नवरात्र - दुर्गापूजा - नवपत्रिका

Submitted by ऋतुराज. on 11 October, 2024 - 09:15

मनुष्य हा मुळातच उत्सवप्रिय आहे. "उत्सवप्रिया: खलु मनुष्या:" असे कालिदासाच्या शाकुंतलातील वचन प्रसिद्ध आहेच. त्यात, भारतासारख्या विविधांगी संस्कृती, परंपरा असलेल्या देशात अनेक सण, उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. त्यामुळे आपण भारतीय अधिकच उत्सवप्रिय असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतात एकच सण उत्सव वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या भागात विविध पद्धतीने साजरा केला जातो.
असाच एक उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. स्त्री शक्तीचा आणि सृजनाचा उत्सव. शाक्त संप्रदायात शक्तिपूजेला खूप महत्व आहे. स्त्री आणि भूमी यांच्या सृजनाचा हा महोत्सव. भुईतून उगवणारे रोप व गर्भातून जन्मणारे मूल हे या सृजनातील साम्य.
या नवरात्रीला शारदीय नवरात्र असेही म्हणतात कारण हा उत्सव शरद ऋतूत येतो. शरद हा समृद्धीचा महिना. खरं तर “शरद्” हा संस्कृत भाषेत स्त्रीलिंगी शब्द आहे. प्राचीन काली कालगणना शरद ऋतूचा संदर्भ देऊन केली जात असे, आणि म्हणूनच समृद्ध, संपन्न दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देताना तो "जीवेत् शरद: शतम्" असा दिला जातो.
हा शारदीय नवरात्र भारतात विविध पद्धतीने साजरा करतात. महाराष्ट्रात, एका मातीच्या घटात पाणी ठेऊन तो घट मातीच्या राशीवर ठेवला जातो. या मातीत नवधान्य पेरतात. नंदादीप अखंड तेवत ठेवला जातो. भोंडला खेळला जातो. तर गुजरात भागात, मातीच्या घटात तेवता दिवा ठेवला जातो व त्याची रोज पूजा करतात. या घटाला गरबा म्हणतात. त्या भोवती फेर धरून गरबा, टिपऱ्या खेळतात. घट, माती, बीज, दिवा अश्या प्रतीकात्मक रूपाने एकप्रकारे मातृरूपाची, सृजनाचीच पूजा केली जाते.
बंगाल प्रांतात मात्र हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपल्या गणपती दिवाळी इतका मोठा आणि महत्वाचा सण बंगाली जनांचा दुर्गापूजा हा आहे. या सणाची समस्त वंगबंधू वर्षभर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. दुर्गापूजेदरम्यान आपल्याकडील गणपतीसारखे भव्य दिव्य मंडप (पंडाल), दिव्यांची रोषणाई, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, पूजाअर्चा, खरेदीची लगबग, नातेवाईकांच्या गाठीभेटी इत्यादी गोष्टींनी हा भाग नुसता गजबजून जातो.
शाक्त पूजेत स्त्रीची अनेक रूपात पूजा केली जाते. त्यातील, मातृरूपी दुर्गा हे रूप जितके कणखर तितकेच ते मोहक आहे. आपल्याकडे दहा दिवसाचा शारदीय नवरात्रोत्सव हा बंगालमध्ये मात्र पाचच दिवसांचाच असतो. षष्ठीला पंडाळात दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी कार्तिकेय आणि गणपती यांचे त्यांच्या वाहनाबरोबर थाटामाटात आगमन होते. बंगाली लोकांचा असा विश्वास आहे की या काळात, देवी दुर्गा कैलास पर्वतावरुन गणेश, कार्तिक, लक्ष्मी आणि सरस्वती बरोबर तिच्या माहेरी परतते.
Durga Parivar.jpg

सातव्या दिवशी, सप्तमीच्या पहाटे, सूर्योदयाच्या आधी कोवळ्या केळीच्या खुंटाला नवपत्रिका- नबापत्र- नबपत्रिका (नऊ पाने) पांढऱ्या अपराजिता (गोकर्ण) वेलीच्या साहाय्याने बांधून त्याला गंगेत मंगल महास्नान घातले जाते. आधीच्या काळात गंगास्नानानंतर पावसाचे पाणी, सरस्वती नदीचे पाणी, समुद्राचे पाणी, कमळ तळ्यातील पाणी, झऱ्याचे पाणी, इतर पवित्र नद्यांचे पाणी अश्या विविध जलाचे स्नान घातले जाई व ते स्नान घालताना मालव, बिभास, भैरवी, ललित, वसंत यासारखे राग गायले जात. ह्या नवपत्रिकेसहीत केळीच्या खुंटाला "कोला बहू" (केळीच्या रूपातील सवाष्ण) असे म्हणतात. या कोला बहूला आता बंगाली लाल काठाची पांढरी साडी (पाड) नेसवली जाते आणि तिचा नववधूप्रमाणे सगळा साज शृंगार केला जातो. आता या कोला बहूची, ढाक (बंगाली ढोल) वाजवत मिरवणूक काढली जाते. जुन्या काळी कोला बहू स्नान विधी, हा बंगालच्या श्रीमंत जमीनदार आणि व्यापाऱ्यांसाठी लांब मिरवणुका काढून स्वतःचे ऐश्वर्य दाखवण्यासाठीचा एक महत्वपूर्ण सोहळा होता.
Navpatrika snan.jpg

