माझे स्थित्यंतर - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 September, 2024 - 21:06

माझे स्थित्यंतर... केवढा व्यापक विषय आहे हा.. माझ्यासाठीच कशाला, तुम्हा आम्हा सर्वांसाठीच हा व्यापक विषय असेल. लिहायला घेतले तर जवळपास आत्मचरीत्र तयार होईल. कारण बदल हेच तर आयुष्य आहे. माणूस बदलायचा थांबला तर तो तिथेच थिजला आणि संपला. तसेही कोणीतरी म्हटलेच आहे (बहुतेक संयोजकांनीच) की जगात सगळ्यात काही शाश्वत, कायमस्वरुपी असेल तर तो म्हणजे बदल!

मागे वळून पाहताना दोनचार चांगले बदल जाणवतात ज्यांनी माझ्या व्यक्तीमत्वात उल्लेखनीय बदल घडवला आणि आयुष्यावर फार मोठा फरक पाडला आहे.

-------------------------------------------

लहानपणी आस्तिक होतो. थोड्याफार फरकाने आपण सारेच असतो. पण मी अंधश्रद्धाळू सुद्धा होतो. म्हणजे कॉलेजच्या वयातही रस्त्याने जाताना मांजर आडवे गेले की क्षणभरासाठी थांबायचो. देवावर तर ईतकी श्रद्धा होती की दर दसर्‍याला अनवाणी पायाने तास दिड तास चालत महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचो. मांसाहार हे तेव्हाही माझ्यासाठी निव्वळ जेवण नसून जीवन होते. पण तरीही गणपतीचा मंगळवार काटेकोरपणे पाळायचो. या देवाचे व्रत कडक असते, आणि त्यात कसूर झाली तर त्याचा कोप होतो यावर विश्वास ठेवायचो. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर गणपतीपासून सुरुवात करून देव्हारातल्या आणि घरातल्या कानाकोपर्‍यातल्या एकूण एक देवाच्या पाया पडूनच घराबाहेर पडायचो. ईतकेच नाही तर पाया पडताना देवांची सिक्वेन्स सुद्धा कधी चुकवायचो नाही, जी मी आपल्याच मनाने ठरवली होती.

पुढे नेमके काय, कधी, कसे माहीत नाही.. पण नास्तिक झालो. बहुधा ईंजिनीअरींगची चार बूकं शिकलो आणि आता आपण बुद्धीवादी झालो आहोत या अहंकारातून झालो असेन. कारण जेव्हा मी नवाकोरा नास्तिक होतो तेव्हा आस्तिकांची फार खिल्ली उडवायचो. त्याचसोबत आपण ज्याप्रकारे श्रध्दा, प्रथा परंपरांच्या जोखडातून बाहेर पडलो आहोत तसे ईतरांनीही पडावे असे कळकळीने वाटायचे. त्यामुळे कोणा आस्तिकाच्या भावना दुखावतील याची पर्वा न करता त्यांच्याशी वाद घालायचो. बरे त्या आस्तिकांनाही आपली श्रद्धा सिद्ध करायला माझ्याशी वाद घालायचाच असायचा. त्यात आमच्या घरात मी सोडून सारेच आस्तिक. त्यामुळे हा आस्तिक-नास्तिकत्वाचा न संपणारा वाद माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला होता.

