रस्त्यापासून दूर... एक भलामोठा डोंगर.
डोंगराच्या पायथ्याशी छान टुमदार दुमजली बंगल्यांची वस्ती.
शहरापासून दूर... अलिप्त.
मुद्दामहून राखलेली...
...नाहीतर त्या अजस्त्र, महाकाय, आकाशालाही गिळंकृत करणाऱ्या स्कायस्क्रेपरच्या गर्दीत झाडीत असलेली ही वस्ती कधीचीच संपली असती...
...पण त्या वस्तीला आशीर्वाद होता त्याचा, म्हणून तिचं नावच होतं...
...सोडा तो विषय पुन्हा कधीतरी.
तर तिथल्याच एका बंगल्यात तो राहायचा...
...वयाच्या खुणा स्पष्ट चेहऱ्यावर उमटलेल्या, मात्र तरीही ताठ मानेने आकाशाकडे बघणारा.
सतत काही ना काही वाचत असलेला, लिहीत असलेला.
मध्येच जुनी गाणी ऐकणारा...
आपल्या गेलेल्या पत्नीच्या फोटोकडे बघून हसणारा...
...शेजारी पाजारी सर्वजण त्याचे मित्रच होते. कधी ना कधी त्याची सोबत केलेले...
...एका मोठ्या प्रवासातील अनेक सहप्रवासी.
आखीव - रेखीव दिनक्रम. गेल्या पाच वर्षात खंड नाही. सकाळी पाव लिटर दूध, दुपारी पाव किलो चिकन, आणि रात्री अर्धा किलो सलाड. गेल्या पाच वर्षात या व्यतिरिक्त त्याने काही खाल्लं देखील नव्हतं.
म्हातारा फटकळ नव्हता, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा होता.
पण स्वतःहून कुठे जाणं त्याला जमतही नव्हतं.
आज सकाळी तो उठला, छानपैकी दूध गरम केलं.
आणि गाडीचा आवाज आला.
त्याच्याच दारासमोर थांबण्याचा...
एक सूक्ष्म आठी त्याच्या कपाळावर उमटली.
मात्र तरीही स्वतःहून तो पुढे गेला नाही. तो वाट बघत बसला.
बेल वाजली.
आता मात्र त्याला जाणं भाग होतं.
त्याने छोट्या स्क्रीनवर बघितलं.
त्याच्यासमोर एक बावीस वर्षांची अतिशय सुंदर युवती उभी होती.
गेल्या कित्येक वर्षात त्याने अशी युवती बघितली नव्हती.
मात्र याने त्याची आठी अधिक रुंदावली.
त्याने दरवाजा उघडला.
"तुम्हाला गार्डने थांबवलं नाही? कारण मला सूचनादेखील केली नाही?"
"तरीही आपण दरवाजा उघडलात. स्ट्रेंज." ती हसली.
"तिच्या हास्याने क्षणभर तो विरघळला."
"सॉरी." तो म्हणाला.
"कशासाठी?"
"आपण सॉरी का म्हटलो ते त्यालाच कळलं नाही..."
"गार्डने मला सांगायला हवं होतं. तो स्वतःशीच पुटपुटला."
"माझ्याकडे गन सुद्धा आहे. ती शांतपणे म्हणाली आणि तिने एक गन काढून समोर टेबलावर ठेवली."
म्हातारा घाबरला.
"माझ्यासारख्या एका म्हाताऱ्याकडे तुला काय मिळणार? त्याने अजिजीने प्रश्न विचारला."
"म्हाताऱ्या व्यक्तींकडे देण्यासारखं खूप असतं. कारण त्यांचं आयुष्य मोठं असतं."
"मी काहीही कमावलं नाही बेटा."
"मग तुमचं लिखाण घेऊन जाऊ? तीच तुमची कमाई समजू?" तिने त्यांच्याकडे रोखून बघितले.
"काहीही नाहीये त्यात." तो हसला.
तीदेखील हसली.
"नाशिकविषयी तुम्ही काय सांगाल?" तिने प्रश्न विचारला, आणि सोफ्यावर बसली.
तिचा इशारा समजून तोही बसला.
"जगातलं सगळ्यात महत्वाचं शहर." त्याने उत्तर दिले.
"फक्त काही नावाजलेल्या व्यक्ती त्या शहरात राहतात म्हणून?"
"नाही." म्हातारा म्हणाला.
"मग? भारताचा इतिहास बदलणाऱ्या व्यक्ती त्या शहरात राहायच्या म्हणून?" तिने प्रतिप्रश्न केला.
"दंतकथा आहेत त्या... लोकांनी वाढवत नेलेल्या. पण जर त्यांच्या खऱ्या कथा कुणाला माहिती पडल्या, तर त्यांच्या दंतकथा फिक्या वाटतील."
ती हसली.
"महान लेखक, म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा, आणि सांगा, अनेक वर्षांपूर्वी या शहरात काय घडलं?" तिने अगदी अजाण बालकासारखा चेहरा केला.
"बालिके, अवश्य, पण त्याआधी मला तुझं नाव कळू शकेल?"
"माझं नाव मानसी, प्रेमाने मला सगळेजण 'मनू' म्हणतात."
