अनवधानातील गमतीजमती . . .

Submitted by कुमार१ on 6 December, 2024 - 02:03

डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या. अजूनही रुग्णालयानुसार काही प्रमाणात हस्तलिखित नोंदी असतात. रुग्ण बरा झाल्यावर घरी पाठवून दिल्यानंतर असे सर्व केस पेपर्स नोंद विभागात ठेवावे लागतात. त्यामुळे अशा खोल्या कागदांच्या ढीगभर थप्प्यांनी ओसंडून वाहत असतात.

एकदा अशाच एका मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने एक वेगळाच ‘संकलन प्रकल्प’ हाती घेतला. त्यांनी नोंद विभागावर चक्क धाड घालून अनेक वर्षांपूर्वीच्या काही ठराविक फायली बाजूला काढल्या. त्या निवडक जुन्या नोंदीमधून त्यांना काही गमतीशीर वाक्ये सापडली. काही वाक्यांमध्ये ठराविक शब्द भलत्याच प्रकारचे होते तर काही ठिकाणी वाक्यरचना गंडलेली होती. परिणामी अर्थाचा अनर्थ झाला होता. नोंदीमधील काही चुकांची खाडाखोड केलेली देखील आढळली. तर अन्य काही चुकांच्या भोवती वरिष्ठ डॉक्टरांनी लाल शाईने गोल काढलेले होते. सहसा अशा चुका अनवधानातून होतात. पण काही वेळेस अशा चुकांतून त्या व्यक्तीचे भाषिक अज्ञान उघड होते.

संबंधित चुका ज्यांच्या हातून झाल्या त्या डॉक्टरांची कदाचित वरिष्ठ डॉक्टरांनी कानउघडणी केली असेल किंवा अन्य काही प्रसंगी त्या वाक्यातून निर्माण झालेल्या विनोदाचा आनंद संबंधित डॉक्टरांनी एकत्रित लुटला असावा. तिकडे जे काय झालं असेल ते असो. अशा गमतीजमतींचे जे संकलन त्या संकलक चमूने प्रसिद्ध केलेय त्यात आज आपण थोडीशी डुबकी मारणार आहोत. त्यातून शाब्दिक विनोदाचा आस्वाद घेता येईल. अशा काही निवडक गमतीजमतींचे स्पष्टीकरणासह केलेले हे छोटे संकलन वाचकांना रोचक वाटावे.
. . .

पहिली केस आहे ताप आलेल्या प्रौढ महिलेची. डॉक्टरांनी तापासंबंधी सर्व विचारपूस केली. तापाबरोबर येणाऱ्या अन्य लक्षणांची पण दखल घेतली. पण नोंद करताना ते लिहून गेलेत :

She has no rigors or shaking chills, but her husband states she was
very hot in bed last night.

बाईच्या नवरोबांनी सांगितलं असेल की रात्रभर ती खूप तापली होती; ठीक आहे. पण डॉक्टरांनी नोंद करताना मात्र hot ऐवजी febrile हा शब्द लिहिणे अपेक्षित होते. पण त्यांनी करून टाकले शब्दशः भाषांतर !
. .
हा बघा गुप्तरोगाच्या डॉक्टरांचा प्रताप. रुग्णाने वेश्यागमनाची कबुली दिलेली आणि काय त्रास होतो ते सांगितलेय. आता डॉक्टर त्याच्या जननेंद्रियाची तपासणी करतात. तिथे प्रथमदर्शनी त्यांना काहीतरी महत्त्वाचे दिसले आणि मग ते लिहून गेलेत :
Examination of genitalia reveals that he is circus sized.

रुग्णाने सुंता केल्याची (circumcised) नोंद करताना त्यांनी शब्दस्पेलिंग तर चुकवलेच आणि शब्दही उगाचच तोडला !
. .
कर्करोगाच्या कक्षातली ही घटना. एका रुग्णाबाबत त्या रोगाचा संशय होता आणि आता खात्रीशीर निदान करण्यासाठी त्याच्यावर biopsy ची तपासणी करायची होती. या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात.

