‘बॉय’ ऑर ‘गर्ल’?

Submitted by एम.जे. on 25 November, 2024 - 21:12

गंगोत्रीहून सोनप्रयागच्या वाटेवर पाय मोकळे करायला बसमधून उतरलो होतो तेव्हा गप्पाष्टकांचा घोळक्यात न्यूजर्सीहून आलेली मरिया होती. तिचे आईवडील इटलीहून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत येऊन वसलेले. साहजिकच अमेरिकेत वाढलेली असली तरी मरियाच्या बोलण्यात इटालियन लहेजा होता. तिचं बोलणं ऐकताना बीबीसीची ‘माईंड युअर लँग्वेज’ मालिकेची आठवण झाली. गोरा वर्ण, भुरे केस, मध्यम बांधा आणि घरेलू, कुटुंबवत्सल लूक असलेली मरिया प्रवासाने जास्तच थकल्यासारखी वाटत होती. मी टेक्सासची रहिवासी आहे हे ऐकून ती पटकन म्हणाली, “तुला जेट लॅग नाही लागला?” मी अमेरिकेहून २ आठवडे आधीच भारतात आलेली असल्यामुळे त्यावेळी पुण्याहून दिल्लीमार्गे तिकडे गेलेली होते. भारतीयवेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास तिचे मिटायला लागलेले डोळे आणि जागं राहण्याच्या प्रयत्नात लालसर होऊ घालेला चेहेरा बघून मी हसले आणि तिला हळूच म्हणाले, “मी जरी काही काळ अगोदर अमेरिकेतून आलेली असले तरी मला जेट लॅग लागत नाही…” ते ऐकून मरिया उत्सुकतेने माझ्याकडे बघायला लागली. मी तिला हळूच उपाय सांगितला आणि प्रयोग करून बघ असं सुचवलं.

दोन दिवसांनी श्रीकेदारनाथहून परतताना घोडापॉईंटवरून हॉटेलकडे चालत निघालो असता मरियाने मला गाठलं. “तू सांगितलेल्याचा उपयोग झाला, बरं का!” तिच्या आवाजात प्रत्ययकारी आनंद जाणवत होता. मी हसले. वाटेवर चालता चालता सहज गप्पा सुरु झाल्या. विषय अर्थातच अमेरिकन निवडणुकांपाशी आला. तिला माझ्या मतांविषयी उत्सुकता होती.

राजकारण हा विषय तसा संवेदनशील असतो. इतक्यातच मला माझ्या एका मावशीने विचारलं, “तू राईट विंग ना? म्हणजे मोदी समर्थक आहेस ना तू?” मी म्हटलं, “तसं बघितलं तर हे डावं, उजवं ठरवणं हीच एक गंमत आहे. पक्षी एका पंखाने उडू शकतो का? सर्वसमावेशकता, दूरदृष्टी असलेलं खंबीर नेतृत्व हवं… आज मोदींशिवाय पर्याय आहे का देश चालवायला? आणि बांग्लादेशांत काय झालं ते पाहिलंस ना? हे डावे म्हणवणारे कुठल्या थराला जातील याचा नेम नाही. मग संस्कृती, देश, बहुजनसमाज खड्यात गेले तरी चालतील. या आंदोलनजीवी डाव्यांच्या सगळ्या चळवळी प्रायोजिक असतात. कांगावा, बिभत्स, विध्वसंक मानसिकतेचे प्रदर्शन करून नंतर कुठे गायब होतात त्याचा पत्ता लागत नाही!”

अमेरिकन निवडणुकांवर मरियाच्या विचारांचा कल काय असेल याचा विचार करतच मी तिला म्हटलं, “वयाचा विचार करून बायडन शर्यतीतून बाहेर पडले हे बरे झाले. कमला आली तर अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळेल…” मरियाच्या चेहेऱ्यावर किंचित आठी उमटली. लोकांच्या भाषेत बोलायचं तर ती राईट विंग असावी. मी माझं बोलणं न थांबवता पुढे चालू ठेवलं. “ओबामाचे राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही कार्यकाळ युद्धखोर बुश प्रशासनानंतर तसे अमेरिकेची प्रतिमा राखणारे होते. मिशेल ओबामाही छाप पडणारी होती. त्यादृष्टीने वरकरणी ट्रम्प जरी थोडं ताळतंत्र सोडून वागत बोलत असताना दिसला तरी तो अमेरिकेचा विचार करतो. बिझनेस माईंड असल्यामुळे फायदा तोटा त्याला कळतो. शिवाय ‘दहशतवाद’ या विषयांत अमेरिकेचा पूर्वीचा दुटप्पीपणा हद्दपार करताना ट्रम्पने कुठलीही भीड न ठेवता भाष्य आणि कृती केलेली आहे… राजकारणात ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने सजग राहून तारतम्याने सरकार निवडावे लागते. कमला आणि डेमोक्रॅटिकवाले हे जे ‘संविधान बचाओ’ वगैरे नारे लावत आहेत ते जरा धोक्याचे वाटतात. आजरोजी अनिवासी भारतीय म्हणून मलाही ट्रम्पच भारताच्या दृष्टीने सुलभ पर्याय दिसतो आहे.”

मरिया संमतीदर्शक हसली. “अगदी बरोबर बोललीस तू ! ट्रम्पच्या बोलण्याकडे कधी कधी दुर्लक्ष करावं लागतं मात्र त्याच्या सरकारच्या पॉलिसीज चांगल्या होत्या. प्रशासन उत्तमरीतीने काम करत होतं. बायडनचा एकूणच कारभार ढिसाळ होता. प्रशासनावर अजिबात पकड नव्हती. हे लोकं बोलत एक होते आणि काम वेगळंच काहीतरी चालू होतं. अमेरिकेचा विचार करायचा असेल तर ट्रम्प जसा आहे तसा बरा मानून घ्यायला लागणार आहे. वैयक्तिक प्राणघातक हल्ले आणि मागच्या पराभवाचा विचार करता तो ही धडा शिकला असेल आणि यावेळी वागताना भान ठेवेल असं म्हणायला हरकत नाही!”

