किरदुर्ग ~ भाग ४
यशवर्धन सुधाकर सांगेल तसे कार चालवत होता.. मधूनच आजू बाजूला नजर टाकून गाव नजरे खालून घालत होता..
पहाटेचे दव अजून पानावर साचलेले होते..आभाळ भरून आले होते.. घरातून झालेले सूर्यदर्शन केव्हाच लुप्त झाले होते.. सगळ्या वातावरणात एक प्रकारचा कुंद पना आला होता..
गाव तसे लहान ही नाही आणि मोठे ही नाही.
पंधरा हजार च्या आसपास लोकवस्ती असेल..
गावातील मुख्य रस्त्याने यशची गाडी पुढे चालली होती... आजूबाजूला खूपच जुनी बांधकामे असलेल्या माळवदाच्या जुन्या धाटणीच्या इमारती होत्या. ... बऱ्याचश्या इमारतींच्या खाली दुकानांचे बोर्ड झळकत होते ...पण सर्व दुकानांना कुलूप लागलेले होते.. नदी शेजारी वसलेली गावे धरण फुटू शकते अशी बातमी आल्यावर कशी खाली होतात.. एकंदरीत तशीच परिस्थिती किरदुर्ग च्या रस्त्यांची होती..
"हीच गावाची मुख्य बाजारपेठ दिसते आहे , जी काही दिवसा पूर्वी पर्यंत किती गजबजलेली असेल? सकाळपासूनच दुकाने उघडली जात असतील, आणि दिवसभर लोक आपापल्या कामात व्यस्त असतील. आता तर सगळे कसे रिकामे रिकामे आहे.."यशवर्धन त्या शुकशुकाट पसरलेल्या रस्त्याकडे बघून विचार करत होता..
सगळे कडे एक भीषण शांतता होती.. थोडे पुढे गेल्यावर एका चौकाच्या डाव्या बाजूला पिंपळाचे विस्तीर्ण झाड होते.. त्याच्या भोवती बांधलेल्या पारावर तीन चार वृद्ध व्यक्ती त्यांच्या गाडी कडे बघून बोलत होते..
"सुधाकर तुमच्या किरदुर्ग मध्ये तर तरुण लपून बसले आहेत आणि वृद्ध मंडळी मात्र खतरों के खिलाडी बनून बाहेर मस्त गप्पा मारत आहेत." यश विनाकारण विनोद निर्मिती करत सुधाकर कडे बघत बोलला..
पण सुधाकर चे मन थाऱ्या वर नव्हते.. त्यानी नक्की ऐकले की नाही हे पण यश ला समजले नाही...
आकसलेल्या चेहऱ्याने समोर बोट दाखवत सुधाकर ने घर दाखविले.. घर कसले भरभक्कम दोन मजली वाडा होता मल्हाररावांचा..
मोठ्या साधारण सात फूट उंच आणि पाच फूट रुंद दरवाजा समोर यश ने गाडी थांबवली व तो घराकडे निरखून पाहू लागला. तेव्हढ्यात पांढरे शुभ्र धोतर आणि फिकट सोनेरी सदरा घातलेले एक इसम वाड्याच्या मुख्य दरवाजातून लगबगीने बाहेर आले.
"बरे झाले लवकर आलास बाबा, बघ हे काय घडून गेले आहे." त्यांनी गाडी जवळ येत सुधाकर ला उद्देशून म्हटले आणि यश कडे प्रश्नार्थक नजेरे ने बघत पुढे म्हणाले, " हे तेच पाव्हणे आहेत का, ज्यांना तू पत्र पाठवले होते."
सुधाकर ने होकारार्थी मान हलवत यश ची ओळख करून दिली..
"बरे झाले पाव्हणे तुम्ही वेळेत आलात.. तुम्हालाच आता यातून काही मार्ग काढता येतो की नाही बघा." असे म्हणत मल्हारावांनी घराच्या दिशेने जात त्यांचा मागे येण्याची खूण केली...
"काका पाहुणे नका म्हणू मला, आणि अहो जाहो नका घालू, मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे. मला फक्त यश म्हणा." यश विनंती वजा सूचना करत भल्या मोठ्या प्रवेशद्वारा मधून वाड्या मध्ये प्रवेशला...
वाड्याच्या आत पाऊल ठेवताच त्याचे भव्य पण यश ला जाणवले.. समोरच मध्यभागी एक मोठे मोकळे अंगण दिसत होते, तिथेच बसण्यासाठी बऱ्याचश्या लाकडी खुर्च्या होत्या. त्याच्या भोवती वाड्याच्या जीर्ण पण अभिजात भासणारी भिंती उभ्या होत्या, जणू त्या काळाच्या साक्षीदार होत्या. समोर एकाच रांगेत चार खोल्या होत्या. त्या खोल्यांच्या दारा वरच्या जुन्या लाकडी फळ्या तेल लावून चकचकीत केलेल्या दिसत होत्या..
खोल्यांच्या मधून एक अंधारी बोळ जात होती. जिथे दिवसा देखील फक्त पुसटसा प्रकाश शिरत होता. उजव्या बाजूच्या खोलीत प्रकाश चमकत होता.. तिच्या मधून बांगड्यांची किणकिण ऐकू येत होती..
त्या खोलीच्या बाजूलाच एक अरुंद लाकडी जिना वर जाताना दिसत होता. तो जिना वाकलेला आणि थोडा जुना असला तरी अद्याप मजबूत होता. अंगणातून वर बघितल्यावर प्रशस्त गॅलरी दिसत होती.. एकूणच वाडा बघून यशवर्धन स्तिमित झाला होता..