या प्रकरणातला रुग्ण जरा हट्टी होता. डॉक्टरांनी त्याला सगळे समजून सांगितल्यावरही त्याने ती तपासणी करण्यास ठाम नकार दिला. ही महत्त्वाची बाब डॉक्टरांना लिहून ठेवणे आवश्यक होते. पण लिहिता लिहिता biopsyच्या जागी ते लिहून बसले एक साधर्म्य दाखवणारा भलताच शब्द :

The patient refused autopsy.

Autopsyचा अर्थ मरणोत्तर शवविच्छेदन. (कायदेशीर प्रकरणांमध्ये असे विच्छेदन सक्तीचे असते आणि त्याला पोस्टमार्टम म्हटले जाते). मात्र नैसर्गिक मृत्यू झालेल्या अन्य सामान्य प्रकरणांमध्ये एखाद्याच्या मृत्यूचे नक्की कारण जाणून घेण्यासाठी करायचे शवविच्छेदन मृताच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच केले जाते.
इथे मात्र जिवंत व्यक्तीच्या बाबतीत autopsy अशी नोंद झाली आणि अनर्थ झाला !
. .
आता एक चक्कर अस्थिरोग विभागात.
knee pain.jpg

गुडघेदुखीचा रुग्ण आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता आलेले डॉक्टर त्याची विचारपूस करतात. त्याने आपल्या गुडघ्याबद्दलची प्रगती डॉक्टरांना सांगितली अन त्याची नोंद करताना डॉक्टर लिहून गेले :
On the second day the knee was better, and on the third day it
disappeared.

. .

सर्जन मंडळींना शरीरातील विविध ग्रंथींची (glands) तपासणी करावी लागते. त्यामध्ये प्रामुख्याने थायरॉईड, स्तन आणि प्रोस्टेट यांचा समावेश असतो. एखाद्या खूप गर्दीच्या दिवशी या तिन्ही प्रकारचे अनेक रुग्ण जर हाताळले असतील तर डोक्यात आजारांची अगदी सरमिसळ होऊ शकते.
प्रोस्टेटच्या तपासणीसाठी संबंधित पुरुषाला कुशीवर झोपवून त्याच्या गुदद्वारात डॉक्टरांनी बोट घालून त्या ग्रंथीचा अंदाज घ्यायचा असतो. एक मूलभूत तपासणी म्हणून तिचे महत्त्व आहे. एकदा प्रोस्टेटसाठी म्हणून अशी तपासणी केल्यानंतर एक सर्जन बघा काय लिहून गेलेत :

Rectal examination revealed a normal sized thyroid !!

कुठे प्रॉस्टेट, कुठे ती दूरवरची थायरॉईड, पण गफलत झाली आहे खरी. हे वाचल्यानंतर एकाने आणि त्यावर विनोद केला,
“अरे बापरे ! या डॉक्टरांचे बोट एवढे लांब आहे काय” !!
. . .

रुग्णालयातील तातडीच्या वैद्यकीय सेवेचा विभाग नेहमीच गजबजलेला असतो. तिथे असंख्य प्रकारचे वेदनाग्रस्त रुग्ण येतात. त्यांच्या शारीरिक तपासणीबरोबर काही मूलभूत चाचण्यांची सोय तिथे केलेली असते. अशाच एका महिला रुग्णाला x-ray वगैरे तपासण्या करून काही विशेष न निघाल्याने घरी पाठवून देण्यात आले होते. त्याची डॉक्टरांनी केलेली ही नोंद :

While in the Emergency room, she was examined, x-rated and sent home.

..

बद्धकोष्ठाची समस्या तर अनेकांच्या पाचवीलाच पुजलेली असते. या विकारावर निरनिराळे उपचार करून रुग्ण देखील कंटाळलेले असतात. अशाच एक बाई डॉक्टरांकडे नियमित यायच्या. त्यातून परिचय वाढल्याने डॉक्टरनी त्यांच्याशी व्यक्तिगत स्वरूपाच्या गप्पा देखील मारल्या होत्या. एकदा त्या उपचारासाठी येऊन गेल्यानंतर डॉक्टर अवचितपणे लिहून गेले :

She stated that she had been constipated for most of her life,until
she got a divorce.