म्हातारा विचारात गढला.
"महान लेखक, आपण कुठल्या विचारात गढला आहात? फक्त पाच चित्रपट लिहून आजही नवीन लेखकांच्या अभ्यासाचे विषय असणारे आपण, मनू नाव ऐकताच इतके विचारात गर्क का झालात?"
"कारण माझ्या चित्रपटाच्या खलनायकाच नाव मानस होतं. त्यालाही मनू म्हणायचे."
"स्त्रेंज. आणि या पाच चित्रपटानंतर मिहिर पाटील देखील एक दंतकथाच झाला ना?"
"ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम!" म्हातारा अभिमानाने म्हणाला.
"येस. पण काही लोक, म्हणजे खूप कमी लोक, म्हणतात की तुम्ही जे लिहिलं, त्यात एकही अक्षर खोटं नव्हतं. हे सगळं जशाच्या तसं घडलं, तुम्ही फक्त कागदावर उतरवलं."
"माझ्या लेखणीत ताकदच तितकी आहे, काल्पनिक पात्र जिवंत होतात. वेळ आहे तुझ्याकडे?" त्याने प्रश्न विचारला.
"किती हवाय?"
"महिनाभर?"
"नाही." ती निर्धाराने म्हणाली.
म्हातारा हसला.
"...मग तुला संपूर्ण कथा कधीही कळणार नाही."
तीदेखील हसली.
"म्हणजे तुम्हाला असं वाटतंय, की संपूर्ण कथा तुम्हाला माहितीये?"
म्हातारा अचंबित झाला.
"मी सोडून कुणाला माहिती असणार? स्वतः त्याने..."
तो अचानक बोलायचा थांबला.
ती उठून उभी राहिली.
"नाइस टू मीट यू सर, मी तुमची वाट बघतेय. तिने खिडकीतून समोर बोट दाखवलं.
एकशे एकविसाव्या मजल्यावर. जिथे कोण रहायचं ते तुम्हाला माहितीये. जिला तुम्ही अनेकदा भेटला आहात."
"शेवटी तू मला त्या अजस्त्र मायाजालात खेचतेय तर?" तो म्हणाला.
"त्याला आम्ही कृष्णविवर म्हणतो, जिथे एकदा गेलेली व्यक्ती तिथलीच होते."
"...प्राजक्ता नावाची वास्तू अद्भुत असणारच... कोसळली, तरीही पुन्हा नव्याने त्याच नावाने उभी राहिली."
"येप्प. ती म्हणाली. प्राजक्ता एका व्यक्तीचं सगळ्यात मोठं स्वप्न होतं."
"...आणि नाईटमेर सुद्धा." तो म्हणाला.
"तेच तर मला ऐकायचंय."
"तुला जे ऐकायचं आहे ना, ते सगळं या जगात कुणालाही माहिती नाही. या पुराणाची अनेक पाने अनेक ठिकाणी विखुरली आहेत, आणि काही पाने तर हरवली सुद्धा. प्रत्यक्ष राजा विक्रमादित्यला सुद्धा या पुराणाची संपूर्ण माहिती नाही..."
"तुम्ही त्यांना कधी विचारलं?"
"कधी वेळ मिळाला नाही. किंबहुना बऱ्याचदा वाटलं, पण..."
"मग का थांबलात? तुम्ही या जगातल्या अतिशय मोजक्या व्यक्तींपैकी आहात जे कधीही त्यांना भेटू शकतात."
"पण आता मी म्हातारा झालोय. बस एवढंच सांगू शकतो, जे मला ठाऊक आहे, त्यात मी समाधानी आहे. खूप समाधानी. हो, जे मला मला माहितीये ते फक्त हिमनगाचं एक टोक होतं, पण तेही माझ्यासाठी भरपूर होतं..."
"एक काम करायचं? जे तुम्हालाही आवडेल."
"काय?"
"जे तुम्हाला आवडेल ते सांगा. तुमच्या मैत्रीची कथा मला सांगा. तुमच्या आणि त्याच्या मैत्रीची, काय नाव होतं बरं त्याचं? आठवलं. द रायझिंग सुपरस्टार..."
"...द काँकरर..." तो म्हणाला.
"ती हसली. येस... हेच ऐकायचं होतं. द काँकरर... पण ते नाव त्याला कुणीतरी दिलं होतं बरोबर?"
"तू पुन्हा तुझ्या मुद्द्यावर येते आहेस...तुला जे ऐकायचं आहे, त्याच्यावर."
"कारण या कथेवर सगळ्यात जास्त हक्क माझाच आहे."
"हो मानसी विक्रमादित्य... तो पुटपुटला. तुझा त्यावरचा हक्क कुणीही नाकारू शकत नाही."
"उद्या सकाळी अकरा वाजता तुम्हाला गाडी घ्यायला येईल. तयार रहा."
त्याच्या होकाराची वा नकाराची वाट न बघता ती निघूनही गेली...
क्रमशः
छान सुरवात. पुढील भागाच्या
छान सुरवात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
+1
+1
इंटरेस्टिंग! पुभाप्र.
इंटरेस्टिंग! पुभाप्र.
छान
छान
मस्त!
मस्त!