‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या बहिर्मुख, कार्यतत्पर, मित्रप्रेमी आणि परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या असतात असे मानले जाते. चालू ‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
रणजीतसिंहजी (१०-०९-१८७२) – गुजरातमधील नवानगरच्या राजघराण्यातील ‘रणजीतसिंहजी’ हे कसोटी खेळणारे पहिले भारतीय होते. १८८८ साली ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि तिथे त्यांना क्रिकेटची गोडी लागली. केंब्रिज विद्यापीठ आणि ससेक्स परगण्याकडून उत्तम क्रिकेट खेळल्यावर १८९६ साली त्यांची इंग्लंड संघासाठी निवड झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्यांनी शतक ठोकले. १९०७ साली नवानगरचे ‘जाम साहेब’ झाल्याने त्यांच्या खेळात खंड पडू लागला. त्यांनी १५ कसोटीत ९८९ धावा काढल्या. ‘ग्लान्स’ या नाजूक फटक्याचे जनकत्व त्यांच्याकडेच जाते. त्यांच्या स्मृतीत भारतातील राष्ट्रीय विजेतेपदाच्या क्रिकेट स्पर्धेला ‘रणजी करंडक’ असे नाव देण्यात आले.
लाला अमरनाथ (११-०९-१९११) – १९३३ साली पंजाबच्या ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ यांनी ‘बॉम्बे जिमखान्या’वर इंग्लंडविरुद्ध पदार्पणात झळकावलेले शतक भारतासाठी पहिले कसोटी शतक ठरले. २४ कसोटी खेळलेले लाला चांगल्यापैकी मध्यमगती गोलंदाजही होते. त्यांनी ८७८ धावा केल्या आणि ४५ बळी मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय संघाचे ते पहिले कर्णधार होते. निवृत्तीनंतर निवड समिती अध्यक्ष आणि समालोचक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली.
विजय मांजरेकर (२६-०९-१९३१) – भारताच्या ३ महान ‘विजय’पैकी एक म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज मुंबईकर ‘मांजरेकर’. परदेशात वेस्ट इंडिज व इंग्लंडच्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांविरुद्ध केलेल्या काही महान खेळयांमुळे ते जाणकारांच्या कौतुकास पात्र ठरले. भारतात फिरकीला अनुकूल खेळपटट्यांवरही ते दादागिरीने फलंदाजी करत. मात्र ५५ कसोटीत ७ शतकांसह केलेल्या ३२०८ धावा त्यांच्या गुणवत्तेला न्याय देत नाहीत. परंतु अनेक क्रिकेटतज्ञ त्यांना तंत्रशुद्धता, मजबूत बचाव आणि चौफेर फटकेबाजीची क्षमता यामुळे महान फलंदाज मानीत. न्यूझीलंड विरुद्ध मद्रास येथे शेवटच्या कसोटीत शतक ठोकून ते निवृत्त झाले.
बिशनसिंग बेदी (२५-०९-१९४६) – भारताच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी प्रमुख म्हणजे पंजाबचा डावखुरा फिरकी गोलंदाज ‘बेदी’. ६० आणि ७० च्या दशकात त्याच्यामुळे भारताला अनेक कसोटी सामने जिंकता आले. भारताचा कर्णधार असताना त्याने प्रसंगी आपल्या खेळाडूंसाठी वाईटपणा घेत आघाडीवर राहत नेतृत्व केले. ६७ कसोटीत त्याने २६६ बळी घेतले. बिनधास्त मतप्रदर्शन आणि फटकळ स्वभाव यांमुळे अनेकदा तो वादग्रस्त ठरे.