मल्हार रावांनी अंगणात टाकलेल्या खुर्च्यान कडे बोट दाखवत बसण्यास सांगितले. स्वतः समोरच असलेल्या मोठ्या आराम खुर्चीवर बसत बोलायला सुरुवात केली.. बोलत असताना मुलगा गायब झाल्याची चिंता त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती.. एका दमात सर्व घटना मल्हार रावांनी व्यवस्थित सांगितली.... त्यांनी पहाटे पासून सर्वत्र शोध घेतलेला होता पण किशोर चा काहीच पत्ता नव्हता...
थोडा वेळ शांत बसून ते कसला तरी विचार करून पुन्हा बोलायला लागले..
"सुधाकर, तुला काय वाटते तो तर परत आला नसेल? त्याचा शाप खरा होतो आहे असेच आता वाटते आहे. या मागे तोच आहे, नक्की तोच. याची आता मला खात्री पटायला लागली आहे.. कुठे असेल माझा किशोर, काय माहित असेल तरी का?" बोलताना एव्हढ्या धिप्पाड माणसाच्या ही डोळ्यात अश्रू तरळले..
सुधाकर च्या मनात भूतकाळातील घटनेची एक भीतीदायक छटा चमकून गेली.. स्वतःला सावरत तो म्हणाला," काका पण तुम्ही अचानक हे कसे ठरवता आहात.. त्या गोष्टीला आता जवळपास दोन वर्ष उलटून गेली आहेत.. पाहिली गोष्ट तो परत येणे शक्य आहे का? आणि दुसरी म्हणजे यायचेच असते तर मध्ये इतका कालावधी त्याने वाट कशी बघितली असती.. तुमच्या मनाचा भ्रम आसेल.." सुधाकर काकांची कमी आणि स्वतः चीच जास्त समजूत घालत होता.. कारण त्याला स्वतः ला च मघाशी रात्री चा आवाज आठवल्यावर तेच वाटले होते....
मल्हार राव दोघां कडे बघत उठले आणि वरच्या बाजूला यायची खूण केली.. ते तिघे जण जिन्याने वरच्या एका खोलीत गेले.. ती किशोर ची खोली होती.. तिच्या मधील पलंगा वरचे अंथरूण बरेच विस्कटलेले दिसत होते..
मल्हार काकांनी पुढे होत, दोघांना दाखवले.. त्या अंथरुणावर मातीचे डाग होते. लाल माती चे डाग, लाल माती फक्त त्या भागात जंगला मध्येच होती...
सुधकारची आता पूर्ण खात्री पटली होती..
यश ला त्या गावात दोन वर्षा पूर्वी घडलेल्या घटने विषयी काहीही माहीत नसल्यामुळे तो संभ्रमित होऊन कधी काकांकडे तर कधी सुधाकर कडे आणि कधी त्या मातीच्या डागांकडे बघत होता..
"काका आता मला पण शंका नाही तर खात्री होत आहे की या मागे तोच आहे, त्याने त्याचा शब्द पूर्ण ठरवला आहे.. पण हे कसे शक्य आहे. आपण तर त्याला पूर्ण पने संपवले होते.." सुधाकर गहन विचारात बुडून बोलत होता..
मल्हार काकांनी खाली चालायची खूण केली..सर्व खाली येऊन बसले.. सगळी कडे शांतता पसरली होती.. कोणीही काही बोलत नव्हते.. यश ला माहीत होते की सर्व काही त्याच्या समोर येणारच आहे.. त्या मुळे तो देखील त्या दोघांना स्थिर होण्यासाठी हवा तेव्हढा वेळ घेऊ देत होता..
"खरेच माझा किशोर या जगात असेल का पण?" मल्हार काका स्वतःशीच पुटपुटले..
यश परिस्थिती चे गांभीर्य ओळखत मल्हाररावांच्या जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवत बोलला,"काका, काळजी करू नका.. मी आलो आहे आता, आपण नक्कीच यातून मार्ग काढू. किशोर ला काही ही होणार नाही परमेश्वरा वर श्रद्धा ठेवा..."
सगळे वातावरण निशब्द झाले होते.. त्या शांतते मध्ये त्या प्रकाशित खोलीतून येणारा मुसमुसण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता...
यश ने आता सर्व सूत्र त्याच्या हातात घेतली होती.. त्याने पुढे बोलायला सुरुवात केली..
"काका तुम्ही आता कोणा विषयी बोलत होतात, म्हणजे कोणी आणि काय शाप दिला आहे? आणि सर्वात महत्वाचे कोणाला दिला आहे आणि काय घडले होते किरदुर्ग मध्ये? मला पुढे काही करायचे असेल तर या सर्व गोष्टी समजायला हव्यात.."
मल्हाररावांनी एकदा त्याच्या कडे बघितले आणि मग सुधाकर कडे बघत ते बोलले,
"सुधाकर सांग बाबा यांना सर्व काही. निदान यांच्या प्रयत्नांना काही यश आले तर आपल्या किरदुर्ग ला या संकटातून वाचवता तरी येईल.."
यश ने सुधाकर कडे बघितले..
सुधाकर यश च्या जवळ सरकला आणि बोलायला लागला...
तोच मल्हार रावांनी त्याला खुणावले आणि आतल्या खोलीकडे बघत ते,
"तुम्ही वरच्या खोलीत जाऊन झोपा, रडून थोडेच ना पोरगा परत येणार आहे." करड्या पण समजावनीच्या सुरात बोलले..
