माझे स्थित्यंतर- { ‘नको नको’पासून मुरण्यापर्यंत ! } - कुमार१

Submitted by कुमार१ on 7 September, 2024 - 08:43

यंदाच्या १५ ऑगस्टला खरंतर एक संकल्प केला होता तो म्हणजे, आता किमान एक महिनाभर तरी कुठलाही नवा लेख लिहायचा नाही. कारण ? कारण फक्त एक - मनावर संयम. लिहायचेच नाही असे एकदा ठरवले की आपोआप आपले वाचन, मनन आणि चिंतन वाढते. एरवी नवे लेखनविषय शोधण्यासाठी मनात सतत जो एक कोलाहल चालू असतो तोही थांबतो. खरं म्हणजे त्या संयमाचा शांतपणे अनुभव घ्यायचा होता.

पण . . .
हा संयम मोडायला लावलाय यंदाच्या आपल्या गणेशोत्सवाच्या कल्पक संयोजकांनी !
‘माझे स्थित्यंतर’ हा मार्मिक आणि अतिशय सुंदर विषय त्यांनी लेखनासाठी ठेवल्यामुळे कितीही टाळू म्हटलं तरी हा लेख लिहायचा मोह झाला. मग मनातल्या मनात एक आरोळी ठोकली,

“लेखन संयमाची ऐशी की तैशी ! . . . ते पाहू नंतर पुन्हा कधीतरी. . . अन आता मात्र झपाटल्यागत लिहूनच टाकू” !

1980 च्या दशकात लेखनाला सुरुवात केल्यापासून आतापर्यंतच्या आयुष्यात लेखन हाच एकमेव छंद जोपासलाय. त्यातल्या एका पैलूच्या स्थित्यंतरासंबंधी काही लिहितो आणि तो आहे विज्ञानलेखन.

writers pen.jpg

आयुष्यात लेखनाला सुरुवात केल्यानंतर जवळपास दहा वर्षे त्याचे माध्यम हे फक्त वृत्तपत्रातील वाचकांची पत्रे हेच होते. त्यातून मुख्यतः दैनंदिन जीवनात जाणवणाऱ्या किंवा खटकणाऱ्या सामाजिक विषयांबद्दलच लिहीत होतो. तेव्हा एक दोन परिचितांनी विचारलेही होते, की आरोग्य विषयांवर तुम्ही का लिहीत नाही. तेव्हा मी त्यांना सरळ सांगितले होते, की त्यात मला बिलकुल रस नाही. या तीव्र नकाराचे मूळ मध्यमवर्गातील आपल्या बहुतेक पालकांच्या पठडीबंद शैक्षणिक मनोवृत्तीत आहे.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, “केवळ तुला अमुक इतक्या टक्क्यांच्यावर गुण आहेत म्हणून तू विज्ञान शाखेलाच जायचे” ही जी मानसिकता तत्कालीन पालकांमध्ये होती त्याचाच मी एक बळी. किंबहुना दहावी झालेल्या मुलाची स्वतःची शैक्षणिक आवड काय आहे किंवा नाही हे विचारायची देखील पद्धत तेव्हाच्या बहुतांश पालकवर्गात नव्हती. दहावीनंतर सायन्स आणि पुढे दोन वर्षांनी त्या अभ्यासशाखेला फक्त दोनच फाटे फुटतात. त्यापैकीच आपण एक निवडायचा असतो हेच ते बाळकडू व साचेबद्ध संस्कार. निव्वळ संस्कारच नाही तर एक प्रकारची सक्ती !

