साकव

Submitted by मनीमोहोर on 22 October, 2024 - 01:30

साकव

पाणी म्हणजे साक्षात् जीवन … म्हणून मानवी वस्ती अगदी पूर्वीपासून नदीच्या, ओढ्याच्या काठावर वसली, तिथेच संस्कृती फुलली. सिंधू काठी बहरलेली मोहंजदरो आणि हडप्पा संस्कृती, नाईल नदीच्या सान्निध्यात विकसित झालेली इजिप्शियन संस्कृती, गंगा तीरावर वसलेलं आपला अभिमान आणि श्रद्धास्थान असलेलं वाराणशी शहर ही त्याची काही प्रसिद्ध उदाहरणं.

मोठी शहरं सोडाच अगदी लहान गावं, वस्त्या ही पाण्याच्या जवळच स्थिरावतात. कोकणात आमच्याकडे सड्यावर किती ही मोकळं आणि हवेशीर वाटलं तरी तिथे रहाणं कठीण आहे कारण तिथल्या विहिरीना पाणी लागत नाही. नैसर्गिक उतारामुळे पाणी वाहून खाली जातं म्हणून मनुष्य वस्ती सगळी खाली व्हाळा जवळच. (वहाळ म्हणजे ओढा, नाला, छोटी नदी, पऱ्ह्या काही ही म्हणा )… तशात गावाला जोडणारा मुख्य रस्ता मात्र व्हाळा पलीकडे असल्याने व्हाळ पार करण्याला पर्याय नाही.

अगदी अलीकडे अलीकडे पर्यंत कोकणात आमच्याकडे व्हाळावर पुल नव्हता त्यामुळे व्हाळ वलांडणे हे खरोखर दिव्य होतं. व्हाळाच्या दोन्ही बाजूला काठावर बांधलेल्या उंच आणि सरळ शिडीवरून खाली व्हाळात उतरायचं. व्हाळाच्या पाऊलभर / घोटाभर /गुडघाभर पाण्यातून चालत पैलतीर गाठायचा आणि पुन्हा तिथे बांधलेल्या शिडीवरून वर चढायचं, एक घाटीही चढायची तेव्हा रस्ता दिसायचा. नुसतं वाचूनच दम लागला की नाही ? आली ना दुर्गमतेची कल्पना थोडीतरी ?

सतत पाण्यात राहिल्याने शिड्यांचं लाकूड लवकर कुजत असे. त्यामुळे त्यांची डागडुजी वारंवार करावी लागे. शिडी व्हाळातून दुरुस्तीसाठी बाहेर काढली की तेवढा वेळ दळण वळण ठप्प होई. पावसाळ्यात व्हाळाला हौर म्हणजे पूर आला की कोणी पलीकडे जायचं डेअरिंग करत नसे. एवढंच कशाला नुसती पावसाची काळोखी भरून आली असली तरी वाहतूक ठप्प. कारण वरती सड्यावर पाऊस असेल तर आपण व्हाळ पार करेपर्यंत पाणी धोकादायक पातळी गाठू शकेल ही भीती असायची मनात. मुख्य रस्त्यापर्यंत पोहचणचं इतकं खडतर असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे फार दुर्लक्ष होई. अर्धे दिवस शाळेत जाणं शक्यच होत नसे मुलांना. तसेच एकंदरच वैद्यकीय मदतीच्या अभावामुळे तब्बेतीची ही खुप हेळसांड होई. डॉक्टर कडे घेऊन जाणं कठीण असल्याने अनेक वेळा घरगुती उपचार केले जात ज्याचा फार उपयोग न झाल्याने दुखणी विकोपाला जात असतं.

