इथे या फेस्टिव्हलसंबंधी थोडी माहिती/अनुभव शेअर करत आहे.
एक डिस्क्लेमर म्हणजे, ही माहिती वैयक्तिक अनुभवावर आधारलेली असल्याने सगळ्यांना लागू पडेलच, असं नाही.
यासंबंधी आणखी कुणी जाणकार असतील तर यामध्ये भर घालू शकतील, किंवा सुधारणा करू शकतील.
१. यंदा हा फेस्टिवल १३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आहे. कॅंपातील आयनॉक्समध्ये, सेनापती बापट रोडवरच्या पीव्हीआर पॅव्हेलियनमध्ये आणि औंधमधल्या सिनेपोलिसमध्ये हा फेस्टिवल होणार आहे.
यात असं असतं की रजिस्ट्रेशन करायचं, ज्याची फीज आठशे रूपये आहे. आणि वरीलपैकी एके ठिकाणी जायचं. तिथं थिएटरच्या तिकीट खिडकीजवळ त्यांचे व्हॉलंटियर्स असतात. त्यांना वयाचा पुरावा म्हणून आपलं एखादं शासनमान्य ओळखपत्र दाखवायचं.
मग ते आपल्याला डेलिगेट पास देतात. या पासवर आपण वरीलपैकी कोणत्याही थिएटरमध्ये महोत्सवादरम्यान दाखवले जाणारे कोणतेही सिनेमे बघू शकतो. हे सिनेमे मागच्या वर्षभरात (२०२४ मध्ये) जगभरात प्रदर्शित झालेले, पुरस्कार विजेते किंवा जगात कुठे कुठे फेस्टीवलमध्ये निवडले गेलेले सिनेमे असतात.
२. शिवाय एक देखणं, गुळगुळीत छपाई असलेलं कॅटलॉग देतात. त्यामध्ये महोत्सवातील प्रत्येक सिनेमाची संक्षिप्त ओळख असते. तसेच तो सिनेमा कोणत्या थिएटरमध्ये कोणत्या स्क्रीनवर किती वाजता दाखवला जाणार आहे, याचे डिटेल्स असतात. कॅटलॉग चाळून आपण प्लॅन करू शकतो की कोणत्या दिवशी कोणत्या थिएटरमध्ये जाऊन कोणते कोणते सिनेमे बघायचे ते.
म्हणजे समजा आपण एके दिवशी पीव्हीआर पॅव्हेलियनला सकाळी दहा वाजता गेलो. तर तिथं समजा सहा स्क्रीन्स आहेत. प्रत्येक स्क्रीनवर संपूर्ण दिवसभरात चार सिनेमे शेड्युल्ड असतात. (उदाहरणार्थ १० ते १२, १ ते ३, ३ ते ५, आणि ५ ते ७ वगैरे)
म्हणजे सहा स्क्रीन्सवर मिळून साधारण चोवीस वेगवेगळे सिनेमे दिवसभरात पॅरलली चालू असतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे सिनेमे. असं सात दिवसांचं शेड्युल असतं.
३. होतं असं की कोणते सिनेमे बघायचे याची निवड करणं अवघड जातं. म्हणजे सलग बघत बसलो तरी एका दिवसात आपण मॅक्सिमम चारच सिनेमे बघू शकतो. इतर सिनेमे सोडूनच द्यावे लागतात. कारण आपण एका वेळी सहा वेगवेगळ्या स्क्रीन्सपुढे जाऊन बसू शकत नाही.
गेल्या वर्षी मी यात पंधरा सोळा सिनेमे पाहिले असतील. (म्हणजे, पैशांच्या हिशोबाने आठशे रूपयांत अंदाजे चार हजारांचे सिनेमे बघितले असतील.) मग दमछाक बऱ्यापैकी होते. म्हणजे हावरटासारखा एक शो सुटला की लगेच धावतपळत दुसऱ्या स्क्रीनकडे जात होतो. काय काय बघायचं, असं होतं!
४. वीकडेजच्या तुलनेत वीकेंडला जरा जास्त गर्दी असते. किंवा मग दिवसभर कामं वगैरे उरकून संध्याकाळच्या शो ला येणारेही असतात.
एरव्ही Film institute चे विद्यार्थी, नाटकवाले, सिनेपत्रकार तसेच सिनेमाप्रेमी लोक बऱ्यापैकी संख्येनं असतात. तर तेही त्यांचं त्यांचं नियोजन करून आलेले असतात. तर मग विशिष्ट शो च्या आधी ज्या स्क्रीनच्या बाहेर गर्दी जास्त असते, तो सिनेमा त्या विशिष्ट टायमिंगमधला सगळ्यात उत्तम सिनेमा असण्याची शक्यता जास्त असते.