अशा तऱ्हेने वैद्यकीय पदवीधर होईपर्यंत पालकांच्या या मनोवृत्तीबद्दल मनात एक प्रकारची नाराजी दडलेली होती. म्हणून, आता छंद म्हणून जे स्वीकारलय ते अर्थातच विज्ञान शाखेपासून कोसो लांब असलेले अन्य काहीतरी पाहिजे हे ओघाने आले. त्यातूनच मग लेखनविषय निवडताना समाज, संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन हे प्रांत आपलेसे वाटत होते.
सातत्याने लेखन करण्यासाठी आपल्या मनात सतत वाचनाचे इंधन भरावेच लागते. वाचनाचे विषय निवडतानाही तोच दृष्टिकोन ठेवला. आपल्याला ज्या विषयासंबंधी लिहावसं वाटतंय त्याच प्रकारचे वाचन आपण करत राहावं हे बरं. लेखनाचे एकंदरीत स्वरूप साहित्यापेक्षा पत्रकारितेच्या अंगाने जाणारे होते. त्यामुळे वृत्तपत्रे आणि नियतकालिकांच्या वाचनावरच अधिक भर राहिला. तेव्हा वृत्तपत्र अगदी मन लावून आणि बारकाईने वाचायची सवय होती . परंतु त्याचबरोबर त्यात कुठल्याही प्रकारचे विज्ञानलेखन दिसले की मात्र त्याकडे सरळ पाठ फिरवित होतो. “कुणी सांगितलाय डोक्याला पीळ”, हाच त्यामागचा मनोभाव.

साधारणपणे 1990 च्या दशकापासून अनेक वृत्तपत्रांनी आठवड्यातून एक दिवस विज्ञान पुरवणी देखील चालू केलेली होती. त्या दिवशीचे वृत्तपत्र हातात घेतले की पहिल्याप्रथम त्याच्या पोटातली ती विज्ञान पुरवणी अगदी झुरळ झटकावे तशी बाजूला काढून ठेवत असे आणि मग मुख्य अंक मात्र चवीने वाचे.
कालांतराने जेव्हा स्वतंत्र लेखन नियमित करू लागलो तेव्हाही पूर्वीचेच धोरण ठेवले होते ते म्हणजे, विज्ञान हे प्रकरण पूर्णपणे नजरेआड करून आपल्या आवडीच्या इतर विषयांवर लिहित राहणे. नाही म्हणायला सटीसामाशी एखादा धूम्रपान किंवा मद्यपानविरोधी लेख मात्र अगदी राहावले नाही म्हणून टाकणं टाकल्यागत लिहीला परंतु त्यात मानसिक गुंतवणूक काही नव्हती.

मासिकांमध्ये लेखन करू लागल्यानंतर अनुभवकथन आणि ललितगद्य या प्रकारांमध्ये गती आली आणि ते छानपैकी आवडतही होते व आजही आवडतात. पण अजूनही आरोग्य विज्ञानलेखनात आपण नियमितपणे पडावे असे बिलकुल वाटत नव्हते. किंबहुना पोटापाण्याचा उद्योग जर आरोग्यविज्ञान आहे तर छंद हा वेगळ्याच प्रांतातला असलेला बरा, असे स्वतःला ठाम बजावले होते.
अशाप्रकारे बिगरवैज्ञानिक लेखन आणि वाचन सुखेनैव चालू होते.

आता नक्की आठवत नाही पण ते अंदाजे 2016 साल असावे. तेव्हा आमच्या वैद्यक संघटनेच्या मासिकाचा एक अंक ‘इन्सुलीन विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यातील या औषधाचा इतिहास मी वाचला मात्र आणि अक्षरशः झपाटलो. मग मला राहवेना. हा मनोरंजक भाग मराठी वाचकांसाठी लिहिलाच पाहिजे असे तीव्रतेने वाटले.
अशा तऱ्हेने ‘इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा’ (https://www.maayboli.com/node/64203) हा लेख १४/१०/२०१७ या दिवशी लिहिता झालो. या लेखाने मी मायबोलीवरील आरोग्य लेखनाचा श्रीगणेशा केला. माझ्या लेखनातील स्थित्यंतराचा हा प्रारंभ म्हणता येईल. तोपर्यंत लेखनाला 35 वर्ष होऊन गेली होती आणि त्या दीर्घ काळात मी जे करायचे टाळले होते तेच आता करून बसलो होतो ! त्या लेखावर वाचकांशी छान संवाद झाल्यानंतर मला ‘कोलेस्टेरॉल’ खुणावू लागला. मग त्यावरही लिहीले. आता माझ्या लक्षात आले,

“अरे, जे लेखन स्वतःला कंटाळवाणे वाटेल या शंकेपोटी मी टाळत होतो, तेही इथे तेवढाच आनंद देत आहे”.