तेव्हढ्यात त्या खोलीतून एक हिरव्या रंगाचे नऊवारी लुगडे नेसलेली पोक्त स्त्री हुंदके देत वरच्या मजल्याचा दिशेने गेली..
"हा बोला पोरांनो आता, या असल्या गोष्टी बाई माणसा समोर नको..." मल्हाररावांनी सुधाकर सांग सर्व या आविर्भावात सांगितले..
यशवर्धन च्या मनात सर्वच गोष्टींचा गुंता होत होता. सुधाकर च्या घरात रात्री घडलेल्या विचित्र घटना आणि सकाळी सकाळी आलेल्या या बातमी ने त्याला संभ्रमात टाकले होते..
पण मल्हाररावांनी शापा विषयी बोलल्यावर, आता त्याला जाणवले होते, की हे संकट एका साध्या शक्तीच नव्हते.. हे काहीतरी अधिक भयानक, अमानवी होते...
यश सुधाकर च्या जवळ सरकला , त्याच्या चेहऱ्यावरून समजत होते की नक्की या प्रकरणा ची सुरुवात कुठून झाली हे जाणून घेण्याची त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती...
सुधाकर ने एक आवंढा गिळून बोलायला सुरुवात केली...तो यशवर्धनला थोडक्यात गावावर येऊन गेलेले संकट समजावून सांगू लागला.
"अडीच वर्षा पूर्वी गावात एक अनोळखी माणूस येऊन राहू लागला.. दिसायला,वागायला एकदम सुशिक्षित.. तो स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होता .. डॉक्टर मुखर्जी असे नाव होते त्याचे.. त्याला फुफुसाचा कोणता तरी आजार होता.. म्हणून त्याला त्याच्या डॉक्टर मित्रांनी कोणत्याही जंगलांनी वेढलेल्या प्रदूषण मुक्त गावात जाऊन राहण्याचा सल्ला दिला होता.. असे त्याने सर्वांच्या मनावर ठसविले होते.. गावात त्याने एक दवाखाना पण थाटला होता.. आणि सर्वात महत्वाचे तो कोणाकडूनही कोणतीही फी घेत नव्हता.. त्यामुळे गावात त्याच्या विषयी प्रचंड आदर निर्माण झाला होता.. त्याच्या वागण्यात एकच दोष होता तो म्हणजे रात्री कितीही emargency आली तरी तो कधीच दरवाजा उघडत नसायचा.. त्यामागचे स्पष्टीकरण त्याने पहिल्या वेळीच दिले होते की त्याच्या आजारामुळे त्याला रात्री गोळ्या सुरू असून.. त्यामुळे येणारी झोप ही किती पण आवाज झाला तरी उघडत नाही.. त्याच्या वागणुकी मुळे म्हणा किंवा आदरा मुळे पण त्याच्यावर आम्ही सर्वांनी विश्वास ठेवला होता..
त्यांनतर एक दोन महिन्यात च गावातील कुमारिका नुकत्याच वयात आलेल्या मुली गायब होऊ लागल्या... सुरुवातीला दोन्ही मुलींच्या वेळेस पोलीस आलेत, त्यांनी बरीचशी चौकशी केली.. पण काहीही धागे दोरे न मिळाल्याने, स्वमर्जी ने पळून गेल्या आहेत असे शिक्का मोर्तब करून तपास बंद केला गेला... त्यांनतर काही दिवसांनी तिसरी गायब झाली. या वेळी जास्त काही तपास न करताच तोच निष्कर्ष काढला गेला... सर्व गाव दहशती खाली होते.. मला पण एक नुकतीच वयात आलेली मुलगी असल्यामुळे रात्री ला चांगली झोप लागणे च बंद झाले होते.. त्या रात्री असाच कसल्या तरी आवाजाने मी जागा झालो.... पौर्णिमेची रात्र होती ती.. बाहेर मावळतीला लागलेल्या चंद्राचा सफेद प्रकाश पसरलेला होता.. खूप प्रयत्न केला तरी झोप येत नसल्यामुळे पुढील घरात चक्कर मारू लागलो.. रात्र सरत आली होती.. साडेतीन वाजले होते.. मला खिडकी तून रस्त्यावरून कोणी तरी गावाच्या दिशेने गेल्याचे दिसले.. मी घाई घाई ने दरवाजा उघडला आणि बाहेर आलो.. तो पर्यंत ती जाणारी व्यक्ती गावाच्या आतल्या दिशेने बऱ्याच अंतरावर गेली होती.. पुढील भाग मोठ्या इमारतींचा असल्यामुळे तिथे अंधार होता.. पण चालण्याच्या पद्धती वरून माझ्या मनात ते डॉक्टरच असल्याची शंका आली...
मी सकाळीच मल्हार काकांकडे माझी शंका बोलून दाखवली. मागच्या घटनांची उजळणी केल्या नंतर माझी शंका नक्कीच रास्त आहे याची खात्री काकांना पटली..." बोलणे बंद करत सुधाकर ने काकांकडे बघितले.. काकांनी मानेनेच त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला..
