बीटरूटची गुलाबो

Submitted by अनिंद्य on 13 November, 2024 - 03:55

काही घरात कुणालाच बीटरूट आवडत नाहीत. मग त्या घरातलेच काही लोक मुद्दाम बीटरूट आणतात बाजारातून. एक दोन न आणता चांगले ४-५ आणतात. तो पदार्थ कुणाच्याही घश्याखाली नाही उतरत ना ? मग असे सर्वच पदार्थ जास्त प्रमाणात आणायचे असतात, तसा नियमच आहे. बीटरूटचा अपवाद करता येत नाही. का करावा ?

IMG_7527.jpeg

पुढचा संपूर्ण दिवस बीटरूट पिशवीतून काढणे, त्यांना दोन तीन पाण्यात न्हाऊनमाखून स्वच्छ करणे, कोरडे करून एका जागी ठेऊन मग काही वेळाने ती जागा बदलणे असे काहीजण करतात. तसे करायलाही पाहिजे. मग तोपर्यंत संध्याकाळ होते. मग आपले जे काही ठरले असेल ते डिनर रांधावे, खावे, झोपी जावे असा परिपाठ आहे.

सकाळी बीटरूट दिसले की “कौन नामुराद ये खाएंगा क्या जाने” असे मोठ्याने म्हणतात, म्हणावे. याऐवजी दुसरे सुयोग्य शब्द योजण्याची मुभा आहे, ती सोय वापरता येते. काहीही म्हटले तरी कुणीच ते ऐकत नाही किंवा ऐकले तरी न ऐकल्या सारखे करतात, त्याकडे दुर्लक्ष करावे लागते.

किचनमधली आपली सर्व कामे उरकून नोकरी-धंदा, wfh, क्लिनिक, ऑफिस, शाळा- कॉलेज जे काही असेल ते करण्यासाठी मेंबरं पांगतात. तत्पूर्वी कुणीतरी सर्व बीटरूटांना आठवणीने फ्रिजमधे ढकलावे लागते कारण बाहेर ठेवले तर ते लवकर पिकतात. या स्टेजला बीटरूट ऑलरेडी लाजू लागलेले असतात. सेम टू सेम टमाट्यांसारखे. Blushing Beetroot Red असे उगाच नाही म्हणत साहेबाच्या भाषेत. त्या भाषेला आपल्याकडे आधी वाघिणीचे दूध असे म्हणत. आता आपण ते दूध नासवून त्याचं पनीर केलयं. पण तो आपला चर्चाविषय नाही. एक मिनिट, That reminds me - फ्रिजमधे फ्रेश दुधाचं केलेलं पाढरं शुभ्र पनीर आहे ठेवलेलं. त्याचं कांपोस्ट ख़त होणार की ते मनुष्यमुखी पडणार हे गुपित ब्रम्हदेवालाच माहिताय. ब्रम्हदेवांना आणि त्यांच्या पिताश्रींना ठाउक असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी हा एका गंभीर चर्चेचा विषय आहे. पण ते आत्ताच नको.

Cut to evening.

आता बहुतेक कामं संपली आहेत. नेहेमीपेक्षा थोडी लवकरच. चहासाठी दूध पाहिजे म्हणून ते शीतकपाट उघडले जातेय. (Refrigerator ला फ्रिज आणि मग शीतकपाट असे चढत्या भाजणीने भारी शब्द लेखक वापरतो आहे, त्याचं लॉजिक समजून घ्या) तर तिथे जुन्या जमान्यातल्या नवीन नवरीसारखे लाजून चूर झालेले बीटरूट सलज्ज मुखाने तुमच्याकडे बघतील, बघतात. “आँखों की गुस्ताखीयाँ माफ हों” असे गाणेही वाजेल, वाजते ब्यागराउंडला. कैसे बचोगे ? सोचो सोचो.

आता चहा तर झाला. भूक लागलीच आहे. ते लाजरे साजरे बीटरूट कधीही मुसमुसून रडायला येतील या स्टेजला आहेत. चढती जवानी मेरी .. तू ने कदर ना जानी रामा असे गाणे ब्यागराउंडला वाजते आहे. उस दर्द को समझो. फ्रिजच्या पडदयाआड असले तरी बीटरूट डोळ्यांसमोरच आहेत. “ये जो चिलमन है दुश्मन है हमारी” गात आहेत.

बहुत हो गया. हीच ती वेळ. फैसले की घडी. आता तो प्रश्न उभा ठाकलाय. यक्ष की गंधर्व प्रश्न म्हणतात तोच. तारुण्याने मुसमुसलेले, मदनभार मज सोसवेना अशी अवस्था असलेले बीटरूट आता आत्महत्या करतील त्याआधी त्यांचा काहीतरी खाणेबल पदार्थ रांधण्याचे काम ज़बरदस्तीने ओढवून घेणारा नरपुंगव कोण ? (नारीपुंगवी असा शब्द आहे का? कुठाय रे तो मराठी बृहद्कोष ? ) कोण हे गांडीव उचलणार ? लाख टके का सवाल. सीता-द्रौपदीच्या स्वयंवरासारखे रामार्जुनाच्या धनुष्याचे रोमांचक टणत्कार ह्या कर्णसंपुटांना कधी चुंबणार ? Time freezes. समय जैसे रुक गया है.