मोहिंदर अमरनाथ (२४-०९-१९५०) – लाला अमरनाथ यांच्या तीन क्रिकेटपटू मुलांपैकी ‘मोहिंदर’ सर्वात यशस्वी ठरला. अनेकदा भारतीय संघाच्या आतबाहेर झालेल्या मोहिंदरची कारकीर्द दोन दशके चालली. जिद्दी, लढाऊ फलंदाज अशी ख्याती असलेला मोहिंदर उपयुक्त मध्यमगती गोलंदाजही होता. त्याने ६९ कसोटीत ४३७८ तर ८५ वन-डेमध्ये १९२४ धावा काढल्या. शिवाय दोन्हीत अनुक्रमे ३२ व ४६ बळी घेतले. १९८२-८३ या कारकिर्दीतील सोनेरी कालखंडात त्याने ११ कसोटीत ११८२ धावा काढल्या. १९८३ विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत आपल्या अष्टपैलू खेळाने सामनावीराचा बहुमान मिळवताना त्याने भारताला प्रथमच विश्वचषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
रवीचंद्रन अश्विन** (१७-०९-१९८६) – तामिळनाडूचा ऑफ स्पिनर ‘अश्विन’ भारतासाठी कुंबळेनंतरचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १०० कसोटीत ५१६ बळी मिळवले आहेत. शिवाय वन-डे आणि टी-२० मध्ये अनुक्रमे १५६ आणि ७२ बळी मिळवले आहेत. अश्विन हा अतिशय हुशार आणि विचारी क्रिकेटपटू मानला जातो. आपल्या गोलंदाजीत सतत नवनवीन प्रयोग आणि वैविध्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे भारताला गेल्या १४ वर्षात अनेक विजय साध्य झाले आहेत. तो उत्तम फलंदाजी देखील करू शकतो. कसोटीत आतापर्यंत त्याने ५ शतके आणि १४ अर्धशतकांसह ३३०९ धावा केल्या आहेत.
इयान चॅपेल (ऑस्ट्रेलिया : २६-०९-१९४३) – ऑस्ट्रेलियाच्या तीन कसोटीवीर ‘चॅपेल’ बंधूंपैकी सर्वात थोरला म्हणजे ‘इयान’. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज असणारा इयान नेतृत्वात आणि स्वभावाने पण आक्रमक होता. त्याने ७५ कसोटीत १४ शतकांसह ५३४५ धावा काढल्या. त्याच्या कप्तानीत ऑस्ट्रेलियाने भरीव कामगिरी केली. आपल्या फटकळ स्वभावाने अनेकदा तो वादग्रस्त ठरला. परखड मतप्रदर्शनामुळे त्याने नंतर समालोचक म्हणूनही लोकप्रियता मिळवली.
केप्लर वेसल्स (ऑस्ट्रेलिया / दक्षिण आफ्रिका : १४-०९-१९५७) – दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्या क्रिकेटपटूंपैकी ‘केप्लर’ एक आहे. डावखुरा केप्लर सलामीला तसेच मधल्या फळीत खेळला. प्रथम ऑस्ट्रेलियासाठी १९८२ ते १९८५ या काळात खेळताना त्याने २४ कसोटीत १७६१ धावा तर ५४ वन-डे मध्ये १७४० धावा केल्या. कसोटी पदार्पणात इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले. नंतर दक्षिण आफ्रिकेसाठी १९९१ ते १९९४ काळात १६ कसोटीत १०२७ धावा तर ५५ वन-डेत १६२७ धावा केल्या. कसोटी व वन-डेमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले.
मार्टिन क्रो (न्यूझीलंड : २२-०९-१९६२) – न्यूझीलंडच्या सर्वकालिक सर्वोत्तम फलंदाजांमध्ये ‘क्रो’चा समावेश होतो. क्रो मधल्या फळीतील आकर्षक, शैलिदार फलंदाज होता ज्याने ७७ कसोटीत १७ शतकांसह ५४४४ धावा तर, १४३ वन-डेमध्ये ४७०४ धावा केल्या. कर्णधार म्हणून देखील त्याने छाप सोडली आणि १९९२ च्या विश्वचषकात आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेले. कसोटीत २९९ वर बाद होण्याची दुर्दैवी नोंद त्याच्या नावावर झाली आहे. निवृत्तीनंतर समालोचन, प्रशिक्षण या क्षेत्रांत त्याने ठसा उमटवला. त्रेपन्नाव्या वर्षी कॅन्सरने या गुणी खेळाडूचा अकाली अंत झाला.
