एका फुलपाखराची गोष्ट !

Submitted by जयु on 4 September, 2024 - 11:58

एका रविवारी सकाळी निवांत बसले असताना एक सुंदर फुलपाखरू माझ्या बाल्कनीतल्या झाडांजवळ भिरभिरताना दिसले . ते कडीपत्त्याच्या झाडाजवळच जास्तवेळ घुटमळत होते . तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याला अंडी घालायची आहेत. ( फुलपाखरे साधारणपणे कढीपत्ता किंवा लिंबाच्या झाडावर अंडी घालतात) . बाल्कनीला कबुतरांसाठी जाळी लावल्यामुळे फुलपाखरू पानांवर बसू शकत नव्हते . म्हणून मी हळूच ३ -४ डहाळ्या जाळीबाहेर काढल्या आणि लांबून बघू लागले . तेव्हा फुलपाखराने पानांमागे अंडी घातली अन् उडून गेले . आणि सुरु झाला एक सुंदर जीवनप्रवास !

मला अंड्यांचा फोटो काढता आला नाही कारण ती जाळीच्या बाहेर आणि पानांच्या मागे होती आणि मला त्यांना हलवायचे नव्हते . चार दिवसांनंतर अंडी उबून ५- ६ अळ्या ( सुरवंट ) बाहेर पडलेल्या दिसल्या . आता रोज सकाळ संध्याकाळी त्यांना पानांमधे शोधणे आणि त्यांचे निरिक्षण करण्याचा छंदच जणू लागला .

IMG20240809065616.jpgIMG20240809080412.jpg

अळ्या कडीपत्याच्यी पाने खाऊन झपाट्याने वाढू लागल्या . पण काही दिवसांत फक्त दोनच अळ्या जिवंत राहिल्या आणि त्यांचे सुरवंट झाले . त्यांचा रंग बदलून काळसर तपकिरी झाला आणि त्यावर पांढर चट्टा दिसू लागला . शिकाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते पक्ष्यांच्या विष्ठेसारखे दिसतात .
IMG-20240903-WA0013.jpgIMG-20240903-WA0018.jpg

४-५ दिवसांनंतर ते हिरवे झाले, झाडावरील हिरव्या फांद्या आणि पानांवर मिसळून जाऊ लागले .
IMG-20240903-WA0017.jpg

या स्टेजला सुरवंट खूप पाने खातात . पाने खाऊन ते खूपच गुबगुबीत सुंदर पोपटी दिसू लागले .
IMG-20240903-WA0025.jpgIMG-20240903-WA0029.jpg

एका शनिवारी सकाळी मला दिसले की रात्री मुसळधार, वादळी पावसामुळे एक सुरवंट खाली पडला होता . आम्ही तो पुन्हा फांद्यांवर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. शेवटी आम्ही त्याला पानांवर ठेवले. पण तो नाही जगू शकला . आता फक्त एकच सुरवंट होता आणि आम्ही आमची बोटे क्रॉस करून ठेवली.
IMG-20240903-WA0028.jpg

आता शेवटचा टप्पा म्हणजे कोष / प्यूपा . सुरवंट भरपूर खाऊन वनस्पतीच्या एका फांदीवर टांगून घेतात.
IMG-20240903-WA0027.jpg

ते त्यांच्या तळापासून रेशमी धाग्याने फांदीवर जोडतात आणि फुलपाखरे होईपर्यंत तसेच राहतात. हा शेवटचा टप्पा होता आणि फुलपाखराचा उर्वरित विकास १0-१२ दिवसांत प्युपामध्ये होतो.
IMG-20240903-WA0031.jpgIMG-20240903-WA0033.jpg

दहा दिवसांनी कोष थोडा काळा झाला , याचा अर्थ फुलपाखराचे पंख विकसित झाले होते आणि पुढील १-२ दिवसांत ते बाहेर पडेल. हा शेवटच्या रात्रीचा फोटो .
IMG-20240903-WA0035.jpg

