मोडेन पण वाकणार नाही

Submitted by सदा_भाऊ on 22 December, 2024 - 06:25

वयाच्या पन्नाशी नंतर जर एकही अवयव दुखत नसेल तर तुम्ही मेलेला आहात असे समजावे. असं मी नाही, खुद्द पुलं म्हणून गेलेत. माझ्या बाबतीत जिवंतपणाचा पुरावा मी पन्नाशीच्या एक दोन वर्षे आधीच निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही. तसं माझ्या इतिहासात डोकावून पाहिलं तर मला क्वचितच सर्दी खोकला ताप झाल्याचे आढळून येईल.

तर मुद्दा असा की माझ्या मागे पाठदुखीचा ससेमिरा लागला. सुरवातीचे काही दिवस मी ह्या दुखऱ्या पाठीकडे थोडी पाठच फिरवली पण नंतर मात्र तिने माझी पाठच सोडली नाही. ही पाठदुखी कधी अचानक डोकं वर काढायची आणि माझं जगणं असह्य करून टाकायची. चार पेन किलर गोळ्या घेतल्या की परत गायब होत असे. नक्की हे दुखणं खरं आहे का उगाच माझ्याशी खेळ खेळतेय हेच कळायचं नाही. बरं मी कुठं पडलोय, धडपडलोय असं पण कधी झाल्याचं मला आठवत नाही. संसाराची आणि नोकरीची बरीच ओझी उचलणारा बैल असलो तरी खरेखुरे अतिजड वजन उचलेले मला मुळीच आठवत नाही. मग ह्या पाठदुखीने माझीच का पाठ धरली, हा प्रश्न मात्र मला सतावत होता.

जेव्हा पेनकिलर कुचकामी ठरायला लागल्या त्यावेळी डॉक्टरची पायरी चढायची ठरवली. जवळच्याच एका डॉक्टरकडे भेट देऊन त्याला हजार रूपयांची दक्षिणा देऊन श्रीमंत करायचा निर्णय घेतला. त्या होतकरू डॉक्टरने मला न्याहाळत बडबडायला सुरू केले, “तुमचे बैठे काम असते का? वजन कमी करायला हवे. किमान महिनाभर ऑफिसला जाऊ नका.” त्या क्षणाला वेदनेत मी विव्हळत असल्यामुळे “हो” बोलणे भाग होते. तीन प्रकारच्या गोळ्या आणि दोन प्रकारची मलमं लिहून दिली. किमान पंधरा दिवस फिजीओथेरेपी करण्याची अत्यंत गरज आहे असा पण सल्ला लिहून दिला. औषध दुकानदाराकडून कळले की दिलेली औषधे सुध्दा पेनकिलरच आहेत. नवीन ब्रॅंडच्या पेनकिलरने दुखणे कमी झाले. दोन दिवस फिजीओथेरपीस्टला भेटून त्याला पण हजार रुपयानी श्रीमंत केले. आणि तीन चार दिवसातच माझे रूटीन पुर्ववत सुरू झाले.