कर्टली अॅम्ब्रोज (वेस्ट इंडिज : २१-०९-१९६३) – भयावह वेस्ट इंडियन द्रुतगती गोलंदाजांच्या परंपरेतील अखेरच्या काळातील शिलेदार म्हणजे ‘अॅम्ब्रोज’. ६’८” उंचीचा अॅम्ब्रोज धावत येई तेव्हा फलंदाजाच्या उरात धडकी भरत असे. पण वेगापेक्षाही अचूकता हे त्याचे बलस्थान होते, त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर फटके मारणे जवळपास अशक्यप्राय असे. त्याने ९८ कसोटीत ४०५ बळी मिळवले, ज्यात कसोटीत १० बळी तीन वेळा होते. त्याशिवाय १७६ वन-डे सामन्यांत त्याने २२५ बळी मिळवले. दुबळी फलंदाजी असतानाही त्याच्या गोलंदाजीमुळे विंडीजला काही विजय मिळवता आले.
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया : १३-०९-१९६९) – आधुनिक काळातील फिरकीचा जादूगार असेच ‘वॉर्न’चे वर्णन केले पाहिजे. हातभर वळणारे लेग-ब्रेक्स, डंख मारणारे टॉप-स्पिनर्स आणि फ्लिपर्स, फसवे गुगली याच्या जोरावर हा लेग-स्पिनर भल्याभल्या फलंदाजांची तारांबळ उडवत असे. फिरकीपटू असला तरी वेगवान गोलंदाजाची आक्रमकता त्याच्या गोलंदाजीत, देहबोलीत आणि स्वभावात असे. पहिल्याच सामन्यात शास्त्री आणि तेंडुलकर यांनी त्याची यथेच्छ पिटाई केली, पण त्याने नाउमेद न होता कालांतराने जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्वत:ला स्थापित केले. त्याने १४५ कसोटीत तब्बल ७०८ बळी मिळवले, ज्यात सामन्यात १० बळी दहा वेळा तर, डावात ५ बळी ३७ वेळा होते. शिवाय १९४ वन-डेमध्ये २९३ बळी मिळवले. जोडीला तो तळाचा उपयुक्त फलंदाज आणि उत्कृष्ट स्लिप क्षेत्ररक्षक होता. मैदानाबाहेर मात्र अतिरेकी मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, सहकाऱ्यांबरोबर वादविवाद, विवाहबाह्य प्रकरणे अश्या विविध कारणांनी त्याला कुप्रसिद्धी लाभे. २०२२ साली ५२ व्या वर्षी एका हॉटेलमध्ये या ‘स्पिन-किंग’चा अकाली मृत्यू झाला.
हॅन्सी क्रोन्ये (दक्षिण आफ्रिका : २५-०९-१९६९) – मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज, मध्यमगती फसवा गोलंदाज आणि कल्पक कर्णधार, असा हा जबरदस्त गुणवान अष्टपैलू ‘क्रोन्ये’ अखेर शापित यक्ष ठरला. अतिशय यशस्वी कर्णधार असणाऱ्या क्रोन्येने २००० साली ‘सामनानिश्चिती’ प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली आणि या ‘खलनायका’चे क्रिकेट अकाली संपुष्टात आले. मग दोनच वर्षात एका विमान अपघातात त्याचे निधन झाले. क्रोन्येने ६८ कसोटीत ३७१४ धावा केल्या व ४३ बळी मिळवले. त्याचबरोबर १८८ वन-डेमध्ये ५५६५ धावा करताना ११४ बळी घेतले.
लान्स क्लुसनर (दक्षिण आफ्रिका : ०४-०९-१९७१) – डावखुरा आक्रमक फलंदाज आणि उजव्या हाताचा तेज गोलंदाज ‘क्लुसनर’ने आपल्या अष्टपैलू खेळाने काही काळ आफ्रिकेसाठी गाजवला. विशेषत: एकदिवसीय सामन्यांमध्ये तो आफ्रिकेचा हुकूमाचा एक्का असे. चेंडूवर हातोड्यासारखा प्रहार करणारा क्लुसनर एकदा लयीत आला की गोलंदाजांना नको जीव होऊन जाई. १९९९ चा विश्वचषक त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने संस्मरणीय केला आणि आफ्रिकेला जवळपास एकहाती उपांत्य फेरीत पोहोचवले. १७१ वन-डेमध्ये त्याने ९० च्या धावगतीने ३५७६ धावा कुटल्या आणि १९२ बळी मिळवले. शिवाय ४९ कसोटींमध्ये १९०६ धावा करताना ८० बळी मिळवले. भारताविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात, डावात ८ बळी मिळवत त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज : २१-०९-१९७९) – आंतरराष्ट्रीय टी-२० आणि जगभरच्या टी-२० लीगस् गाजवणारा ‘गेल’ हा ‘यूनिवर्सल बॉस’ म्हणून लोकप्रिय आहे. टी-२० क्रिकेटचा जन्मच जणू डावरा तडाखेबाज सलामी फलंदाज गेलसाठी झालाय असे गमतीने म्हटले जाते. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याच्या नावे होता. विशेष म्हणजे कसोटीमध्ये दोन त्रिशतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने १०३ कसोटीत ७२१४, ३०१ वन-डेमध्ये १०,४८० तर ७९ टी-२० मध्ये १८९९ धावा कुटल्या आहेत. शिवाय उपयुक्त ऑफ-ब्रेक गोलंदाजीने त्याने या तिन्ही प्रकारात अनुक्रमे ७३, १६७ आणि २० बळी मिळवले आहेत.
