ढाबा स्टाइल पालक भाजी

Submitted by maitreyee on 9 February, 2025 - 23:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिरलेला पालक - ३-४ वाट्या, कोथिंबीर पाउण ते एक वाटी, कांदा १ मध्यम , लसूण १२-१५ पाकळ्या, आले १ इन्च, हिरव्या मिरच्या ३-४, धणे १ टे.स्पून, हरभरा डाळ किंवा पंढरपुरी डाळे ४ चमचे, शेंगदाणे ४ चमचे, लाल मिरच्या २-३.

क्रमवार पाककृती: 

आमच्याकडे पालक सगळ्यांचा आवडता. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे पालक आठवड्यातून एकदा तरी होतोच. ही रेसिपी मला एकदा इन्स्टा रील्स मधे दिसली, आवडली आणि जशी लक्षात राहिली त्याप्रमाणे लगेच करून पाहिली. तेव्हापासून बर्‍याचदा केली जाते.
ही रेसिपी अगदी पाहुण्यांना काहीतरी खास म्हणून, पॉटलक ला किंवा वीकेन्ड ला काहीतरी स्पेशल हवे असेल तेव्हा करावी इतकी मस्त आणि तरीही झटपट होणारी आहे.
या भाजीला पालक आणि कोथिंबिरीची मिश्र चव येते ती फार मस्त लागते. अशीच पालक + मेथी किंवा नुस्ता पालक वापरून पण करता येईल.
मसाला - प्रथम अगदी थोड्या तेलावर हरभरा डाळ खमंग भाजून घ्या, ती नसल्यास डाळे घेतले तर ते किंचित परतून घ्या. ( डाळे वापरल्यास जास्त परतावे लागत नाही) , त्यानंतर धणे , लाल मिरच्या भाजून घ्या. शेंगदाणे भाजून साले काढून घ्या. हे सगळे मिक्सर मधून काढून पावडर करून घ्या.
या रेसिपी मधे लसूण बराच वापरलेला आहे, तो कमी करू नका. देअर इज नो सच थिंग अ‍ॅज टू मच गार्लिक. Happy
त्यातल्या ५-६ पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आले याची एक पेस्ट करून घ्या. ही सेपरेट ठेवा किंवा वरच्या मसाला पावडरी मधेच हे जिन्नस मिक्स करून एकच पेस्ट तयार केली तरी चालेल. उरलेला लसूण ( ८-१० पाकळ्या) किंचित ठेचून वेगळा ठेवा.
कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडू द्या. त्यात हा ठेचलेला लसूण घालून तो जरा लाल होऊ देत. मग बारीक चिरलेला कांदा घालून परता. तो थोडा मऊ झाला की त्यात पालक आणि कोथिंबीर घालून थोडे परता. ते जरासे शिजले की हळद, आधी तयार केलेली पेस्ट आणि मसाला घालून नीट हलवा आणि एखादे मिनिट शिजू द्या. मग थोडेच गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करा. मीठ, गरज पडल्यास तिखट, हवी तर चिमूट भर साखर घाला. मी घालत नाही. भाजी तयार! ही नान सोबत किंवा भातासोबत पण छान लागते. भाजीतले तळलेल्या लसणाचे तुकडे जबरा लागतात!!
palak4.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी भरपूर होईल
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

केवळ मैत्रेयी ने लिहीली आहे म्हणून मी हि रेसिपी करून बघीन.तिच्या पद्धतीने केलेली गवारीची भाजी हिट आहे आमच्या कडे.
. भाजीतले तळलेल्या लसणाचे तुकडे जबरा लागतात!!>>>आमच्या कडे अशी लसूण चिरुन तेलात तळून वरून घेतात काही काही भाज्यांमधे, तसा पण चांगला लागेल का?

धनुडी Happy थॅन्क्यू.
केया- लाल मिरच्या हिरव्या मिरच्या दोन्ही घालायचे. तुम्हाला शंका वाटली तर कमी घाला. पालक आणि कोथिंबीर चिरुन च घ्यायची. पेस्ट नाही. फोटो मधे कन्सिस्टन्सी दिसेल, साधारण पिठल्याइतकी घट्ट , लिक्विड नाही.
अरे सॉरी फोटो दिसत नव्हता, आत्ता पुन्हा टाकला आहे.

मै, फोटो दिसत नाहीये. लसूण आणि मिरच्या मलाही जरा जास्त वाटल्या पण तू म्हणतेस तर लसूण तेवढाच ठेवून मिरच्या अ‍ॅडजस्ट करेन. पण नक्की करुन बघणार.

>>> देअर इज नो सच थिंग अ‍ॅज टू मच गार्लिक
सत्यवचन!
करणार म्हणजे काय, करणारच - आणि खाताना शिवाय वरून लसणीचं तेल घालून घेणार चवीसाठी.

