
माबो गणेशोत्सवाची वाट पाहत होतोच तर संयोजकांनी यावेळेस थोडे लवकरच स्पर्धा जाहीर करून टाकल्या. विषय सुद्धा सोपे होते. पण म्हणतात ना सोपे असले की मग जास्ती डोके चालवले जाते. असेच डोके चालवता चालवता काय करावे सुचत नव्हते. सगळ्या गोष्टी - हे सोपे आहे, यात काही नवीन नाही पर्यंत येऊन थांबत होत्या. त्यात बरेच भाताचे प्रकारच सुचत होते. अशाच वेळेस नेहमीप्रमाणे रमड मदतीस आली आणि म्हणाली की तुला खरे म्हणजे कणकेचे पदार्थ जास्ती चांगले जमतात मग काय आमचे विचार धावू लागले आणि या कृतीचा जन्म झाला. तसे पाहिले तर ही पाककृती मराठी बिट्ट्या (वरणफळं) आणि इटालियन रॅव्हिओलीचे फ्युजन आहे आणि आम्ही त्याला रणवीर ब्रारच्या भाषेत थोडा पंजाबी तडका दिलेला आहे.
बिट्ट्या हा लहानपणापासून माझा जीव की प्राण पदार्थ. आमच्याकडे आमसूल गुळाची आमटी आणि तिच्यात सोडलेल्या बिट्ट्या आणि वर तुपाची धार अशी पद्धत होती. मग पुण्यात आल्यावर एकदा एका मित्राच्या फ्लॅटवर त्याच्या स्वयंपाकी मावशींनी केलेल्या कांदा टोमॅटो घातलेल्या मसाला बिट्ट्या खाल्ल्यावर एक नवीनच चव लक्षात आली आणि त्या मसाला बिट्ट्या खूप आवडीच्या झाल्या. आता मी केल्या तर बरेचदा मसाला बिट्ट्याच केल्या जातात. रॅव्हिओलीची चटक इकडे आल्यावर लागली. सुरूवातीला साधी चीज रॅव्हिओली खाऊन झाली मग हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या रॅव्हिओलीज खाऊन पाहिल्या. दरवेळेस ट्रेडरजोज मध्ये या सिझनला कुठल्या नविन रॅव्हिओलीज आल्यात ते नेहमी पाहिले जाते. लेमन रिकोटा, पम्पकीन अशा वेगळ्या रॅव्हिओल्या खाऊन झाल्या. तर या सगळ्या आवडीतून आलेली ही कृती तुम्हालाही आवडेल.
साहित्य -
वरणाकरता -
२ भाग मसूर डाळ
१ भाग हरभरा डाळ
१ भाग तूर डाळ
१ कांदा
१ टोमॅटो
२ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
कसूरी मेथी
गरम मसाला
तिखट
धणे पूड
मीठ
हळद
हिंग
जिरे
बिट्ट्यांकरता -
१ कप कणीक ( अंदाजे )
१ टीस्पून ओवा
हळद
मीठ
चिमूटभर साखर
सारणाकरता -
मिक्स हिरव्या भाज्या. (मला ट्रेडरजोज मध्ये power to the greens म्हणून मिक्स भाज्यांचे पाकिट मिळते ते आवडते. तुम्ही नुसता पालक घालू शकता )
२ पाकळ्या लसूण
८ काळे मिरे
१० काजू
२० बेदाणे
२ लहान किंवा १ मोठा बटाटा
कृती -
१) डाळी नीट धुवून कुकर मध्ये थोडी हळद आणि हिंग घालून शिजवून घ्या.
२) हिरव्या भाज्या बारीक चिरून घ्या.
३) मिक्सरमधून मिरे, काजू, आणि बेदाणे एकत्र बारीक करून घ्या.
४) बटाटे उकडून घ्या.
५) पॅनमध्ये थोडे तेल टाकून लसूण परता. त्यात भाज्या टाकून त्याही परतून घ्या.
