भुताची किरपा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 October, 2024 - 01:20

बारकू राऊत गावातलं एक पाप्याचं पितर. शिडशिडीत देहयष्टी. एक चालता-बोलता अस्थीपिंजर. डोळ्याच्या खोबण्या झालेल्या. गालफडाची हाडं वर आलेली. चारदोन दात मुखात. अंगावर मास कसलं ते नाहीच. वर आलेल्या गालफडाच्या हाडाच्या मधोमध असलेलं टेकडीसारखं तरतरीत नाक. एरवी तोंडावर बसलेली माशी हलवायचं बळ नव्हतं पण तो चार पोरांचा बाप होता.

घरची दोन अडीच एकर शेती. तीत देखील तो काम करायचा नाही. पाऊस पडला की त्याची बायको, पोरं ज्वारी किंवा बाजरी पेरणी करायचे. खुरपणी, कुळवणी तेच करायचे. पीक तयार झालं की मळणी, उपणणी व्हायची पण त्या आधीच अर्ध पीक मोगरीनं बडवून पिठाच्या गिरणीत गेलेलं असायचं. बारकू कामाला हात लावायचा नाही. त्याचं काम एकच शेताच्या बांधाला दोन शेळ्या चारणं.

घरात कधी तेल आहे तर मीठ नाही अशी अवस्था. त्यामुळं बायको, पोरं सतत रोजंदारीवर काम करायचे. कसंबसं घर चालायचं.

बनी बारकूची बायको. संसाराचा गाडा हाकणं हे तिचं काम. बारकू दोन शेरडं घेऊन शेतात तिच्या अवतीभवती असायचा. तिथंही त्याला कोल्ह्याची, लांडग्यांची भिती वाटायची; पण बनी जवळ असली की जीवात जीव यायचा.

आठवडयाचा बाजारहाट, देणीघेणी ही कर्त्या पुरुषाची कामं सांभाळून बनी लग्नकार्याला देखील हजेरी लावायची. थोडक्यात राऊता घरची कर्ती पुरुषच ती. गावात सगळे कर्ते पुरुष तंबाखू खायचे तशीच बनीही खायची. ती बिनधास्त बाप्यांमध्ये बसून हातावर तंबाखू चुना मळायची . चिमटीत धरुन अलगद खालच्या ओठात धरायची. पुरुषांसारख्या पिंका मारायची. त्यामुळे काही मंडळी तिला बन्याबापू म्हणायचे.

बारकू तिच्यापुढे गोगलगाय व्हायचा.

असा हा बारकू एकदा लागिरला. भुताने हा काडीपैलवान का निवडला कुस्ती खेळायला हे ही गौडबंगालच.
गावात रोजगार हमीची बांधबंदिस्तीची कामं चालू होती. दिवस उन्हाळ्याचे होते. गावाच्या सभोवार शेतात उतारावर बांधाला सरकार तर्फे ताली घातल्या जात होत्या. अशा तालींमुळे शेतातल्या पाण्याबरोबर वाहून जाणाऱ्या मातीला प्रतिबंध व्हायचा आणि शेताची झीज थांबायची. पाणी शेतात मुरायचं. या तालीच्या आतील बाजूला विशिष्ट मोजमाप असलेले चौकोनी खड्डे खणले जायचे आणि त्यातली माती तालीवर पडायची. सरकारी कर्मचारी खड्ड्याची लांबी, रुंदी, खोली मोजायचे आणि किती ब्रास माती तालीवर टाकली त्याचा हिशोब व्हायचा. त्याप्रमाणात मजुरीचे पैसे मिळायचे. बहुतेक लोक सकाळी लवकर कामावर जायचे आणि दुपारी उन्हाचा कहर वाढला की सुट्टी करायचे. कुठेतरी झाडाखाली बसून दशम्या सोडायचे. पाणी प्यायचे. थोडावेळ सावलीला विश्रांती घ्यायची आणि ऊन उतरल्यावर पुन्हा काम सुरु करायचे.