कालांतराने विचारात आणि वागण्यात प्रगल्भता आली. आपले नास्तिकत्व आपल्यापुरते जपायचे ही समज आली. याचे श्रेय सुद्धा माझ्या घरच्यांना जाते. कारण आधी त्यांनी स्वत:चे आस्तिकत्व त्यांच्यापुरते मर्यादीत ठेवून माझे नास्तिकत्व स्विकारले. घरात संध्याकाळची आरती सुरु असताना मी सोफ्यावर तंगडी पसरून, मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेलो असतो. पण याने त्यांना काही फरक पडत नाही. कारण मी तुमचा देव मानत नाही हे दाखवायला मुद्दामहून मी असे वागत नाही याची त्यांना कल्पना आहे आणि हे त्यांनी समजून घेतलेले आहे. आरती झाल्यावर प्रसाद आवडीचा असेल तर मी सुद्धा मुकाट खातो. तुम मुझे प्रशाद समझ के दो और मे मिठाई समझ के खाता हू, असले डायलॉग मारायची गरज पडत नाही. जर आवडीचा प्रसाद नसेल तर घरचेच पुढे करत नाहीत. घरी पूजेला येणार्‍या भटजींना स्वतःच सांगतात. आमचा पोरगा नास्तिक आहे. तो कसला धागा दोरा गंडा बांधणार नाही. कसला उपास तापास करणार नाही. पण त्यातूनही एखाद्या भटजींनी हट्टच धरला की, नातवाची शांती करायची असेल तर तुमच्या मुलालाच पूजेला बसावे लागणार. तर मी देखील घरच्यांना अडचणीत न टाकता देवासाठी म्हणून नाही तर त्यांच्यासाठी म्हणून माझ्या आयुष्यातील दोन तास खर्च करतो.

माझी मुले पुढे जाऊन आस्तिक झाली तरी ते त्यांचे विचार आणि तो त्यांचा निर्णय राहील. मी देव मानत नाही हे त्यांना ठाऊक आहे. पण सोसायटीमध्ये सध्या मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव चालू आहे. मी रोज आरतीला जातो, प्रसाद खातो, देवाला हारफुले वाहून हात जोडून पाया पडतो. एक कुंकूवाचा टिका स्वतःलाही लावतो. कारण तुमचे पप्पा देवबाप्पाच्या पाया का पडत नाहीत या प्रश्नाचे उत्तर द्यायची वेळ त्यांच्यावर या वयात येऊ नये असे वाटते.

घरचेही मुलांबाबत तितकाच समजूतदारपणा दाखवतात. सणाच्या दिवशी देखील मुलांनी अंडे वा मासे मागितले तर करून खाऊ घालतात. अन्यथा एकेकाळी माझा विश्वास नसूनही अगदीच सारे काही सोडू नकोस म्हणून आईच्या सांगण्यानुसार मी संकष्टी आणि सणवार पाळायचो. एकप्रकारचे इमोशनल ब्लॅकमेलिंगच होते ते असे म्हणू शकतो. पण आज आमच्याकडे कोणीही आपली श्रद्धा किंवा आपले विचार दुसर्‍यांवर लादत नाहीत. तर हे स्थित्यंतर माझे एकट्यादुकट्याचे नसून आमच्या कुटुंबाचे आहे.

आजच्या तारखेला मी आस्तिकांशी वाद न घालता आस्तिक-नास्तिक दोघांनाही हेच सांगतो की आपण एकमेकांच्या विचारांचा आदर केला तर ज्या अंधश्रद्धा खरेच समाजासाठी घातक आहेत, ज्या ईतर समस्या आहेत, त्याविरुद्ध एकत्र येऊन लढता येईल.

आता परवाचा किस्सा ज्यावरून हे लिहावेसे वाटले.
सोसायटीच्या गणपतीसाठी बायको प्रसाद बनवत होती. मी माझ्या कामात बिझी होतो. तिने दूध, रवा, तूप, केळे वगैरे टोपात घेऊन ढवळायला सुरुवात केली इतक्यात मुलगी आली. म्हणे मला साडी नेसव. त्यामुळे बायकोने ढवळायचे काम माझ्यावर सोपवले आणि तिच्या मदतीला गेली. मायलेकींचे बराच वेळ साडी नेसणे चालू असल्याने प्रसाद बनवण्याचे अर्धे अधिक पुण्य माझ्याच पदरी जमा झाले. मोठ्या कौतुकाने तो शिरा ढवळायचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर काहींनी असा सूर लावला की तू तर नास्तिक आहेस, प्रसाद बनवताना मनात भक्तीभाव नसेल तर काय फायदा..
त्यावर मी म्हणालो घाईगडबडीच्या वेळी मला जमेल तसे आनंदाने आणि न कंटाळता बायकापोरांच्या कामाला आलो इतके माझ्यासाठी पुरेसे आहे त्या भावनेला भक्तीभावाचे लेबल द्यायला.

