माझा अविस्मरणीय ट्रक प्रवास
कोकणात जाण्यासाठी बोट, रेल्वे, खाजगी बस, भाड्याची मोटार किंवा स्वतःची गाडी ह्यातला कोणताही पर्याय उपलब्ध नसणाऱ्या किंवा तो न परवडणाऱ्या काळातील ही गोष्ट आहे . तेव्हा कोकणात जाण्यासाठी प्रवासाचे एकमेव परवडणारे साधन होते एश्टी ची गाडी. पण मे महिना म्हटल की कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप आणि गाड्या लिमिटेड त्यामुळे त्या गाड्यांना गर्दी तुफान . तीन तीन रात्री बॉम्बे सेंट्रल च्या रिझर्वेशन लायनीत नंबर लावून ही रिझर्व्हेशन मिळत नसेच. लोक अगदी हवालदिल होऊन जात. आमच्याकडे ही हीच परिस्थिती होती. बरं, सगळी आशा सोडून मे महिन्यात शांतपणे मुंबईतच राहाव तर ते अजिबातच जमायचं नाही. मे महिन्यात कोकणात नसणे म्हणजे अगदी "जल बिन मछली " अवस्था. आंबा सिझनला कोकणात नाही गेलं तर जन्म फुकट ही ठाम धारणा… परंतु त्यासाठी एश्टीचा पर्याय बाद झाल्याने ट्रक हाच एकमेव आधार होता आमचा.
आंब्याच्या सिझन मध्ये आंबे ट्रकने मुंबई मार्केट ला विक्रीसाठी आणले जातात. गावागावात अशी सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. आम्ही ही कोकणात अश्याच एका कंपनी साठी काम करतो. त्यामुळे स्वतःचे नसले तरी सर्व्हिस चे अनेक ट्रक सिझन ला दारात उभे असतात. त्यातल्या काही जणांशी वर्षानुवर्ष ते सिझनला कोकणात येत असल्याने आमचे फारच घरोब्याचे संबंध निर्माण झाले आहेत. घरच्या लग्ना कार्याना ही त्यांना आवर्जून निमंत्रण दिले जाते. म्हणून सिझनला एस्टीच्या वाटेला न जाता आम्ही अश्याच एखाद्या खात्रीच्या ट्रकने मुंबईहून कोकणात जात असू. कोणी पुरुष माणूस बरोबर नसला तरी आम्ही लेडीज बायका ही पोरा बाळाना घेऊन ट्रक ने बिनधास कोकणात जात होतो.
अर्थात हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आपलं सामान एकदा का मागच्या भागात टाकून ट्रक बांधला गेला की किती ही हवी असेल तरी त्यातली कोणतीही गोष्ट काढता येणे अशक्यच. ती आपल्याला एकदम मुक्कामी पोचल्यावरच दिसणार. त्यामुळे प्रवासात लागणाऱ्या सामानाची बॅग नीट लक्षपूर्वक भरावी लागत असे. मार्केट मधून ट्रक ज्यावेळी निघेल असा सांगावा येई त्यावेळी तिथे हजर राहावेच लागे. कारण एकदा लोडींग झालं की मार्केट मध्ये त्यांना पाच मिनिटं ही थांबता येत नसे. अर्थात वेळेचा ठावठिकाणा नसल्याने सांगितलेली वेळ आणि प्रत्यक्ष ट्रक निघायची वेळ ह्यात कधी कधी तीन तीन चार चार तास ही जात असत.
ट्रक मध्ये चढण ही अतिशय कठीण गोष्ट आहे. चाकाच्या खोबणीत पाय घट्ट रोवून वरच दार हाताने नीट पकडायच आणि मग उडी मारून डायरेक्ट आत एन्ट्री घ्यायची. फारच चैन म्हणजे काही ट्रकमध्ये चढण्यासाठी एखादं छोटं स्टूल असायचं. ड्रायवर केबिन मध्ये ड्रायवर च्या मागे जे एक अरुंद बाकडं असतं त्यावर बसून प्रवास व्हायचा. तिथल्या त्या अरुंद जागेत पाय खाली सोडायला मात्र अजिबात जागा नसायची. तसेच तेव्हाच्या ट्रक मध्ये इंजिनाचं धुड केबिन मध्येच असायचं. त्यावर थोडा वेळ पाय ठेवू शकता येत पण एकदा गाडी चालू झाली की काही वेळातच ते इतकं गरम व्हायचं की चपला घालून ही तळपाय गरम होतं . खिडकीतून येणारा गार वारा आणि पायाला बसणारे सौम्य चटके असं अजब मिश्रण त्या केबिन मध्ये तयार होत असे.