सुधाकर परत यश कडे बघत पुढे बोलायला लागला, "मी आणि काकांनी गावातील काही विश्र्वासातील लोकांनाच ही घटना सांगितली.. गावात दहशत पसरेल म्हणून त्यांना ही गोष्ट गुपित ठेवण्याची सूचना केली.. त्या थोडक्या गावकऱ्यांना मदतीला घेऊन आम्ही त्याच्या वर पाळत ठेवणे सुरू केले ... एके दिवशी आम्हाला तो रात्री जंगला मध्ये जातो आहे याचा सुगावा लागला, आम्ही बराच पाठलाग केला पण एके ठिकाणी तो अचानक गायब झाला.... आम्ही बराच वेळ वाट बगून परत फिरलो.. आम्ही तो यायच्या आत घराला घेराव घालून, त्याला त्याच दिवशी पकडू शकलो असतो.. पण त्या मुळे गायब झालेल्या मुली त्याने च गायब केल्या हे सिध्द होऊ शकले नसते.. तो कोर्टात आरामात सुटला असता.. आमच्या मुली कुठे नेल्या आहेत हे आम्हाला कधीही समजू शकले नसते म्हणून आम्ही त्याला रंगे हाथ पकडायचे ठरवले... आता शिकारी आमच्या समोर होता.. आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन होतो ..तो रोज रात्री जंगला मध्ये जायचा पण कितीही पाठलाग केला तरी आम्हाला काही जंगलातील त्याच्या जागेचा सुगावा लागत नव्हता... त्याला संशय आला तर तो गाव सोडून पळून जाईल.. या भीतीने आम्हाला त्याचा पाठलाग करताना खूप काळजी घ्यावी लागत होती..आम्हाला यश येत नव्हते तरी ही मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे आम्ही आमच्या योजने मध्ये तसू भरही ढील पडू देत नव्हतो.. अखेर, तो दिवस उजाडला, दिवस कसला रात्र उजाडली ती पण पौर्णिमेची. सायंकाळी जवळ जवळ सगळी कडे अंधार पसरला होता.. अजून चंद्र क्षितिजा वरच रेंगाळत होता.. गावातील एक 16 ,17 वर्षाची मुलगी एका पाळत ठेवणाऱ्या ला जंगलाच्या दिशेने जाताना दिसली... बराचसा अंधार असल्या मुळे नक्की कोण आहे त्याला समजू शकले नाही.. त्याने त्याच्या बरोबर असलेल्या दोघांना तिच्या मागे जाण्यास सांगितले आणि तो घाई घाई ने आमच्या पर्यंत पोहोचला.. आम्ही ही जवळच पहारा देत होतो.. लागोलाग तिथे पोहोचलो.. तिच्या चालण्या वरून ती एक तर झोपेत चालत असावी नाही तर नशेत असेच जाणवत होते.. आम्ही सर्व तिचा पाठलाग करू लागलो.. सर्वत्र अंधार पडला होता.. पूर्ण चंद्र क्षितिजा पासून बऱ्या पैकी वर आला होता.. त्याच्या सफेद प्रकाशात आम्ही बरेच अंतर ठेऊन तिचा पाठलाग करत होतो. पाठलाग करत आम्ही जंगला मध्ये खूप आत आलो होतो. . अचानक एका दाट झाडी जवळ ती थांबली.. आम्ही सर्व पण जागीच थबकलो.. त्या सर्व प्रकारा मागे जो आहे त्याला आम्ही तिथे असल्याचा संशय येऊ नये म्हणून आम्ही बरेच अंतर ठेवले होते. सर्व प्राण डोळ्यात आणून आम्ही काय होते हे बघत होतो.. त्याच क्षणी तो तिच्या समोर प्रकट झाला.. कुठून आला कसा आला काहीच कळले नाही.. आता त्याचा अवतार विलक्षण वेगळा होता.. गळ्यात कवड्यांच्या माळा, कपाळावर मळवट भरल्यासारखे कुंकू, खाली काळया रंगाचे धोतर.. माझ्या मनात तर हा नक्की मनुष्य आहे की नाही याचीच शंका येऊन गेली... आम्ही त्यांना बराच मोठा घेराव घातला... त्याने तिच्या कपाळाला काही तरी लावले.. ते लावताना तो काही तरी मंत्र म्हणत होता.. येणाऱ्या थोड्याफार आवाजा वरून ते मंत्र काही चांगल्या प्रकारातील नाही हे आम्हाला कळत होते... थोड्या वेळात तिच्या हातात त्याने एक कळशी दिली आणि काही तरी सूचना केली.. तिने ती कळशी स्वतःच्या डोक्यावर रिकामी केली.. लाल रंगाचा द्रव तिच्या केसांवरून पूर्ण अंगाला भिजवत गेला.. आता वेळ आली होती आम्ही आमच्या जवळच्या काठ्या कुऱ्हाडी सरसावल्या... त्याच्या वर हल्ला करण्यासाठी आम्ही एकमेकांना खुणा केल्या आणि पुढे सरसावलो.. तेव्हढ्यात ते घडले, मंत्र पूर्ण होताच त्याने हाताची मूठ जमिनीच्या दिशेने फेकली आणि एकदम तिथे लख्ख प्रकाश चमकला आमचे डोळे त्या प्रकाशाने दिपले... आम्ही जागेवरच थबकलो.. आम्हाला दिसायला लागले तेव्हा ती जागा रिकामी होती.. आम्ही सर्वांना विचारले पण कोणीच काहीच बघू शकले नव्हते..
त्याला नक्की आकाशाने खाल्ले की जमिनीने गिळले, काही च समजायला तयार नव्हते... तो जर मनुष्य नसेल तर आमच्या हातात काहीही नव्हते, पण जर मनुष्यच असेल तर घेराव घातलेला असल्या मुळे तो बाहेर जाऊ शकणे शक्य नव्हते.. आम्ही सर्वांना आहे त्याच जागेवर रात्र काढायची सूचना केली..