अर्थात, आपणही कॅटलॉग बघून, थोडंफार गुगल करून, ट्रेलर्स बघून, रेटींग बघून अंदाज घेऊ शकतो की यापैकी कोणते सिनेमे आपल्या वृत्तीला सूट होतील. भले मग त्या सिनेमासाठी विशेष गर्दी नसली तरीही!
५. सिनेमे क्लासिक असतात, इतरत्र सहसा बघायला मिळत नाहीत. समकालातले, जगभरातील वेगवेगळ्या भाषांतले, संस्कृतींतले, वैविध्यपूर्ण विषयांना हाताळणारे, असे चांगल्या दिग्दर्शकांचे सिनेमे असतात. म्हणजे मलापण लै काय कळतं असं नाही. पण कॅटलॉग वगैरे बघून अंदाज घेता येतो की कुठल्या दिग्दर्शकांचा/सिनेमाचा बायोडाटा जास्त मजबूत असावा..!
बाकी सिनेमाची भाषा ही वैश्विक भाषा आहे. त्यामुळे पात्रांची भाषा, संस्कृती आपल्याला पूर्णपणे अपरिचित असलं तरीही अभिनयातून-कॅमेऱ्यातून बऱ्यापैकी आशय कळतो. शिवाय सबटायटल्स असतात. त्यामुळे सिनेमा अगदीच डोक्यावरून गेला, असं फार कमी वेळा होतं.
६. थिएटर्स, आसनव्यवस्था, साऊंड सिस्टीम, ॲकोस्टीक्स उत्तम असला की त्या स्मूथ अंधारात आपण पूर्ण विरघळून जातो. बाहेरची कटकट डोक्यातून निघून गेलेली असते. खुर्चीत शांतपणे बसून आपण वेगवेगळ्या दुनियांचे स्थिर प्रवासी झालेलो असतो.
एकाच दिवसात वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळ्या देशांतले चार सिनेमे बघून जेव्हा बाहेर रस्त्यावर पडतो तेव्हा आपण नक्की कुठे आहोत, आणि काळ कुठला चालूय याचा संभ्रम व्हायला लागतो. दिवसभर वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ झिरपलेला असतो डोक्यात. मेंदू ती गजबज प्रोसेस करण्यात गुंतलेला असतो. दिवसभरात काय काय अनुभवलेलं असतं, कशाकशातून गेलेलो असतो, तर मग स्वतःशीही बोलावंसं वाटत नाही. संध्याकाळी आपण अगदी मूक होऊन बाहेर पडतो, असाही अनुभव आहे.
७. बाकी, मोबाईल/ओटीटीवर बघण्यात आणि थिएटरमध्ये बघण्यात फरक पडतो. मोबाईलवर बघतेवेळी आजूबाजूला काही डिस्टर्ब करणारं आलं तर आपण मिलीसेकंदात मोबाईलवरून नजर हटवून या जगात परत येतो. म्हणजे आपण ह्या दोन जगांच्या संधिकालावरच चाचपडत असतो. अर्धे इकडचे, अर्धे तिकडचे, असं सावधपणे आणि काठाकाठानेच वावरत असतो. म्हणजे अशी एकदम डीप डाईव्ह नसते.
थिएटरमध्ये जरा वेगळं पडतं. चांगला अंधार असतो. तर सगळी ज्ञानेंद्रियं समोरच्या खेळामध्ये पूर्णपणे इनव्हॉल्व होऊन जातात. डुबून जातात. आपण एका झटक्यात बाहेर येऊ शकत नाही. त्या अनुभवासोबत रेंगाळत राहतो, किमान थोडा वेळ तरी.
शिवाय आणखी एक म्हणजे, अशा फेस्टिव्हलमध्ये आलेले लोकही नेहमीपेक्षा वेगळं वागतात. आपल्यामुळे कुणालाही कसलाही डिस्टर्ब होऊ नये, याची आपोआपच दक्षता घेतली जाते. चिप्सचा पॉपकॉर्नचा किंवा तत्सम चीडउत्पादक आवाज येत नाही. रडणाऱ्या लहान मुलांचे किंवा मोबाइलच्या रिंगटोनचे आवाजही नसतात.