काही दिवसांनी पुन्हा एकदा माझ्या दुखण्याने माझी पाठराखण केली. चार पावले चालणे कठीण झाले. तशाच अवस्थेत पुन्हा एकदा होतकरू डॉक्टरकडे जावे लागले. सर्वप्रथम त्याने मी महिनाभर विश्रांती का घेतली नाही आणि पंधरा दिवस फिजीओथेरपी का केली नाही याबद्दल तोंडसुख घेतले. माझ्या कडे सॉरी बोलण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. बैठ्या कामामुळे पाठीत एक स्पॅझम तयार झाला असून त्यावर फिजीओथेरपी हाच एक उपाय आहे. असे पुन्हा एकदा सुतोवाच केले आणि पुन्हा एकदा दोन नवीन गोळ्या लिहून दिल्या. पंधरा दिवसांच्या फिजीओमधे महिन्याचा पगार फुंकायची माझी तयारी होत नव्हती. पण मुकाट्यानं हो म्हणून मी बाहेर पडलो. यावेळी मी तब्बल आठ दिवस फिजीओथेरेपी घेतली. पाठीला एक मशिन लावून तिथली बया इतर बायां बरोबर गप्पा ठोकत बसे. पंधरा मिनीटे पाठीला मुंग्या चावल्या प्रमाणे ते मशिन काम करीत राही. मी आपला असहाय होऊन त्यांच्या बायल्या गप्पा नाईलाजास्तव ऐकत पडून राही. या सर्व खटाटोपीचा तसा फारसा काहीच परिणाम होत नव्हता. वेदना माझी पाठ सोडायला तयार नव्हती. समोर आलेल्या संकटाला पाठ दाखवण्याचा माझा स्वभाव नाही पण इथं तर प्रत्येक संकट मीच ओढवून घेत होतो आणि पाठ पण दाखवत होतो.

या बरोबरीने घरामधे माझ्या पाठीवर बरेच अत्याचार चालूच होते. आयोडेक्स, मुव्ह, व्हॉलीनी, मसाज, गरम पाण्याचा शेक, विचित्र रंग व गंधाचे लेप… अशा अनेक नरक यातना माझ्या पाठीशी लागल्या होत्या. दरम्यान एका पैलवान मसाज वाल्याकडे मी माझी पाठ सुपूर्त केली. त्याला पाठीच्या दुखण्याची कल्पना देऊन मी चुक तर नाही ना केली असा प्रश्न पडला. त्याला काहीतरी सुवर्ण संधी चालून आल्याचा आनंद झाला. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” असा त्याने दिलासा दिला. त्याने सर्व बळ पणाला लावून अतिभयंकर शक्ती प्रदर्शन सुरू केले. संपत आलेल्या टुथपेस्ट च्या ट्युब मधून पेस्ट बाहेर काढण्यासाठी जे शर्थीचे प्रयत्न करावे लागतात तसे काहीसे प्रयत्न त्याने माझ्या पाठीवर सुरू केले. अखेरीस मला सांगावे लागले.. माझी आधीची पाठदुखीच बरी होती. पण हे असले अत्याचार नकोत. आठवड्याच्या त्याच्या प्रामाणिक सेवेनंतर मी स्वतःला निवृत्त केले.

आता मात्र माझी पाठ माझ्या हाता बाहेर चालली होती. मला ताठ मानेने जगणे अशक्य झाले होते. उजव्या बाजूला वेदना असल्यामुळे माझा एक खांदा झुकला गेला होता. माझी चाल अल्लू अर्जून च्या पुष्पा सारखी झाली होती. सोसायटीच्या आवारात चार पावले चालणे अशक्य झाले होते. वाटेत भेटणारा प्रत्येक जण आवर्जून विचारपूस करीत होता. कधी ओळख न दाखवणारा माणूस ही अचानक आपुलकी दाखवू लागला. जणूकाही भेटणाऱ्या प्रत्येकाने माझी पाठ बरी करण्याचा विडाच उचलला होता. मला बरे करणे ही निव्वळ त्यांचीच नैतिक जबाबदारी असल्याप्रमाणे सल्ले मिळू लागले. “आमच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, त्यानी माझी पोटदुखी चार दिवसात बरी केली होती.” अहो पोटदुखी आणि पाठदुखी हे भिन्न आजार असून त्याचे डॉक्टर वेगळे असतात.. हे समजावण्याचे माझ्यात बळ नव्हते. एका प्रेमळ काकांनी तर डॉक्टरांचा फक्त नंबर देऊन न थांबता स्वतः जातीने फोन करून अपौंटमेंट पण घेऊन टाकली. काहीतरी कारण काढून टाळल्यावर ते काका माझ्यावर नाराज झाले. “बघा बुवा! ज्याचं करावं भलं…”