हा प्रवास कायम रात्रीच व्हायचा. समोरून येणाऱ्या वाहनांचे डोळ्यावर येणारे प्रखर लाईट , ट्रक चा सतत येणारा घांग घांग् असा आवाज, मध्येच कर्णकर्कश्य आवाजात वाजणारे हॉर्न, खिडकीतून येणारा भणाणता वारा, ड्रायव्हरला झोप येऊ नये म्हणून ट्रक मध्ये कायम मोठ्या आवाजात लावलेल्या लावण्या , गाणी ( एक वर्ष " माझा नवीन पोपट “ ने कान किटले होते, अजून ही हे गाणं ऐकलं की ट्रक प्रवासच आठवतो .) आणि अंग अवघडून , सतत मांडी बदलत बदलत त्यातल्या त्यात आरामाची पोझिशन शोधण्याची धडपड ह्यात एक मिनिट ही डोळा लागण्याची सुतराम शक्यता नसे. त्यात मुलं लहान असली बरोबर तर मग विचारायचंच नाही.
कधी ड्रायव्हरला आंब्याच्या रिकाम्या ट्रंका ट्रकमध्ये लोडिंग करण्याच्या कामात दिवसभर काही खायला वेळ मिळत नसे. त्यामुळे गोवा हायवे ला लागलो की लगेच कुठे तरी चहा पाण्याला गाडी थांबत असे. कधी ट्रक चे किरकोळ काम निघाले तरी गॅरेज मध्ये सहज एक दोन तास जात. कधी ड्रायव्हरला झोप अनावर झाली तर ट्रक सायडिंगला लावून केबिनच्या वर असलेल्या जागेत तो मस्त पैकी वाऱ्यावर ताणून देई आणि आम्ही मात्र ट्रक चालता नसल्याने आत उकाड्याने हैराण होत असू. कधी सगळा प्रवास वेळेवर आणि चांगला होऊन “चला, आता तासा दोन तासात घरी पोचू “ अशी स्वप्न आपण बघत असताना ड्रायव्हरचा “ काय ? राजापूरची गंगा आलीय म्हणे , जाऊ या का बघायला “ हा प्रश्न कानावर येऊन स्वप्नभंग होई.
अश्या तऱ्हेने संध्याकाळी तीन चारच्या दरम्यान सुरू झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी दुपारी अकरा बाराच्या दरम्यान समाप्त होई तेव्हा अक्षरशः हाडांचा हिशेब मांडावा की काय इतकं अंग ठणकत असे. ट्रक मधून उतरल्यावर ही घर गाठे पर्यंत एक अगदीच कच्च्या पायऱ्यांची केव्हा ही पाय घसरून जमिनीला वंदन करावं लागेल अश्या अवस्थेतील एक घाटी उतरण्याला, एक घाटी चढण्याला आणि आत्ता पडेल की मग अश्या अवस्थेत असलेला साकव क्रॉस करण्याला पर्याय नव्हता.
आता विचार करते तेव्हा हा ट्रक प्रवास किती खडतर होता हे मनात जरा जास्तच अधोरेखित होतं. पण अर्थातच तेव्हा हे जाणवत नसे. उलट ट्रक मुळे कस मनात आलं की घरी येता येतं, कशी रिझर्व्हेशन ची कटकट करावी लागत नाही ह्या विचाराने बरच वाटत असे. असो. ट्रक चं गारूड आमच्या घरातल्या लहान मुलांच्या मनावर मात्र कायमच असे. ट्रक ट्रक हा त्यांचा सर्वात आवडता आणि ग्लॅमरस वाटणारा खेळ होता. सनलाईटच्या पुठ्ठ्याच्या मोठ्या खोक्याला पुढे सुतळ बांधली की झाला ट्रक तयार. सगळी पोरं असे ट्रक खळ्यात फिरवताना त्यात तासनतास रमत असत. सन लाईट चे बॉक्स नसतील तर हक्काच्या झोपाळ्यावर ही ट्रक चा खेळ रंगत असे. एवढा मोठा ट्रक चालवणारे ड्रायव्हर प्रत्येक मुलाला हिरो वाटत असत आणि त्यामुळे घरातील सगळे मुलगे मोठेपणी ट्रक ड्रायवर किंवा क्लिनर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होते. असो.