रात्री साडे बाराच्या सुमारास आमचे कष्ट सफल झाले... अचानक कुठून तरी त्याच जागेवर काही तरी येऊन पडले आणि परत एकदा तोच प्रकाश उमटला... आमची नजर स्थिरावली तेव्हा समोर एक धगधगते लोखंडी अग्निकुंड होते.. त्याच्या एका बाजूने ती मुलगी काळी साडी गुंडाळून, पूर्ण पने कुंकुवा मध्ये माखून बसलेली होती.. आणि समोर तोच काळे धोतर घालून, वर फक्त कवड्याची माळ घातलेला मांत्रिक डॉक्टर मुखर्जी कुंडात आहुती टाकत, जोर जोरात मंत्र पुटपुटत होता... त्याच्या शेजारीच अग्निकुंडातील अग्नीच्या प्रकाशात एका तलवारीचे पाते चमकत होते .
सर्व जंगल शांत झालेले होते.. त्यात त्याचे ते मंत्र आणि त्या अग्नी मध्ये उजळ लेला त्याचा चेहरा एका सीमेपलीकडे भेसूर भासत होता..
पण आता वेळ आली होती... आता दिसणाऱ्या गोष्टी वरून हे ही सिध्द झाले होते की, गायब झालेल्या त्या तीन कुमारिकांना यानेच बळी दिले होते...
सर्व प्रकार बघून गावकऱ्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.. प्रचंड रागाने सर्व च्या सर्व हत्यारे घेऊन त्याच्या दिशेने धावले... त्याला समजण्याच्या आतच त्याच्यावर जमाव तुटून पडला... मी सर्वात आगोदर धावत त्या मुलीला गाठले.. तिला माझ्या दिशेने खेचले.. ती दुसरी कोणी नसुन माझी मुलगी नेहा च होती.. डोळे सताड उघडे पण मला ओळखल्याची एवढीशी ही खूण तिच्या चेहऱ्यावर नव्हती.. ती कोणाच्या तरी पूर्ण अधिपत्याखाली होती.. मी तिच्या गालावर चापटी मारून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला.. पण तिच्या मध्ये कसलाच बदल होत नव्हता.. मल्हार काका माझ्या शेजारीच उभे होते. मुलीची परिस्थिती बघुन माझा स्वतः वरील ताबा सुटला.. मल्हार काका ना तिला घेऊन गाव गाठायला सांगितले.. काका तिला घेऊन सुखरूप मार्गस्थ झाल्यावर मी मागे वळून बघितले.. त्याचे अर्धमेले शरीर शेवटचे आचके देत प्राण जाण्याची वाट बघत होते.. जमाव बाजूला पांगला होता... माझा राग अजून शांत व्हायचा होता.. मी तिथेच पडलेली ती तलवार उचलली.. जी तो माझ्या मुलीच्या अंगावर वार करण्यासाठी वापरणार होता.. अतिव रागाने मी त्याच्यावर वार करू लागलो.. असंख्य वार मी त्याच्यावर केले, तरी पण त्याचे शरीर अजून ही हालत होते. थकून मी थांबलो. त्याचे निरीक्षण करू लागलो.. आता पर्यंत तो मरायला हवा होता..पण असंख्य जखमा मुळे रक्तात न्हाऊन निघालेले शरीर शेवटचे थरथरत असताना ही हात मात्र काही तरी चाचपडत शोधत होता... माझ्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला.. हा मांत्रिक आहे म्हणजे नक्कीच काही तरी अघोरी गोष्ट हा शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.. मी परत पुढे सरसावलो क्षणात त्याचा हात धडापासून वेगळा केला.. पण मला एक क्षण उशीर झाला होता.. हात तुटण्यापूर्वी जे हवे ते त्याला सापडले होते.. तुटलेला हात बंद मूठ घेऊन हलू लागला.. इकडे त्याचे शरीर गतप्राण झाले होते.. आम्ही डोळे विस्फारून हाताकडे बघत होतो.. पुढच्या क्षणात मूठ उघडी झाली.. काळी राख सगळी कडे फेकली गेली... त्या राखेने आसमंत प्रदूषित झाला होता.. सर्वत्र झाकोळून आल्याने चंद्रा चा प्रकाश जमिनी वर पडणे देखील बंद झाले होते.. आणि एक भेसूर आवाज सगळी कडे निनादला..
" मी आजच्या दिवसा साठी चाळीस वर्ष वाट बघितली.. आज माझा शेवटचा बळी होता, आज जर माझी आहुती पूर्ण झाली असती तर, माझा शैतान माझा देव मला प्रसन्न झाला असता... आज तुम्ही सर्वांनी माझा फक्त यज्ञ उधळला नसून तर माझे चाळीस वर्षांचे कष्ट उधळले आहेत... याची परत फेड तुम्हाला आणि तुमच्या गावाला करावीच लागेल...."
एव्हढे बोलताच एक भेसूर हास्य सगळी कडे पसरले... आणि आमच्या समोर त्याच्या हाताने आणि शरीराने पेट घेतला.. बघता बघता त्याचे रूपांतर काळया राखे मध्ये झाले.. यज्ञ कुंड पुन्हा धगधगायला लागला.. कुठून तरी एक मोठी वावटळ आली आणि आमच्या समोर त्या सर्व राखेला उडवून घेऊन गेली... जंगला वर पसरलेले सावट दूर झाले."सुधाकर बोलायचे थांबला... त्याने तो सर्व भूतकाळ परत अनुभवला होता.. तो पूर्ण घामाने भिजला होता..