ह्या सगळ्या वर तोडगा म्हणून साधारण साठ एक वर्षापूर्वी माझ्या तिथे राहणाऱ्या सासऱ्यानी आणि ग्रामस्थांनी घरच्या घरी गड्यांच्या मदतीने त्या व्हाळावर एक साकव म्हंजे अगदीच तात्पुरता पुल बांधला. असा कोकणातला साकव तुम्ही कदाचित फोटोत किंवा चित्रपटात किंवा प्रत्यक्षात ही पाहिला असेल. पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. व्हाळाच्या दोन्ही काठांवर थोडा पाया खणून ठराविक अंतरावर दोन दोन उंच उंच लाकडी वासे फिक्स केले आणि त्या चौकटीवर जमिनीच्या लेव्हल वर फळकुट्या टाकल्या. दोन्ही बाजूला संरक्षक कठडा म्हणून ठराविक उंचीवर आडवे बांबू सुंभाने बांधून टाकले. झाला साकव तयार…पाया जास्त मजबूत नसल्याने ह्या पुलाची रुंदी अगदीच कमी म्हंजे एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल एवढीच होती.

पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर इतर वेळी आयुष्य खूपच सुकर झालं साकवामुळे. आता पलीकडे जायचं तर व्हाळात उतरण्याची गरज उरली नाही. कोरड्या पायांनी रस्त्यापर्यंत पोचण्याचं सुख मंडळी अनुभवू लागली. मुलं टणाटण उड्या मारत साकवावरून वहाळ पार करत आपली आपण शाळेत जाऊ लागली. वयस्कर माणसं ही छोट्याश्या कामासाठी वहाळ वलांडू लागली. जड सामानाची ने आण करण भलतचं सुलभ झालं. खुप पाऊस असेल तेव्हा मात्र जोरात वहात येणाऱ्या पाण्याच्या धडका खालच्या आधार खांबांना न सोसल्याने साकव गदागदा हलू लागे आणि वाहतूक ठप्प होई. तसेच हा पूल फार उंच नसल्याने पावसाळ्यात व्हाळाला हौर आला की पाणी साकवावरून धो धो वाहू लागे तेव्हा ही साकव वापरणे अशक्य होई. साकवावरून पाणी वाहणे हे हौर किती मोठा आहे हे मोजण्याचं एक परिमाणच होतं किंवा अजून ही आहे म्हणा ना. .. कोकणातल्या मुसळधार, धुवाधार, संततधार अश्या पावसाशी दोन हात करून मरगळ आलेल्या मनाना तो दुधडी भरून व्हाणारा वहाळ पाहणे फारच थ्रीलिंग वाटत असे तेव्हा.

मी जेंव्हा हा साकव पहिल्यांदा पाहिला तेव्हा ही पावसाळाच होता. तिन्ही सांज झाली होती. पाउस पडत नव्हता तरी आकाशात काळे ढग जमले होते. घाटी उतरून मी साकवासमोर उभी होते. आपले दोन्ही हात पसरून जणू साकव माझ स्वागत करत आहे असचं वाटलं मला त्याच्याकडे बघून. त्या तिन्ही सांजा, झाकोळून आलेलं आभाळ, खालून मंद वाहणाऱ्या व्हाळाचा कर्णमधुर नाद , संध्याकाळ असल्याने झाडावर असलेल्या पाखरांचा चिवचिवाट, समोर पैलतीरावर पसरलेलं आमचं गर्द हिरवं आगर,आणि त्या पलीकडे हळूच डोकावून बघणारं आमच्या कौलारू घराचं लाल छप्पर… मी मंत्रमुग्ध होऊन बघतच राहिले. पलीकडे जायची ओढ वाढवणारचं दृश्य होत ते. पलीकडे जाण्यासाठी मन उत्सुक होतं पण माझा त्या डुगडूगणाऱ्या साकवावर पाऊल टाकायला धीरच होत नव्हता. माझ्या बरोबरची गडी माणसं माझं सामान घेऊन केव्हाच घरी पोचली होती. अखेर कोणीतरी माझा हात धरला, मी ही हिम्मत एकवटली आणि साकव क्रॉस करून आगारात आले तर तिथे प्रचंड फुललेली गुलबक्षी बघून साकवावरून चालताना आलेला सगळा ताण क्षणात नाहीसा झाला.

