संक्रांतीची ओटी

Submitted by SharmilaR on 16 January, 2025 - 01:42

संक्रांतीची ओटी

मिनू आणी चिनूच्या वयामध्ये मध्ये अंतर होतं तिनेक वर्षांचं, पण त्या दोघी भांडायच्या मात्र अगदी बरोबरीने. त्यात कुणी लहान, कुणी मोठी नव्हतीच. ‘मी लहान आहे म्हणून माझ्यावर ती ताईगिरी करते.’ असं चिनूला वाटायचं, तर ‘ती लहान आहे म्हणून मीच का नेहमी पडतं घ्यायचं?’ असं मिनूचं म्हणणं असायचं. त्यामुळे त्यांची भांडणं ही रोजचीच.

संक्रांतीच्या दिवसात तर, त्यांची ही भांडणं जरा जास्तच वाढायची. खरं तर संक्रांतीचे दिवस म्हणजे नुसती मजा असायची. दुपारी पटापट अभ्यास आटपला की, संध्याकाळी आईबरोबर हळदी-कुंकवाला खूप ठिकाणी जायचं असायचं. भरपूर तिळगूळ खायला मिळायचा मग. मैत्रिणी भेटायच्या.. ह्या मैत्रिणी रोजच्याच असल्या, तरी आया बरोबर असल्या की त्या जरा वेगळ्याच वाटायच्या. बायकांच्या गप्पा ऐकायलाही मजाच यायची.
आई बरोबर तर दोघींनाही जायचं असायच हळदी-कुंकवाला. पण त्यांच्या भांडणाचं मुख्य कारण असायचं, ‘संध्याकाळी आई बरोबर हळदी-कुंकवाला जातांना, ओटीची पिशवी कुणाच्या हातात असणार?’

एरवी एकमेकीं कडे कामं ढकलणाऱ्या त्या दोघींनाही, ती ओटीची पिशवी मात्र स्वत:लाच पकडायची असायची. काय नसायचं त्या ओटीत..? त्यात असायचे, गहू (ज्याचा उपयोग त्या दोघींनाही नव्हता), उसाचे कांडे, गाजराचे तुकडे, हरबऱ्याचे गाठे, आणी मुख्य म्हणजे, टपोरी बोरं. ही बोरंच तर मुख्य आकर्षण असायची त्या पिशवीची. मग जिच्या हाती ती पिशवी असायची, ती आईच्या मागे चार पावलं चालत त्यातली बोर खात असायची. दुसरीच्या हातात असायची, हळदी कुंकवात मिळालेल्या वाणाची पिशवी. त्या पिशवीतल्या वाणांच दोघींनाही फारस कौतुक नव्हतं. ती वाणं तर काय, घरी गेल्यावर बघता येणारच असायची. शिवाय ती असायची आईच्या उपयोगाची, चमचा, डबी नाही तर साखरेची पुडी वगैरे.

आई चालत असायची पुढे, दुसऱ्या बायकांबरोबर. त्या सगळ्या बायका एवढ्या गप्पांमध्ये गुंतलेल्या असायच्या की आपल्या मागे काय चाललंय, ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसायचं. मिनू आणी चिनू बरोबर बाकीच्याही मुली असायच्याच, आयांच्या मागे मागे चालणाऱ्या. सगळ्या मुलींचे हे खाण्याचेच उद्योग चालू असायचे.

मिनूच्या हातात ओटीची पिशवी असेल, तर ती चिनूला दोन बोरं द्यायची, आणी स्वत: चार खायची. अर्थात चिनूच्या हातात पिशवी आली, की ती पण तसंच करायची. म्हणूनच तर मग दोघींनाही ती ओटीचीच पिशवी हवी असायची धरायला. संक्रांतीच्या दिवसात रोज जायचंही खूप घरी असायचं. म्हणजे रोज कमीत कमी सात आठ घरी तरी! एका घरातून दुसऱ्या घरी जातांना रस्त्यात हे खाण्याचे उद्योग चालायचे. आधी बोरं.. मग हरबरे.. मग उस.. ह्या क्रमाने संपत जायची ती ओटी. घरी जाईपर्यंत फक्त गहू आणी गाजराचे तुकडे तेवढे शिल्लक रहायचे.

रोजची भांडणं टाळण्याकरता मग त्या दोघींनीच उपाय शोधला, एक दिवस मिनूने धरायची ओटीची पिशवी अन दुसऱ्या दिवशी चिनूने. पण कधी कधी असं व्हायचं, की एखाद दिवस अगदी दहा बारा घरची आमंत्रण असायची, अन दुसऱ्या दिवशी नेमकी एखाद दुसरच असायचं आमंत्रण. म्हणजे मग एकीच नुकसानच व्हायचं. मग बऱ्याच तडजोडीने त्यांनी ठरवलं, रोज एकेका घराआड ओटीच्या अन वाणाच्या पिशव्यांची अदलाबदल करायची एकमेकीत. त्यांनंतर मात्र रोज हळदी-कुंकवाला जातांना, त्या दोघीत रस्त्याने चालतांना तरी तेवढी भांडणं कमी झालीत.

