ताराने लगबगीने दरवाजा उघडला. तिच्या अपेक्षेप्रमाणे दारात संतोष उभा होता. संतोष. तिचा नवरा. मूळचा गहूवर्णी रंगाचा ; पण कामानिमित्ताने उन्हातान्हात भटकावे लागत असल्यामुळे जरासा रापलेला, काळवंडलेला चेहरा, मध्यम उंची, किरकोळ शरीरयष्टी. दिवसभराच्या श्रमाने सारं शरीर घामेघुम झालेलं. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. पण या थकव्यातून उत्पन्न होणाऱ्या वैतागाचा मात्र त्यावर लवलेशही दिसत नव्हता. उलट तो आज खुश दिसत होता. डोळ्यांत चमक होती ओठांवर स्मित होतं.
" आलात ? या." नवऱ्याचं हसतमुखाने स्वागत करत तारा म्हणाली. हातातील पिशव्या तिच्याकडे देऊन संतोष आत आला. त्यांची मुलगी स्वाती आईने काही सांगण्या अगोदरच टीव्ही बंद करून किचन मधून पाणी घेऊन आली होती.
" पपा. पाणी घ्या." पाण्याचा ग्लास संतोषला देत स्वाती म्हणाली.
" थॅंक्यू. " खुर्चीवर बसत संतोष म्हणाला. " पण काय गं, टी. व्ही बघत बसली होतीस. काही अभ्यास वैगेरे नाहीये का ? "
" पपा.. माझा अभ्यास झा..." स्वाती चाचरत म्हणाली.
" झालाच असणार. माहितीये मला. मी गम्मत केली गं तुझी. मला चांगल ठाऊक आहे, माझी मुलगी अभ्यास कंप्लीट केल्याशिवाय कसलाही टाईमपास करत नाही ते. " हसून तिच्या गालावर थोपटत संतोष म्हणाला. स्वातीही मग मनमोकळेपणाने हसली.
" हं, तारा ती सफेद पिशवी दे बरं इकडे." संतोष.
ताराने पिशवी त्याच्याकडे दिली. त्याने पिशवीतून एक आयताकृती बॉक्स काढून तिच्याकडे दिला. तिने तो उघडून पाहिला तर त्यात तिच्या आवडत्या अबोली रंगाची एक सुंदरशी साडी होती.
" अय्या साडी." तारा चकित होऊन उद्गारली. तिच्या स्वरातील आनंद जाणवून संतोष मनोमन सुखावला.
" आणि हे तुझ्यासाठी." तसाच दुसरा एक बॉक्स स्वातीला देत संतोष म्हणाला.
" अहो पपा, आताच माझ्या वाढदिवसाला तर ड्रेस घेतला होतात. लगेच परत घ्यायची काय गरज होती ? उगाच निरर्थक खर्च.." बॉक्स उघडत ती म्हणाली.
" एक मिनिट. ते खर्चाचं वैगेरे बघायला तुझा पपा आहे. एवढ्या लहान वयात तु हा सगळा विचार करायची गरज नाहीये." जराशा कडक आवाजात संतोष म्हणाला. मग पुन्हा आपल्या मऊ, प्रेमळ स्वरात पुढे बोलू लागला. " .. आणि बाळा तुझ्या वाढदिवसाला पाच महिने झाले. त्यानंतर तोच ड्रेस तू शाळेच्या एका कार्यक्रमात घातला होतास. नवरात्रीत एक दिवस दांडिया गरबा खेळायला गेली होतीस तेव्हाही तोच घातला होतास. अन् आता दिवाळीतही तोच इतक्या वेळा वापरलेला ड्रेस घातला असतास तर मलाच बरं वाटलं नसतं. म्हणून म्हटलं दिवाळीत माझ्या पिलूसाठी नवीनच ड्रेस घ्यावा. आणि तसही तुला दिवाळीत अजून कशाचीच अपेक्षा नसते. फटाके वैगेरे वाजवायला तुला आवडत नाहीत. मग तुझी एवढी हौस मी पुरवू शकत नाही का ? "
" अहो पण पपा.."
" ड्रेस आवडला का तेवढ सांग."
" हो हो आवडला. खूपच आवडला."
" तारा तुला साडी आवडली ना ? " त्याने शामलला विचारलं.
" अहो म्हणजे काय ? खूप छान आहे."
संतोषच्या चेहऱ्यावरील आनंद अजून वाढला ; पण मग तो काहीसा गंभीर झाला. गंभीर स्वरात तो पत्नीला म्हणाला.
" तारा, आय अॅम सॉरी."
" सॉरी... कशाबद्दल ? " तिच्या आवाजात आश्चर्य होतं.
" स्वातीची फर्स्ट सेमिस्टर ची एग्जाम असते, त्यामुळे तिचं एकवेळ ठिक आहे ; पण खरंतर मी तुला तरी शॉपिंग करायला घेऊन जायला हवं. पण आपली परिस्थिती ही अशी त्यामुळे तुलाही काम करावं लागतं आहे."