ही कोला बहू आता पंडाळात आणून तिची गणपतीच्या उजव्या बाजूला सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. तिची षोडशोपचारे पूजा केली जाते. ही पूजा केल्यावरच दुर्गेच्या पार्थिव मूर्तीत या कोलाबहू - नवपत्रिकेच्या सजीव रूपातून प्राण प्रस्थापित होतात असे मानतात.

आपल्याकडील गणपती- हरितालिकेला जशी पत्रीपूजा केली जाते तसाच काहीसा प्रकार. यासाठी त्या काळात उपलब्ध असणाऱ्या नऊ वैशिष्टयपूर्ण वनस्पती पुजल्या जातात. या प्रत्येक नवपत्रिकेला दुर्गेचे एक रूप मानतात. प्रत्येक पान दुर्गेच्या एका रूपाचे प्रतिनिधित्व करते.
१. केळी: देवी ब्राह्मणी
२. कासाळू: देवी कालिका
३. हळद: देवी दुर्गा
४. जयंती: देवी कार्तिकी
५. बेल: देवी शिवा
६. डाळिंब: देवी रक्तदंतिका
७. सीता अशोक: देवी शोकरोहिता
८. अळू: देवी चामुंडा
९. तांदूळ: देवी लक्ष्मी

Navpatrika 1.jpgNavpatrika 2.jpgNavpatrika 3.jpg
या सर्व वनस्पतीमध्ये विविध औषधी आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत.

Ganesh with kola Bou.jpg
कोला बहू गणेशाच्या शेजारी ठेवल्याने तिला काही ठिकाणी गणेशाची पत्नीदेखील मानतात. कोला बहू संबंधित एक मनोरंजक लोककथा आहे.
कथेनुसार, गणेशाची लग्नाची मिरवणूक घरापासून निघाली होती. अचानक गणेशाला आठवले की आई कुठे दिसत नाही. म्हणून तो परत फिरला, घरी आल्यावर, त्याला आई दुर्गा वाटीत दूध भात खाताना दिसली. गणेशला हे विचित्र वाटले आणि त्याने आईला विचारले, की ती असे का करतेय. तेव्हा दुर्गा माता त्याला म्हणाली "जोडी तोर बाऊ आमके खेते ना दाये?" (तुझ्या बायकोने मला जेवायला दिले नाही तर?). हे ऐकून गणेश अस्वस्थ झाला, तो घराबाहेर पडला, त्याला समोर एक केळीचे झाड दिसले, त्याने ते तोडले आणि आईला म्हणाला "इताई तोमार बहू" (ही तुझी सून). अश्या पद्धतीने गणेशाचे लग्न केळीच्या झाडाशी झाले आणि म्हणून त्याला कोला बहू असे नाव पडले.
Durga .jpg

या दुर्गोत्सवात दररोज पुष्पांजली, आरती केली जाते. अष्टमीला कन्यापूजन केले जाते. अष्टमी आणि नवमी दरम्यान संधी पूजा केली जाते. यात देवीला १०८ कमलपुष्पे वाहिली जातात. नवमी दिवशी मोठा होम करून त्या दिवशी देवीला विविध भोग दाखवले जातात. दशमीला स्त्रिया "धुनुची नाच" करतात म्हणजे हातात धुपाची धुपाटणी घेऊन देवीसमोर केलेले नृत्य. हीच प्रथा आपल्याकडे देवीच्या उत्सवात घागरी फुंकणे या प्रथेशी फार मिळतीजुळती आहे. तसेच "सिंदूर खेला" खेळला जातो. यात देवीच्या सर्वांगाला कुंकू लावतात व नंतर सर्व सवाष्ण स्त्रियांनी एकमेकींना कुंकू लावतात. अश्या प्रकारे उत्साहात दुर्गापूजा साजरी केल्यावर दशमीला दुर्गेचे विसर्जन करतात. कालांतराने, जसजशी मूर्तिपूजा अधिक लोकप्रिय होत गेली, तसतसे नवपत्रिकेचे महत्त्व थोडेसे कमी होत गेले.
सध्याच्या धकाधकीच्या आणि पर्यावरणविषयक चिंतेच्या युगात, नवपत्रिका विधी हा निसर्गाचा आदर आणि वनस्पतींच्या रूपात देवीची पूजा, याद्वारे एक संस्कृती आणि पर्यावरण याना जोडणारा एक दुवा आहे. नवपत्रिका विधी हा बंगालमधील दुर्गापूजेशी संबंधित समृद्ध परंपरा, रीतिरिवाज यांचा एक अविभाज्य भाग आहे.
असे सर्व भारतीय सण, उत्सव लोकांमध्ये एकप्रकारे उत्साह, आनंद आणि एकमेकांबद्दलचा सौहार्द अधिकाधिक वृद्धिंगत करतात.

