फराळाचा PTSD कसा द्यायचा..!

Submitted by अस्मिता. on 24 October, 2024 - 10:26

माबोवरील दिवाळीच्या धाग्यावरील जुन्या प्रतिसादात भर घालून नवा स्वतंत्र लेख लिहून मैत्रीण या संकेतस्थळावर दिला होता. आज अचानक आठवण आली व विरंगुळा व्हावा म्हणून येथेही आणला. हा प्रतिसाद काही जणांनी वाचला असेल. Happy

एखाद्या धक्कादायक घटनेनंतर मनात त्या अनुभवाची एक भीती बसते, त्याला PTSD (post traumatic stress disorder) म्हणतात.

----------------
diwali-snacksdiwali-faralfestival-food-itemsfestival-260nw-2063346278.jpg

आपण केलेल्या गोष्टी/चांगलेचुंगले / मेहनतीने केलेल्या पाककृती विसरून जाणारा किंवा 'रिप्लेस मेमरी' असणाऱ्या नवरा असलेल्या मैत्रिणींना समर्पित....

एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. तेव्हापासूनच काही आयडिया हाताशी ठेवल्यात... फक्त मुलींसाठी.

फराळाचा PTSD कसा द्यायचा?

1. कच्च्या मालासाठी वेगवेगळ्या दुकानात पळवायचं, तरी उणिवा काढून किरकिर करायची.
उदा. रवा/पोहे जाड/ पातळ/ बारीक, खोबरं- शेंगदाणे खवट.

2. शंभर मेसेज-फोन करून जास्तीत जास्त महत्त्व अधोरेखित करायचं. सारखं 'कुठपर्यंत झालं' विचारत रहायचं . किराणा खरेदीत झालेल्या चुकांवर खूप हताश होऊन सुस्कारे सोडत रहायचं.

3. आठ दिवस आधीपासूनच शॉर्टकट स्वैपाक करायचा, का विचारलं तर मोठ्याने 'फ रा ळ' एवढंच म्हणायचं. फराळाच्या रुखवतापैकी काहीनंकाही डायनिंग टेबलवर मांडून ठेवायचं व वातावरणनिर्मिती करायची.
उदा. भाजलेले पोहे-शेंगदाणे , परात, झाऱ्या, चकलीपात्र-सोऱ्या, धुतलेले डबे.

4. तो घरात असताना फोनवर इतरांना 'बाई गं ,फराळ बनवायला घेणारे, ठेवते आता ', व 'आमच्याकडे विकतचं चालतं पण मलाच पटत नाही ' इ ठेवणीतली आणि इतरांना निगुतीने संसार करतेय असं भासवणारी वाक्यं म्हणत रहायची.

5. फराळ सुट्टीच्या दिवशीच करायचा. लक्षात ठेवा - सप्राईज वगैरे द्यायला आपलं काही नवीन लग्न झालेलं नाही. गेले ते दिवस. वास्तवात या.

6. जास्तीत जास्त गर्दा करायचा, अमेरिकेत असाल तर 'लॉन मो' करताना खिडकीतून/भारतात असाल तर माळा आवरायला लावताना सांगत रहायचं की 'आता तू गराज/पसारा आवर/ दिव्यांच्या माळांचा गुंता काढ/आकाशकंदिलासाठी एक्स्टेंशन केबल शोधून काढ/ वॅक्यूम कर /झाडून काढ/ मुलांना आण/सोड. मला तर फराळ बनवायला घ्यायचा.

7. त्या दिवशी पसारा करून, घरच्यांना डिस्पोजेबलमधे उभ्याने खायला द्यायचं. घरच्यांकडून भांडी घासून घ्यायची.

8. दुसऱ्या दिवशी 'तळणाच्या वासानं डोकं उठलं , आज तुम्ही सबवे खा' म्हणायचं.

9. थोडं निवांत बसलं की उठवायचं. Repeat as needed.

10. या खोलीतून त्या खोलीत पाय वाजवत येरझाऱ्या घालून लगबग दाखवायची.

11. एवढं करूनही काही गोष्टी घरच्या तर काही बाहेरच्या आणायच्या.

12. मी गृहकृत्यदक्ष म्हणून एवढं तरी केले, आजकाल तर कुणी एवढंही करत नाही म्हणत रहायचं. Repeat as needed.

13. यापैकी कुठलीही वाक्यं फराळाचा आनंद घेऊन मिटक्या मारण्याच्या बेसावध क्षणी इतरांवर सुदर्शनचक्रासारखी 'सहज' फेकायची. किती तडजोड करतोय हे दाखवून द्यायचं.

***फराळाची दहशत निर्माण झाली पाहिजे.
दिवाळी आली तर फटाके नकोत का, म्हणून हा PTSD प्रपंच. हे सगळं बेमालूमपणे करायचं आहे, त्यामुळे 'गुपित' ठेवायचं.