त्याच दिवशी सोसायटीत आरती म्हणावी तशी रंगत नाहीये आणि आपल्याला चांगली येते तर पुढे जायला हवे म्हणत मी दणक्यात आरती सुद्धा म्हटली. त्यावर सुद्धा पुन्हा तोच सूर आवळला गेला. नास्तिक आहेस तर आरती म्हणू नकोस किंवा नास्तिक असल्याचे ढोंग न करता आस्तिक आहेस हे कबूल कर..

यावर विचार पक्षी आत्मविश्लेषण करताना लक्षात आले की आपल्याला कुठला टॅग, कुठले लेबल लावून घ्यायला आता आवडत नाही. आस्तिक आहात तर अमुकतमुक करा आणि नास्तिक आहात तर असेच वागा हे कोणी ठरवले. आणि ते मी का मानायचे? आज मी स्वतःला कुठल्याही जाती-धर्म संस्कृतीचा मानत नाही आणि स्वत:ला या सर्व समूहापासून वेगळे करून घेतले आहे ते याचसाठी की अमुकतमुक देवधर्म, प्रथांपरंपरा, चालीरीती पाळायची इतरांनी लादलेली बंधने मला नको आहेत. जर एखादा नास्तिक समूह मला काय करावे आणि काय करू नयेची बंधने लादत असेल तर मी स्वत:ला त्या गटातला नास्तिक देखील समजत नाही. माझी विचारधारा त्याहून स्वतंत्र आहे असे समजतो.

एकंदरीतच शाळा कॉलेजच्या सुरुवातीचे माझे विचार आणि आताचे विचार यात मला बरेच स्थित्यंतर झालेले जाणवते. हे सारे विचार लिखाणाची आणि व्यक्त व्हायची आवड म्हणून लिहायला आवडतात, पण प्रत्यक्षात कोणाला ते पटावेत आणि कोणी आपले विचार बदलावेत असा हट्ट नसतो.

------------xx-----------------xx--------------

देशात आणि राज्यात नुकतेच काही मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या. दुर्दैवाने तश्या त्या नेहमीच घडतात. पण काही प्रकरणात अचानक सोशलमिडीयाला काही दिवसांसाठी जाग येते. या काळात बरेच सल्ले, उपदेश आणि आदर्शवादी विचार फिरू लागतात. हे ऊपरोधाने म्हटलेले नाहीये. ते सारे योग्यच असतात, पण दुर्दैवाने बरेचदा सुरुवातीचा आवेग ओसरताच हवेत विरून जातात. यापैकी एक विचार म्हणजे मुलींना सक्षम बनवण्यासोबत आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या. जेणेकरून मुली सुरक्षित राहतील. त्यांच्यावर अशी वेळ येणारच नाही.

आज मी एका मुलीचा अणि एका मुलाचाही बाप आहे. त्यामुळे मी या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून बघितला. आणि हे दोन्ही मुद्दे मला एकमेकांशीच निगडीत वाटले.

यातील पहिला मुद्दा म्हणजे मुलीला सक्षम बनवताना केवळ तिचे शारीरीक बळ वाढवणे आणि हत्यार सोबत बाळगणे पुरेसे ठरणार नाही तर ते चालवता येण्याची जिगर महत्वाची आहे. ते धाडस, ती हिंमत, तो मानसिक कणखरपणा हा विचारांतून येतो. ते विचार मुलांना आपण कश्याप्रकारे वाढवतो यातून विकसित होतात. मुलाला आणि मुलीला आपणच वेगवेगळी फूटपट्टी लावली तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास तसाच होणार. मी स्वत: एकुलता एक असल्याने मला या भेदभावाचा अनुभव नाहीये. पण ईतर मावस चुलत भावंडांचे पाहिले आहे. त्यांचे परीणाम पुढे काय झाले ते ही अनुभवले आहेत. बंडखोर मुलींची काही कमी नाही आमच्या घराण्यात. त्या तश्या का झाल्या हे समजून घ्यायची अक्कल नव्हती तेव्हा माझ्यात. आज आली आहे तर मी आमच्याकडे वर्षानुवर्षे चालत आलेली पॅरेंटींगची पद्धतच बदलली आहे. नुसते मुलगा-मुलगी भेदच नाही तर छोटा-मोठा भेद सुद्धा आता आमच्यात पाळले जात नाहीत. प्रत्येकाला माय लाईफ माय चॉईसचा अधिकार आहे. मला वाटते ही समानता मुलीला मानसिकरीत्या सक्षम बनवेल आणि मुलाला देखील पुरुषी अहंकारापासून दूर ठेवेल.