" अहो तुम्हीसुद्धा शॉपिंगला थोडीच गेला होतात. कामासाठीच जाता नं तुम्हीही. आणि आपली परिस्थिती आहे अशी आहे. त्यात तुमची काय चूक." मग त्याचा हात हातात घेऊन पुढे म्हणाली. " उलट अशा परिस्थितीतही तुम्ही मला आणि स्वातीला जमेल तेवढं सुखी ठेवण्यासाठी किती धडपड करत आहात. आताही कामांमधून वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी साडी आणि ड्रेस आणलात हे काय कमी आहे ? "
स्वातीच्या घसा खाकरण्याच्या आवाजाने दोघं भानावर आले. स्वाती गालातल्या गालात हसत होती. मग तिने शामलकडे पाहून काहीतरी इशारा केला. शामल म्हणाली -
" अहो माझ्यासाठी साडी आणलीत, स्वातीला ड्रेस आणलात. पण मग स्वतःसाठी काही घेतलत की नाही ? "
" माझ्यासाठी... माझ्यासाठी कशाला ? सगळं तर आहे माझ्याकडे. आणि सणावाराला बायका मुलांनी हौसमौज करायची असते. माझं काय ? "
तारा आणि स्वाती एकमेकींकडे अर्थपूर्ण नजरेने बघत हसल्या. मग तारा पटकन आपल्या बेडरूममध्ये गेली. संतोषने स्वातीला ' काय आहे ? ' असं हाताच्या खूणेने विचारलं. मात्र उत्तरादाखल तिनेही हाताच्या खूणेनेच माहीत नाही असं सुचवलं.
दोनच मिनिटात तारा बाहेर आली, तेव्हा तिच्या हातात एक ब्राऊन कलरचा छोटा चौकोनी बॉक्स होता.
" घ्या." संतोष कडे तो बॉक्स देत हसऱ्या चेहऱ्याने तारा म्हणाली.
" काय आहे काय ? "
" अहो बघा तर खरं."
संतोषने बॉक्स उघडून पाहिलं तर त्यात एक छानसं वॉच होतं."
" अगं हे.. हे कशाला."
" अहो कशाला म्हणजे काय ? तुम्ही नेहमी आमची हौस पुरवत आलात. आम्हाला काय हवं नको त्याची काळजी घेत आलात ; पण स्वतःच्या गरजांकडे मात्र तुम्ही नीट लक्षच देत नाहीत. हौसमौज करणं तर लांबचीच गोष्ट. आता तुमचं घड्याळ, किती दिवसांपूर्वी बंद पडलय. कामं करताना सारखं वेळेवर लक्ष ठेवावं लागतं. म्हणून तुमच्यासाठी आम्हा दोघींकडून हे गिफ्ट."
" पण तू कधी.."
" अहो पपा ऑनलाईन ऑर्डर केलं होतं."
" आणि पैसे ? "
" मी माझ्या कामातून वेगवेगळ्या खर्चांसाठी थोडे थोडे पैसे बाजूला ठेवत आले आहे. त्यातून घेतलं. तुम्ही आणि आपल्या सारख्या प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील तुम्ही पुरुष, नेहमी आपल्या बायकोमुलांची हौसमौज पुरी करण्यासाठी, त्यांना सुखी ठेवण्यासाठी झटत राहता. तुम्हाला कसली हौस नसते असं थोडीच आहे. तुम्हीही शेवटी माणूसच आहात. तुम्हालाही भावना असतात, तुमच्याही काही इच्छा आकांक्षा असतात ; पण आपल्या कुटुंबासाठी तुम्ही आपल्या इच्छांना, हौशींना नेहमीच मुरड घालता. मग त्या थोड्याफार प्रमाणात का होईना पण पुऱ्या करण्याची जबाबदारी आम्ही घ्यायला नको का ? "
संतोषला पुढे काही बोलण्यासाठी शब्द सुचेना. तो एक स्मित करत आपले बाहू पसरवून उत्साहित, आणि जराशा भावनिक स्वरात म्हणाला -
" हॅपी दिवाली ss."
तशा तारा अन् स्वाती हसत त्याच्या मिठीत शिरत लाडिकपणे म्हणाल्या -
" हॅपी दिवाली."
समाप्त
@ प्रथमेश काटे
छान, मस्त, आवडली. अर्थात
छान, मस्त, आवडली. अर्थात प्रत्यक्ष जीवनात बहुतांशी माणसे एवढी समजूतदार नसतात. ती असती तर किती बरे झाले असते .
अर्थात प्रत्यक्ष जीवनात
अर्थात प्रत्यक्ष जीवनात बहुतांशी माणसे एवढी समजूतदार नसतात. ती असती तर किती बरे झाले असते >> तेही खरंच, म्हणा ; पण फॅमिलीमध्ये understanding असते हो