वन डिश मील - दाल चमन - धनि

Submitted by धनि on 9 September, 2024 - 01:16
daal chaman

माबो गणेशोत्सवाची वाट पाहत होतोच तर संयोजकांनी यावेळेस थोडे लवकरच स्पर्धा जाहीर करून टाकल्या. विषय सुद्धा सोपे होते. पण म्हणतात ना सोपे असले की मग जास्ती डोके चालवले जाते. असेच डोके चालवता चालवता काय करावे सुचत नव्हते. सगळ्या गोष्टी - हे सोपे आहे, यात काही नवीन नाही पर्यंत येऊन थांबत होत्या. त्यात बरेच भाताचे प्रकारच सुचत होते. अशाच वेळेस नेहमीप्रमाणे रमड मदतीस आली आणि म्हणाली की तुला खरे म्हणजे कणकेचे पदार्थ जास्ती चांगले जमतात मग काय आमचे विचार धावू लागले आणि या कृतीचा जन्म झाला. तसे पाहिले तर ही पाककृती मराठी बिट्ट्या (वरणफळं) आणि इटालियन रॅव्हिओलीचे फ्युजन आहे आणि आम्ही त्याला रणवीर ब्रारच्या भाषेत थोडा पंजाबी तडका दिलेला आहे.

बिट्ट्या हा लहानपणापासून माझा जीव की प्राण पदार्थ. आमच्याकडे आमसूल गुळाची आमटी आणि तिच्यात सोडलेल्या बिट्ट्या आणि वर तुपाची धार अशी पद्धत होती. मग पुण्यात आल्यावर एकदा एका मित्राच्या फ्लॅटवर त्याच्या स्वयंपाकी मावशींनी केलेल्या कांदा टोमॅटो घातलेल्या मसाला बिट्ट्या खाल्ल्यावर एक नवीनच चव लक्षात आली आणि त्या मसाला बिट्ट्या खूप आवडीच्या झाल्या. आता मी केल्या तर बरेचदा मसाला बिट्ट्याच केल्या जातात. रॅव्हिओलीची चटक इकडे आल्यावर लागली. सुरूवातीला साधी चीज रॅव्हिओली खाऊन झाली मग हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या रॅव्हिओलीज खाऊन पाहिल्या. दरवेळेस ट्रेडरजोज मध्ये या सिझनला कुठल्या नविन रॅव्हिओलीज आल्यात ते नेहमी पाहिले जाते. लेमन रिकोटा, पम्पकीन अशा वेगळ्या रॅव्हिओल्या Happy खाऊन झाल्या. तर या सगळ्या आवडीतून आलेली ही कृती तुम्हालाही आवडेल.

साहित्य -
वरणाकरता -
२ भाग मसूर डाळ
१ भाग हरभरा डाळ
१ भाग तूर डाळ
१ कांदा
१ टोमॅटो
२ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
कसूरी मेथी
गरम मसाला
तिखट
धणे पूड
मीठ
हळद
हिंग
जिरे

बिट्ट्यांकरता -
१ कप कणीक ( अंदाजे )
१ टीस्पून ओवा
हळद
मीठ
चिमूटभर साखर

सारणाकरता -
मिक्स हिरव्या भाज्या. (मला ट्रेडरजोज मध्ये power to the greens म्हणून मिक्स भाज्यांचे पाकिट मिळते ते आवडते. तुम्ही नुसता पालक घालू शकता )
२ पाकळ्या लसूण
८ काळे मिरे
१० काजू
२० बेदाणे
२ लहान किंवा १ मोठा बटाटा

Sahitya.jpgmasala.jpgकृती -
१) डाळी नीट धुवून कुकर मध्ये थोडी हळद आणि हिंग घालून शिजवून घ्या.
२) हिरव्या भाज्या बारीक चिरून घ्या.
३) मिक्सरमधून मिरे, काजू, आणि बेदाणे एकत्र बारीक करून घ्या.
४) बटाटे उकडून घ्या.
५) पॅनमध्ये थोडे तेल टाकून लसूण परता. त्यात भाज्या टाकून त्याही परतून घ्या.
६) सगळे झाले की वेगळे थंड होण्याकरता काढून ठेवा. आणि थंड झाले की भाजी, बटाटा, मिक्सरमधले बारीक प्रकरण एकत्र करून चांगले मळून घ्या.
७) आता कणकेत हळद, मीठ, साखर घाला, थोडा ओवा हातावर चुरून घाला आणि पाणी घालून चांगली मळून घ्या.
८) कणीक मळली की त्यात थोडे तेल टाकून अजून थोडे मळून घ्या आणि नीट झाकून ठेवा.
९) कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कापून घ्या.
१०) कढई मध्ये जिर्‍या - हिंगाची फोडणी करा.
११) त्यात लसूण, मिरची, आणि कोथिंबीर घालून परता.
१२) लसूण थोडा लालसर झाला की कांदा घालून परता.
१३) कांदा शिजत आला की टोमॅटो घालून शिजवा.
१४) हे सगळे शिजले की त्यात मसाला, तिखट, हळद, कसूरी मेथी, धणे पूड हे सर्व घालून परता.
१५) थोडे बाजूला तेल सुटू लागले की मग त्यात शिजलेली डाळ घाला. आणि पाणी घालून उकळी येऊ द्या.
१६) आता गॅस अगदी बारीक करून डाळ उकळू द्या. मध्येच एकदा थोडी हलवून खाली लागत नाहीयेना ते पहा.
१७) दुसर्‍या बर्नरवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. (दुसरा बर्नर नसेल तर काय करायचे याचे उत्तर माझ्याकडे नाही Proud ) त्यात अर्धा चमचा मीठ घाला.
१८) कणकेचे छोटे पेढे करून त्याच्या लाट्या करून घ्या. त्या पीठ लावून लाटून घ्या.
१९) सारणाचेही छोटे गोळे करून घ्या.
२०) आता एका लाटीवर एक सारणाचा गोळा ठेवा. लाटीच्या कडांना बोटांनी थोडे पाणी लावा आणि त्यावर दुसरी लाटी ठेवा आणि चांगले बंद करून घ्या.
२१) माझ्याकडे एक कुकी कटर होते त्याने मी ते कापून घेतले म्हणजे सगळ्या बिट्ट्या समान आकारात येतील आणि नीट बंद होतील. तुमच्याकडे फिरकी / कातण वगैरे काही असेल तर हवे असल्यास त्याने करून घ्या.
२२) अश्या सगळ्या बिट्ट्या तयार करून घ्या.

