भास की सत्य किंवा काहीतरी दुसरेच?

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 28 November, 2024 - 04:07

रस: भयानक
वृत्त: देवराज

काळ रात्र थंडगार शांत गूढ दाटते
चांदणे सभोवती निळे धुके लपेटते
पेटवू किती पुन्हा विझे मशाल का बरे?
सापडे न मार्ग रानभूल भास बावरे

उंच चौकटीत काळतोंड कोण राहते?
मान काढुनी उगा इथे कशास पाहते?
लांब नाग झेप घेत पायवाट रोखतो
दात दावुनी खुशीत तो अभद्र हासतो

ऐकते शिटी कधी हळूच आत वाजते
जोरदार थाप धप्प बंद दारि मारते
कोण येत-जात रोज पावलांस वाजवी
का कुणास ताल देत घुंगरास नाचवी?

सावली बनून क्रुद्ध चेटकीण भांडते
आरश्यात गूढ गीत गात दुःख रांगते
गर्द सावलीत खोल डोह गुप्त नांदतो
बोट लांब दावुनी मध्ये मध्ये खुणावतो

भास हे जरी फिजूल सत्य कोण जाणते ?
कापरे कणाकणात घाबरून राहते
सत्य आणि भास यातओळखू कसे बरे
जे मनी वसेल तेच सत्य वाटते खरे

-डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे अणि anjali_kool

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व ओळी स्वतंत्रपणे आवडल्या व एकसंघ परिणाम मात्र जरा गूढ झाला.

देवराज की चामर!

रस - रसात
आरसा - आरश्यात (आरशात नव्हे) - ही आपली माझ्याकडे असलेली माहिती उगाच डकवली.

(रस - रसात हे फक्त उदाहरणादाखल लिहिले आहे)

अहा! पहिला प्रतिसाद बेफी ह्यांचा... वाचून खूप छान वाटले.
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. व्याकरणातील चूक लक्षात आणून दिली, बदल केलेला आहे.
देवराज आणि चामर परत वाचते आणि प्रतिक्रिया देते.
सामो धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल.