ढाबा स्टाइल पालक भाजी

Submitted by maitreyee on 9 February, 2025 - 23:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिरलेला पालक - ३-४ वाट्या, कोथिंबीर पाउण ते एक वाटी, कांदा १ मध्यम , लसूण १२-१५ पाकळ्या, आले १ इन्च, हिरव्या मिरच्या ३-४, धणे १ टे.स्पून, हरभरा डाळ किंवा पंढरपुरी डाळे ३-४ चमचे, शेंगदाणे ३-४ चमचे, लाल मिरच्या २-३.

क्रमवार पाककृती: 

आमच्याकडे पालक सगळ्यांचा आवडता. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे पालक आठवड्यातून एकदा तरी होतोच. ही रेसिपी मला एकदा इन्स्टा रील्स मधे दिसली, आवडली आणि जशी लक्षात राहिली त्याप्रमाणे लगेच करून पाहिली. तेव्हापासून बर्‍याचदा केली जाते.
ही रेसिपी अगदी पाहुण्यांना काहीतरी खास म्हणून, पॉटलक ला किंवा वीकेन्ड ला काहीतरी स्पेशल हवे असेल तेव्हा करावी इतकी मस्त आणि तरीही झटपट होणारी आहे.
या भाजीला पालक आणि कोथिंबिरीची मिश्र चव येते ती फार मस्त लागते. अशीच पालक + मेथी किंवा नुस्ता पालक वापरून पण करता येईल.
मसाला - प्रथम अगदी थोड्या तेलावर हरभरा डाळ खमंग भाजून घ्या, ती नसल्यास डाळे घेतले तर ते किंचित परतून घ्या. ( डाळे वापरल्यास जास्त परतावे लागत नाही) , त्यानंतर धणे , लाल मिरच्या भाजून घ्या. शेंगदाणे भाजून साले काढून घ्या. हे सगळे मिक्सर मधून काढून पावडर करून घ्या.
या रेसिपी मधे लसूण बराच वापरलेला आहे, तो कमी करू नका. देअर इज नो सच थिंग अ‍ॅज टू मच गार्लिक. Happy
त्यातल्या ५-६ पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आले याची एक पेस्ट करून घ्या. ही सेपरेट ठेवा किंवा वरच्या मसाला पावडरी मधेच हे जिन्नस मिक्स करून एकच पेस्ट तयार केली तरी चालेल. उरलेला लसूण ( ८-१० पाकळ्या) किंचित ठेचून वेगळा ठेवा.
कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडू द्या. त्यात हा ठेचलेला लसूण घालून तो जरा लाल होऊ देत. मग बारीक चिरलेला कांदा घालून परता. तो थोडा मऊ झाला की त्यात पालक आणि कोथिंबीर घालून थोडे परता. ते जरासे शिजले की हळद, आधी तयार केलेली पेस्ट आणि मसाला घालून नीट हलवा आणि एखादे मिनिट शिजू द्या. मग थोडेच गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करा. मीठ, गरज पडल्यास तिखट, हवी तर चिमूट भर साखर घाला. मी घालत नाही. भाजी तयार! ही नान सोबत किंवा भातासोबत पण छान लागते. भाजीतले तळलेल्या लसणाचे तुकडे जबरा लागतात!!
palak4.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी भरपूर होईल
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

केवळ मैत्रेयी ने लिहीली आहे म्हणून मी हि रेसिपी करून बघीन.तिच्या पद्धतीने केलेली गवारीची भाजी हिट आहे आमच्या कडे.
. भाजीतले तळलेल्या लसणाचे तुकडे जबरा लागतात!!>>>आमच्या कडे अशी लसूण चिरुन तेलात तळून वरून घेतात काही काही भाज्यांमधे, तसा पण चांगला लागेल का?

धनुडी Happy थॅन्क्यू.
केया- लाल मिरच्या हिरव्या मिरच्या दोन्ही घालायचे. तुम्हाला शंका वाटली तर कमी घाला. पालक आणि कोथिंबीर चिरुन च घ्यायची. पेस्ट नाही. फोटो मधे कन्सिस्टन्सी दिसेल, साधारण पिठल्याइतकी घट्ट , लिक्विड नाही.
अरे सॉरी फोटो दिसत नव्हता, आत्ता पुन्हा टाकला आहे.

मै, फोटो दिसत नाहीये. लसूण आणि मिरच्या मलाही जरा जास्त वाटल्या पण तू म्हणतेस तर लसूण तेवढाच ठेवून मिरच्या अ‍ॅडजस्ट करेन. पण नक्की करुन बघणार.

>>> देअर इज नो सच थिंग अ‍ॅज टू मच गार्लिक
सत्यवचन!
करणार म्हणजे काय, करणारच - आणि खाताना शिवाय वरून लसणीचं तेल घालून घेणार चवीसाठी.

छल्ला - मसाला पावडर मुळे भाजी छान मिळून येते. मी तरी बारीक वाटते. हळद जळता कामा नये इतके पहा, जरा जरी जळली तर खराब लागेल चव. मसाला पावडर वाटताना घातली तरी चालेल किंवा पालक कोथिंबीर घालतानाच हळद पण घाला.
डाळ- दाणे - धणे पावडर थोडी जास्त करून मग भाजी करताना हवी ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी ती लागेल तेवढी घाला असे केले तरी चालेल. मी पहिल्यांदा केली तेव्हा तसे केले होते.