. .
depression.jpg

मनोरुग्णांच्या नोंदींमध्ये तर अनेक उलटीपालटी वाक्ये बऱ्याचदा आढळतात. अनेक रुग्णांवर दीर्घकालीन उपचार चालू असतात. एका डॉक्टरांनी नैराश्याच्या रुग्णाबाबत केलेली ही टिपणी :

The patient has been depressed since she began seeing me in 1993.
वाक्यरचना गंडलेली .
….
रुग्णालयातील बहुतेक रुग्णांच्या भरपूर प्रयोगशाळा तपासण्या होतातच. लॅबमधून वॉर्डात रिपोर्ट आले की ज्या त्या रुग्णानुसार त्या रिपोर्टचा गोषवारा मुख्य केसपेपरमध्ये लिहिणे हा एक वेळखाऊ उद्योग असतो. एका रुग्णाच्या यकृताच्या आरोग्यासंबंधीचा टेस्ट रिपोर्ट लिहिताना हे डॉक्टर काय लिहून गेलेत बघा :

The lab test indicated abnormal lover function.

एका महत्त्वाच्या शब्दाच्या एकाच अक्षराने चुकलेल्या स्पेलिंगमुळे छानपैकी विनोद होऊन गेला खरा !
..
आणि आता शेवटी शारीरिक तंदुरुस्ती विभागात एक फेरफटका. अनेक संस्थांमधून विशिष्ट कामासाठी नेमणूक करताना शारीरिक तंदुरुस्तीचा दाखला अधिकृत रुग्णालयाकडून मिळवावा लागतो. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांमध्ये अर्थातच निरोगी लोकांचा भरणा जास्त असतो. त्यांच्या काही तपासण्या करून काही सुप्त दोष निघतोय का ते पाहणे हे डॉक्टरांचे काम. सर्व तपासण्या केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा एकंदरीत आढावा घेणारा गोषवारा शेवटी लिहितात. एका मध्यमवयीन व्यक्तीच्या बाबतीत अशी नोंद केली गेली :

Patient has two teenage children, but no other abnormalities.
..

असं आहे हे गमतीदार संकलन. डॉक्टरांच्या सहकारी असलेल्या नर्सेस आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या टिपणांमध्येही अशी 'वेचक रत्ने' सापडतात - त्यांची जातकुळी थोडीफार वेगळी. कळत नकळत अशा चुका हातून होणे हा मानवी गुणधर्म आहे. इंग्लिशमधील नोंदींच्या बाबतीत वरवर पाहता असं वाटू शकेल की ती मातृभाषा नसलेल्या लोकांकडून अशा चुका होतात. परंतु असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. या चुकांची व्याप्ती पाश्चात्य जगतासह अगदी जागतिक आहे ! जालावर त्याचे असंख्य नमुने वाचायला मिळतात.

संपूर्ण संगणकीकरण झालेल्या रुग्णालयांमध्ये देखील अशा नोंदींची अचूकता दाद द्यावी इतकी नाही. हस्तलेखन असो अथवा संगणक टंकन, या दोन्ही कृती करणारा शेवटी माणूसच असतो. स्पीच टायपिंगच्या वाढत्या वापरानंतर तर काही नव्या प्रकारच्या चुका आढळू लागल्यात ( बोलायला गेलो एक. . .!). जोपर्यंत अशा चुकांनी कुठल्याही निर्णय प्रक्रियेवर परिणाम झालेला नसेल तोपर्यंत काळजीचे कारण नाही. अनवधानातून अकस्मात झालेले मनोरंजन अशा दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहता येईल.

तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते. सातत्याने होणाऱ्या काही भाषिक गफलती आणि विनोदांमधून कधीकधी बोलीभाषेला नवे वाक्प्रचारही मिळून जातात. अनेक अभ्यासक्रमांच्या लेखी व तोंडी परीक्षांदरम्यान कधीकधी भले भले विद्यार्थी सुद्धा एखादी गफलत किंवा घोडचूक करून बसतात आणि त्यानंतर दुसऱ्याच क्षणी सावरून स्वतःच्या कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर येते. तणावपूर्ण वातावरणाचा तो परिणाम असतो.

वैद्यकीय वगळता अन्य कार्यक्षेत्रांमध्ये देखील या प्रकारच्या मौजमजा होत असणार. वाचकांनी त्याबद्दलचे आपापले अनुभव प्रतिसादातून लिहिल्यास लेखातून झालेले मनोरंजन द्विगुणीत होईल.
**********************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* foot slept >>
Slipping / Sleeping हा घोळ बऱ्यापैकी पाहिला आहे.