अशाच एका कामावर पोरांना घेऊन बनी जाऊ लागली. तिचा नवरा बारकू देखील त्यांच्या मदतीला जाऊ लागला. शेळ्या मोकळ्या रानात सोडल्या जायच्या. त्या बांधाच वाळकं गवत , छोटी काटेरी झुडपे, नांगरटीतून वर आलेल्या काशा (हरळीची मुळं) खायच्या . बाजूला एखादी पांद किंवा ओहळ असेल तर आटलेल्या डबक्याच्या आजूबाजूला डोकं झिरो मशिनने भादरल्यावर बारीक केस उरावेत तद्वत बारीक बेंदाडाची हिरवळ असायची ती खात. बारकू माती टाकण्याचं काम करायचा. खणायला टिकाव त्याच्यानं उचललाच जायचा नाही. बनी पदर खोचून माती खणायची. बारकू आणि त्याची पलटन माती घमेल्यात भरुन टाकायची. बारकू अर्धे, अर्धे घमेले भरून माती टाकायचा.

दिवस माथ्यावर आला होता. ऊन रणरणू लागले होते. सकाळपासून माती खणून, वाहून माणसे थकून गेली होती. तोंडाला कोरड पडू लागली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. बनीच्या माती खणणाऱ्या हातांनी असहकार पुकारला होता. वारा पडला होता. त्यामुळे घामाघूम व्हायला होत होते. तशात अंगावर सांडलेली माती घामात मिसळून बनी मातकट दिसत होती. बनीने काम थांबवलं. पोरांना आणि नव-याला म्हणाली
“भाकरी खायाला चला. बाकीची माणसं कवाच गेली. मी आन पोरं यरीवर जातो. चरवीत प्यायला गार पाणी काढतो. ”
असं म्हणत बनी पोरांना घेऊन पुढे झाली. थोडी माती वर टाकायची बाकी होती. तेवढं काम झालं की बारकू जेवणाची सुट्टी करणार होता.

विहिरी जवळच्या डेरेदार आंब्याच्या गार सावलीला बरीच माणसं भाक-या खात बसली होती. तोंडी लावायला गप्पा होत्या. ज्यांच्या जेवणात सुकी भाजी, चटणी होती ते फडक्यावर किंवा हातावर भाकर ठेवून खात होते. बुक्कीने कांदे फुटत होते. कालवणवाले अल्युमिनीयमच्या ताटलीत भाकरी कुस्करून तोंडाने फुर्रsss आवाज करत काला ओरपत होते. बायका वाढता, वाढता खातही होत्या. एक दोन कुत्री समोर बसली होती त्यांनाही कोरभर भाकरीचा तुकडा मिळत होता. भाकरी खाताना खुशीत येवून ती शेपटी हलवत होती.

भिका चोरग्याने ढेकर देत हात धूतला. धोतराला हात पुसुन कोपरीच्या खिशातनं बिडीचं बंडल आन काडेपेटी काढली. बिडी शिलगावून धूर काढायचा अवकाश तो त्याला बारकू खड्ड्यात पडल्यासारखा वाटला. मनात म्हणला पाय घसरला आसल. पण बारकू पुन्हा, पुन्हा खड्ड्यात पडत होता. पुन्हा उठत होता. पुन्हा पडत होता. आता तर तो उठून पैलवाना सारखा पवित्रा घेत शड्डू थोपटू लागला. भिकाला काय समजना ह्यो काडीपैलवान कुणाबरं कुस्ती खेळतोय. त्याला कळना हे भांग प्याल्यागत तेच तेच का करायला लागलय. मधेच दात ओठ दाबत पट काढल्यागत करायचं. मधेच स्वत: उताना पडायचा. मधेच गुडघं मुडपत कोणाच्या तरी छाताडावर बसून त्याचं डोकं रेंगसतोय असे हावभाव करायचा. मधेच कुस्ती जिंकल्यासारखं दोन्ही हात उंचावून एक पाय काटकोनात वर करत एका पायावर उड्या मारायचा.