बाकी, फेस्टिव्हलचं शेड्युल खालील लिंकवर पहायला मिळू शकेल :
https://piffindia.com/pdf/2025/schedule-for-23rd-piff.pdf
गेल्या वर्षीच्या
गेल्या वर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये पाहिलेल्या काही सिनेमांच्या नोंदी केल्या होत्या. या नोंदी कच्च्या आहेत, घाईगडबडीत केलेल्या होत्या तेव्हा. इथं का पोस्ट करतोय, माहित नाही.
१. सकाळी 'युरोपा'. एका रूथलेस बिझनेस वुमनची गोष्ट. युरोपा नावाची जगभर पसरलेली कंपनी. कंपनीच्या प्रोजेक्ट्स साठी जमिनी ताब्यात घेण्याची या बाईवर जबाबदारी. हिला कशाचं काय पडलेलं नाही. अत्यंत बेरकी कार्पोरेट स्त्री. चेहऱ्यावर मानवी भावना धारण करून वावरत असते. पण आतून कशाचं काही देणंघेणं नाही. या अशा रोबोटसदृश अतिमानवी बायका दिसणार इथून पुढच्या काळात. या भीतीदायक आहेत.
जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कुठल्यातरी टेन स्टार हॉटेलच्या लाऊंजमध्ये मोठी डील्स साईन होतात आणि तुमची वडिलार्जित जमीन परस्पर हडप केली जाते. त्यांच्यासोबत, त्यांच्यासाठी सगळ्या सरकारी यंत्रणा राबत असतात. एकेक करून सगळे फशी पडतात. फक्त तो एकटा शेतकरी नडत राहतो तिला शेवटपर्यंत..!
आधी ऑफर, मग घोळात घेणं, मग दमदाटी, मग कुटुंबाकडून इमोशनल आवाहनं. चार चार वेळा त्या शेतकऱ्याला पार खच्ची करून टाकलं. तो काय टिकणार एवढ्या अजस्त्र ताकदीपुढं.
२. दुपारी 'ब्लागाज् लेसन्स'. बल्गेरियन मूव्ही आहे. लोकसंख्या फारच विरळ दिसतेय या शहरात. त्यातली ती ब्लागा नावाची म्हातारी शिक्षिका. तिची एका स्कॅममध्ये आर्थिक फसवणूक झालेली असते. म्हणून तीपण इतरांची फसवणूक करून पैशे लुबाडायला लागते. म्हातारपण अवघड असतं, म्हणून सुरूवातीला सहानुभूती वाटते तर ही बया फारच डेंजर निघते. तिची एक स्टुडंट असते. त्या स्टुडंटच्या देशावर बॉंबहल्ले व्हायला लागेलेले असतात. म्हणजे विमानं घरघरत निघून गेल्यानंतरच्या क्षणी श्वास चालू असला तरच कळतं की आपण जिवंत आहोत.! म्हणून ही स्टुडंट निर्वासित झालेली असते, बल्गेरियाचं नागरिकत्व मिळवायचं असतं तिला. ही म्हातारी तिला बल्गेरियन भाषा शिकवत असते. शेवटी ही म्हातारी ह्या स्टुडंटलाच हकनाक मार खायला सोडून देते. या बाईला आयुष्यानं जो धडा शिकवलाय, तोच धडा ही इतरांना शिकवतेय. यात हिचं स्वतःचं असं काय राहिलं?
३. आजच्या दिवसातला शेवटचा सिनेमा 'Excursion'. बोस्नियाचा होता बहुतेक.
एक टीनेजर, शाळकरी मुलगी. मैत्रिणींना एकदा सहज चेष्टेत म्हणते की मी काही व्हर्जिन नाहीये. तिला अटेंशन पायजे असतं. आपण इतरांपेक्षा काही हटके केलंय, हे इतर मित्रमैत्रिणींच्या नजरेत बघण्याची इच्छा असते. केवळ निरूपद्रवी इच्छा! त्यासाठी हे क्षुल्लक थाप मारणं. पण त्यातून मग ती प्रेग्नंट असल्याची अफवा पसरते. त्यातून बदनामी. आपल्यासारखी घाणेरडी मेंटॅलिटी तिकडेही आहे.
शाळेचं मॅनेजमेंट तिला प्रेग्नसीचा निगेटिव्ह रिपोर्ट मागते. तेवढ्यावरही हे सगळं थांबत नाही. तिच्या आईला फोन करून शाळा बदलायला सांगतात, कारण इतर मुलं विचलित होतील म्हणून.! आईचे हाल बघवत नाहीत. पॅरेंट होणं अवघड आहे.!त्या मिटींगमध्ये बाकीचे पॅरेंट्स तिच्या आईवर कसलं ओरडतात. टीनएजर मुलीच्या डोक्यात काय काय चाललेलं असतं, आईला जराही कल्पना नाही. आई म्हणते, हाऊ स्टुपिड आय वॉज.!