ब्रेंडन मॅक्कलम (न्यूझीलंड : २७-०९-१९८१) – न्यूझीलंड क्रिकेटमध्ये सहसा न दिसणारी आक्रमकता ‘ब्रेंडन’च्या खेळात आणि देहबोलीत दिसे. कुठच्याही क्रमांकावर तोडफोड फलंदाजी, चपळ यष्टिरक्षण आणि आक्रमक नेतृत्व ही त्याची वैशिष्ट्ये होती. आपल्या अखेरच्या कसोटीत त्याने इतिहासातील सर्वात जलद शतक फक्त ५४ चेंडूत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. शिवाय भारताविरुद्ध एका कसोटीत चक्क त्रिशतक नोंदवत सामना वाचवला. त्याने १०१ कसोटीत ६४५३, २६० वन-डेमध्ये ६०८३ तर ७१ टी-२० मध्ये २१४० धावा नोंदवल्या. शिवाय तिन्ही प्रकारात यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक म्हणून अनुक्रमे २०९, २७७ आणि ४४ बळी टिपले. गेल्या ३ वर्षात इंग्लंडचा प्रशिक्षक झाल्यावर कसोटीमध्ये ‘बझ-बॉल’ नामक अति-आक्रमक क्रिकेटची दीक्षा तो देत आहे.
इऑन मॉर्गन (इंग्लंड : १०-०९-१९८६) – मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज ‘इऑन’चा दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तो टेस्ट आणि टी-२० क्रिकेट फक्त इंग्लंडसाठी खेळला तर वन-डे मात्र इंग्लंड आणि मायभूमी आयर्लंड दोघांसाठीही खेळला. त्याने १६ कसोटीत ७०० धावा, २४८ वन-डेत ७७०१ धावा तर ११५ टी-२० मध्ये २४५८ धावा ठोकल्या. २०१९ च्या वन-डे विश्वचषक विजेत्या इंग्लिश संघाचा तो कर्णधार होता. याच विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात एका डावात सर्वाधिक १७ षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम त्याने केला.
ईतर काही प्रमुख खेळाडू ::
[अ] परदेशी खेळाडू --
बर्ट ओल्डफील्ड (ऑस्ट्रेलिया : ०९-०९-१८९४) – यष्टीरक्षक. ५४ कसोटी (७८ झेल, ५२ यष्टीचीत, १४२७ धावा).
बेसिल बुचर (वेस्ट इंडिज : ०३-०९-१९३३) – मधल्या फळीतील फलंदाज. ४४ कसोटी (३१०४ धावा).
लान्स गिब्स (वेस्ट इंडिज : २९-०९-१९३४) – ऑफ स्पिनर. ३०० बळी घेणारा पहिला फिरकी गोलंदाज. ७९ कसोटीत ३०९ बळी.
वेस हॉल (वेस्ट इंडिज : १२-०९-१९३७) – वेगवान गोलंदाज. १९६० च्या दशकात आपल्या प्रलयंकारी वेगाने फलंदाजांच्या मनात धडकी भरवत असे. ४८ कसोटीत १९२ बळी.
माजिद खान (पाकिस्तान : २८-०९-१९४६) – मधल्या फळीतील फलंदाज, कामचलाऊ गोलंदाज. ६३ कसोटी (३९३१ धावा, २७ बळी), २३ वन-डे.