बाकीच्या लोकांच्याही हा प्रकार लक्षात यायला वेळ लागला नाही. बनीला वाटलं आपला नवरा लोकांना हासवत असावा. पण बराच वेळ झाला तरी बारकू कुस्ती खेळतच होता हे पाहून भिका चोरग्यानं बुड हलवलं. तशी जेवणं अर्धवट टाकून बनी,बनीची पोरं, नाथा,जगू,बंड्या बारकू कडं गेले. नाथाने बारकूला काय करतोय असं विचारलं. तर बारकू रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला
“ये माकडा तू कोण ईच्च्यारणार? तुझी पण ह्याच्या सारखी हालत करील. घोळसू , घोळसू घेईल. म्या महाराष्ट्र केसरी हाय. “
नाथा तब्बेतीनं बारकूच्या डबल टीबल. त्याला या काडीपैलवान महाराष्ट्र केसरी बारकूच हासू आलं. तसं बाकीचे लोकही फिदी फिदी करुन हसू लागले. ते पाहून बनीचा पारा चढला. ती सगळ्यांवर ओरडली.
“ तुम्ही काय माणसं हातं की जनावरं. त्याला काय झालंय हे बघायचं सोडून हसत बसलात”.
असं म्हणत तिने बारकूच्या कमरेला मिठी मारून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तसं बारकूने एक झटका दिला तशी बनी कोलमडली. बारकूचा आत्मविश्वास वाढला होता.
हे पाहून नाथा, बंडया बारकूला पकडण्यासाठी पुढे झाले व दोघांनी दोन बाजूने त्याला पकडला. तसा तो त्यांनाही झटके देऊ लागला. त्याचं दात ओठ खात सोडवून घेण्यासाठीची धडपड चालूच होती. आता लोकांना कळून चुकलं हे लागिरलयं; नाही तर बारकू असा कधीच वागला नव्हता. सगळ्यांनी बारकूला बैलगाडीत घालून घरी आणला. बनीनं एका कोप-यात वाकळ अंथरली. तिवर बारकू लवंडला. पडल्या पडल्या थरथर कापू लागला. अचानक बरळू लागला.
“सोड मला नाही कुस्ती खेळायची. जबरदस्ती केली तर दाखवीन इंगा तुला.”
“बने मला खारीक, खोबरं, बदाम, काजू खायला दे. म्हशीच्या शेरभर दुधात केसर घालून प्यायला दे. त्याला आता बनी समोर मान वर करुन बोलता येतंय. पुर्वी तो बनीचा बैल होता. आता बनी त्याचा शब्द खाली पडू देईना.
तो दिवसाउजेडी तंद्री लावून बसत होता.
काय करावं म्हणून बनी इच्चारी का बिच्चारी होऊन बसलेली. इतक्यात डोक्यात लख्खकन प्रकाश पडला.
“अगं बया मारती देवरूषी ह्यांचा मैतर बाजूच्या आडगावात राहतोय आन मला कसं आठावलं नाय”.
“बाळ्या ए बाळ्या”
“काय आय”
“आर जा मारती देवरष्याला बोलवून आण आडगावावनं. म्हणावं बा लागिरलाय. त्याचं भूत काढायचं हाय.”
“बरं माय.”
असं म्हणून बाळ्या आडगावला मांत्रिकाकडं गेला.
इकडं गावांत सगळीकडं ही बातमी वा-यासारखी पसरली. चर्चा चालू झाली.
“उद्याच्यानं मळ‌ईला तालीच्या कामावं नको बाबा.”
“आरं खरंच रं, आपल्याला बी झपाटलं तर.”
“ आरं कसलं भूत घेऊन बसला. भूतं कुठं असत्यात व्हय”.
“लय शाना हाय. आम्हीं नाय कामावर जायचो.”
“आरं मग खायचं काय?”
“शेजारच्या गावात जाऊ रोजगार हमीच्या कामावर.”
जे भूत नाही म्हणत होते त्यांचं उसनं अवसान, बहुसंख्य लोकं मळ‌ईच्या कामावर यायला तयार नाहीत हे पाहून गळालं. अन् तसंही शेजारच्या गावचा पर्याय आहे तर कशाला मगजमारी. असा त्यांचा विचार झाला.
शेवटी लोक भुताच्या भितीमुळे कामावर यायला तयार नाहीत, असा अहवाल शासकीय पातळीवर गेला. लोकभावनेचा आदर करत आमदारांनी हे काम गावातच इतरत्र कुठं करता येईल का याची चाचपणी सुरू केली. दुस-या शिवारी नाला बिल्डींगच्या कामाला सुरुवात झाली. नियोजित बांधाच्या खालच्या अंगाला काही अंतरावर लागूनच विजयची विहीर होती . विजय सारखे आणखी काही शेतकरी ज्यांच्या विहिरी बंधा-याच्या आसपास होत्या ते खुष होते.