हलकेच घेणे. Happy

#Copyright free image from Shutterstock.

अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol हे भारी आहे. मला तर वाटलं एवढं सगळं करून शेवटी फराळ विकत आणायचा असला काहीतरी ट्विस्ट येणार की काय! Wink

सप्राईज वगैरे द्यायला आपलं काही नवीन लग्न झालेलं नाही. गेले ते दिवस. वास्तवात या.
***फराळाची दहशत निर्माण झाली पाहिजे. >>>> Lol

एखादा फारसा फेमस नसलेला किंवा कटकटीचा पदार्थ करायला घ्यायचा. त्यातली की स्टेप (उदा. चिरोट्यांना साटा लावणे. ) घरच्यांकडून करून घ्यायची. ती येरबाडतेच. मग 'एवढं सोप्पं काम जमत नाही. माझी सग्गळी मेहनत वाया गेली' हा राग आळवायचा.
याचा कॉन्फिडन्स नसेल तर नेहमीचाच पदार्थ वेगळ्या पद्धतीने करायचा. नेहमी रव्याचे लाडू करत असाल तर रवा नारळ लाडू करायचे. मग 'तू नारळच खवट आणलास' ते 'तू भसकन फॅन/एसी लावून ठेवल्यामुळे पाक घट्ट झाला' इथपर्यंत काहीही सांगता येते.
सतत 'आजकाल कुणी फारसं करत नाही घरी. पण मुलांना आपल्या पद्धती समजायला नकोत का' वगैरे डायलॉग ज्येना, ज्ये शे वगैरेंपुढे मारायचे. मुलं फराळ करताना नको ती आणि नको तेव्हढी लुडबुड करून झाली की त्यांचा आवडता पदार्थ सोडून घरातल्या कश्शाला तोंड लावत नाहीत. पण लक्षात ठेवा तुम्ही फराळ करत असल्यामुळेच भारतीय संस्कृती सर्वाइव्ह करते आहे.

नवविवाहितांनी घाबरू नये. त्यांच्यासाठीही आपल्याकडे टीपा आहेत. करंजी जमत नाही असं वाटलं की पारीत रंग टाकावा. साधारण मजारीवरच्या चादरीचा किंवा तंदुरी चिकनचा रंग आला की कुणीतरी भयचकीत होऊन ‘काय हे?’ विचारतंच. त्यावेळी ‘खाजाचे कानवले केलेत’ म्हणून ठोकून द्यावे. तत्पूर्वी सासरच्या ७० पिढ्यात कुणी सीकेपी नव्हते ना याची खात्री करून घ्यावी. स्वयंपाकाचा आनंदच असलेली आपली लेक/पुतणी/भाची फराळाच्या नावाने का होईना काहीतरी करते आहे या समाधानात माहेरकडले ज्येना असतात. तरूण पिढी ‘हिने डबा बिबा आणला का काय?’ या आक्रिताच्या शंकेने भयग्रस्त असतात. आणि सगळ्या पिढ्या आपल्या हॅपिली एव्हर आफ्टरसाठी देव पाण्यात ठेवून असतात. ते जावया/सासरकडच्यांसमोर आपली इज्जत काढत नाहीत. तरीही एखाद्या सुगरणीने ‘पण यात खवा कुठाय?’ असा मुदलाचा प्रश्न विचारला तर ‘अगं ती माझी मैत्रिण नाही का? तिच्या काकूची/आज्जेसासू/जाऊबाईंची हीच मुळ पद्धत’ असं ठासून सांगावं.
केवळ जातीवर थांबू नये. विदर्भातल्यांनी कोकण, खानदेशातल्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातल्यांनी पार इंदोर ते निपाणी असा आपापल्या परीने पदार्थांचा अनुशेष भरून काढावा.

साधारण आकाराचे ३० लाडू होणार असतील तर सुपारीएवढे ५० लाडू करावे. म्हणजे ‘मी एकहाती ५० लाडू वळले’ हे जाहिर करता येते. वरून ‘आजकाल कुणी गोड खायला मागत नाही. हा लाडू कसा एका घासात संपतो’ अशी मखलाशी करावी.

पुढच्या वर्षी ‘तू कुठे काम सांभाळून एवढं करशील? आपण चितळे/जोशीकाकूंकडून आणू’ अशी सुचना आपोआप येईल. त्यावर नाक उडवून ‘छे बाई, सगळं काय बाहेरून आणायचं? मी निदान चिवडा/शंकरपाळी तरी घरी करते’ सांगता आलं पाहिजे.

Happy अगदी माझेमन.