त्या दिवशी सकाळी उठल्यापासून, मिनू अन् आई मध्ये काहीतरी खुसुर फुसुर चालू होती. चिनूने ऐकायचा प्रयत्न केला, पण दर वेळी आईने तिला दूर पिटाळलं. ‘आई नेहमी मिनूचेच जास्त लाड करते. मला तर जवळ पण येऊ देत नाही.’ चिनूच्या डोक्यात आलंच नेहमीप्रमाणे. त्या दिवशी मिनू शाळेला पण आली नाही. मग चिनूला एकटीलाच जायला लागलं शाळेत. ती का येत नाही हे पण आईने धड सांगितलं नाही. शाळा संपवून चिनू घरी गेली, तेव्हा मिनू एका कोपऱ्यात बसली होती, आपली आपली. आई म्हणाली, ‘तिच्या जवळ नको जाऊ. तिला कावळा शिवलाय आज.’

आईला बरेचदा शिवायचा कावळा. चिनूला कळायचच नाही, ‘घरात एवढे सगळे असतात, तो कावळा नेमका आईला कसा येऊंन शिवतो? अन केव्हा?’ कावळा शिवला, की मग आई तीन दिवस कोपऱ्यात बसायची. स्वयंपाक वगैरे बाबाच करायचे. अगदी बोअर व्हायचं तेव्हा. मग आई चौथ्या दिवशी न्हाऊन कामाला लागली, की घर कसं स्वच्छ स्वच्छ वाटायला लागायचं. आणी आता तर मिनूलाही शिवला कावळा. कशाला ही बाहेर गेली होती कावळ्या जवळ?

त्यादिवशी मग मिनू आलीच नाही बाहेर कुठे हळदी कुंकवाला. पुढचे दोन दिवस पण नाही आली ती. चिनूने खाल्ली खूप बोरं मग, पण अगदी सगळी नाही. मिनूला नाही मिळत ह्याचं तिला वाईट पण वाटलं मग थोडं. थोडी बोरं ठेवली तिने तिच्या करता तशीच.

चौथ्या दिवशी मिनूचं नहाण झालं, अन तिचा कोपरा सुटला मग. त्या दिवशी चिनू स्वत:हुन तिला म्हणाली, “आज ओटीची पिशवी पूर्ण तूच धर. माझे झाले आता खूप दिवस.”

“नको. तूच सांभाळत जा संक्रांतीची ओटी रोज. लहान आहेस अजून तू.” मिनू समजूतदारपणे तिला म्हणाली.
******************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलीय कथा. लहानपणीचे दिवस आठवले. बोरं, हरभरे, उसाचे करवे खायला मजा येते. आमच्या गावी कचरा नावाचे एक फळही द्यायचे. हा सीजन सोडून कधीच मिळायचे नाही. बाहेरून काळे केसाळ आणि आतून पांढरे असायचे. बऱ्याच वर्षात खाल्ले नाही.

>>छान लिहिली आहे गोष्ट... शेवट ही आवडला.. तो काळ छान रंगवला आहे.>>+१

ऑर्किड, 'कचरा ' म्हणजे ते उकडून खातात ते का? मला आता निटसे आठवतही नाही. पण काळे केसाळ आणि आत पांढरे एवढे मात्र आठवतयं . ते फळ असते की ट्युबर?

कचरा म्हणजे हे का? याला आमच्याकडे वराहकंद म्हणतात. संक्रांतीलाचं बाजारात मिळतो Screenshot_2025-01-16-17-52-08-558-edit_com.miui_.gallery.jpg

छान कथा..

संक्रांतीचे वाण आणि खाऊ मलाही रीलेट झाला. आईचे बोट पकडून जिथे तिथे जायचा काळ. सगळे तिळाचे लाडू मीच खायचो. आईच्या वाटणीचे सुद्धा. आपल्याकडे आयांमध्ये तशीच पद्धत असायची.
बाकी तुळशीच्या लग्नात सुद्धा असेच बोर-करवंदे, उसाचे तुकडे वगैरे लूट असायची.