मग मोठ्या उत्साहात आरोग्यलेखन चालू झाले. त्यातून झालेला वाचकसंवाद ही माझी आनंदयात्रा ठरली; ती आजही टिकून आहे.
वरवर पाहता असं दिसतंय की मी वाचलेला उपरोल्लेखित लेख हा या स्थित्यंतरास कारणीभूत ठरला. परंतु खोलवर विचार करता आज असे वाटते, की हे एक तात्कालिक कारण असावे. सन 2000 पासूनच साहित्यक्षेत्र आणि वाचनसंस्कृती या संदर्भात एक हाकाटी ऐकू येत होती. ती म्हणजे, आता एकंदरीत टीव्ही आणि इंटरनेटमुळे वाचनाचे समाजातील परिणाम झपाट्याने कमी होतंय .. वगैरे. पण त्याचबरोबर जो काही चोखंदळ वाचकवर्ग टिकून आहे त्याचा वाचन विषयांचा कलही बराच बदललेला आहे.

आता पांढरपेशा काल्पनिक लेखनापेक्षा उपयुक्त प्रकारचे लेखन वाचण्याकडे वाढता कल दिसू लागलेला होता. दरवर्षीचे अ. भा मराठी साहित्य संमेलन झाले की त्याच्या वृत्तांतात, संमेलनादरम्यान जोरदार खपलेली एक-दोन पुस्तके कुठली हे पाहिले तर त्यात प्रामुख्याने माहितीपर पुस्तकांचा उल्लेख असायचा. त्या पुस्तकांची व्याप्ती, ‘कुत्र्यांचे पौष्टिक खाद्य’ इथपासून ते ‘माझा कर्करोगाशी लढा’ इथपर्यंत असायची. या सामाजिक वाचन स्थित्यंतराची देखील माझ्या मनात कुठेतरी सुप्त नोंद झालेली असावी. आजवरच्या लेखन कारकिर्दीत एक सूत्र मनाशी पक्के ठरवलंय ते म्हणजे, वाचक हा लेखकाचा ग्राहक आहे. आणि ग्राहकशास्त्राच्या मूलभूत तत्वानुसार, ‘मागणी तसा पुरवठा’ हेच त्रिकलाबाधित सत्य आहे. जर वाचकांचा एक मोठा गट माहितीपर लेखन आवडीने वाचतोय तर मग आता आपण तरी लेखक म्हणून आखडते कशाला घ्या, अशी मनाची समजूत पटली.

मग काय, त्यानंतर आरोग्यलेखनाची एक्सप्रेस गाडी अगदी वेगाने दौडू लागली.
सलग तीन वर्षे कुठल्या ना कुठल्या विषयावर आरोग्यलेखन झाल्यानंतर एक जाणवत होते की या प्रकारचे लेखन हे काहीसे एकसुरी होतंय. एका वाचकाचा तसा प्रांजल प्रतिसादही इथे आला. तो मी मोलाचा मानतो. त्या प्रतिसादाशी व्यक्तीशः सहमत आहेच. परंतु या प्रकारचे विज्ञानलेखन, रंजक करू म्हटले तरी किती रंजक करणार, याला एक अंगभूत मर्यादा आहे. म्हणून लेखमालेचा अपवाद वगळता लागोपाठ स्वतंत्र आरोग्य लेख लिहायचे नाहीत असा मात्र प्रयत्न जमेल तितका करतो. तसेच विषय निवडताना माझ्या आवडीपेक्षा समाजातील चालू आरोग्यविषयांना प्राधान्य देतो. हे लेखन माहितीपर असले तरी त्यातून वाचकावर माहितीचा भडिमार होऊ नये एवढी दक्षता घेतली जाते. हा स्थित्यंतराचा पुढचा टप्पा म्हणता येईल.