६) सगळे झाले की वेगळे थंड होण्याकरता काढून ठेवा. आणि थंड झाले की भाजी, बटाटा, मिक्सरमधले बारीक प्रकरण एकत्र करून चांगले मळून घ्या.
७) आता कणकेत हळद, मीठ, साखर घाला, थोडा ओवा हातावर चुरून घाला आणि पाणी घालून चांगली मळून घ्या.
८) कणीक मळली की त्यात थोडे तेल टाकून अजून थोडे मळून घ्या आणि नीट झाकून ठेवा.
९) कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कापून घ्या.
१०) कढई मध्ये जिर्या - हिंगाची फोडणी करा.
११) त्यात लसूण, मिरची, आणि कोथिंबीर घालून परता.
१२) लसूण थोडा लालसर झाला की कांदा घालून परता.
१३) कांदा शिजत आला की टोमॅटो घालून शिजवा.
१४) हे सगळे शिजले की त्यात मसाला, तिखट, हळद, कसूरी मेथी, धणे पूड हे सर्व घालून परता.
१५) थोडे बाजूला तेल सुटू लागले की मग त्यात शिजलेली डाळ घाला. आणि पाणी घालून उकळी येऊ द्या.
१६) आता गॅस अगदी बारीक करून डाळ उकळू द्या. मध्येच एकदा थोडी हलवून खाली लागत नाहीयेना ते पहा.
१७) दुसर्या बर्नरवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. (दुसरा बर्नर नसेल तर काय करायचे याचे उत्तर माझ्याकडे नाही ) त्यात अर्धा चमचा मीठ घाला.
१८) कणकेचे छोटे पेढे करून त्याच्या लाट्या करून घ्या. त्या पीठ लावून लाटून घ्या.
१९) सारणाचेही छोटे गोळे करून घ्या.
२०) आता एका लाटीवर एक सारणाचा गोळा ठेवा. लाटीच्या कडांना बोटांनी थोडे पाणी लावा आणि त्यावर दुसरी लाटी ठेवा आणि चांगले बंद करून घ्या.
२१) माझ्याकडे एक कुकी कटर होते त्याने मी ते कापून घेतले म्हणजे सगळ्या बिट्ट्या समान आकारात येतील आणि नीट बंद होतील. तुमच्याकडे फिरकी / कातण वगैरे काही असेल तर हवे असल्यास त्याने करून घ्या.
२२) अश्या सगळ्या बिट्ट्या तयार करून घ्या.
२३) तोवर पाणी उकळले असेल. तो गॅस मध्यम करा. आणि बिट्ट्या पाण्यात सोडा. थोड्या वेळाने त्या वर येऊन तरंगायला लागतील. म्हणजे बिट्ट्या जवळ जवळ शिजल्या आहेत. तरी ३ मिनीटे उकळू द्या.
२४) एखाद्या झार्या किंवा जाळीदार उचटण्याने हळू हळू त्या बाहेर काढून ज्या भांड्यात वाढणार आहात त्यात काढून घ्या. (एका वेळेस ३ पेक्षा जास्ती बिट्ट्या एकत्र उकळू नका)
२५) वरतून वरण घाला आणि भरपूर तूप सोडा.
२६) फारच फेन्सी करायचे असेल तर सजावटी करता एक कोथिंबिरीचे पान वरती ठेवा.
आपली दाल चमन तयार आहे!
टिपा -
१) वरती पालकाची टीप दिलेली आहेच. पण सारणाकरता तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरता येतील.
२) वरणात तुमच्या आवडीचा मसाला घालू शकता.
३) फार घाई असेल तर भाजी मिक्सर मध्ये बारीक करून त्यात कणीक भिजवून बिट्ट्या करू शकता पण त्यात ही मजा नाही.
Spinach ravioli आणि वरणफळं
Spinach ravioli आणि वरणफळं भारी आहे. करून बघेन. लिहिलेय नेटके, दिसतेय छान व निगुतीने केलीय. आवडली.