Bittya.jpg

२३) तोवर पाणी उकळले असेल. तो गॅस मध्यम करा. आणि बिट्ट्या पाण्यात सोडा. थोड्या वेळाने त्या वर येऊन तरंगायला लागतील. म्हणजे बिट्ट्या जवळ जवळ शिजल्या आहेत. तरी ३ मिनीटे उकळू द्या.
२४) एखाद्या झार्‍या किंवा जाळीदार उचटण्याने हळू हळू त्या बाहेर काढून ज्या भांड्यात वाढणार आहात त्यात काढून घ्या. (एका वेळेस ३ पेक्षा जास्ती बिट्ट्या एकत्र उकळू नका)
२५) वरतून वरण घाला आणि भरपूर तूप सोडा.
२६) फारच फेन्सी Proud करायचे असेल तर सजावटी करता एक कोथिंबिरीचे पान वरती ठेवा.
आपली दाल चमन तयार आहे!

daal_chaman.jpgटिपा -
१) वरती पालकाची टीप दिलेली आहेच. पण सारणाकरता तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरता येतील.
२) वरणात तुमच्या आवडीचा मसाला घालू शकता.
३) फार घाई असेल तर भाजी मिक्सर मध्ये बारीक करून त्यात कणीक भिजवून बिट्ट्या करू शकता पण त्यात ही मजा नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टार रेसिपी. फ़्यूज़न सोबर आहे, उगाच केल्यासारखे नाही. Nourishing value आहे, नाविन्य आहेच.

स्पर्धा वोट असेल तर माझे मत या रेसिपीला.

आणि हो, भसाभसा लसूण न घातल्याचे २ मार्क जास्त. कारण तो मुख्य खाद्यपदार्थ नसून flavouring agent आहे याचा विसर पडलाय सर्वत्र Lol

इन्नोव्हेटिव रेसिपी आहे. चवदार लागत असणार कारण सर्व पदार्थ वेगळ्या फॉर्म मधे खाऊन पाहिलेत Happy
खटाटोप आहे मात्र.

फारच छान! करून बघायला पाहिजे. त्या सारण भरलेल्या बिट्ट्या ( हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. वरणफळं, चकोल्या ही दोन नावं माहिती होती.) आमटीत घालून उकळायच्या नाही का? का?

हे मस्त आहे.सगळी पोषक मूल्ये एकत्र.आपल्या चकोल्या आणि राजस्थानी गट्टे रस्सेदार चे लग्न होऊन झालेले अपत्य वाटते आहे.
इतकी प्रोटीन आणि पोषक पॅक डिश आहे की नक्की करून पाहणार.

धन्यवाद मृ, ऋ, अनिंद्य, कविन, आशू, जाई, धनवंती, अल्पना, वावे, किल्ली, अनु, ऋतुराज, छल्ला, शर्मिला, स्पार्कल

अनिंद्य आपले पाय या रेसीपीला लागले म्हणजे अहोभाग्य. लसूण ओव्हर पावरींग नको असे आधीच ठरवले होते. आणि भाज्यांमुळे पौष्टिक होते रेसिपी.

वावे त्या बिट्ट्या थोड्या नाजूक होतात त्यामुळे आमटीत उकळल्या नाहीत. आणि एखादी जरी फुटली तरी मग सगळे वरण हिरवे होऊन चव बदलेल.

ही रेसिपी पाहून सखिप्रियाने खूप वर्षांपूर्वी लिहिलेली वरणातला पास्ता ही रेसिपी आठवली. मला भयंकर आवडली होती ती. ही सुद्धा ट्राय करुन बघेन.

बिट्ट्या थोड्या नाजूक होतात त्यामुळे आमटीत उकळल्या नाहीत. > हां बरोबर. खायला घेताना थोडा वेळ मुरवायला पाहिजेत का?

Star recipe. The Italian restaurant at Pune Marriott does fantastic Ravioli spinach. Award aahe Tula.

Pages