गावात सगळं आलबेल होतं. मारती देवरुषी बारकूला मंत्र तंत्र करत होता. आठ पंधरा दिवस ज्या शेतात बारकूची आणि भूताची कुस्ती झाली तिथं मारती दारुची बाटली, गांजा, चिलीम, कोंबडं, अंड्याच्या पोळ्या, भजी, भाकर बारकू वरुन उतरुन ठेवू लागला.
जसजसी भूताची एक मागणी पूर्ण व्हायची तसं भूत वेगळी मागणी करत होतं. तिखट खाऊन कंटाळा आल्यावर भुतानं श्रीखंड,पुरी, पुरणपोळी,आमटी,कुर्ड‌ईवर यथेच्छ ताव मारला. शेवटी झाडाला सोडताना गाडीभाडं १५१ रुपये मागू लागलं; तशी बनी मारतीला म्हणली…
“काय मारती भाऊ, भूतं काय एसटीनं जात्यात व्हयं.”
“बनू वयनी काय असतया,त्येनला न्यायला भुतांची एसटी असतीया. म्या बघितली. एकदा घाटात एसटी पडून आतली समदी माणसं मेली. त्येंची भूतं झाली आन ती एसटी त्यांनी सोडलीच नाय. डायवर, कंडक्टर बी भूतच झाले. तवापसनं कुठली बी भूत कितीबी लांब जाया लागली एसटीनं. ती एसटी माणसाला दिसत नाही. जव्हा दिसती तवा एसटी, भूतं ख-या एसटीचं रुप घेत्यात. फळं, च्या,जेवाण, डिझेल घेत्यात.त्यासाठी पैकं द्यावं लागत्यात. नायतं झाडाला सोडत नाय भूत.”
बनीनं सगळं ऐकल्याव मनात म्हणाली
“मेल्याव आपणबी भूतच व्हावं. आपल्या पण इच्छा असतीलच की. सध्या पैकं दिल्या बिगर सुटका नाय. नवरा बारकू ऐकण्यात हाय, नाय तर नसतं दिलं पैकं.” असा मनात विचार करून तिनं मारतीला १५१ रुपये दिले.

आडगावची वाट मळ‌ईतूनच जात होती. त्या वाटेने मारती देवरुषी सोडून कोणी फिरकायला तयार नव्हतं. भुतांच्या भितीनं लोकांनी मळ‌ईला वळसा घालून जाणारी दुसरी लांबची वाट पत्करली होती.

बारकूच्या ताटातही अंड्याच्या पोळ्या, चमचमीत मटण, भजी वाढलं जात होतं. गोडधोड ही मिळू लागलं. बारकूला हळूहळू बाळसं येत होतं. बारकूची पोरंही मजेत होती. बनीचा आवाज दबला होता. हे समदं करण्यात तिला कर्ज‌ झालं होतं.

बंधा-याच्या कामावर जाणारे लोकही पोटापाण्याची सोय गावातच झाली म्हणून खुष होते.

उन्हाळा सरुन पाणकळा सुरू झाला. पाऊस धो धो कोसळला. नदी नाले तुडुंब झाले. विजयच्या रानातलं धरणही भरुन गेले , पाणी सांडव्यातून ओसंडू लागलं.
एक दिवशी ग्रामसभा भरली अन् पाणी पुजायचा ठराव झाला.

मारती देवरूषी आता मळ‌ईत राह्यला आला. तिकडची शेती त्यानं स्वस्तात पदरात पाडून घेतली होती. मळ‌ईला लोक आता भुताचा मळा म्हणू लागले. बारकूचे मळ‌ईत जाणे येणे सुरु झाले, तशी बनी‌ काळजीत पडली पण नंतर निर्धास्त झाली. मारुतीने भुताचा बंदोबस्त वेताळबुवाचे देऊळ बांधून केला होता. देवळाला, गाव वर्गणी विजयने जमा केली. एके दिवशी बारकूनं नोटांचं पुडकं बनीच्या पुढ्यात टाकलं. बनी आ वासून ते बघत राहिली. तेव्हा बारकू म्हणाला
“बघती काय मळ‌ईच्या भुताची किरपा हाय.”
तिला वाटलं आपल्या नव-याला भूत वश झालं असलं, आन हे वशिकरण मारतीनं शिकवलं आसलं . कसं का असंना लक्ष्मी हाय ती.
आता बनीची कर्तृत संपली अन् बारकूचं राज्य आलं. बारकू आता बारीकसारीक कामही करेनासा झाला. फक्त हुकुम सोडायचा.
बंधा-याचं पाणी पुजन झालं. विजयने गावातल्या काही निवडक मित्रांना मटण, दारुची पार्टी ठेवली. त्या पार्टीला मारती देवरुषी आणि बारकूला आवर्जून बोलावले.
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. मजा आली वाचताना. कित्येक विस्मरणात गेलेल्या शब्दांची उजळणी झाली. लागीर, दशमी, पाणकळा , वरी, कोरभर...