माहितीसाठी आभार:
डॉ सुचंद्रा दत्ता, नॅशनल महाविद्यालय, मुंबई.
सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती. बंगाली पुजा पाहिल्यात पण त्यात इतक्या मुर्ती का असतात ते कळले नव्हते. या लेखामुळे उलगडा झाला.

बंगालच्या प्रसिद्ध दुर्गापुजेसंबंधी उत्सुकता असतेच. त्या पूजेची सांग्रसंगीत माहिती रोचक शब्दात इथे मिळाली.
लेख आवडला.

पंचमहाभूते आपण नेहमी पुजत आलोय. पत्री पुजा आणि वनस्पतींना देवीची नावं देऊन पुजा केली जाते ती एक पंथ दो काज वाटते...
पुजेच्या माध्यमातून त्यांचे महत्व आणि उपयोग पुढच्या पिढीला कळावा.
या परंपरेत याचं अलिखित दस्तावैजीकरणच होतंय.

आमच्याकडे या घटाला न‌ऊ दिवस रोज एक अशा न‌ऊ माळा घालतात. फूलमाळेचे एक टोक भिंतीत ठोकलेल्या खिळ्याला आणि एक घटाला बांधतात. दस-याच्या दिवशी घटाभोवती उगवलेले कोवळे धान्य कोंब टोपीत पुढच्या बाजूला खोवतात, एकमेकांना सोनं देताना.

छान लेख...
बंगाली पूजेचा ठाकूर वाड्यात मोठा थाट असतो.

छान लेख !
देवीची विविध रूपे आणि विविध प्रथा.

साधनाताई, कुमार सर, सामो, जाई, दत्तात्रय साळुंके, ऋन्मेssष, स्वाती२, मनीमोहर, अस्मिता, अनिंद्य, rmd, धनुडी, Diggi12, किल्ली प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सस्नेह नमस्कार,

विजयादशमीच्या (दसरा) हार्दिक शुभेच्छा.

माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, सालाबादप्रमाणे यंदाही पर्यावरणाचा विचार करुन, आपट्याची पाने न स्विकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. परंतु आपल्या सर्वांचा मान राखून मी आपणाकडून फक्त १ ग्रॅम सोन्याचे पान आनंदाने घेईन तरी आपणही पर्यावरणाचा विचार करुन कमीतकमी १ ग्रॅम सोन्याचे पान नक्कीच द्याल अशी आशा करतो.

आपणांस व आपल्या कुटुंबियांना
विजयादशमीच्या (दसरा) हार्दिक शुभेच्छा ..

माहितीपूर्ण लेख ऋतुराज ..!

आमच्या कॉलनीत नवरात्र उत्सवासोबत दुर्गापूजा उत्सव पण उत्साहात साजरा होतो .. मी नेहमी दुर्गा पूजेच्या पंडालमध्ये जातेच .. देवीचा देखावा , रोषणाई आकर्षक असते ... बंगाली बांधवांनी खूप सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात .. बंगाली भाषा येत नाही पण मला आवडतात दुर्गोत्सवातले बंगाली भाषेतले कार्यक्रम पाहायला ..

फारएण्ड, चामुंडराय, डॉ रोहिणी, रुपाली विशे - पाटील धन्यवाद.
अमा, आवाजाचा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. डॉल्बी, डीजे लावल्याशिवाय सण साजरेच करू शकत नाही असे वाटते मंडळांना.

आहाहा सुरेख .

डोंबिवलीत सर्वेश हॉलमध्ये असतं बंगाली नवरात्र. बहुतेकदा को ब्रा त महालक्ष्मी उभी करतात तेव्हा दर्शनाला जाते. त्यानंतर त्याच दिवशी दुर्गापुजाही बघून येते.