अब्दुल कादीर (पाकिस्तान : १५-०९-१९५५) – लेग-ब्रेक गोलंदाज. ६७ कसोटी (२३६ बळी), १०४ वन-डे (१३२ बळी).
जेफ क्रो (न्यूझीलंड : १४-०९-१९५८) – मधल्या फळीतील फलंदाज, कर्णधार. ३९ कसोटी (१६०१ धावा), ७५ वन-डे (१५१८ धावा). सामनाधिकारी म्हणून अनेक वर्षे काम.
डेव्ह रिचर्डसन (दक्षिण आफ्रिका : १६-०९-१९५९) – यष्टीरक्षक. ४२ कसोटी (१५२ झेल+यष्टीचीत, १३५९ धावा), १२२ वन-डे (१६५ झेल+यष्टीचीत, ८६८ धावा). ICC चा व्यवस्थापक आणि ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून अनेक वर्षे काम बघितले.
रॉबिन स्मिथ (इंग्लंड : १३-०९-१९६३) – मधल्या फळीतील फलंदाज. ६२ कसोटी (४२३६ धावा), ७१ वन-डे (२४१९ धावा).
आमिर सोहेल (पाकिस्तान : १४-०९-१९६६) – डावखुरा सलामी फलंदाज, फिरकी गोलंदाज. ४७ कसोटी (२८२३ धावा, २५ बळी), १५६ वन-डे (४७८० धावा, ८५ बळी). १९९२ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
असंका गुरूसिंहा (श्रीलंका : १६-०९-१९६६) – मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. ४१ कसोटी (२४५२ धावा), १४७ वन-डे (३९०२ धावा). १९९६ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
सईद अन्वर (पाकिस्तान : ०६-०९-१९६८) – डावखुरा सलामी फलंदाज. ५५ कसोटी (४०५२ धावा), २४७ वन-डे (८८२४ धावा). भारताविरुद्ध वन-डेमध्ये १९४ धावांची विक्रमी खेळी.
इजाज अहमद (पाकिस्तान : २०-०९-१९६८) – सलामी व मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज. ६० कसोटी (३३१५ धावा), २५० वन-डे (६५६४ धावा). १९९२ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
मार्क रामप्रकाश (इंग्लंड : ०५-०९-१९६९) – भारतीय वंशाचा मधल्या फळीतील फलंदाज. ५२ कसोटी (२३५० धावा), १८ वन-डे.
डॅरेन गॉफ (इंग्लंड : १८-०९-१९७०) – वेगवान गोलंदाज. ५८ कसोटी (२२९ बळी), १५९ वन-डे (२३५ बळी).
नाथन अॅस्टल (न्यूझीलंड : १५-०९-१९७१) – सलामी व मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज, धीमा-मध्यमगती गोलंदाज. ८१ कसोटी (४७०२ धावा, ५१ बळी), २२३ वन-डे (७०९० धावा, ९९ बळी). २००२ साली इंग्लंडविरुद्ध कसोटीत अवघ्या १५३ चेंडूतील दविशतकाचा जागतिक विक्रम अजूनही कायम.
मोईन खान (पाकिस्तान : २३-०९-१९७१) – यष्टीरक्षक, कप्तान. ६९ कसोटी (१४८ झेल+यष्टीचीत, २७४१ धावा), २१९ वन-डे (२८७ झेल+यष्टीचीत, ३२६६ धावा).
अलिस्टर कॅम्पबेल (झिंबाब्वे : २३-०९-१९७२) – मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज, कर्णधार. ६० कसोटी (२८५८ धावा), १८८ वन-डे (५१८५ धावा).
गाय व्हिटल (झिंबाब्वे : ०५-०९-१९७२) – मधल्या फळीतील फलंदाज, धीमा-मध्यमगती गोलंदाज. ४६ कसोटी (२२०७ धावा, ५१ बळी), १४७ वन-डे (२७०५ धावा, ८८ बळी).
क्रेग मॅकमिलन (न्यूझीलंड : १३-०९-१९७६) – मधल्या फळीतील फलंदाज, धीमा-मध्यमगती गोलंदाज. ५५ कसोटी (३११६ धावा, २८ बळी), १९७ वन-डे (४७०७ धावा, ४९ बळी).