याच अनुषंगाने जेव्हा मी माझे स्वतःचे एकेकाळचे स्त्रियांबद्दलचे विचार आणि वर्तणूक पडताळतो तेव्हा त्यातील बदल देखील सुखावह वाटतात.

लहानपणापासून मी मित्रांना स्टोरी सांगण्यासाठी प्रसिद्ध होतो. या स्टोरी म्हणजे पोर्न कथा असायच्या. माझ्या कल्पना विलासातून मी मित्रांचे मनोरंजन करायचो. त्यांच्या लैंगिक ज्ञानात भर टाकायचो. जे मला माझ्या बिल्डींगमधल्या मोठ्या मुलांकडून मिळालेले असायचे. त्यांच्याकडून मला बरेच ज्ञान लहान वयात प्राप्त झाले होते. भले त्यातले निम्मे चुकीचे का असेना. त्या जीवावर मी नेहमीच भाव खाऊन जायचो. त्यामुळे माझे मुलींबद्दलचे विचार सुद्धा नेहमी त्याच ट्रॅकवर असायचे.

पण यात आता अपराधी वाटावे असे काही नव्हते. कारण जे काही आचारविचार होते ते मुलींच्या पाठीमागे असायचे, तोंडावर कुठल्या मुलीला ऑकवर्ड वाटावे असा थिल्लरपणा कधी केला नाही. त्यात केवळ मुलांची शाळा असल्याने शाळेपर्यंत कधी मुलींशी बोलणे झाले नाही. त्यानंतरही माझ्या इमेजमुळे मुली माझ्यापासून आणि माझ्या लाजऱ्या स्वभावामुळे मी मुलींपासून दूरच राहायचो. परिणामी त्यांचे भावविश्व देखील कधी कळलेच नाही. ना कधी जाणून घ्यायची गरज वाटली. मी माझ्या मित्रांच्या ग्रूपमध्ये टवाळक्या करण्यात खुश होतो.

पुढच्या बदलाचे श्रेय सोशल मिडीयाला, ऑर्कुटला जाते. तिथे मित्रांपेक्षा मैत्रिणीच जास्त भेटल्या. त्याआधी मुलींशी बोलताना संकोच वाटायचा, अवघडलेपण यायचे, कारण मला मुलामुलींतील एकच नाते माहीत होते. ऑनलाईन चॅटिंग या प्रकाराची सुरुवातही तेच विचार डोक्यात ठेवून झाली होती. पण हळूहळू इतर नाती, ईतर भावना उलगडत गेल्या. विचारांच्या कक्षा रुंदावल्या. त्यातल्याच एकीशी लग्न केले. पण ती बायकोआधी मैत्रीणच जास्त वाटली. जिथे शाळा कॉलेजमध्ये अपवाद वगळता मैत्रीण अशी नव्हतीच तिथे ऑफिसमध्ये उलट झाले. मित्र असा नव्हताच, तर ज्या होत्या त्या मैत्रिणीच होत्या. त्यामुळे स्त्रियांचे भावविश्व उलगडायला मदत झाली. आणि प्रत्यक्ष आयुष्यात देखील तो संकोच ते अवघडलेपण निघून गेले.