छान लिहिलंय.
वाचताना भुताचा जन्म आठवत होती.
अर्थात त्यात चुकीने भुताचा जन्म आहे तर इथे प्लॅन करून केलेला भुताचा जन्म Happy
बारकू मात्र सगळीकडून तुपात Happy

मजा आली वाचताना.
विजय आणि कंपनीची जमीन नवीन नाल्याच्या खालील बाजूला होती ना.

मी केव्हाधारून विचार करत होतो.
माझे वडील कर्मकांडात अत्यंत कर्मठ होते. प्रवासात ते "दशम्या" बांधून घेऊन जात असत. ते त्यांना कसे चालायचे. आता हे मिळाले.
दशमी ---कणीक अथवा जोंधळे, बाजरी इ. च्या पिठामध्ये दूध किंवा फळाचा रस घालून केलेली भाकरी. ही पीठ भाजूनही करतात. [सं. दह्]
हे अंधुक आठवत होते. तसेच आमच्याचकडे पापडाचे पीठ पाण्यात नसत भिजवत. ते केळीचा खुंट असतो त्याच्या गाध्याला (काल्याला) पिळून जे पाणी निघते त्यात भिजवत असत. असे हे सोवळे ओवळे.

1) http://www.maayboli.com/node/13997 रानबाचा वारस
2) http://www.maayboli.com/node/14018 वेडा
3) http://www.maayboli.com/node/14035 भुल
४) http://www.maayboli.com/node/14294 निर्णय
५) http://www.maayboli.com/node/14421 राखण
६) http://www.maayboli.com/node/14500 बोलका
७) http://www.maayboli.com/node/14655 चुक
८) http://www.maayboli.com/node/14849 सारीपाट
९) http://www.maayboli.com/node/15098 वादळ
१०) http://www.maayboli.com/node/15138 हिशोब
११) http://www.maayboli.com/node/15545 वृक्षारोपण
१२ http://www.maayboli.com/node/16012 रक्ताळलेला हात
१३) http://www.maayboli.com/node/16798 निर्धार
१४) http://www.maayboli.com/node/17716 सत्तांतर
१५) http://www.maayboli.com/node/18121 गड्या, संसार काही....
१६) http://www.maayboli.com/node/20698 कल्याणकारी राज्य...
१७) http://www.maayboli.com/node/25235 होळी भाग १
१८) http://www.maayboli.com/node/25282 होळी भाग २
१९) http://www.maayboli.com/node/25415 होळी भाग ३
२०) http://www.maayboli.com/node/27606 थर्ड शिफ्ट
२१) http://www.maayboli.com/node/38587 चकवा
२२ ) http://www.maayboli.com/node/18721 अघटीत
२३) http://www.maayboli.com/node/49213 अघटीत -- २
२४) http://www.maayboli.com/node/49231 अघटीत -- ३
२५) http://www.maayboli.com/node/49549 ऋणानुबंध

या २५ कथा पैकी अनेक भूत कथा आहेत. वाचून पहा.

नितीनचंद्र...
तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझी कथा वाचल्यावर ती आवडली किंवा नाही आवडली असा प्रतिसाद अपेक्षित आहे. ते लिहायचं सोडून मी काय लिहिलंय हे वाचा म्हणता. मी तुमच्या धाग्यावर येऊन माझ्या सर्व कथा वाचायला सांगणं निश्चित अप्रस्तुत आहे.

छान कथा ...!
कथेतली पात्र आणि प्रसंग अगदी डोळयांसमोर उभी केली आहेत ..
देवाचं , भुताचं भय घालून आपला कार्यभाग साधणारे महाभाग समाजात असतातचं ..
पुढील कथेच्या प्रतिक्षेत ..!