थिलान समरविरा (श्रीलंका : २२-०९-१९७६) – मधल्या फळीतील फलंदाज आणि ऑफ स्पिनर. २००१ साली भारताविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक. ८१ कसोटीत ४९ च्या सरासरीने ५४६२ धावा. ५३ वन-डेत ८६२ धावा. मार्च २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकन खेळाडूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यात जबर जखमी पण प्राण वाचले.
मार्टिन गप्तील** (न्यूझीलंड : ३०-०९-१९८६) – सलामीचा आक्रमक फलंदाज. ४७ कसोटी (२५८६ धावा), १९८ वन-डे (७३४६ धावा), १२२ टी-२० (३५३१ धावा). वन-डे पदार्पणात शतक आणि २०१५ च्या वन-डे विश्वचषकात नाबाद द्विशतक.
जीत रावळ** (न्यूझीलंड : २२-०९-१९८८) – भारतीय वंशाचा डावखुरा सलामी फलंदाज. २४ कसोटीत ११४३ धावा.
जॉनी बेअरस्टो** (इंग्लंड : २६-०९-१९८९) – यष्टीरक्षक व आक्रमक फलंदाज. १०० कसोटी (६०४२ धावा, २५६ झेल+यष्टीचीत), १०७ वन-डे (३८६८ धावा, ५८ झेल+यष्टीचीत), ८० टी-२० (१६७१ धावा, ४७ झेल+यष्टीचीत). २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
जोस बटलर** (इंग्लंड : ०८-०१-१९९०) – यष्टीरक्षक, आक्रमक फलंदाज व कप्तान. ५७ कसोटी (२९०७ धावा, १५४ झेल+यष्टीचीत), १८१ वन-डे (५०२२ धावा, २५८ झेल+यष्टीचीत), १२४ टी-२० (३२६४ धावा, ८५ झेल+यष्टीचीत). २०२२ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि २०१९ च्या वन-डे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.
धनंजय डी’सिल्वा** (श्रीलंका : ०६-०९-१९९१) – मधल्या फळीतील शैलिदार फलंदाज, फिरकी गोलंदाज आणि सध्या कसोटी संघाचा कर्णधार. ५६ कसोटी (३७१७ धावा, ३४ बळी), ९० वन-डे (१८६५ धावा, ४४ बळी), ४५ टी-२० (८४७ धावा, १६ बळी).
रशीद खान** (अफगाणिस्तान : २०-०९-१९९८) – लेग स्पिनर आणि आक्रमक फलंदाज. जगभरच्या टी-२० लीगस् गाजवणारा अफगाण क्रिकेटचा पहिला सुपरस्टार. टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमधील सर्वात तरुण कप्तान. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी. आतापर्यंत ५ कसोटी, १०३ वन-डे (१८३ बळी, १३१६ धावा), ९३ टी-२० (१५२ बळी).
[ब] भारतीय खेळाडू --
सय्यद वझिर अली (१५-०९-१९०३) – जालंधरचे ‘वझिर’ मधल्या फळीतील फलंदाज होते. ते ज्या ७ कसोटीत खेळले, त्या सर्व इंग्लंडविरुद्ध होत्या.
माधव मंत्री (१५-०९-१९०३) – मुंबईचे ‘मंत्री’ हे यष्टीरक्षक आणि चांगले फलंदाज होते. ते भारतासाठी ४ कसोटी खेळले. निवृत्तीनंतर क्रिकेट व्यवस्थापनात त्यांनी चांगलाच ठसा उमटवला. मात्र पुढे ‘सुनिल गावसकर’चे मामा म्हणून त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली.
रामनाथ केणी (२९-०९-१९३०) – मधल्या फळीतील फलंदाज मुंबईकर ‘केणी’ भारतासाठी ५ कसोटी खेळले. उच्चशिक्षित केणीनी नंतर स्टेट बँक आणि महिंद्र कंपनीमध्ये उच्चपदे भूषवली.
सय्यद अबिद अली (०९-०९-१९४१) – मध्यमगती गोलंदाज, आक्रमक फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक असा हा अस्सल अष्टपैलू हैद्राबादी खेळाडू होता. त्याने २९ कसोटीत १०१८ धावा करताना ४७ बळी मिळवले. १९७१ च्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील भारताच्या पहिल्या मालिका विजयाचा तो एक प्रमुख शिलेदार होता.