जेव्हा बाप व्हायची वेळ आली तेव्हाही मला मुलगीच हवी होती. अन्यथा त्या आधी मला मुलगा हवा होता. कारण मुलाशी माझी छान मैत्री जमेल असे मला वाटायचे. पण नंतर वाटू लागले की आपली केमिस्ट्री मुलीशी छान जुळेल. आणि होतेयही तसेच!

जे माझे शाळा-कॉलेज आणि ऑर्कुटचे सुरुवातीचे मित्र आहेत त्यांना या बदलाचे फार आश्चर्य वाटते. मला स्वत:ला देखील हे स्थित्यंतर सुखावह आणि आश्वासक वाटते. एक मुलगा आणि एका मुलीचे एकत्र संगोपन करताना आता याच स्थित्यंतराचा फायदा होत आहे.

-------------------------------------------

गेल्या काही काळात वाढीस लागलेला संयम आणि समजूतदारपणा हे देखील मला माझ्या व्यक्तीमत्वात बदल घडवणारे महत्वाचे घटक वाटतात.

हा संयम देखील सोशल मीडियाची देण आहे. इथे वादात कितीही वातावरण तापले तरी संयमाने रिप्लाय देता येतो. राग येणे हा मनुष्यस्वभाव आहे. पुढे आपण रिएक्शन काय देतो यावर सारा खेळ आहे. इथे प्रतिसाद लिहून प्रकाशित करायची टिचकी मारण्याआधी पुन्हा एकदा विचार करायला वेळ असतो. तो किंचित वेळ सुद्धा पुरतो. अन्यथा प्रत्यक्ष आयुष्यात मी शॉर्ट टेंपर होतो किंबहुना आजही आहे. याआधी पटकन रिएक्शन द्यायचो आणि त्यानंतर आपला अहंकार कुरवाळत बसायचो. आताही रिएक्शन टाईम फार काही कमी जास्त झाला अश्यातला भाग नाही. पण त्यानंतर अहंकार कुरवाळत बसत नाही. बायकोशीच नाही तर मुलीशी सुद्धा खटके उडतात. कारण तिथे सुद्धा माझेच रक्त आहे. तिच्यातही माझाच स्वभाव उतरला आहे. पण नंतर दोघे गळ्यात गळे घालून रडतो देखील. अहंकार नाही तर नाती जपायची असतात ही गोष्ट जी मला समजायला काही वर्षे जावी लागली ती लेकीला आतापासून समजेल याची काळजी घेतो.

अजून एक सोशल मीडियाची देण म्हणजे इथे मी जशी इमेज जपायची पर्वा करत नाही तेच प्रत्यक्ष आयुष्यात देखील सुरू केले आहे. चार लोकं काय म्हणतील याचा विचार करू नये असे म्हणतात खरे, पण ते प्रत्यक्षात जमवणे तितके सोपे नसते. तो विचार मनात येतोच. पण ते आता जमू लागलेय. कारण ते चार लोकं त्यांच्या आयुष्यात काय करतात हे आता मीच कधी बघायला जात नाही. ते शक्यही होत नाही. कारण इथे स्वतःचे आयुष्य जगायला वेळ पुरत नाही अशी स्थिती आहे. एक फेज आलेली जेव्हा आपल्या आयुष्याचे नक्की ध्येय काय आहे हेच समजेनासे झाले होते. पण आता ते चांगलेच समजले आहे. येणारा प्रत्येक दिवस आनंदाने, सुखासमाधानाने आणि आपल्यापुरते अविस्मरणीय करून जगायचा हे ध्येय ठेवूनच आता जगणे होत आहे.

काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि मत्सर या षडरिपूंवर नियंत्रण मिळवायचे प्रयत्न आजही चालू आहेत आणि कायम चालू राहतील. यात कमी अधिक प्रमाणात यश मिळाले आहे आणि बरीच स्थित्यंतरे अनुभवली आहेत असे आज मागे वळून पाहताना जाणवते. सारेच लिहायला घेतले तर सुरुवातीला म्हटले तसे आत्मचरीत्रच तयार होईल. कित्येक दुर्गुण आणि अयोग्य अपरीपक्व विचार आजही ठाण मांडून आहेत. काहींना स्वभावदोष म्हणून स्विकारले आहे तर काहींवर काम चालू आहे. अजून पाच दहा वर्षांनी आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर काही चांगले बदल जाणवतील तेव्हा या लेखात जरूर भर टाकेन.. तूर्तास इथेच थांबतो, किंवा..
तोपर्यंत,
क्रमश: Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान , प्रामाणिक आत्मपरीक्षण आवडले . तुमचे विचार इतरांवर लादत नाही हे आवडले. नास्तिक आहे म्हणून अट्टाहासाने देव - धर्माशी निगडित गोष्टींपासून दूर राहत नाही हे आवडले . लेखातील बर्याच गोष्टी पटल्या.

छान लेख.

आवडला. सगळ्याच गोष्टी रिलेट झाल्या. माझाही प्रवास साधारण असाच आहे.

फक्त मी घरात व बाहेर अजूनही नास्तिकच आहे. घरी आरती वगैरे करत नाही, देवा-धर्माच्या गोष्टींपासून लांब राहतो. मुलांना ठेवत नाही. ते म्हणले तर त्यांना देवळात नेतो. तिथे त्यांचं देवदर्शन, प्रसाद वगैरे होईपर्यंत (दिवार मधल्या अमिताभसारखा) बाहेर कठड्यावर बसतो.

रोज सकाळी आंघोळ झाल्यावर गणपतीपासून सुरुवात करून देव्हारातल्या आणि घरातल्या कानाकोपर्‍यातल्या एकूण एक देवाच्या पाया पडूनच घराबाहेर पडायचो.>>

कॅलेंडर वरचे देव

होता तो काळाचा महिमा
की कुणास ठाऊक
होती ती जादू बाल वयाची
भिंतीवरच्या कॅलेंडरमधे हसरे देव तेव्हा
होत्या त्याच समाधानाच्या राशी.. |

लालजर्द वस्त्र ल्यायलेली
नखशिखांत सोन्याने मढलेली
ओंजळीतून सोन्याच्या मोहरांचा
अखंड वर्षा करणारी लक्ष्मी..
पडणारी एक एक लखलखती मोहर
हात पुढे केला असता तर
मुठीतही आली असती कदाचित..
पण नजर खिळायची ती मात्र
तिच्या दैदीप्यमान चेहऱ्यावर..
जणू विचारायची ती, ‘हवीय का तुला माझी ओंजळ..?’
मी भान विसरून बोलत रहायचे
तिच्याशी दुसरच काही..
धन मागायचं सुचलच नाही|

शुभ्र जरतारी पातळ नेसून
सरस्वती असायची हाती वीणा घेऊन..
तेज:पुंज चेहरा तिचा अन् नजरेत स्निग्ध भाव
धीर देऊन शांतवणारं असायचं तिथे हसू..
स्वत:ला हरवून तिच्या कडे बघतांना
अन् गुज मनीचं सांगतांना..
राहूनच गेलं काही मागायचं..|

माथा लववायला
चौरंगावर अलगद टेकलेली
ती लालसर गुलाबी पावलं
अन् बघतच राहावं असं रूप ..
जगाची विचारपूस करणारा
गणपतीचा प्रसन्न चेहरा
माझे सगळे बोल
कानात सगळं साठवून घेणारा.. अन् ‘आहे ना मी..’
असा आधाराचा हात देणारा.. त्राता ..
मी सांगत राहिले.. तो ऐकत राहिला..
कधी काही मागावच लागलं नाही.. |

भिंतीवरची ती कॅलेंडर गेली..
ऐकणारे देव दिसेनासे झालेत..
बोलणारे ओठ.. अन् देवांना शोधणारं..,
मनीचं गुज तिथे ऐकवणारं..
निरागस मनही गेलं कुठेतरी..
त्या भिंतीवरच्या कॅलेंडर सारखंच..|

--शर्मिला

शर्मिला खूप छान कविता आहे. (कोणाची आहे?)
फारच रीलेट झाली.