छल्ला - मसाला पावडर मुळे भाजी छान मिळून येते. मी तरी बारीक वाटते. हळद जळता कामा नये इतके पहा, जरा जरी जळली तर खराब लागेल चव. मसाला पावडर वाटताना घातली तरी चालेल किंवा पालक कोथिंबीर घालतानाच हळद पण घाला.
डाळ- दाणे - धणे पावडर थोडी जास्त करून मग भाजी करताना हवी ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी ती लागेल तेवढी घाला असे केले तरी चालेल. मी पहिल्यांदा केली तेव्हा तसे केले होते.

मी ही भाजी करुन पाहिली हे ही विसरले आणि इथे लिहायलाही विसरले. मै च्या रेसिपीत मसाला आहे तो माझा जरा जास्तच झाला भाजीत त्यामुळे तिच्या भाजीसारखी कन्सिस्टन्सी दिसली नाही. गोळा भाजी टाईप झाली. पण चव चांगली होती. पुढच्या वेळी मसाला जास्त होणार नाही हे बघेन.

गोळा भाजी झाली असेल तर उलट ती पावडर कमी झाली असे असेल का? थोडे पाणी घालून हवी ती कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करत येईल

१) ही आम्ही करतो. पण ढाबा स्टाईल म्हणजे उत्तर भारतातला का?

२) अळुच्या भाजीसारखीही करतो, अळुच्या पानांऐवजी पालक किंवा चवळी घालून.

३) बटाट्याचे लांब तुकडे तळून शेवटी घातल्यास चांगले लागतात.

मी पण करून बघितली. आवडली. नेहमीच्या मुगाची डाळ घालून केलेल्या भाजीपेक्षा वेगळी.
मी एक हिरवी मिरची आणि एक सुकी लाल मिरची घेतली , धणे थोडे जास्त झाले. नुसता मसाला चाटून पाहिला तर झणझणीत लागला मग भाजीत लाल तिखट घातले नाही. आणि हा मसाला जरा जपून घातला. बाकीचा फ्रीजमध्ये ठेवला.
दुसऱ्या दिवशी कोफ्ता करी केली होती. जिर्याच्या फोडणीवर कांदा टोमॅटो परतून हा मसाला घातला फक्त. मस्त झाली करी.
आता उरलेला मसाला उग्गानीमध्ये वापरेन. हाय काय आणि नाय काय Happy

मी पण करून पाहिली. फोटो विसरले काढायला. छान लागली नेहेमीपेक्षा वेगळी चव आवडली. थँक्यू फॉर रेसिपी.
जरा वेरिएशन झालं कारण माझ्याकडे अगदी थोडी मेथी राहिलेली ती वापरायचीच होती ती घातली आणि डाळं, लाल मिरची तेलावर परतताना १ कांदा पण उभा चिरून त्यातच परतला आणि मग पेस्ट केली. चांगली दाट झाली भाजी. वरून चरचरीत लसूण फोडणी.

माझं काहीतरी चुकलं असावं. चव छान आली होती पण खाताना आपण सेल्युलोज खातोय याची जाणिव होण्याइतपत भाजी तोंडात घोळत होती (हे असे चवळईची भाजी खाताना नेहमी वाटते मला)

भाजी मस्त झाली एकदम. बरोबर ज्वारीची भाकरी केली. सकाळी ताजी भाजी भाकरीबरोबर खाल्ली आणि दुसरे दिवशी पहिल्या वाफेच्या इंद्रायणी भातासोबत. एक दिवस मोकळ भाजणी, पुढचे दोन दिवस ही भाजी असे बेत झाल्यावर सुडोमि मोमेन्ट एकदम.

मला ताकातला पालक आवडत नाही हे त्या निमित्तानं ( हे ऐकण्यात काळ्या कुत्र्याला इंटरेस्ट नसला तरी सुद्धा) पुन्हा एकदा सांगून घेतेय.

8b861584-5f1a-433a-be18-ab7e7a864759.JPG

वा मस्त फोटो Happy
माधव- कदाचित पालक आणि कोथिंबीर घातल्यावर परतले गेले नसेल. खर तर थोडे परतले तरी चटकन शिजते भाजी.

पालकाची भाजी त्यातल्या मसाल्यामुळे खमंग आणि मस्त चमचमीत झाली एकदम ढाबा स्टाइल .मी डाळवं घातली होती मसाल्यात आणि तंतोतंत रेसिपीने केली जरा घट्टच छान लागते मी मोजून दोन वाट्या पाणी घातलं होतं .भाकरीबरोबर भारीच लागते .
मी नेहमीची डाळ पालक पातळ भाजी खाल्ली आहे त्यापेक्षा नक्किच वेगळी लागते कदाचित कोथिंबीरीमुळे

.IMG_20250224_095841.jpg

Pages