आता आंतरजाल सेवा जगभरात प्रस्थापित होऊन 25 वर्षे तरी लोटली आहेत. कुठल्याही प्रकारची माहिती आता जगातील कोणालाही टिचकीसरशी उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारानंतर तर लेखकासह अन्य काही कलाकारांनी आता संन्यास घेतला तरी चालेल, अशा प्रकारच्या चर्चा आता वारंवार होतात. तरीसुद्धा जे काही आरोग्यलेखन घडते आहे त्याला अजून तरी वाचकांची पसंती मिळताना दिसते. (अन्य काही विज्ञान लेखकांच्या मुलाखतीतून सुद्धा हा मुद्दा मांडला गेलाय). ती अजून किती टिकेल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे आरोग्य काय किंवा अन्य प्रकारचे विज्ञानलेखन काय, किती काळ समाजात वाचले जाईल याचे उत्तर येणारा काळच देईल. जी माहिती विज्ञानपत्रिकांमधून जालावर सहज आणि अगदी प्रश्न-उत्तर स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे, त्यासंबंधी अन्य लेखकांनी वेगळ्या लेखन माध्यमांमध्ये मुद्दामहून असे सुलभ लेखन करावे किंवा नाही हा पुढील काही वर्षांमधला यक्षप्रश्न असेल. भविष्यात यदाकदाचित अशा प्रकारचे माहितीपर लेखन जवळपास बंद झाले तर ते विज्ञानलेखनातील एक मोठे समाजस्थित्यंतर म्हणावे लागेल.
*********************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान लिहिलंय कुमार सर.
समस्त मायबोलीकरांसाठी तुमचे माहितीपूर्ण लेख ही एक आनंददायी वाचनीय पर्वणीच असते.
सातत्याने लेखन करण्यासाठी आपल्या मनात सतत वाचनाचे इंधन भरावेच लागते.>>>>>> हे खूप आवडले.

खूपच छान लिहिलंय कुमार सर.
समस्त मायबोलीकरांसाठी तुमचे माहितीपूर्ण लेख ही एक आनंददायी वाचनीय पर्वणीच असते.
सातत्याने लेखन करण्यासाठी आपल्या मनात सतत वाचनाचे इंधन भरावेच लागते.>>>....... +१.

डॉक्टर हे स्थित्यंतर तुमच्यासाठीच नव्हे तर इतरेजण्यासाठीही तितकेच उपयुक्त ठरले आहे .
कृपया अजून लिहा Happy

सातत्याने लेखन करण्यासाठी आपल्या मनात सतत वाचनाचे इंधन भरावेच लागते.
+786

त्याच सोबत तुमचे लेखन हे इतरांसाठी वाचन असते हे देखील कायम लक्षात राहू द्या Happy

Happy अतिशय सुरेख लिहिले आहे. प्रांजळ, सरळ आणि मनापासून. तुमच्या सर्वच लेखनासाठी आभार. तुमच्या अशा लेखनातून डॉक्टर मागच्या एक व्यक्तीशी ओळख होते, जी वाचायला नेहेमीच आनंददायी वाटते.

अत्यंत प्रांजळ, आरस्पानी म्हणतात तसा लेख झाला आहे. तुमचे आरोग्य विषयक नसलेले लेख मायबोलीवर वाचलेले आठवत नाहीत. ते इथे आणलेत तर वाचायला आवडतील.
संकल्प तात्पुरता रहित केलात त्यामुळे आम्हाला छान लेख वाचता आला. Happy तुमच्या पुढील लेखांना शुभेच्छा!

लेखन प्रवासातील स्थित्यंतर खूप सुंदर पद्धतीने मांडलय.

जी माहिती विज्ञानपत्रिकांमधून जालावर सहज आणि अगदी प्रश्न-उत्तर स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे, त्यासंबंधी अन्य लेखकांनी वेगळ्या लेखन माध्यमांमध्ये मुद्दामहून असे सुलभ लेखन करावे किंवा नाही हा पुढील काही वर्षांमधला यक्षप्रश्न असेल. >>>>

आंतर जालावर माहिती मिळाली तरी एखाद्या खात्रीशीर/ माहितीतील लेखकाकडून आलेला लेख नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.

शिवाय अजून एक जाणवलेली गोष्ट, आंतरजालावर जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण मुद्दामून जाऊन माहिती शोधतो तेव्हा ती मिळते परंतु मा बो सारख्या कट्ट्यावर, किंवा पूर्वी वर्तमान पत्रात सहज म्हणून वाचेल्या लेखांमधून विज्ञान किंवा तांत्रिक माहिती मिळत जाते.