Creative वरणफळे
Creative वरणफळे
करून बघणार नाही,पण रेसिपी
करून बघणार नाही,पण रेसिपी आवडली.
नक्की करून बघ अस्मिता चवीला
नक्की करून बघ अस्मिता चवीला भन्नाट होते.
धन्यवाद झकासराव
धन्यवाद देवकी. तशी वेळखाऊ आहे पण खाताना मज्जा येते
बिट्ट्या हे नाव माझ्यासाठी
बिट्ट्या हे नाव माझ्यासाठी नवीन आहे. स्टफ्ड डाळ ढोकळी ऐकलं होतं. हे अगदी पॉलिश्ड व्हर्शन आहे.
लिहिलंय ही व्यवस्थित.
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
भारी आहे. नक्की करून बघणार.
भारी आहे. नक्की करून बघणार. आम्ही चिकोल्या किंवा वरणफळ म्हणतो. बिट्ट्या हा शब्द नवीनच आहे.
ही पाककृती मराठी बिट्ट्या
ही पाककृती मराठी बिट्ट्या (वरणफळं) आणि इटालियन रॅव्हिओलीचे फ्युजन आहे >>> मला पहिला फोटो बघून तसेच वाटले. हे दोन्ही पदार्थ आवडत असल्याने हे ही आवडेल
मस्त आहे.
धन्यवाद रोहिणी आणि फा
धन्यवाद रोहिणी आणि फा
हे दोन्ही पदार्थ आवडत असल्याने हे ही आवडेल >> अरे भन्नाट चव येते. नक्की करून पहा.
आतल्या सारणात चीज टाकल्यास
आतल्या सारणात चीज टाकल्यास कसे लागेल असा विचार करते आहे...
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी आणि फोटो.
धन्यवाद मामी.
धन्यवाद मामी.
छल्ला >>> नक्कीच चांगले लागेल. सारण थंड करून मग त्यात घालायचे. मग बीट्टया उकडल्या की ते मस्त मेल्ट होईल. खाताना जपून खायचे नाही तर टाळूला लागेल
मस्त क्रियेटिव्ह रेसिपी,
मस्त क्रियेटिव्ह रेसिपी, फोटोहि छान आलाय, तुझी मागच्या वर्शीची "पोन्ग चाट "करायला मला पोन्ग(हुरडा)मिळाला नाहि पण ह्याचे सगळे साहित्य अगदी घरगुती आहे त्यामुळे करुन खाता येइल..
(सारण बाहेर येवु नये म्हणून मोमोसारखी दुमड घालता येइल..)
मागच्या वर्षीचीही रेसिपी
मागच्या वर्षीचीही रेसिपी आवर्जून लक्षात ठेवल्याबद्दल धन्यवाद प्राजक्ता.
मोमोसारखी दुमड घालता येइल>> हो ते अजून सुंदर दिसेल पण कलाकुसरीमध्ये थोडा जास्ती वेळ जाईल. कदाचित ज्यांना मोदक करायची सवय असेल त्यांना पटकन जमून जाईल
रेसिपी आवडली. करून पाहण्याचा
रेसिपी आवडली. करून पाहण्याचा विचार आहे .
(No subject)
हा पदार्थ चविष्ठ आणि नवा होता
हा पदार्थ चविष्ठ आणि नवा होता.अभिनंदन. करून बघायचंय.
अभिनंदन.. जिंकणार याची
अभिनंदन.. जिंकणार याची खात्रीच होती
अभिनंदन!
अभिनंदन!
सगळ्यांचे आभार.
सगळ्यांचे आभार.
माबोकरांच्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे नवीन पाककृत्या तयार करायला आणि लिहायला मजा येते.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन धनी.
अभिनंदन धनी.
यू डिझर्व्ह धिस!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन !
अभिनंदन !
धन्यवाद शर्मिला, मनीमोहोर,
धन्यवाद शर्मिला, मनीमोहोर, कविन, छल्ला, ऋतुराज, आरती
Pages