यश काही ही न बोलता स्तब्ध होता.. सुधाकर ला स्थिरवण्यासाठी वेळ देणे गरजेचे होते..त्या रात्री प्रत्यक्ष त्याच्या कुटुंबाचा त्यात समावेश होता.. दोन वर्षाच्या काळात भूतकाळाच्या पटलांवर पुसलेली गोष्ट पुन्हा समोर आली होती..
सुधाकर ची स्थिती जाणवून मल्हार काका नी बोलण्यास सुरुवात केली," त्या दिवशी गावात आल्यावर मी नेहा ला माझ्या घरी आणले, मागच्या दरवाजाने तिला देवघरात झोपवून मी सुधाकर च्या बायको ला निरोप पाठविण्यासाठी हरीला आवाज दिला.. तर सुधाकर ची बायकोच समोर उभी राहिली.. प्रचंड घाबरलेली.. नेहा घरात नाही म्हणून गावभर शोधून माझ्याच घरी सुधाकर ला सांगण्यासाठी आलेली होती.. मी तिला शांत करत देवघरात घेऊन गेलो.. बाकी तिला काही ही न सांगता तिथेच नेहाची काळजी घेण्यास सांगितले.. तिच्या जोडीला किशोर च्या आई ला थांबवले. बराच वेळ झाला तरी पोरगी काही पूर्ण शुद्धीत येत नव्हती.. एक प्रहर उलटल्यावर सुधाकर आणि बाकीचे आले.. सर्वांची बैठक झाली.. मीच पोलीस पाटील असल्यामुळे.. जर ही घटना सरकार दरबारी गेली तर गावावर खूप मोठे संकट येऊ शकते याची मला खात्री होती.. आणि गावातील इतर सर्वांना भयानक घटने पासून अनभिज्ञ ठेवणेच योग्य होते.. म्हणून सर्वांना जे घडले ते आता इथेच विसरायचे आणि अगदी घरातील व्यक्ती ला ही न कळू देण्याचे बजावले... बैठक संपल्यावर.. मी सुधाकर ला आणि त्याच्या कुटुंबाला तिथेच थांबवून घेतले.. गावावरचे एक खूप मोठे संकट आम्ही परतवले होते.. आता लेकी बाळी परत एकदा विना भीती गावात फिरू शकणार होत्या.. पण नेहा ची चिंता मात्र झोपताना ही मन पोखरत होती.... सकाळी उठल्यावर बघितले तर अजूनही नेहा तशीच स्तब्ध होती.. आम्ही लागलीच तिला घेऊन जिल्हा गाठला.. बरेच उपचार केले पण तिच्या परिस्थिती मध्ये म्हणावा तसा फरक पडेना .. मुळात एकाही डॉक्टर ला तिच्या शरीरात कोणताच दोष आढळून येत नव्हता..डॉक्टरांच्या सल्ल्या नंतर तिला घेऊन आम्ही एका मानसोपचार तज्ञा कडे गेलो.. ते माझ्या चांगल्या परिचयातील होते म्हणून त्यांना कोणाला न सांगण्याच्या बोलीवर घडलेले सर्व काही सांगितले.. त्यांनी त्या दृष्टी ने नेहा वर हिपनोटिजम चा उपचार करायचे ठरवले.. नेहा आणि तिच्या आई ला तिथेच ठेवले.. त्यांच्या ज्ञानामुळे म्हणा किंवा देवाच्या इच्छे मुळे असेल.. ते त्यांच्या थेरपी ने नेहा च्या आयुष्यातील ती रात्र पूर्ण पणे पुसून टाकण्यात यशस्वी झाले.. नेहा हळू हळू पहिल्यासारखी झाली... तिच्या आयुष्यातून तो दिवस पूर्ण पुसला गेला होता.. डिस्चार्ज देताना किरदुर्ग मध्ये गेली तर कदाचित तिला परत काही आठवू शकते अशी भीती वाटल्याने नेहा ला पुन्हा कधीच किरदुर्ग मध्ये न नेण्याची सूचना त्यांनी दिली.. मग नेहा आणि तिच्या आई ला सुधाकर तिच्या मामा च्या गावी सोडून आला.. ते तिथेच राहत आहे.. नेहा एकदम पहील्या सारखी चुणचुणीत झाली आहे.. सुधाकर आठवड्यातून एकदा जातो तिकडे... " एव्हढे बोलून मल्हार काका थांबले..
यशवर्धन समोर आता सर्व काही स्पष्ट झाले होते.सुधाकर च्या आयुष्यात येऊन गेलेल्या वादळाने त्याचे मन तळमळत होते.. गावातील हे भयानक संकट त्या मांत्रिकाच्या आत्म्याचे होते, जो आता त्याच्या कडे असलेल्या अघोरी सामर्थ्याने पिशाच योनीत गेला होता. त्याचे शरीर नष्ट झाले होते, पण त्याची आत्मा अघोरी विद्या वापरून जगात परतली होती...
एक विकृत, अमानुष शक्ती बनून.
"आता नक्कीच तोच पिशाच बनून आला आहे,तो घेतलेली शपथ पूर्ण करतो आहे, तो गावाला स्मशान बनवायला निघाला आहे."सुधाकर थरथरत म्हणाला.