तेव्हढ्यात वीज लकाकते. समस्त सरीसृप जागीच थबकतात. एक पुरंध्री आणि तिचा प्राणसखा दोघे ताडकन उठतात. उतणार नाही मातणार नाही असे मूक आश्वासन एकमेकांना देतात. आँखों आँखों मे.

युद्धाला तोंडच काय हात, पाय, नाक, कान फुटतात. चारदोन बटाटे उकडले जातात.त्यांच्या सोबतीला कॉर्न दाणे उकळत्या पाण्यात सती जातात. हिरव्या मिरच्या, कांदे आणि कोथिंबिराच्या जुडीचे निर्घृण हत्याकांड घडते. काट कर बोटी बोटी ! उडवीन चिंधड्या राई राई एव्हढ्या.

तिकडे बीटरूट हसतात, सवयीने पुन्हा लाजून चूर होतात. पण आता माघार नाही. त्यांना आधी स्टीम बाथ. मग हार्ड स्किन रब. मग किस द किसणीचा खेळ. सगळीकडे रंग गुलाबी ! आता ? अब पिया मिलन को जाना.

तापलेले, खुडलेले, भाजलेले वरचे सर्व कलाकार सब दुख दर्द भूल के एकत्र जमतात. “हम साथ साथ हैं” चे आश्वासक सूर शिंपतात. नेहेमीचे मसाले धावून येतात. हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं म्हणणारा black salt विशेष अतिथी. रायगडाप्रमाणे इथे ब्रह्मदेवाला जाग येते - मोक्षासाठी फ्रिजमधे कठोर तपस्या करित असलेले पनीर धावून येते, स्वत:ला या गर्दीत झोकून द्यायला. भेटी लागे जीवा चे एक आर्त आवर्तन !

इन सब रोमांचकारी घटनाओं का नतीजा : गुलाबो उर्फ़ पिंक टिक्की उर्फ़ blushing cutlets Happy गुल खिले गुलाबी, मौसम हुआ गुलाबी. जोडीला आनंदी आनंद गडे. सांगू मी सांगू कुणाला वगैरे.

Why should pink pasta and pink wine steal all the glam ? मेरे बीटरूट किसी से कम है के ? 869a6b5c-e507-432b-b7f2-de0b0260f1a3.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आणि सत्य परिस्थिती विशद करणारी पाकृ.

मला बीट आवडतं. नुसते उकडून आमटी भात, खिचडी बरोबर घासागणिक एक उ बीटाचा तुकडा मस्त लागतो.

मस्त खुसखुशीत लिहिलं आहे. मस्तच.
बीट आवडते उकडून खायला.
प्लेट आणि तीतले पदार्थ , दोन्ही सुंदर.>>>>+१

नवीन नवरीसारखे लाजून चूर झालेले बीटरूट सलज्ज मुखाने तुमच्याकडे बघतील>>>>> पण जरा जास्त दिवस राहिले तर त्याच मुखावर सुरकुत्या येऊन जरावस्था प्राप्त होते त्यांना. Lol

मस्त!
मला आवडते उकडलेल्या बीटाची कोशिंबीर.

किती छान लिहिलं आहे, अनिंद्य !
बीट ह्या विषयावर इतके सुंदर कसे कुणी लिहू शकते?
Happy
पनीर ही घातले का त्यात?
मग चार-पाच बीट, आणि बटाटे आणि कॉर्न आणि कांदा -कोथिंबीर आणि पनीर...खूपच ऐवज झाला असेल ना?

मस्त खुसखुशीत लिहिलं आहे. पदार्थ ही छानच दिसतोय.
बीट रूट आवडतं मला. दही घालून गुलाबी कोशिंबीर दिसते मस्त आणि लागते ही छान.
कांदा , मिरची, दाण्याचं कूट घालून बटाट्या सारखी भाजी पण आवडते.
मुख्य म्हणजे पाव भाजी करताना थोडस घातलं तर रंग मस्त येतो.

.. .खूपच ऐवज झाला असेल ना?

आता नावडतीच्या अळणी मिठाला खारट करायचं तर त्यात समुद्र ओतावा लागतो. तसंच है Lol

बाकी बीट या विषयात आय एम अन”बीटे”बल Lol

अरे मस्त , खुसखुशीत लेख...
बीटाला मी आजवर पार्शली बीटन होतो. ही मारामारी चाखल्यावर संपूर्ण बिनशर्त शरणागती होईल आणि अस्मादिक पांढरे निशाण फडकवतील.

छान लिहिले आहे . माझी थोडी कमी साहित्याची रेसिपी - जाड पोहे भिजवून घ्यायचे . त्यात उकडलेले बीट आणि बटाटा किसून घालते. मिरची लसूण पेस्ट घालते . कांदा आणि इतर भाज्या ऐच्छिक. मीठ आणि थोडा गरम मसाला घातला की सगळा ऐवज नीट मळून घायचा . वरून रवा लावून टिक्की शॅलो फ्राय करायच्या.