अंशुमन गायकवाड (२३-०९-१९५२) – बडोद्याच्या चश्मिस फलंदाज ‘अंशुमन’ने जिगरबाज, लढाऊ फलंदाज म्हणून ठसा उमटवला. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याविरुद्ध मालिका असली की निवड समितीला त्याची हटकून आठवण येई. १९७५ च्या विंडीज दौऱ्यावर शरीरवेधी गोलंदाजीने त्याचा कान फुटला, ज्याने त्याला नंतर कायम कमी ऐकू येई. ४० कसोटीत त्याच्या १९८५ धावा आहेत. याच वर्षी जुलैमध्ये त्याचे कॅन्सरने निधन झाले.
चंद्रकांत पंडित (३०-०९-१९६१) – स्थानिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतणाऱ्या मुंबईकर यष्टीरक्षक ‘चंदू’ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समकालीन किरण मोरेमुळे थोडक्यात आटोपली. तो फक्त ५ कसोटी आणि ३६ वन-डे खेळू शकला, ज्यात १९८६ च्या ‘टाय’ टेस्टचा समावेश होता. मात्र प्रशिक्षक म्हणून त्याने भरपूर यश मिळवले असून अनेक संघांना त्याने राष्ट्रीय पातळीवर विजेतेपदे मिळवून दिली आहेत.
किरण मोरे (०४-०९-१९६२) – बडोद्याचा छोट्या चणीचा यष्टीरक्षक ‘किरण’ १९८५ ते १९९३ या काळात भारतीय संघाचा अविभाज्य घटक होता. मोरेने अनेकदा आपल्या जिगरबाज, चिवट फलंदाजीने भारताचा डाव सावरला आहे. भारतासाठी तो ४९ कसोटी आणि ९४ वन-डे खेळला. १९९२ च्या विश्वचषकातील जावेद मियांदादबरोबरची त्याची नोकझोक विशेष गाजली.
इशांत शर्मा** (०२-०९-१९८८) – दिल्लीच्या लंबूटांग, लांब केसांच्या ‘इशांत’ने २००८ च्या आपल्या पहिल्याच दौऱ्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या चेंडूच्या वेगाने आणि उसळीने हादरवून सोडले. हेच सातत्य कायम राखत त्याने पुढे १०५ कसोटी खेळत ३११ बळी मिळवले. शिवाय ८० वन-डेमध्ये ११५ बळी घेतले.
मोहम्मद शमी** (०३-०९-१९९०) – भारताचा सध्याचा आघाडीचा वेगवान गोलंदाज. मूळचा उत्तर प्रदेशचा असणारा ‘शमी’ बंगालकडून स्थानिक क्रिकेट खेळू लागला. २०१३ साली भारतासाठी पदार्पण केल्यावर थोड्याच वेळात संघाचा आधारस्तंभ बनला. आत्तापर्यन्त त्याने कसोटीत २२९ तर वन-डेमध्ये १९५ बळी मिळवले आहेत.
सूर्यकुमार यादव** (१४-०९-१९९०) – वयाच्या तिशीनंतर भारतासाठी खेळलेला मुंबईकर ‘सूर्या’ हा ‘३६० अंशात’ खेळू शकणारा अविश्वसनीय फलंदाज म्हणून ओळखला जातो. टी-२० आणि आयपीएल मध्ये तो जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने आतापर्यंत ४ शतके ठोकली असून १६९ च्या धावगतीने धावा केल्या आहेत.
शुभमन गिल** (०८-०९-१९९९) – भारताचा भावी विक्रमवीर म्हणून पंजाबचा गुणवान सलामीवीर ‘शुभमन’कडे पाहिले जात आहे. वन-डेमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम त्याने केला आहे. भारताचा दीर्घ पल्ल्याचा भावी कर्णधार म्हणूनही त्याची चर्चा आहे.
( ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )
( * फलंदाज नाबाद )
( ++ सारी आकडेवारी ३१-०८-२०२४ पर्यंतची )
मित्रहो, ‘सप्टेंबर’ मध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवारासोबत सामायिक करायला विसरू नका.
चांगली माहिती
चांगली माहिती
धन्यवाद "जाई"
धन्यवाद "जाई"