नोव्हेंबर पाचला मतदानाची आठवण करून देणारे दारावर फिरत होते. रात्री मतमोजणी सुरु झाल्याच्या बातम्या झळकल्या. व्हाट्सअँपवर चालू झालेल्या मिम्स… “अमेरिकन जनमनाचा कौल… आता बाळंतकळा सुरु… येत्या २४ तासांच्या आत निकाल लागेल, ‘मुलगा’ की ‘मुलगी’?”

“ट्रम्प की कमला? तुम्हाला कोण वाटतं येईल?” मी घरात मुलींना विचारलं. त्यांना याविषयात फारसा गंध नव्हता… पण एकसुरात उत्तर आलं “कमला!”… “का ग? कमला का हवीये तुम्हाला?” त्या गोंधळल्या… आणि मग म्हणाल्या, “कारण ‘कमला’ ही मुलगी आहे!” त्यांचा निरागस भाव न मोडता मी त्यांना विचारप्रवृत्त करत म्हणाले, “असं थोडंच असतं, कोण कसं काम करणार, धोरणं कोणती राबवणार, देश कसा पुढे नेणार यावर ठरवायला हवं ना? पाहाल उद्या, ट्रम्पच जिंकणार आहे!”

खरोखर ट्रम्पतात्याच निवडून आले. ‘हिलरी क्लिंटन आणि कमला हॅरिस अशा दोन स्त्रियांबरोबर वादविवाद जिंकलेला ट्रम्प हा एकमेव अमेरिकन पुरुष आहे…’ ही दुसऱ्या दिवशी सकाळी व्हाट्सअँपवर आलेली मिम अमेरिकेच्या २०२४ च्या ‘बॉय’ ऑर ‘गर्ल’? या यक्षप्रश्नाचं उत्तर घेऊन आलेली होती. लागलेले निकाल पाहून मरियाही नक्कीच समाधानी झालेली असेल!

~
सायली मोकाटे-जोग
https://sayalimokatejog.wordpress.com/2024/11/23/boy-or-girl/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय. अर्थात या विषयातले फारसे माहित नाही पण मुलींची प्रतिक्रिया वाचुन माझ्या भाच्याची राहुल गांधीवर प्रतिक्रिया आठवली. राहुलला मस्त खळी पडते म्हणुन मी त्याला सपोर्ट करतो असे तो म्हणालेला. Happy

केदारनाथ प्रवासाचे अनुभव वाचायला आवडेल.

जेट लॅगवरील उपाय काय हे जाणून घ्यायची मलाही उत्सुकता ... असा उल्लेख करून न सांगणे योग्य नाही Happy

मोदी आणि डावे यांच्या बद्दलचा पूर्ण पॅरेग्राफ वाचून धाग्याला शुभेच्छा द्याव्या असे वाटते Happy

राहुलला मस्त खळी पडते म्हणुन मी त्याला सपोर्ट करतो>>> आमच्या राहुलला (शाहरूखला) सुद्धा छान खळी पडते Happy
पण हे राजकारणी नाही तर क्रिकेटरबाबत सुद्धा होतेच. म्हणजे खेळतो कसा ऐवजी दिसतो कसा यावरून देखील आवडीचा प्लेअर ठरवला जातो.

क्रिकेट मध्ये सुद्धा एक राहुल आहे .. (के एल नाही द्रविड)
तो जितका क्लास फलंदाज म्हणून क्रिकेटप्रेमींना आवडतो तितकाच क्लास दिसतो म्हणून महिला क्रिकेटप्रेमींना आवडायचा..
या नावात काहीतरी स्पेशल आहे Happy

मस्त लेख.

राहुल महाजन सुद्धा मस्त आहे. लोक त्याच्या हास्यावर फिदा आहेत.

ह्या "बॉब"ची स्त्रीयांबद्दलची वक्तव्ये ऐकून माझा ऊर आदराने भरून गेला. त्या श्री श्री १०८ "बॉब"ला माझा साष्टांग प्रणाम!

राजकारण गमतीदार असते खरे. राजीव गांधी हत्या झाली तेव्हा गॉगल लावलेली सोनिया काय सुंदर दिसतेय अशी म्हणारी माणसेही मी पाहिली आहेत. या सोनियाने नको जीव केला मनमोहन सरकारच्या काळात. ट्रंम्पच्या चरित्राबद्दल तर न बोललेलेच बरे. आणि रागा वर तर देशास घातक विदूषक आहेच. असो.
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!

जेटलॅगवरचा उपाय यावर जाणून घ्यायची इच्छा असल्यास, कृपया वैयक्तिक संपर्क करावा - https://sayalimokatejog.wordpress.com/contact/

आणि रागा वर तर देशास घातक विदूषक आहेच>>व्वा. अजून तारे तोडा. कोट्यावधी तारे आहेत! तोडता तोडता थकून जाल. तोडा. तोडा. मायबोली आपलीच आहे.

< या सोनियाने नको जीव केला मनमोहन सरकारच्या काळात. ट्रंम्पच्या चरित्राबद्दल तर न बोललेलेच बरे. आणि रागा वर तर देशास घातक विदूषक आहेच.> अगदी अगदी. फक्त ट्रंपबद्दल तीव्र असहमती. अमेरिकेत चालतं की हे. काही राष्ट्राध्यक्षांनी तर पदावर आल्यावर काय काय केलं.

बाय द वे, या तुम्ही आहात का?