बीट उकडून खायला आवडते.माबोकर सामो यांच्या कृतीनिसार बिटाची कोशिंबीर.पण ती किसा किसी करण्यापेक्षा उकडलेले बिट झिंदाबाद!

फारच छान लिहिलंय. दक्षिणेत बीट ची भाजी करतात ( काचऱ्या छाप) खाल्ली आहे का? महाराष्ट्रात मात्र कोशिंबीर, पराठे आणि कटलेट एवढंच प्रचलित आहे.

@ निनाद

अहो इथे घरातले चार बीट संपवायला हे महाभारत घडतेय आणि तुम्ही दक्षिण दिग्विजयासाठी सैन्य सिद्ध करायला सांगताय ! Happy

हलके घ्या. गमतीचा मूड आहे आज.

अय्यो बीट का नाही आवडत लोकांना...
मी तर त्याच्या रंगाच्याच प्रेमात आहे. सलाडमध्ये ते हवेच.

लेख मस्त लिहिला आहे!

बीटच्या चिप्स सुद्धा फार मस्त लागतात. ज्यांना बीट आवडत नसेल त्यांनी ट्राय करा जरूर..

दसा,

पार्शली बीटन Lol This is intelligent one !

मजेशीर लिहिलंय. Happy

>>> असतात अशी लोकं. दहा माझ्या घरातच आहेत
त्यापैकी सर्वांत बिटर कोण आहे? Proud

Lol
मन लावुन वाचलं, हसलो. पण घरातील बीट संपवायला कृती येईल येईल म्हणता म्हणता आलीच नाही! Proud
आमच्या कडेचे लोक बीट प्रकृतीला चांगले म्हणून आणतात. पण ते बीट पोटात गेल्यावर चांगले हे त्यांच्या गावीच नाहीये. ते निस्ते आणतात आणि फ्रीज... आपलं शीतकपाटात ढकलतात. मग एक दीड महिना झाला की रंगपंचमी खेळून धरणीमाता ते पोटात घेते. त्या आधी लोळत पडण्यावरुन काही बोललं किंवा आणण्यावरुन काही बोललं तर मलाच पोटात घेईल. कांट बीट दॅट फीलिंग. तर आज बीट उकडुन पोटात दवडू. तुमची कृती आली की त्या खेपेला टिक्की. Proud

मस्त लिहिलंय.
मी उकडलेल्या बिटाची कोशिंबीर करते. उ बी बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून वर दाण्याचं कूट, मीठ साखर, कोथिंबीर बारीक चिरून आणि वर फोडणी. आमच्याकडे कोशिंबीरीची फोडणी आवर्जून वेगळी न करता भाजीसाठी करायची फोडणीच जरा जास्त करून, मिरची घालून त्यातून पटकन कोशिंबीरीसाठी लागेल ती वेगळ्या वाडग्यात काढून त्यातच बाकी चिरलेलं मटेरिअल ठेवते मी. वाढून घेताना दही घालून एकत्र करायची. लेकीला आणि तिच्या एका मैत्रिणीला खूप आवडते म्हणून मीपण 2 वेगळे छोटे डबे देते.

मस्त लिहिलंय. आवडले. Happy
बीटचे कटलेट , बीट गाजर हलवा, बीटाची कोशिंबीर करते मी. त्याचा earthy- nutty flavor आवडतो. कच्चाही चालतो मला पण इतरांसाठी उकडून ठेवते. मी बीट ज्यूस व पेट्रोलियम जेली मिसळून टिन्टेड लिप बामही केले होते, इतका रंग मोहक वाटतो. Happy

बायदवे, मायकेल जॅक्सनचे 'Beat it' तुमच्या खुसखुशीत लेखामुळे आठवले. Happy

टिन्टेड लिप बाम ! आयडिया योग्य कानांपर्यंत पोहचवणेत येईल.

तुम्ही लिहिलेले बीटरूटीय पदार्थ सासरी होतात. अस्सा सासुरवास करतात मला बघा, (इथे अश्रु टिपणारा बाहुला कल्पावा) Lol

याच कच्च्या मालातून fake meat steaks वगैरे केले होते, त्याचे फोटो नंतर पोस्टतो.

धमाल लिहीलं आहे. मला बीट इतके आवडत नाहीत की मी विकतच आणत नाही ते Proud एकदाच कधीतरी फार्मर्स मार्केटातून आणले होते तेव्हा त्यांचं काय केलं होतं ते ही आता आठवत नाहीये. इतकंच आठवतंय की बीटाच्या पानांची भाजी मस्त होते Proud

मध्यंतरी आलिया भटची बीटची कोशंबिर नेटवर गाजत होती . तिचे डायट फूड आहे म्हणे . मी करुन पाहिलेली
हा फोटो :
20220816_203052.jpg

Pages

नवीन प्रतिसाद लिहा