Chat Gpt किंवा आंतर जाला वर वेग वेगळे योग्य प्रश्न विचारून माहिती गोळा करून त्याचे आकलन करून घावे लागते..
उलट इथे त्या लेखकाचा ( वैज्ञानिक, तंत्रज्ञ, किंवा वैद्य) त्या व्यवसायातील अनुभव, समज ह्यांमुळे कितीतरी एकमेकांशी निगडित प्रश्न - उत्तरांचा उहापोह त्यात केलेला असतो किंवा ते समजेल , पाचेल, झेपेल या रीतीने मांडलेले असते.

खूपच सुंदर. तुम्हाला कितीही एकसुरी वाटत असलं तरी इथले वाचक तुमच्या नवनवीन लेखांची आतुरतेने वाट बघत असतात. रंजक लिखाण आणि तरीही त्यासोबत वैज्ञानिक शिस्त ही तुमच्या लिखाणाची बलस्थाने आहेत असं जाणवतं.

कुमार, तुमचे सर्व लेख, आणि इतरांचा आदर ठेवून, पेशन्स ठेवून प्रश्नांना त्वरित उत्तरं देणं हा अतिशय अनमोल गुण आहे.
लिहिते राहा..
तुमच्या सारखे चांगले ऑनलाईन लेख, कम्युनिटी हे डॉक्टर भेटीला पर्याय नक्की नसतो.पण कधीकधी 'डॉक्टर भेट घ्यायलाच हवी' या ड्रायव्हर पर्यंत यायला रेटा असतो.

तुमच्या लेखनविषयांत स्थित्यंतर झाले तरी ४०+ वर्ष सातत्याने लिहित राहणे फार impressive आहे. आंतरिक उर्मी, शिस्त, सतत अभ्यास आणि दांडगा उत्साह असल्याशिवाय शक्य नाही हे. फार कमी लोकांना जमेल.

अभिनंदनीय !
अनेक शुभेच्छा.

अभिप्राय व उत्तेजनाबद्दल सर्वांना धन्यवाद !
..
*. तुमचे आरोग्य विषयक नसलेले लेख मायबोलीवर वाचलेले आठवत नाहीत.
>>> अरेच्चा ! आतापर्यंत मी इथे ६० बिगर वैद्यकीय लेख लिहिलेले आहेत.
त्यामध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेल्या अंतर्नाद मासिक, पुरुष उवाच दिवाळी अंक, इ. तील सर्व लेखांचा समावेश आहे.

https://www.maayboli.com/user/173/created?page=4 या पानावरील सूचीतील बहुसंख्य लेख बिगर वैद्यकीय / ललितगद्य प्रकारातील आहेत.

* पूर्वी वर्तमान पत्रात सहज म्हणून वाचेल्या लेखांमधून विज्ञान किंवा तांत्रिक माहिती मिळत जाते.
>>> हा मुद्दा अगदी बरोबर आहे. माझा देखील काही बाबतीत अनुभव आहे त्यातील एक उदाहरण सांगण्याचा मोह होतोय .
माझे वैद्यकीय शिक्षण चालू असल्याच्या वयापासून पुण्यातील नामवंत डॉ. ह वि सरदेसाई वृत्तपत्रातून वैद्यकीय लेख लिहीत असत. त्यांच्या लेखातील एक दोन मुद्दे अगदी रोचक आणि उपयुक्त असल्याने लक्षात राहिलेत ते लिहितो :

१. बद्धकोष्ठाच्या समस्येसाठी रोज रात्री पोटातून घ्यायच्या गोळ्यांची सवय लावू नये.
२. शहरी जीवनशैलीत आपण सगळेच घरांमध्ये सुद्धा स्लीपर्स घालून वावरत असतो. त्यामुळे आपल्या पावलाच्या स्नायूंना आवश्यक असलेला नैसर्गिक व्यायाम होत नाही. म्हणून मधूनमधून बिगर चपलेने चालत जावे.

या अशा सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी वैद्यकीय पाठ्यपुस्तकातून शिकायला मिळणार नाहीत हे मात्र खरे Happy

खूपच छान लिहीले आहे.
सातत्याने लेखन करण्यासाठी आपल्या मनात सतत वाचनाचे इंधन भरावेच लागते.>>अगदी खरे आहे.
जी माहिती विज्ञानपत्रिकांमधून जालावर सहज आणि अगदी प्रश्न-उत्तर स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे>> माहिती अभ्यासू आणि विश्वसनीय व्यक्तीकडून आली तर त्या बद्दल शंका रहात नाही.