कोकणातल्या एखाद्या छोट्या खेड्याचं चित्र पूर्णत्वाला नेणाऱ्या त्या साकवाच्या मी प्रथम दर्शनीच प्रेमात पडले होते म्हणून लवकरच त्याच्याशी चांगली गट्टी ही झाली. त्यामुळे मी साकवावर असताना मुलांनी धावत येऊन गंमत म्हणून तो थोडा हलवला तरी भीती वाटेनाशी झाली. मे महिन्यात कामवाल्या बायका आंब्याची जड ओझी डोक्यावर घेऊन साकवावरून झपझप जाऊ लागल्या की त्यांच्या चालीच्या लयीनुसार हलकेच हेलकावे घेणारा साकव दुरून बघणं मी एंजॉय कधी करू लागले ते माझं मला ही कळलं नाही. कधी वहाळाच्या पाण्यातील मासे बघण्यासाठी, कधी किनाऱ्यावरचा एखादा बगळा शांतपणे उभा राहून संधी येताच माश्यावर कशी झडप घालतो हे टिपण्यासाठी किंवा कधी तरी नशीब असेल तर व्हाळावरच्या झाडांच्या फांद्यांमध्ये लपलेला निळा खंड्या सर्रकन खाली येऊन मासा पकडुन त्याच वेगाने परत विजेच्या वायर वर बसून आपली मेजवानी कशी एंजॉय करतो हे दिसेल म्हणून मी साकवावर रेंगाळू ही लागले.

ग्रामपंचायत आणि गावकरी दोघांच्या ही सहकार्याने काही वर्षांपूर्वी साकवाचं नूतनीकरण झालं , म्हणजे रुंदी तेवढीच राहिली तरी आधाराचे खांब काँक्रिट चे घातले गेले. त्यामुळे अर्थातच तो जास्त मजबूत आणि सुरक्षित ही झाला. दरवर्षी डागडुजी करण्याची गरज संपली. तसेच अगदी अलीकडे सरकारच्या “रस्ते बांधा” योजनेमुळे व्हाळावर जुन्या साकवाला बायपास करणारा, छोटा ट्रक जाईल एवढा रुंद सिमेंटचा पुल बांधला गेला आहे. त्यामुळे आता मात्र गाडी जवळ जवळ घरापर्यंत येते. जिथे एके काळी दळण वळणाच्या अभावामुळे वैद्यकीय उपचारांसाठीही तालुक्याच्या गावी जाणं शक्य नव्हतं तिथे आता मुलं कांदे बटाटे आणायचे असले तरी गाडी काढतात आणि पाच मिनटात घेऊन ही येतात. केवढा बदल झालाय हा….

कोकणातल्या खेड्यात पूर्वी आयुष्य फार खडतर होत. माझे आजे सासरे सव्वाशे / दीडशे वर्षापूर्वी जेव्हा इथे आले तेव्हा तर परिस्थिती ह्याहून नक्कीच अधिक बिकट असणार.पण ते त्यापासून लांब नाही गेले तर ह्या बिकट परिस्थितीशी अगदी सर्व शक्ती पणाला लावून लढले. काबाड कष्ट करून त्यांनी घर बांधलं, घाट्या बांधल्या, विहीर खोदली, गुरं पाळली, डोंगर उतारावर सपाटी करून भातशेती केली, कातळात खड्डे करून त्यात कलमं लावून आंब्याच्या बागा लावल्या ज्यांची फळ आज आमची सहावी पिढी परदेशात ही चाखत आहे. अनेक प्रयोग करून एक पर्यावरण पूरक जीवन पद्धती, एक कोकणातली संस्कृती विकसित करायला त्यांनी हातभार लावला. घरातल्या स्त्रियांनी ही ह्यात मोलाची साथ दिली आहेच. घरकाम, बाल संगोपन ह्या बरोबरच वेळ पडली तर लावणी ही लावत असतं माझ्या तिथे राहणाऱ्या सासूबाई. उपलब्ध असलेल्या मर्यादित साधन सामुग्रीतून त्यांनी कोंड्याचा मांडा करणारी कोकणची खास खाद्य संस्कृती जपली आणि वाढवली ही. आमच्या पूर्वजांनी अक्षरशः शून्यातून हे नंदनवन निर्माण केलं आहे आणि पुढची पिढी ही त्याच आत्मीयतेने ते जोपासत आहे. ह्याचा मला कायम अभिमान वाटतो आणि कृतज्ञता ही वाटते.