अशाच एका प्रेमळ काकूंकडून एका हाडवैद्याचा शोध लागला. “अहो बिन औषधाचं ते वैद्य फक्त पाच मिनीटात बरं करून देतात.” मी पण वेदनेनं त्रस्त झालो होतो. ठरवले, आता हाही प्रयोग करून बघूया. ठरल्या वेळे प्रमाणे मी त्या इप्सित स्थळी पोचलो. तिथं एक हॉल पुरूषांचा आणि एक हॉल स्त्रीयांचा होता. मला पुरूषांच्या हॉल मधे धाडण्यात आले. तिथं सात आठ लोक जमिनीवर आडवी पडलेली होती. एक माणूस प्रत्येकाच्या पाठीवर पाय रोवून त्यांचे हात ओढीत होता. आडवा माणूस मुकाट्यानं ते सहन करीत होता. तो उभा इसम एकाला तुडवला की दुसऱ्याच्या पाठीवर पाय रोवायला सज्ज! मी प्रवेश केल्यावर मला कोणताही प्रश्न न विचारता तिथंच आडवं होण्याची आज्ञा झाली. मी अंदाज बांधला की तो तुडवणारा इसमच हाडवैद्य असणार. त्यानं माझ्या पाठीवर पाय रोवून माझा हात वर ओढला. तीव्र वेदना या पलीकडे काहीही घडले नाही. मी तसाच धडपडत उठलो आणि पैसे हातात ठेऊन पाठ कुरवाळत घर गाठले.

माझ्या पाठीने तसे बरेच चढ उतार बघितले आहेत. साधारण आठवडाभर मला बेजार करून झाले की पाठदुखी कुठंतरी दडी मारून बसायची. काही दिवसांनी परत पाठीवर थाप मारत हजर व्हायची. माझी अशी अवस्था पाहून सोसायटीच्या वॉचमनने मला एक दिवस सल्ला दिला. “साहेब, सकाळी लौकर इथं खाली या आणि उघड्यानं या लाईटच्या खांबाला पाठ घासा.” पाठदुखीमुळं मला वाकता येत नव्हते पण ताबडतोब त्याला तिथंच साष्टांग दंडवत घालण्याची इच्छा झाली. ऑफिस मधे एकाने मला आवर्जून एक मलम आणून दिले. यानं नक्की फरक पडेल. दोन तीन दिवस मलम चोळल्यावर वेदनेत फरक पडला नाही पण शरीराला एक भयंकर दुर्गंध येऊ लागला. त्यानंतर चार दिवस पाठीला साबण घासून त्या वासातून सुटका करून घेतली.

आता डॉक्टर बदलण्याची वेळ आली होती. एका नामांकित हॉस्पिटल मधील प्रख्यात डॉक्टरना पाठ दाखवण्याचे ठरले. त्यांची अपौंटमेंट एक आठवड्या नंतरची मिळाली. आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर डॉक्टरना भेटण्याची वेळ आली. वाटेत टॅक्सी वाल्याला सावकाश चालव रे बाबा! अशी विनंती केल्यामुळे त्याच्यापासून पाठदुखी लपून राहिली नाही. पुढील सुमारे पंचवीस मिनीटाच्या प्रवासात त्याने त्याच्या मामाचे दुखणे इचलकरंजी जवळच्या एका खेड्यातील वैद्याने कसे बरे केले याची इत्यंभूत कहाणी ऐकवली. मी वेदना सांभाळत त्याच्या कथेला योग्य न्याय दिला. दर वाक्याला “हो का?” “अरेरे!” “वाऽ” असे उद्गार काढले आणि प्रवास संपवला. मी पुढील खेपेस इचलकरंजी जवळच्या खेड्याला जरूर भेट देईन हो, असे आश्वासन पण दिले.