अतिशय सुंदर लेख.

वरील सर्व पोस्ट्सना संपूर्ण अनुमोदन.

तुमच्या वैद्यकीय अनुभवाच्या पोतडीतील अजूनही बरेच शिल्लक असणारच.... ते वाचायला सदैव उत्सुक आहोतच आम्ही सारे... Happy

खूपच छान लिहिलंय.
सातत्याने लेखन करण्यासाठी आपल्या मनात सतत वाचनाचे इंधन भरावेच लागते.>>>....... +१११

तुमचे लेख माहितीपूर्ण असतात.
प्रतिसादातील शंका निरसन देखील उत्तम करता तुम्ही.
माबोवर डॉक्टर म्हणून तुमचे, इब्लिस, साती, शिंदे सर सर्वांचे लेख आतुरतेने वाचतात सगळे.
त्यामुळे तुमचे स्थित्यंतर हे आमच्यासाठी पर्वणी
Happy

>>>>>>प्रतिसादातील शंका निरसन देखील उत्तम करता तुम्ही.
होय आणि धागा वहावत जाऊ नये म्हणुन करडी नजरही असते.
खर्‍या आयुष्यातही, तुम्ही फार शिस्तबद्ध असणार डॉक्टर.

छान लेख आणि स्थित्यंतरही
इंटरनेटवर माहिती उपलब्ध असली तरी ती बऱ्याचदा एक ठिकाणी मिळत नाही आणि मुद्दाम शोधून तसेच कारण असल्याशिवाय फार वाचली जात नाही
आणि मराठीत असे लेखन व माहिती येणेही महत्त्वाचे आहेच

सुंदर लेख! तुमचे लेख नेहमीच आवडतात वाचायला, आणि खूप माहिती मिळत जाते त्यातून. पुढेही लिहीत राहा! तुम्ही लेखावर विचारलेल्या प्रश्नांनाही ज्या पेशन्सने उत्तरे देता याचाही खूप आदर आहे.

एकतर मराठीत वाचनीय व माहितीपूर्ण हे दोन्ही असलेले वैज्ञानिक लेखन कमी आहे. सर्वसामान्य लोकांसमोर आजकाल "विज्ञान" नावाखाली काय वाट्टेल ते येते व्हॉट्सअ‍ॅप मधून आणि अनेक जण ते खरेही समजतात. अशा लोकांसमोर - विशेषतः ज्येनांसमोर - तुमचे लेख येणे फार गरजेचे आहे.

वरील सर्व नवीन प्रतिसादकांना अभिप्राय व उत्तेजनाबद्दल धन्यवाद !

हे आरोग्य लेखन वाचावेसे वाटते आहे असे आपण सगळ्यांनी आस्थेने म्हटले आहे. त्याने हुरूप नक्कीच वाढेल.
आपल्यापैकी काहींनी गेल्या तीन चार वर्षांत काही विषय सुचवलेले आहेत ते अद्याप प्रतीक्षा यादीत आहेत. त्यातले माझ्या आवाक्यातले विषय जमेल तसे यथावकाश घेईन.

सर्वसामान्य लोकांसमोर आजकाल "विज्ञान" नावाखाली काय वाट्टेल ते येते व्हॉट्सअ‍ॅप मधून आणि अनेक जण ते खरेही समजतात. अशा लोकांसमोर - विशेषतः ज्येनांसमोर - तुमचे लेख येणे फार गरजेचे आहे.>>> पटलं

<एकतर मराठीत वाचनीय व माहितीपूर्ण हे दोन्ही असलेले वैज्ञानिक लेखन कमी आहे.> + ११
लिहीत राहा!

सुंदर लेख....
तुमचं स्थित्यंतर आमचं धन्वंतरी वरदान...
असाच लोभ असावा...

वाह, स्थित्यंतर आवडले!
माझा इथला वावर हा सहसा "माझ्या ग्रुपमधलं नवीन लेखन" पुरताच मर्यादित असतो, (ज्यात फक्त गुलमोहर ललितलेखन आणि प्रवासाचे अनुभव - भारतातले आणि भारताबाहेरचे अशा तीनच ग्रुप्सचा समावेश आहे Happy ) त्यामुळे हा लेख उशिराने माझ्या दृष्टीस पडला.

Pages