अंत: अस्ति प्रारंभ: १ - सत्तांतर - अमितव

Submitted by अमितव on 9 September, 2024 - 12:36

जंगलातले उंच वयोपरत्त्वे वठलेले झाड. मुळावर उठलेल्या वडवानला थोपवत अजुनतरी ताठ. इथल्या प्रजातींचे जैववैविध्य जपले, मूळच्या आणि नंतर रुजलेल्या; आता इथल्याच झालेल्या जाती जपल्या म्हणून सुबत्ता होती, पूर्वसुरींचा वसाच! पण टोलेजंग इमारती बांधणार्‍यांना त्याचं काय? एकाच साच्यातले पांढरे ठोकळे जोपासायचे, अफरातफर, सग्यासोयर्‍यांना कंत्राटं आणि नटलेलं जंगल उध्वस्त! सीमेवर भिंत उभारुन वारा थोपवायच्या, पूर्वीचं वैभव दाखवायच्या वल्गना!

वठलेल्या झाडावर हल्ला सोपाच, शकले उडू लागली आणि सार्‍या जंगलाचेच अवसान गळाले.

तिकडे कनकदेशीच्या धनदांडग्यांना गजाआड करणारी हसतमुख 'कमल'शलाका उदयास येताना बघुन मात्र झाडाने नि:श्वास सोडला. सेनापती बदलला आणि जंगलानेच जोम धरला. ऑरेंज जंपसुटच्या भयाने उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा मस्त ..
शब्दरचना उत्तम ..!

अभिनंदन.. मला तर आयुष्यात समजणार नाही. कारण हा माझा प्रांत च नाही. पण नंबर आला म्हणजे चांगलीच असेल Happy

धन्यवाद! Happy

यातील कलाकार
जंगल - अमेरिकेची संयुक्त संस्थाने
वठलेलं झाड - बायडन
पूर्वसुरी - फाऊंडिंग फादर्स
वडवानल - ट्रम्प तात्या आणि मागा पब्लिक
मूळच्या - फर्स्ट नेशन/ नेटिव्ह लोक.
जैववैविध्य - मेल्टिंग पॉट मध्ये आलेले आणि आता एकजीव झालेले किंवा न झालेले आणि तरीही विविधता जपत इथलेच झालेले देशोदेशीचे लोक आणि पिढ्या.
पांढरे ठोकळे - व्हाईट सुप्रिमसिस्ट्स
पुर्वीचे वैभव - मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन)
कनकदेश - गोल्डन स्टेट/ कॅलिफोर्निया
कमलशलाका - कमला हॅरीस
गजाआड करणारी - डिस्ट्रिक अ‍ॅटर्नि असल्याने
नि:श्वास - बायडनने बटान हॅरिसला दिले.
ऑरेंज जंपसुट - कैदी घालतात तो गणवेश. तात्या हाता तोंडाशी जिंकत आलेली निवडणूक हरला तर त्याच्यावर चालू केसेस बंद न होता अशाच चालू रहातील आणि तो काही काळ का होईना अ‍ॅडल्ट डे केअर सोडून बंदिशाळेत जाईल असा एक भाबडा आशावाद.

मस्त. हसतमुख 'कमल' यामुळे कमला हॅरिस कळली आणि orange prison jumpsuit कळलेलं . पण बाकीचे संदर्भ डोक्यावरून गेले.
सॉलिड लिहिले आहे. प्रथम क्रमांक मिळणे आवश्यकच होते Happy अभिनंदन!

अभिनंदन अमित
निर्विवाद अतिशय उत्तम शशक आहे ही

बाय द वे, अमित तू "सत्तांतर" या शीर्षकाबद्दल लिहीले नाहीच. जॉर्ज ऑरवेलच्या "अ‍ॅनिमल फार्म" या पुस्तकात राजकीय व्यवस्थेबाबत रूपक आहे. मराठीत व्यंकटेश माडगुळकरांचे एक "सत्तांतर" नावाचे पुस्तक आहे ते अशाच रूपकावर आहे असा माझा समज होता. सर्च केल्यावर दिसते की ते थोडे वेगळे असावे. पण तो समज डोक्यात असल्याने ही शशक त्या शीर्षकामुळे लगेच कळायला मदत झाली. दुसरे कोणते शीर्षक असते तर समजायला कदाचित वेळ लागला असता.

हेच नाव वापरण्यामगे त्या "सत्तांतर" पुस्तकाचा किंवा त्या रूपकाचा काही संदर्भ होता का?

आता नाही म्हटलं तर बरं दिसेल का? Lol
लिहिताना ऑर्वेल डोक्यात न्हवता. नंतर परत वाचताना त्या प्रकारचं रूपक झालं आहे लक्षात आलं.
सुरुवातीला लिहीत गेलो आणि सुचत गेलं. शेवटच्या वाक्यापर्यंत संदर्भ गुलदस्त्यात हवा आणि त्याच वेळी डिबेट झालेली त्यामुळे त्यावर लिहावं वाटत होतं. शेवट माहीत होता त्यामुळे आता तसे शब्द निवडून द्वयर्थी करायचं तर रूपकात लिहिलं तर फसवायला सोपं. त्यामुळे रूपक प्रकार निवडला, आणि मग सुचेल ते लिहिलं. १०० शब्दांचे बंधन होते त्यामुळे ते आपोआप क्रिस्प होत गेलं. सुरुवातीला खरतर फार पसरट होतं. बाकी द्वयर्थी शब्दांशी खेळायला आवडतेच. Lol खरं सांगायचं तर टोटल इंजिनियर्ड कथा आहे.

Pages