माझ्या next-to-last कंपनी मध्ये एक कॅनेडियन डायरेक्टर होता Bobby J heard त्याला आमचा एक कलीग जो एसईओ टीममध्ये जॉईन झालेला तो साईट ट्राफिक रिपोर्ट्सचे मेल लिहिताना 'Hello Booby' असं मेंशन करत होता आणि ते मेल ट्रेल मल्टिपल डेज चालू असायचे. बिचारा आमचा डायरेक्टर खूप कूल माणूस होता. त्याने एक - दोन वेळा इग्नोर केल, मग मात्र कलीगच्या रिपोर्टींग मॅनेजरला बोलला Man, please ask him to correct my name, It feels so weird, whenever he mail me.

रांजणवाडी = stye >> धन्यवाद. रांजणवाडीला इंग्रजीत काय म्हणतात हे माहीत नव्हतं. In fact इंग्रजांना रांजणवाडी होतच नसेल असं वाटायचं कारण हे नाव महाराष्ट्रातल्या दुर्गम गावाचं वाटतं. अस्सल देशी रोग असावा अशी समजूत होती.

'Hello Booby >> Happy
* * *
राजकारणी आणि वैद्यकीय विनोद
आचार्य अत्रे यांनी सांगितलेला हा किस्सा पूर्वी अंतर्नाद मासिकात वाचलेला आहे.

महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार हे एकदा नागपूर येथे Radiology विभागाचे उद्घाटन करण्यासाठी एका रुग्णालयात गेले होते. तेथील सर्व उपकरणांवर नजर टाकल्यानंतर त्यांनी अनवधानाने विचारले,

“मला येथे आधुनिक पद्धतीचा एकही Radio कसा कोणी दाखवला नाही ?”

बँकिंग बाह्य लोकांसाठी थोडी माहिती
बँक लोकांकडून ते पैसे deposit म्हणून घेते त्याला liability म्हणतात लोकांना जे पैसे देते त्याला लोन न म्हणता asset म्हणतात.
ज्या कर्जाचे हप्ते नियमित येतात त्याला performing asset
परत न येणाऱ्या/हप्ते थकणाऱ्या/अनियमित हप्ते असलेल्या
कर्जाला non performing assets
या अमेरिकन इंग्लिश मधील संज्ञा आहेत.
सर्वसामान्य इतर व्यवसायाच्या अकाउंटिंग मध्ये ॲसेट आणि लायबिलिटी म्हणजे देणे व येणे. त्यात फिक्स एसेट म्हणजे मशीनरी फर्निचर वगैरे
जागतिकीकरणानंतर या संज्ञा भारतीय बँकांमध्ये रूढ झाल्या
आमच्या बँकेत एकाच वेळेस संगणकीकरण चालू होते व
बुडीत कर्जे वसुलीचेही काम चालू होते.

पूर्वी बँकेत कर्मचारी असलेल्या व नंतर केंद्रीय मंत्री झालेल्या एका नेत्याला बँकेत बोलवले होते.

मंत्री महोदय भाषणात सुमारे एक तास "
बँकेतील टेबल खुर्च्या लेयर वगैरे फर्निचर हे नवीन संगणक येणार असल्यामुळे नॉन परफॉर्मिंग कसे झाले आहे व संगणक आल्यावर नवीन फर्निचर येऊन जुन्या फर्निचर काढून टाकावे लागेल कारण ते नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून
हे काम लवकरात लवकर आठ दिवसात व्हायला पाहिजे असा सरकारी आदेश आह"
वगैरे कडक दम देत होते. ते एका शिस्तबद्ध संघटनेचे कार्यकर्ते असल्यामुळे हे बोलताना त्यांच्या चेहरा कठोर पाणीदार झाला होता, संघटनेचे विशिष्ट तेज त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होते
स्टेजवरील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आम्हा अधिकारी मंडळींना हसायची पंचाईत झाली !