निरागस पोरगी. आपल्या क्षुल्लक खोटं बोलण्यातून पुढं हे असलं महाभारत होईल, हे कळलं नाही. कळायचं तिचं वयही नाही. हे तिच्या कंट्रोलच्या बाहेरचं जग आहे. शेवटी शाळेत ती टॉयलेटमध्ये गेलेली तर मुलं आत घुसण्याचा प्रयत्न करतात. बिच म्हणतात. बेकार. ती वर्गात येऊन रडते. कसलं नाक थरथरवत रडू आवरते, गुपचूप डोळे पुसते. खाली मान घालून नोट्स लिहून घेण्याचं प्रयत्न करते. गलबलायला होतं.
४. 'द फॉक्स'. जर्मन. दुसऱ्या महायुद्धात एका सैनिकाला कोल्ह्याचं पिल्लू सापडतं. त्याचा सांभाळ तो कसा करतो, यावर आहे. निरोप घेतानाचा क्षण आपल्याला कधीच झेपत नाही. आपलं अवघड आहे!
५. आज 'डेझर्ट्स'. मोरोक्को. वाळवंटातून प्रवास करत लोनचे हफ्ते गोळा करत फिरत असतात दोघे जण. विनोद सूक्ष्म आहेत. डोंगरांची, माळरानांची दृश्यं भव्य आहेत. आपण प्रत्यक्ष तिथंच जाऊन पोचलो आहोत असं वाटतं. डोळ्यांपुढं सगळं नितळ. जणू हात किंचित पुढे केला तरी या सगळ्याला आपल्याला स्पर्श करता येईल, एवढं जिवंत.! ह्या सिनेमात मध्येमध्ये संवाद बिलकुलच नाहीत. दिग्दर्शक फक्त कॅमेरानंच बोलत राहतो. क्लास !
६. दुपारी 'क्वीन ऑफ माय ड्रीम्स'. सिनेमा कॅनडाचा होता आणि गोष्ट पाकिस्तानी. आज्जी, आई आणि नात. अशा तीन पिढ्यांतील तीन स्त्रिया. तीन काळ. तीन लव्हस्टोरीज्. या सिनेमातून पाकिस्तानी समाजात डोकावता आलं. बरंचसं आपल्यासारखं आहे. बाकी तिकडंही बॉलिवूडचा प्रभाव/अप्रूप बरंच आहेसं दिसतं. शर्मिला टागोरचं 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू' मस्त वापरलंय पार्श्वभूमीला !
७. संध्याकाळी 'ह्युमॅनिस्ट व्हॅम्पायर सीकिंग कन्सेंटिंग सुसाइडल पर्सन'. फ्रेंच. हा एक पिच्चर पूर्ण एंगेजिंग होता! त्या पोरीकडे कसलं थंड सौंदर्य आहे. कमाल ॲक्ट्रेस आहे ही!
व्हॅम्पायर्सची स्वतंत्र समाजरचना आहे. अगदी तो डॉक्टरपण व्हॅंपायर आहे. आणि पोरीची आज्जी तर कहर कॉमेडी आहे.! मज्जा.!
८. आज दुपारनंतर 'पॅराडाईज इज बर्निंग'. तीन लहान बहिणी असतात. आईबाप वगैरे काही नाही. मोठी पोरगी किती लडतरी करत असते, कुणालातरी आपली नकली आई होण्यासाठी तयार करण्यासाठी आटापिटा करत असते. कारण सोशल सर्व्हिस वाले तिच्या लहान बहिणींना घेऊन जाणार असतेत. तिकडं तशी यंत्रणा आहे.
९. आज आयनॉक्सला 'इलाहा'. त्या मुलीचं लग्न ठरलंय. आणि तिला हायमेन रिकंस्ट्रक्शन चं ऑपरेशन करायचंय.! बापरे ! सगळीकडेच ही पितृसत्ताक, धर्मांध टोळकी आहेत. हे फक्त आपल्याकडेच आहे, असं नाही.
