शपथ

Submitted by अनघा देशपांडे on 17 October, 2024 - 19:33

शपथ

शबरीची गोष्ट ऐकून घरातली तान्ही मुलं निजली आहेत.मुुलांसोबतच दिवसभर शेगडीवर रटरटणारी पातेलीही पालथी पडली आहेत. कसलातरी मेळ बसावा याकरिता बैठक मारुन पुराण पोथ्या वाचणारा कर्ता पुरुषही निजेने ओढून नेला आहे. कर्तव्यपराधीन असलेल तिच लेकुरवाण जगण उद्याच्या हाका देत आहे. पण तिच सोवळ मन तिला निजू देत नाही आहे. पुस्तकाचं पान बदलाव तशी कुस बदलते आहे.

घड्याळाचा लंबक त्याचे त्याचे गुपित कुणापाशी तरी उघड करतो आहे. तिच्या भेगाळलेल्या टाचा पांघरुणाची सुरकुती सारखं करते आहे. एकाएकी सुरकुत्यांचे तरंग होत आहेत. मन कृष्णेच्या काठी विहार करु लागलं आहे.

नभाचा शेला पांघरुन उत्तररात्र नदीकाठी बसली आहे. सुखांताचे ओलेते क्षण तळवा भिजवतो आहे. पण गात्रगात्र शहारुन उठलंय. ही अवस्था हा क्षण निघून जाऊ नये वाटत आहे. पण त्यासाठी कुणाला शपथ घालावी तिला उमजत नाही. पाण्याच्या स्पर्शाचा प्रभाव कमी झालेला नाही पण वाळूच पायाला लुचणं मन गहिरं करत आहे.

पण मनाला काय एक दरवाजा आहे का? अंदाजे सत्तर. कदाचित त्याहुनही जास्त. त्यातले कितीतरी दरवाजे सताड उघडे आहेत पण तिच्या हातातली काठी तिथ आपटत जात नाही. ती जिथ काठी आपटेल तिथंच मनाच मेंढरु जाऊन स्थितीची पानं खात बसणार आहे.

त्यातल्याच एका बंद दरवाज्यापाशी ती जाऊन बसली आहे. कुणीतरी दरवाजा उघडेल अशी तिला आस आहे. पण पलीकडून कोणतीच हाक येत नाही. तिच्या पायात पसरलेल्या सर्पांंच्या जाळ्यात तिची वेणी अडकली आहे. त्यामुळे तिथून परतणं आता तिला शक्य नाही.

तिथूनच ती विहारते आहे नदीकाठावर. अंधाराने झाकोळून गेलेल्या झाडावर तिला एक पक्ष्यांच जोडप दिसत आहे. जोडप्यातला नर पक्षीणीच्या पंखांना मायेने पंखाने हात फिरवतो आहे. दोघांच्या किलबिलाटाला मुग्धतेचा रंग चढला आहे. दोघांच्याच असलेल्या घरट्यात दोघांच विश्व बहरत आहे. ती संसाराच्या गप्पा सांगते आहे. तो जगाचं शहाणपण तिला शिकवतो आहे. त्याच्या डोळ्याच्या तळ्यात तिला आनंदाच गाण सापडत आहे. तिच्या चिवचिवाटात त्याला जगण गवसत आहे.

दोघांचच असणार ते जग दरवाज्याच्या पायरीवरुन तिला शीळ घालून हाकारते आहे. पण या जगाने मृगजळाचे कातडे पांघरले आहे तिला ठाऊक आहे. याकरिताच शाश्वताच्या दरवाज्यापाशी ती येऊन बसली आहे.या दरवाज्यापाशी ती रोज येते नि जात राहते. तिच्यासारखे अनेक पांथस्थ दरवाजा ठोठावून जातात. दरवाजा कधीच उघडला जात नाही.

उत्तररात्रीने पांघरलेला नभाचा शेला पाण्यात पुर्ण भिजला आहे. ते ओलेते नेसून ती आली आहे. तिची शुचिता ओळखून दरवाजा किलकिला झाला आहे. आत विद्वानांचा कलासक्ताचा दरबार भरला आहे. पण कुणीतरी केदार राग आळवून महादेवाला जाग करत आहे. त्या सुराच्या स्पर्शाने तिला काहीतरी गवसलंय. ती इतकावेळ फुल म्हणून झाडावर होती. आता प्राजक्त होऊन ओघळली आहे. आता तिचा सुंगध ती काय जाणेल? मातीच जाणेल.

मातीच्या पावलातून ती पुन्हा परतली आहे कृष्णेच्याकाठी. उषेचा पहिला किरण कृष्णेच्या हृदयाच्या गाभाऱ्यात प्रवेशला आहे. कृष्णेच्या पाण्यातल ममत्व जाग होतं आहे. त्याच मायेपोटी तिच्याकाठी राधेसम बसलेल्या तिला तिने कवितेच्या प्रदेशातून जागते केले आहे. निद्रादेवीपुढे तिचं गाऱ्हाणं गायलं आहे. निद्रेनेच उषेचे रुपड घेतलय याचा अनुभव वाहत्या पाण्याला अजूनही उमजला नाही. कृष्णेनं पाठीवर फिरवलेल्या हातामुळे ती पुन्हा पलंगावर आडवी होऊन पहुडली आहे.ती नदीकाठी जाण्यापूर्वी जशी घडी होती तशीच ठेवायचं इमान तिच्या घराने राखलयं.घड्याळाच्या लंबकाने तिच गुपीत उघड केलंय. पण त्याला काळ गोठवता आला नाही. आणि तिलाही शपथ घालता आली नाही. स्तब्ध होण्याकरिता.

--अनघा देशपांडे

Group content visibility: 
Use group defaults

वाह!!! अमूर्त मनाच्या पातळीवरती काहीतरी लिहीले गेलेले आहे. अशी भावसमाधी लागणे हे किती छान आहे.