मला आजही देवांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसणारे तेज आणि सात्विक भाव बघायला फार आवडतात. भुरळ घालतात. हे कबूल करायला माझे नास्तिकत्व आड येत नाही. हि एक कलेला दिलेली दाद समजू शकतो हवे तर.. Happy

@ अतरंगी,
छान आणि आपल्यात जो थोडाफार फरक आहे तो तसाच राहावा. कुठलाही एक नियम नसावा. याबाबतीत आधी आपल्या विचारांशी प्रामाणिक राहावे. आणि त्यानंतर दुसऱ्याचे पटले तर ते अंगिकारायची देखील तयारी असावी.

काल रात्री मुलांसोबत सार्वजनिक गणपती बघून आलो तेव्हा कसा वागलो याचा आता विचार केला तेव्हाही हे दोन मुद्दे ध्यानात आले.

१) एकाही गणपतीच्या पाया पडलो नाही. हात जोडले नाहीत. त्या ऐवजी मंडपात गेल्यागेल्याच सजावट, मूर्ती बघणे आणि आवडलेल्या गोष्टींचे कौतुकाने फोटो काढणे सुरू केले. एके ठिकाणी प्रसाद आवडीचा दिसला नाही त्यामुळे घेतलाच नाही. एके ठिकाणी कुंकू गुलालचा रंग आवडला आणि हे लावल्यावर आपण छान दिसू असे वाटल्याने ते पटकन लावले. एकूणच भक्तिभाव शून्य पण मुलांसोबत फिरायला जातानाचा मूड होता. असे वागताना इथे कोणी आपल्या ओळखीचे निघाले आणि त्याने आपल्याला पाहिले तर त्याला काय वाटेल असा विचार मनाला शिवला सुद्धा नाही.

२) अंजीरवाडी गणपती दर्शन घेऊन परतताना रस्त्यात तिथले गणपती मंदीर लागले. जे छगन भुजबळ यांनी बांधले होते आणि आमच्या काळापासून प्रसिध्द होते. म्हणून ते मुलांना आवर्जून दाखवायला घेऊन गेलो. तिथले पुजारी आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे होते. बरेच दिवसांनी दिसले म्हणून दोन चार गप्पा मारल्या. आणि त्यांचे मन खट्टू होऊ नये असा विचार मनात आल्याने तिथल्या गणपतीच्या पाया पडलो. ओळखीच्या लोकांच्या भावना जपायला थोडा वेळ आपले नास्तिकत्व बाजूला ठेवल्याने ते धोक्यात येत नाही इतकाच विचार असतो Happy

माबोवाचक, केशवकूल, ऋतुराज कविन.. धन्यवाद!

@ केशवकूल,
१८४० शब्दसंख्या आहे. गणपतीत आपण तुलनेत लांबलचक लेख लिहिला आहे तो देखील वैयक्तिक विचारांचा तर वाचकांना आधीच कल्पना दिलेली बरे असे वाटले Happy
तसेच या उपक्रमातील इतर लेखांना त्याच्या लेखकांनी शीर्षक दिले आहे (कम्पल्सरी नव्हते म्हणा) तरी मला ते न सुचल्याने शब्दसंख्या टाकून मोकळा झालो Happy

Happy अतिशय सुरेख लिहिलं आहेस ऋ. मनापासून आवडले. मनातल्या मनात कितीतरी गोष्टींवर अनुमोदन दिले. मी सुद्धा माझ्या मतांपेक्षा नात्यांना-भावनांना प्राधान्य देते नेहमीच. मते सतत बदलतात पण नाती बदलू नयेत ही तळमळ आहे.

हे स्थित्यंतर वाचताना , खूप पूर्वी एक लेख वाचलेला त्याची आठवण झाली.. " जन्म लेकीचा.. आणि बापाचाही".

सुंदर कविता.. शर्मिला!

सुरेख लिहिलं आहेस.

शर्मिला आर,मस्त कविता.
ठीतही आली असती कदाचित..
पण नजर खिळायची ती मात्र
तिच्या दैदीप्यमान चेहऱ्यावर....... अगदी अगदी.शेवटच्या दोन ओळी तर खासच.

Pages