कावळा शिवला शब्दप्रयोग देखील खूप दिवसांनी ऐकला. लहान असताना कावळाच येऊन शिवतो हे खरे वाटायचे. बहुधा लहान मुलांसमोर काही बोलायला नको म्हणूनच तो शब्द प्रयोग बनवला असेल. कारण पुढे मोठा झालो तसे अडचण शब्द कानावर पडू लागला.
आता मात्र घरी कुठले कोडवर्ड वापरले जात नाही. तर शॉर्ट फॉर्म वापरले जातात.

बाई दवे, काळे पांढरे फळ म्हणजे ते आपले शिंगाडा का?
पण ते केसाळ नसते. कोळश्यासारखे असते.

शेवटचा भाग सोडून सगळी गोष्ट खूप रिलेट झाली. आम्ही घरी एक भाऊ आणि एक बहीण असल्याने या संबंधी भांडायला लागायचं नाही पण शेजारच्या घरात दोन बहिणी होत्या त्यांची भांडणं चालायची ते आठवतं.

मला फार आवडली ही गोष्ट.
५ दिवसांत मोठी बहीण मनाने पण मोठी होऊन गेली.
आई सोबत हळदी कुंकू साठी फिरणे पण आठवले.
आमच्या इथे कोणीही बोरे आवळे ऊस वैगेरे देत नसत. हलवा आणि एखादी वस्तू देत. काही सुगरणी घरी कांडून तिळगुळ बनवत. अगदीच जवळची मैत्रीण असेल आईची तर ती तिळाचा लाडू देई.
आई एखादा छोटा स्टीलचा डबा घेई त्यात सगळे भरे.
वस्तू देण्यात पण मजाच असे. एके वर्षी ५ चहाची गाळणी, ६-७ मिठाच्या डब्या आणि बरेच हात रुमाल मिळालेले.
माझ्या आईने एकदा मेथीच्या जुड्या वाटलेल्या. आमच्या आजूबाजूला खूप शेती होती तेव्हा. आजीने आणि आईने एका शेतकरी आजीला आधीच सांगून एकदम ताज्या मेथीच्या ३० एक जुड्या आणून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सगळ्या गल्लीत मेथीची भाजी बनलेली. Wink

कथा आवडल्याचं आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद ममो, ऑर्किड, स्वाती, मनिम्याऊ,जाई, साधना, सामो, पियू, ऋन्मेष, सहेली, रोहिणी, वावे.
कचरा हे फळाचे नाव पहिल्यांदाच ऐकलेय.
लहान असताना कावळाच येऊन शिवतो हे खरे वाटायचे>> मलापण. आणि तेव्हा आईचा राग पण यायचा. जायचंच कशाला बाहेर म्हणून. त्या दिवसांमध्ये घरातले इतर कुणी सगळी कामं करत असलं तरी घर पारोसं वाटायचं.
आमच्या इथे कोणीही बोरे आवळे ऊस वैगेरे देत नसत.>> आता गहू आणि बोरं वगैरे घातलेल्या ओट्या बहुतेक सगळीकडेच बंद जाळ्यात. इतक्यातच २/३ ठिकाणी हळदी-कुंकवाला जायचा प्रसंग आला. ओट्या कुठेच नव्हत्या.
‘कावळा शिवणे’, ‘दूर बसणे’ हे बऱ्याच लोकांना रिलेट होणे अवघड आहे. कारण आता बहुदा नाही पाळत कुणी.
पण नुकताच आलेला एक अनुभव-
पुण्यनगरीत रहाणारी माझी एक उच्च शिक्षित मैत्रीण आणि तिची आयटी मध्ये काम करणारी सुन अजूनही ‘हात–बोट’ (हा शब्दप्रयोग पण कदाचित काहीजणांना माहीत नसेल) पाळतात. त्यांच्याकडे कामाला तीन वेगवेगळ्या मावश्या येतात. त्या प्रत्येकीला महिन्यातून चार दिवस कंपलसरी सुट्टी घ्यावी लागते. (ते त्यांना आराम मिळावा ह्या उदात्त वगैरे हेतूने नाही, तर त्या दिवसात त्यांचं हात-बोट चालत नाही म्हणून!) त्यामुळे माझी मैत्रिणी सतत त्या मावश्यांपैकी कुणाचं किंवा सुनेचं तरी (घरचं) काम करण्यात बिझी असते.

>>>>>>माझ्या आईने एकदा मेथीच्या जुड्या वाटलेल्या. आमच्या आजूबाजूला खूप शेती होती तेव्हा. आजीने आणि आईने एका शेतकरी आजीला आधीच सांगून एकदम ताज्या मेथीच्या ३० एक जुड्या आणून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सगळ्या गल्लीत मेथीची भाजी बनलेली. Wink
मस्त नावीन्यपूर्ण वाण आहे की. Happy

नवीन प्रतिसाद लिहा