बेईमान गुणधर्म
इतिहासातल्या वर्चस्वाचा
प्रवासपट मांडताना
माणसाने निसर्गाचे
गमक शोधून काढले,
अन् केला कैकदा
निसर्गावर अत्याचार
पूर्वजांपासून पिढ्यान्पिढ्या...
मनगटाच्या बळावर म्हणा
अगर बुद्धिचातुर्याने,
अवघ्या सृष्टीला पादाक्रांत
करण्याच्या इराद्यात
हवी तेव्हा बदलली कूस
भौतिक गरजा शमवताना...
विविध विचारप्रवाहातून
विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडताना
विज्ञानासह तंत्रज्ञानाचा
आटापिटा चालवला,
श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे
घालून दिले नियम,
सत्तावादातून पुकारली युद्धे
अन् पुन्हा वर्चस्ववादाचा
भूगोल जन्माला घातला...
माणसाचाच एक ब्रँड
विकसित होण्याच्या नादात
समस्यांचा हैदोस बघा,
खुर्चीश्वर राजकारण्यांच्या लीलांनी
सर्वसामान्यांना केले हैराण!
समाजकेंद्री आशय उलगडताना
इथली स्पंदनेसुद्धा परेशान...
आतातर नाइलाज आहे
कारण ज्यांचा-त्यांचा गुणधर्म
बेईमान होत चालला आहे,
आदिम काळापासूनच्या
मानवी वर्चस्ववादाचा
इतिहास शोधताना!
nareshrawatala@gmail.com
***
बेईमान गुणधर्म
Submitted by nareshrawatala on 26 December, 2024 - 10:16
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users