यशवर्धन मनातल्या मनात पुढील योजनेचा विचार करत होता.. नक्की कसा करायचा भयानक शक्तीचा नाश? त्याला माहित होते की ज्या अर्थी मृत पावल्यानंतर ही फक्त तुटलेल्या हाताच्या जीवावर हा परत आला आहे.. तर नक्कीच साध्या विद्या किंवा शक्ती यावर काम करणार नाहीत. त्याला त्याच्या गुरूंनी दिलेल्या अत्यंत प्रभावी मंत्रांचा साधनेचाच उपयोग करावा लागेल.. आणि त्या वेळी गुरूच्या शक्तीला ही पाचारण करावे लागेल.. तेव्हाच हे जे अंधाराच्या खोल गर्भातून बाहेर आलेले आहे, त्याचा नाश आपण करू शकू..
"काका, आपल्याला त्या मांत्रिकाच्या आत्म्याचा नाश करायला लागेल. त्याचे शरीर गेले असले, तरी त्याचे पिशाच्च रूप अजूनही येथे आहे. मला त्या जंगलात परत जाव लागेल, जिथे त्याने आपली शक्ती साधली. तिथेच त्याला कायमचे थांबवता येईल." यश निर्धाराने म्हणाला....
मल्हाररावांमधील बाप आतल्या आत आश्रु ढाळत यश कडे मोठ्या आशेने बघत होता..
संध्याकाळचे सहा वाजून गेले होते..आज नाही तर उद्या आता शेवटचे पर्व सुरू होणार होते.. या संकटाची अंताच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती.. तेव्हा यश ला आजच त्या दृष्टीने तयारी करणे आवश्यक होते....
त्यामुळे यश निघण्याच्या हेतूने उठत सुधाकर कडे बघत बोलला,"चल जायला हवे, अजून खूप तयारी करावी लागणार आहे."
बोलत बोलत यश मल्हारकाकांकडे गेला आणि त्यांना धीर द्यायच्या उद्देशाने बोलला," काका आम्ही निघतो आता.. श्री गुरुदेव दत्तांवर विश्वास ठेवा ते नक्कीच आपल्याला या सर्व गोष्टी मधून बाहेर पडण्यास मदत करतील.. आज आता पासून तर परवा पहाटे पर्यंत काकूंना जोडीला घेऊन पोथी वाचन सुरू ठेवा.. नक्कीच किशोर या सर्वा मधून सुखरूप बाहेर येईल.. पण जे काही आहे ते परमेश्वराच्या हातात आहे.. आपण फक्त मनोभावे आराधना करायची...येतो आम्ही.. सकाळी परत एकदा एक चक्कर टाकून जाऊ.."
असे म्हणत दोघे ही जाण्यासाठी उठले..मल्हार राव भरलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप देण्या साठी गाडी पर्यंत आलेत.. निघताना यश ने त्यांच्या डोळ्यात बघितले.. त्यात त्याला एका बापाची मुलांविषयी असलेली तळमळ दिसत होती.. भरल्या मनाने निरोप घेऊन, ते दोघे घरी आले.. सकाळच्या अनुष्ठानाचा प्रभाव अजून ही घरात जाणवत होता.. सुधाकर ने जाऊन हात पाय धुतले आणि तो स्वयंपाक करण्यासाठी निघाला.. सकाळी पासून त्या दोघांनीही चहा खेरीज काहीच घेतले नव्हते.. यश ने त्याला एकदम साधे जेवण बनविण्यास सांगितले..
आणि परत अनुष्ठानास बसण्याचे असल्याने तो स्नान करण्यास निघून गेला..
स्नान करून आल्यावर, ओल्या अंगाणेच सकाळी स्थापना केलेल्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली.. बराच वेळ त्याचे मंत्रोच्चार सुरू होते.. पूजा करतांना लावलेल्या अगरबत्त्या चा सुवास सर्व घरभर दरवळला होता.. मंत्रोच्चाराच्या आवाजाने घराचा कोपरा न कोपरा व्यापला होता..
पूजा आवरल्यावर परत एकदा साष्टांग नमस्कार घालत तो उठला आणि सुधाकर कडे स्वयंपाक घरात गेला.. सुधाकर नाही नाही म्हणत असताना त्याने छान पैकी पोळ्या केल्या.. शहरात एकटा राहत असल्यामुळे त्याला स्वयंपाका विषयी बरेच ज्ञान होते..
दोघांनी थोडकाच आहार घेतला.. घर जरी अनुष्ठान केल्या मुळे संरक्षित झाले असले तरी बाहेरचा भाग खूप असुरक्षित होता... कधी काय घडेल काहीच सांगता येत नव्हते.. त्यामुळे त्यांना आजची रात्र खूप सावधानता बाळगणे गरजेचे होते..
जेवण झाल्यावर ते दोघे परत पुढील भागात येऊन बसले... यशला थोड्या वेळाने परत अनुष्ठाणास बसायचे होते... अनुष्ठान च त्याच्या कडील मंत्रांचा प्रभाव वाढविणार होते... मंत्र जेव्हढे जास्त शक्तीशाली तेव्हढाच कमी त्रास त्या शक्तीचा सामना करण्यात त्याला होणार होता..
सुधाकर ची मनस्थिती आता पूर्ण सुधारली होती. तो खुर्चीवर बसत बसत बोलला "यश हे जे काही आहे त्याचा बीमोड करायला खरेच जंगलात जावे लागेल?."
"होय जिथे त्याने ती अघोरी साधना केली होती तिथेच त्याचा अंत करावा लागेल.. मला तिथेच जाऊन त्याला सामोरे जावे लागेल.. तरच त्याचा पूर्णतः नाश होईल." यश उत्तरला..