नवा मोठा पूल आणि रस्ता दोन्ही झाल्यामुळे जुना साकव हल्ली जरी जास्त वापरला जात नाही. मी गावाला गेले की अजून ही त्या जुन्या साकवाचे ऋण जाणून कृतज्ञता म्हणून एकदा तरी मुद्दाम साकवावरून चक्कर मारून येते. साकव नसताना कोकणातलं आमचं आयुष्य किती कठीण होतं, साकव बांधल्यावर ते कसं आणि किती सुकर झालं हा आमच्या कुटुंबाचा एक प्रकारचा इतिहासच आहे. आणि ह्या इतिहासाचा साकव हा मूक भागीदार आणि साक्षीदार ही आहे. इतिहासाच्या ह्या पाऊलखुणा आपण डोळसपणे प्रयत्न करून अवश्य जपल्या पाहिजेत असं मला अगदी मनापासून वाटतं . मात्र प्रत्यक्षात काय होतं हे येणारा काळच ठरवणार आहे.

हेमा वेलणकर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिखाण
.
ह्याच नावाचा धडा होता शाळेत असताना तेव्हा मला हा शब्द कळला.

छान लेख.
इतिहासाच्या ह्या पाऊलखुणा आपण डोळसपणे प्रयत्न करून अवश्य जपल्या पाहिजेत +१००

किल्ली , शर्मिला धन्यवाद ....

हो होता किल्ली साकव धडा, एक शहरी मुलगी खेड्यात येते आणि तिथले तिचे सवंगडी तिला त्या जीवनशैलीची , साकवाची ओळख करून देतात अशी थीम होती.
साकव हा कोकणी शब्द आहे का ?

सुंदर लेख.
या निमित्ताने एक इंग्रजी वाक्प्रचार आठवला "We should build bridges, not walls"
दोन माणसात जेव्हा गैरसमजाचा पूर येतो तेव्हा असा साकव ( पूल ) आवश्यक असतो.
साकव व्यक्ती, संस्कृती, निसर्ग सांधणारा दुवा.
या साकवावरुन तुम्ही अनुभवलेला निसर्ग अल्पकाळ आम्हीही पाहिला. त्याचं डुलणंही अनुभवलं.

छान !
( फार पूर्वीची माझी " व्हाळ" ही पोस्ट व त्यातील साकवाचं डिजिटल चित्र आठवलं - https://www.maayboli.com/node/25403. )

द. सा. , भाऊ धन्यवाद...

भाऊ, वाचला तुमचा लेख. सुंदर लिहिलं आहे व्हाळाच वर्णन आणि चित्र ही खुप छान.

खूप सुंदर लेख. चित्रदर्शी.
साकव क्रॉस करून आगारात आले तर तिथे प्रचंड फुललेली गुलबक्षी बघून साकवावरून चालताना आलेला सगळा ताण क्षणात नाहीसा झाला.>>>>>>>सगळं चित्र डोळ्यासमोर उभ राहिलं

छान लेख.
एक गंमत.. पूर्वी मटा मधल्या कोड्यात नदीवरील अरुंद पूल अशा परवलीच्या वाक्याने साकव शब्द अनेकदा येत असे.

ऋतुराज, diggi 12, अमितव , भ्रमर केकू धन्यवाद.
साकव हा कोकणी शब्द आहे पण इतरत्र ही हाच शब्द प्रचलित आहे की कोणता दुसरा शब्द ही वापरतात अश्या पुलासाठी हे म्हणायचं होतं असो.

होय अमित, शब्द कोड्यात बरेच वेळा येतो हा शब्द. Happy

खुप सुंदर लेख. चित्रदर्शी लिखाण आहे. वाचताना सगळं काही डोळ्यासमोर दिसलं. खंड्या, संध्याकाळ, बगळा, गुलबक्षी, कौलारू घर........ सगळ्या फ्रेम्स दिसल्या.

सुंदर लिहिलं आहे ममो! वाचायचा राहिला होता हा लेख माझा. आमच्या गावात माझ्या आठवणीत साकव नव्हता, पूलच आहे आधीपासून. पण गावातली जुनी माणसं त्या पुलाचा उल्लेख सवयीने 'साकव' म्हणून करताना कधीकधी ऐकलं आहे. त्याअर्थी तिथे पूर्वी साकव असावा.