आता माझ्या पाठीवर नवीन अध्याय सुरू झाला होता. डॉक्टर वयस्कर आणि अनुभवी दिसत होते. त्यानी काही प्रश्न विचारले, पाय हलवून दाखवा, बोटं हलवून दाखवा अशा काही परिक्षणानंतर सुतोवाच केले.. हे स्लिपडिस्क असण्याची शक्यता आहे. ताबडतोब MRI करून घ्या. आता आमचा मोर्चा तिकडे वळला. पंधरा हजाराचे देणे देऊन आम्ही पुन्हा त्या डॉक्टरना भेटलो. रिपोर्ट पाहून ते बुचकळ्यात पडलेले दिसले. तरी त्यांनी स्लिपडिस्क चा ठेका चालूच ठेवला होता. पण उगाच शंका नको म्हणून तुम्ही CT Scan आणि रक्त तपासणी करा असा सल्ला दिला. आता मात्र मला नक्की काय झालंय याची उत्सुकता व भीती दोन्ही गोष्टी सतावू लागल्या. अजून दहा हजारांची आहूती दिल्यावर चार दिवसांनी माझे सर्व रिपोर्ट त्यांना दाखवले. त्यानी हे स्लिपडिस्कच आहे पण थोडी वेगळी केस आहे असं काहीतरी समजावलं. मला त्यातलं काहीच समजलं नाही. चार औषधांची यादी हातात ठेवून पुढच्या आठवड्यात परत भेटा असा सल्ला वजा धमकी दिली. एकंदरीत माझ्या वेदनेच्या जोडीला भीतीने पण साथ द्यायला चालू केले होते. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस या म्हणी मधे भीत्या पोटी किंवा डोकी असं न म्हणता पाठी का म्हणतात त्याचा शोध लागला.

पुढच्या आठवड्यात डॉक्टरना भेटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी गवसल्याचा आनंद दिसत होता. प्रथम चार सोपे व्यायाम करायला सांगितले आणि मग मला एका नव्या व्याधीच्या नावाचे ज्ञान दिले. DISH .. हा आजार मणक्या जवळच्या स्नायूंचा असतो. वयानुसार आणि राहणीमानामुळे मणक्या जवळ calcium जमा होते आणि स्नायूंमधे एक आखडलेपणा येतो. असाच व्यायाम कायम करीत रहा…

आणि आता माझ्या आयुष्यात DISH नामक राक्षसाचा प्रवेश झाला होता.

तळटिपः या लेखाकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पहावे. सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हसू आलेही आणि नाहीही.

समहाऊ मला कोणाच्या आजार आणि उपचार पद्धती वगैरे वर हसता येत नाही. कितीही विनोदी अंगाने लिहिले असले तरी.

विनोद जाणवला नाही. शरिराची तक्रार सुरु झाल्यानंतर ( कंडिशन कशामुळे असेल याचे ) निदान होईपर्यंतचा मोठा आणि महाखर्चिक प्रवासाचे वर्णन म्हणून हा लेख आवडला.

उघड्यानं या लाईटच्या खांबाला पाठ घासा >> Lol

आवडला पाठदुखीचा प्रवास.. लवकरात लवकर बरे व्हावे, आराम पडावा यासाठी शुभेच्छा Happy

जितका मोठा आजार तितका तो गमतीने घ्यावा.
माझ्याकडे विनोद बुद्धी तशी जेमतेम आहे.. पण आजारपण आले की तिला ऊत येतो Happy

<< जितका मोठा आजार तितका तो गमतीने घ्यावा. >>
----- सहमत... आनंद मधला राजेश खन्ना आठवला. Happy

लवकर बरे व्हाल यासाठी शुभेच्छा.

अगदी मस्त लिहिले आहे.
मलाही गुडघे दुःखी साठी थोड्या फार अशाच अनुभवातून जावे लागते आहे......
Happy

मस्त लेख...
केरलाईट आयुर्वेदाचे कडूलिंब वगैरेचे काढे नाक दाबून प्यायले नाहीत का? Happy