"पण ते खूप धोकादायक असेल,मी तुला एकट्याने या संकटाला सामोरे कसे जाऊ देऊ शकतो.. मी पण येईल तुझ्या बरोबर.. तो मांत्रिक आता अधिक बलाढ्य झाला आहे, त्याला नक्की कसे संपवणार आहोत आपण?" सुधाकर ने चिंतीत होत विचारले..
"होय तू आलास तरी चालेल... तसेही मला ती निश्चित जागा दाखविण्यासाठी पूर्ण माहिती असलेला कोणीतरी लागेलच, तू असशील तर उत्तमच.. माझ्याकडे गुरुंच्या शिकवणीतले काही गुप्त मंत्र आहेत," यशवर्धन ठामपणे म्हणाला. "आता या मंत्रांवरच सर्व अवलंबून आहे. मी त्या शक्तीला ताब्यात आणणार आहे आणि गावाला यातून मुक्त करणार आहे. पण त्यासाठी मला त्या मंत्रांना अधिक शक्तिशाली बनवावे लागणार आहे", असे बोलत यश ने तो रात्री करणार असलेल्या अनुष्ठाना विषयी सांगितले..
रात्री बराच वेळ सुधाकर आणि यशवर्धनने पुढील योजनेवर चर्चा केली. यशवर्धनला माहित होते की त्याला आता खूप संयम आणि सावधगिरीने वागावे लागणार होते.
हे संकट काही साधे नव्हते भयानक होते, पण यशवर्धन ला विश्वास होता की, तो हे संकट परतवून लावेल. त्याला अजून बरीच माहिती गोळा करायची होती.. गुरुंशी संपर्क करायचा होता....
सुधाकरला झोपायला सांगून तो शांतपणे उठला.. शिवलिंगा समोर आसनस्थ होत, आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्रांच्या ग्रंथाला हात जोडून त्याने मंत्र सिद्धी च्या पूजेला आरंभ केला.. बसताना च त्याने एक धागा सुद्धा पुजे मध्ये ठेवला होता.. दुसऱ्या दिवशी सुधाकर ला घेऊन जायचे म्हणजे त्याच्या संरक्षणाची तयारी अगोदरच करून ठेवणे गरजेचे होते..
त्याला माहित होते, किरदुर्ग साठी ही अखेरची लढाई होती..
आणि ही लढाई त्याला जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर जिंकायची होती...
थोड्या वेळातच सुधाकरच्या घरात मोठ्या मोठ्या ने मंत्रोच्चार सुरू झाले होते. त्यांची तीव्रता एव्हढी होती की त्याचे पडसाद थेट जंगला मध्ये उमटायला लागले होते.. अर्ध्या रात्री जंगलात सगळी कडे सळसळ व्हायला सुरुवात झाली होती....
" का? का? काल रात्री गाडी चा आवाज ऐकून निघून आलास, रात्रीच दोघांना संपवणे महत्वाचे होते.. रात्री का निघून आलास," भेसूर आवाजात ते मांत्रिकाचे पिशाच्च स्वतः वरच चिडून बोलत होते..
सिद्ध झाल्यानंतर त्या मंत्रा ची शक्ती काय आहे हे त्याला पूर्णपणे माहीत होते.. तो मंत्र सिद्ध होण्या आधीच अनुष्ठान उधळून लावणे गरजेचे होते...
स्वतः कडून आदल्या दिवशी झालेली चूक लक्षात येऊन ते अजूनच क्रुद्ध झाले होते..
स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याला मंत्र सिद्ध होण्याच्या आधी प्रहार करून ते अनुष्ठान आणि अनुष्ठान कर्ता दोघांना संपवणे गरजेचे होते... भेसूर आवाज करत ते गावाच्या दिशेने निघाला होते.....
काय होईल?
पुन्हा भेट होईल किशोर ची की मल्हाररावांना आयुष्य भराचा पुत्र विरह सहन करावा लागेल?
हा किरदुर्ग च्या लढाईचा शेवट आहे की अजून किरदुर्ग ला बरेच भोगायचे आहे?
यशवर्धन चा या लढाई मध्ये निभाव लागेल का?
जीवन मरणाच्या सीमेवरील ही लढाई तो जिंकेल की हारेल?
जाणून घेण्यासाठी वाचत रहा...
किरदुर्ग ~ एक भय मालिका
लेखक: रूद्रदमन
( कथा वाचल्यावर कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या..)
वाचातोय. वाचन संपल्यावर
वाचातोय. वाचन संपल्यावर प्रतिसाद देईन.
वाचून संपवली. पुढच्या
वाचून संपवली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
दु आयडी का
दु आयडी का
बाकी कथा भिकार
बाकी कथा भिकार
@बन्या
@बन्या
खूप चांगले चांगले लेखक आहेत माबो वर तिकडे तुमचा वेळ घालवा.. इकडे टाईम व्यर्थ नका करू..
Ok दिवदमन
Ok दिवदमन
रुद्रदमन छान. कीप इट अप!
रुद्रदमन
छान.
कीप इट अप!
@केशवकुल thanx very much
@केशवकुल thanx very much
चांगली पकड घेत आहे कथा. आता
चांगली पकड घेत आहे कथा. आता शेवटचा भाग पण लवकरच टाका.
सगळे भाग वाचले... छान लिहिलंय
सगळे भाग वाचले... छान लिहिलंय!
कथा चांगली चालू आहे.हा भाग
कथा चांगली चालू आहे.हा भाग एकदम कंटेंट पॅक आहे.लिहीत राहा.
सगळे भाग वाचले....खुप छान ,
सगळे भाग वाचले....खुप छान , पुढचा भाग लवकर येवूदेत....