१०. सकाळी 'गुड बाय ज्युलिया'. सुदानमधलं यादवी युद्धाची पार्श्वभूमी. मुस्लिम- ख्रिश्चन्स कॉन्फ्लिक्ट. एकमेकांच्या बोकांडी बसण्यासाठी वांशिक दंगली. सामाजिक-वैयक्तिक दोन्ही बाजूंनी आशय काठोकाठ भरलाय यात. कुठंच कसलाच टाईमपास नाही. अनावश्यक सीन एकही नाही. एका सलग फ्लो मध्ये सरकते गोष्ट. संवाद इंटरेस्टिंग होते.
त्या दोन बायकांचं आपापल्या नवऱ्यांबद्दलचं बोलणं. 'नवरा चांगला आहे एवढंच, प्रेम करण्यासारखा नाही.'
आणि नंतर तो अक्रम त्याच्या बायकोला म्हणतो, 'तुझ्यावर प्रेम करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि तुझ्यावर विश्वास ठेवणं वेगळी गोष्ट आहे'
११. दुपारी 'क्रिटीकल झोन'. इराणी. यात सगळे गंजाडे, ड्रगीच भरलेत की काय. संपूर्ण पिच्चर एका कारमध्ये शूट केलाय. नुसतं टर्न लेफ्ट, टर्न राईट असलंच चाललेलं पिच्चरभर. निम्म्यातनं उठून बाहेर पडलो. अगदीच बाऊन्सर गेला डोक्यावरून.
१२. संध्याकाळी 'Afire'. जर्मन. एका लेखकाची गोष्ट आहे. यातलं ते लेखकाचं पात्र फार रिलेट झालं. कुणात मिक्स न होणारं. कुढं. विषाक्त. जगावर नाराज. माणुसघाणं. आतून पोकळ. पण उगीच भाव खात फिरणारं. सगळ्यांना तुच्छ लेखत असतो. आपलं मोल जाणणारा कुणी नाही, वगैरे रडगाणं.
ती अभिनेत्री लेखकाला म्हणते की तुला आजूबाजूचं काय दिसतं की नाही?
खरंतर ती असते मोठी विद्वान साहित्य-समीक्षक, पण ती त्याला शेवटपर्यंत पत्ता लागू देत नाही. तो पब्लिशर येतो आणि लेखकाकडं साफ दुर्लक्ष करून तिच्याशीच बोलत बसतो, तेव्हा याच्या डोक्यात उजेड पडतो. त्या लेखकाची भूमिका ज्यानं केलीय त्यात वैयक्तिक झलक दिसत राहिली. मला माझ्यासमोरच रंगेहाथ पकडल्यासारखं वाटलं. कसलं वैश्विक असतंय हे सगळं. म्हणजे आपल्याला आपल्याबद्दल जे खूप आतून माहितीय, ते सगळं अगदी जसंच्या तसं आधीच कुणाला तरी वाटलेलं आहे. आणि त्यांनी त्यावर एक उत्तम सिनेमादेखील बनवलाय.!
बेस्ट शॉर्ट रिव्यू.
गेल्यावर्षीच्या चित्रपटांचा बेस्ट शॉर्ट रिव्यू.
काय काय बघायला आवडेल हे फटक्यात समजले.
इथं का पोस्ट करतोय, माहित
इथं का पोस्ट करतोय, माहित नाही.>>>> उलट गेल्या वर्षीच्या नोंदी केल्यात ते अगदी बेस्ट झालं अगदी थोडक्यात चित्रपट पाहिला असच वाटलं यावर्षीच्याही चित्रपटांबद्दल सविस्तर लिहा. तुमची लिखाणाची शैली छान आहे.
वाचणार आहे, धागा काढल्याबद्दल
वाचणार आहे, धागा काढल्याबद्दल धन्यवाद. जे योग्य वाटेल ते लिहीत रहा, भर घालत राहा.
तुमची लिखाणाची शैली छान आहे. >>>> +१ मुख्य म्हणजे दृष्टिकोन मर्यादित नाही.
शैली छान आहे. +१
शैली छान आहे. +१
पाचपाटील आणि तुम्ही - दोघेही जे शब्द, Expressions वापरता ते फार आवडतात. I am a fan.
लेख आणि खालचा आढावा - दोन्ही
लेख आणि खालचा आढावा - दोन्ही आवडले.
मस्त लेख!!
मस्त लेख!!
पाचपाटील आणि तुम्ही - दोघेही
>>>> मला तर दोघेही एकच वाटतात!
लेख आवडला.
लेख आवडला.
पाचपाटील आणि तुम्ही - दोघेही
>>>> मला तर दोघेही एकच वाटतात! >>+११