निवांत वाचायला बाजूला काढून ठेवला होता. भयंकर किस्से आहेत. मस्त लिहीलेय. Lol प्रतिसादांपैकी काही वाचून झाले,धमाल आहेत. Happy

* एनपीए >> भारी.
वैद्यकीय क्षेत्रातील एनपीए म्हणजे Non Practicing Allowance
. . .
* 'स्टाय' >>> बरोबर.
. . .
रच्याकने
तोंड येणे = stomatitis
( एखादा माऊथ कम ऐकला नाही ना कोणी ? Happy

"आईज् हॅव कम" बऱ्याचदा वाचलंय मात्र "माऊथ हॅज कम" असे नाही ऐकले / वाचले.

रच्याकने एकच डोळा आला आहे असे नाही का होत कधी? नेहेमी डोळे आले आहेत असेच ऐकले आहे.

* एकच डोळा आला आहे >> चांगला प्रश्न !

जेव्हा डोळे येण्याची साथ असते तेव्हा दोन्ही डोळ्यांना इन्फेक्शन झालेल्या केसेस अधिक प्रमाणात आढळतात. सुरुवातीस एकच डोळा येऊ शकतो परंतु त्याची लागण दुसऱ्या डोळ्याला होण्याची शक्यता खूप असते.

मात्र, काही विशिष्ट प्रकारचे डोळ्यांचे आजार असे आहेत की ज्यामध्ये फक्त एकाच डोळ्याचा दाह होतो ( ऑटो इम्यून, इत्यादी) जर दीर्घकाळ एकाच डोळ्याला दाहसमस्या झाली असेल तर त्याची सखोल चिकित्सा करावी लागते. अशाप्रसंगी डोळ्यांचा काही अवघड आजार असू शकतो

https://www.aao.org/eyenet/article/chronic-unilateral-conjunctivitis

तोंड येणे = stomatitis

>> बऱ्याच ठिकाणी मध्ये माऊथ अल्सर म्हणले जाते तोंड येण्याला. वेगवेगळे आहेत का दोन्ही?

Lol
Booby

पियू,
जेव्हा तोंडाच्या अंतर्गत भागाला जंतूसंसर्ग, इजा किंवा एलर्जी होते, त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेला Stomatitis ( लालभडकपणा व किंचित सूज) असे म्हणतात आणि ही अवस्था जर पुढे अधिक खराब झाली तर चढत्या क्रमाने erosionulceration अशा जखमा होतात.

मस्त लेख!

  • "she was very hot in bed last night."
  • "circus sized."
  • "Patient has two teenage children, but no other abnormalities."
  • " incontinence"
  • " constitution"
  • " mated with him"
  • "Must have been painful!"
  • Happy Happy Happy

इक सिर्फ हमही मय को
आंखोसे पिलाते है - आबा पाटील यांनी बंद केलेला व्यवसाय

=====

किसीके मुस्कुराहटोंपे - स्वतःच्या सोडून दुसऱ्याच्या भावना जपण्यातून चांगुलपणाचे श्रेय मिळवण्यात अभिमान बाळगणे

=====

तुम जो कहदो तो आज की रात चांद डुबेगा नही - अंतराळवीर

=====

नाम अब्दुल है मेरा सबकी खबर - पत्रकार

=====

ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार - समीक्षक

=====

दुनिया बुरा माने तो गोली मारो - व्यवसाय सांगायला नको

=====

वावे Lol

तुम जो कहदो तो आज की रात चांद डुबेगा नही - अंतराळवीर >> हे आवडलं Happy त्या धाग्यावर अगदीच हिट होईल.

सर्वांना धन्यवाद !
..
* गमतीचे प्रात्यक्षिक >> आवडले Happy
पण . . .
अपेक्षित गल्ली कोणती होती ??

अपेक्षित गल्ली व्यवसायासंबंधित गाणी (स्वाती आंबोळेंचा धागा) Happy

छान धागा कुमार सर
दसा, भरत, संभा छान किस्से
झकास राव, पियू, चामुंडराय, छबुराव प्रतिसाद मस्तच.
वाचतोय अजून
बेफिकीर, आयडी सार्थ झाला.

धन्यवाद हो !
आणि
मी पुन्हा येईन >>> अरे वा ! हे नामांतर तर भलतेच सार्थ आणि समयोचित झाले. Happy Happy

येऊ द्या तुमच्याही पोतडीतला एखादा बाहेर . . .

Pages