कधी कुणकेश्वर किंवा विजयदुर्ग ला जायचा बेत ठरला तर आम्ही सगळे ट्रकनेच जात असू. सतरंजी, तिथे खेळायला बॅट बॉल, सुक्या भेळेच सामान , चहाची किटली आणि इतर सामान ट्रक मध्ये ठेवलं जाई. हौद्यात म्हणजे ट्रकच्या मागच्या भागात उभे राहून किंवा खाली बसून हा प्रवास होई. काही जणं केबिन मध्ये ही बसत. कोकणातले खडबडीत , चढ उताराचे आणि वळणा वळणाचे रस्ते आणि कमी भरलेला ट्रक ह्यामुळे चांगलेच गचके आणि धक्के बसत. ट्रक ला घट्ट पकडून उभं राहिलं तरच बचाव व्हायचा नाहीतर अक्षरशः पडायला व्हायचं. “काकू, तू केबिन मध्ये बस “ ह्या सूचनेकडे कानाडोळा करून मी नेहमी हौद्यातच जात असे. कारण वरती निळं आकाश आणि सभोवती कोकणातली गर्द हिरवाई हौद्यातून पाहायला खूप मजा यायची. नेहमीचा परिसर ही वेगळाच वाटायचा उघड्या ट्रकमधून पाहताना. त्यातली काही दृश्य अजून ही डोळ्यासमोर लख्ख दिसतात.
कालौघात प्रवासाची साधनं बदलली. भाड्याच्या गाड्या घेऊन चार दिवसासाठी कोकणात जाणं अधिक सोयीचं वाटू लागलं. खाजगी बस सर्व्हिस उदयाला आल्या. अनेक जणांकडे स्वतःची गाडी ही आली. पंचवीस वर्षापूर्वी मधू दंडवतेंच्या कृपेने कोकण रेल्वे सुरू झाली. कोकणवासीयांचं रेल्वेच स्वप्न साकार झालं. रात्री झोपून सुखाचा प्रवास करता येऊ लागला. आता तर आमच्या गावापासून दोन तासावर विमानतळ ही झाला आहे म्हणून तो ही एक पर्याय आहेच हातात. ह्या सगळ्यामुळे एस्टी ची मक्तेदारी मात्र संपुष्टात आली. ट्रक सर्व्हिस अजून ही सुरू आहे. हल्लीचे ट्रक ही पूर्वी पेक्षा जास्त आरामदायी झालेत म्हणे पण तरी ही कोणी ही ट्रकने गावाला जात नाही.
एसी गाडीने किंवा रेल्वेने आरामात झोपून कोकणांत जाताना ट्रक प्रवासाच्या त्या रम्य (?) आठवणी माझ्या मनात मात्र रुंजी घालत असतात.
हेमा वेलणकर
मानव,
मानव,
तुम्ही अमरावतीला होतात? Engineering hostel?
गाववाले दिसलात म्हणून विचारलं.
हो. तुम्ही अमरावतीच्या?
हो. तुम्ही अमरावतीच्या?
हो.
हो.
आणि engineering college च्या समोरच्या college मधली.
अच्छा.
अच्छा.
मानव, मी अमरावती govt engg
मानव, मी अमरावती govt engg college मध्येच होते.

91 passout.
मानव ट्रेन मधून प्रवास म्हंजे
मानव ट्रेन मधून प्रवास म्हंजे काय thrilling अनुभव असेल ना ...कल्पना करून ही भारी वाटतंय मला.
अमरावतीच्या उल्लेखाने ही इथे एक गटग च झालंय अमरावतीकरांचे
छल्ला म्हणजे आपण एकाचवेळी
छल्ला म्हणजे आपण एकाचवेळी होतो कॉलेज मध्ये. मी 89 pass out.
ममो, हो इंजिन मधुन पुढले दृश्य भारी दिसते.
Pages