतोच. 👍

मला माझ्या बाबतीत एक चमत्कारिक गोष्ट फार कमी वेळा पण जाणवली, ती म्हणजे मी स्वप्नात जेव्हा केव्हा कोणत्याही प्रकारचा गंध अनुभव करतो जर त्याच वेळी दचकून माझी झोप तुटली तर जागृत अवस्थेत काही क्षण मला त्या गंधाची जाणिव होत रहाते.....जसं एखाद्या जंगलाला /घराला आग लागली आहे अस स्वप्न पडलं आणि त्यातून दचकून जागा झालो तर आजूबाजूला सर्व आलबेल आहे हे मला व्हिजुअली समजते पण आगीच्या/धूराच्या गंधाची संवेदना काही क्षण तशीच रहाते.

अय्या म्हणजे मीच स्पेशल (४ %) आहे होय! मला वाटायचे ज्यांना असे कल्पनाचित्र मनात रंगविता येते ते दुर्मीळ गिफ्टेड लोक असतात, बहुसंख्य माझ्यासारखे सामान्य असणार. :-ड म्हणूनच मानसपूजा मला कधी झेपत नाही.
हा लेख लिहील्याबद्दल धन्यवाद, तुमचे सगळेच लेख छान आहेत.

मला कादंबऱ्यांमधले निसर्गाची वर्णने का आवडत नाहीत आणि मी ते पानेच्या पाने का सोडतो ते आता मला कळते.>> असं मी नावांच्या बाबतीत करते. मला नावं लक्षात रहात नाही म्हणून मी वाचतांना गाळते नावं सरळ सरळ.

तसेच चेहरेही लक्षात रहात नाही मला . त्यामुळे नवऱ्याला सांगितलं होतं, रस्त्यात कुणी भेटलं की मला 'ह्यांना ओळखलं का?' म्हणून विचारायचं नाही. सरळ सांगायचं कोण ते. एरवी मी अंदाज घेत बोलते लोकांशी. बोलता बोलता ओळख पटते.

तसंच अगदी रोज भेटणारी व्यक्ती वेगळ्या ठिकाणी दिसली तरी मी ओळखत नाही त्या व्यक्तीला.

Pages