रमड, तसेही चालेल. शेवटी अभिनयच आहे. Happy

--------
हे फॉरवर्ड करा. *तुम्हाला एका खट्याळ गृहिणीचे हाय फाईव्ह मिळतील.'
* हे कायप्पाच्या 'व्हायरल करा तुम्हाला मातेचे आशीर्वाद मिळतील' च्या चालीत वाचावे. Happy Wink

Lol

लेख बायकोला फॉरवर्ड करतो. ती असेही फराळ करायचा आळस करते. मला चार टोमणे मारायला तरी थोडा कर म्हणतो.. अन्यथा दरवर्षी मला त्या वायरल बाईचे व्हाट्सअप फॉरवर्ड पाठवते.. ज्यात ती म्हणते दिवाळी दोघांची असते. तर फराळ एकट्या बाईने का करावा?? अरे जीव धोक्यात घालून, उंच स्टूलावर चढून, विजेशी खेळून कंदील आणि लायटिंग काय आमचे सासरेबुवा करतात Proud

*तुम्हाला एका खट्याळ गृहिणीचे हाय फाईव्ह मिळतील.'
* हे कायप्पाच्या 'व्हायरल करा तुम्हाला मातेचे आशीर्वाद मिळतील' च्या चालीत वाचावे. Lol

अरे जीव धोक्यात घालून, उंच स्टूलावर चढून, विजेशी खेळून कंदील आणि लायटिंग काय आमचे सासरेबुवा करतात
>>>> ऋ Lol

लंपन, नाही नाही. हे चिटींग आहे. Lol

ही स्त्रियांची चीट-शीट आहे, दुसऱ्या कुणीही पुरुषांची खट्याळ बाजू लिहा. Happy

साधारण मजारीवरच्या चादरीचा किंवा तंदुरी चिकनचा रंग आला की कुणीतरी भयचकीत होऊन ‘काय हे?’ विचारतंच. त्यावेळी ‘खाजाचे कानवले केलेत’ म्हणून ठोकून द्यावे.
>>>> Lol
हॅपिली एव्हर आफ्टरसाठी देव पाण्यात ठेवून असतात>>>> Lol

विदर्भातल्यांनी कोकण, खानदेशातल्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातल्यांनी पार इंदोर ते निपाणी असा आपापल्या परीने पदार्थांचा अनुशेष भरून काढावा.>>>> Lol

सुपारीएवढे ५० लाडू करावे. >>> Lol

मी निदान चिवडा/शंकरपाळी तरी घरी करते’ सांगता आलं पाहिजे.>>> हेच सार आहे लेखाचे. Happy

धमाल ॲडिशन्स आहेत माझेमन. Lol

धमाल आहे हे!
माझेमन ची पोस्ट तर कडी आहे. Biggrin

हा फराळ खुसखुशीत चवदार आणि हलका झाला आहे.
ही स्त्रियांची चीट-शीट आहे, दुसऱ्या कुणीही पुरुषांची खट्याळ बाजू लिहा. Happy>> पुरुषांचे काय असते ना कि समोरची पार्टी खुश आहे ना , मग बकरा बनायची त्यांची तयारी असते. वर मग पार्टी शार्टी करायला फ्री पास! उगाच कशाला बाजू लावून धरायची?

पुरुषांचे काय असते ना कि समोरची पार्टी खुश आहे ना , मग बकरा बनायची त्यांची तयारी असते. वर मग पार्टी शार्टी करायला फ्री पास!
>>> असे आहे का Happy

अस्मिता Lol

माझेमनची भर देखील कहर Lol

पुरुषाचं असलं काय नसतंय
त्येचं वायरिंग साधंसरळ असतंय Happy
तो फार फार तर कुठे आबदत बसतेस, बाहेरून थोडे थोडे आणू ह्याच्या पलीकडे काही बोलत नाही.

झकासराव
पुरुष म्हणजे डॉल्फिन माशांच्या प्रमाणे असतात. उड्या मारून दाखवतात, लोक हसतात. डॉल्फिन म्हणतात चला लोक खुश आहेत ना. आपल्याला खायला देताहेत. बस झालं तर.

धन्यवाद मित्रमंडळी Happy
झकासराव, पुरुषांचं 'साधंसरळ' वायरिंग आकाशकंदिलाला जोडूया. Happy Wink

खुसखुशीत लेख आणि प्रतिसाद!
साधारण आकाराचे ३० लाडू होणार असतील तर सुपारीएवढे ५० लाडू करावे. म्हणजे ‘मी एकहाती ५० लाडू वळले’ हे जाहिर करता येते. वरून ‘आजकाल कुणी गोड खायला मागत नाही. हा लाडू कसा एका घासात संपतो’ अशी मखलाशी करावी. >> अगदी आमाच्याकडे आधीची पिढीत अशी संवाद फेक पाहिली आहे Lol

Pages