दुसऱ्या दिवशी सकाळी बघीतले तर विचार केला की ऑफिसला जायच्या आधी फुलपाखरू बघायला मिळेल का ? आणि मी नाष्टा बनवायला लागले . थोड्या वेळाने नाष्टा खाण्याआधी सहज बाल्कनीत नजर वळवली तर महाराज निवांत फांदीवर लटकून बसलेले दिसले !
IMG-20240903-WA0040.jpg

आहा ! काय सुंदर दिसत होते ! त्याच्या पंखांच्या तळाशी केशरी ठिपके होते म्हणजे ती मादी फुलपाखरू होते . फुलपाखरू पंख सुकविण्यासाठी 1-2 तास फांदीवर विश्रांती घेते .
IMG-20240903-WA0046.jpg

त्याच्यासाठी मी साखरपाण्यात स्पंज बुडवून एका वाटीत ठेवला आणि एक सफरचंदाची फोड पण ठेवली खाण्यासाठी . लेकीला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून मी ऑफिसला आले . तासाभराने लेकीचा फोन आला की फुलपाखरू उडून गेले . एका कॉमन मॉरमॉनचे सुंदर आयुष्य सुरू झाले !

IMG-20240904-WA0068.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर.
फुलपाखरे साधारणपणे कढीपत्ता किंवा लिंबाच्या झाडावरच अंडी घालतात>>>>>> मॉर्मन जातीची फुलपाखरे.
प्रत्येक फुलपाखराच्या खाद्य वनस्पती खूप स्पेसिफिक असतात. त्या इतर दुसऱ्या वनस्पतींवर त्यांची अंडी घालत नाहीत.

थँक्यू , केशवकूल आणि ऋतुराज .
फुलपाखरे साधारणपणे कढीपत्ता किंवा लिंबाच्या झाडावरच अंडी घालतात>>>>>> मॉर्मन जातीची फुलपाखरे. >> हो . पण त्यावेळी मला फुलपाखराचे नाव माहित नव्हते . नंतर सगळी माहिती वाचली त्याच्याबद्दल . Happy

आहा ! सुंदर आलेत फोटो ! आमची बोटे क्रॉस करून ठेवली. यानंतरच्या फोटोत सुरवंट भुजंगासन करतोय असे दिसतेय .. हा हा
मस्त जवळून बघता आले तुम्हाला !

क्रमाने फोटो दिल्याने ओळख पटली की या फुलपाखरांची ही अळी आणि नंतर कोष आणि नंतर फुलपाखरू.

सुंदर.
माझ्या बाल्कनीत याच फुलपाखरांचे कढिपत्ता रोपांवर अंडी घातली आहेत. एवढी इतर झाडे आहेत तरी कसे काय झाड ओळखतात.
फुलपाखरांचे आयुष्य थोड्या दिवसांचे असते तरी वर्षानुवर्षे कसे काय पिढ्या वाढतात गंमत आहे.

धन्यवाद अंजली , स्वातीताई , srd .
मला , फुलपाखरे साधारणपणे कढीपत्ता किंवा लिंबाच्या झाडावर अंडी घालतात एवढंच माहिती होते . कधी खोलात जाऊन माहिती घेतली नव्हती.
त्यादिवशी प्रत्यक्षात फुलपाखराला अंडी घालताना बघून मी खूपच एक्साईट झाले. त्याने आपली पिढी वाढवण्यासाठी विश्वासाने माझे छोटेसे कडीपत्याचे झाड निवडले यानेच मी खूप हरकून गेले होते . म्हणून मी सर्व जीवनप्रवास जवळून पाहून डॉक्युमेंट करायचे ठरवले आणि सगळी माहिती वाचून काढली .
या सृजन निर्मितीची प्रक्रिया मी पूर्ण आणि जवळून बघितली यातच मी खूप आनंदी झालेय . Happy

खूप छान लेख.
त्या अतिहावरट आळ्यांनी माझा पूर्ण कढीपत्ता एका दिवसात फस्त केला होता तेव्हापासून त्या वैताग आणतात. ( डोक्यात जातात असे लिहिणे टाळले आहे हे चाणाक्ष वाचकांनी लक्षात घ्यावे).

थँक्यू धनवन्ती आणि सामो .
धनवन्ती >>नाही ओ , सगळी पाने नाही खात . दिवसाला १-२ संयुक्त पाने खाते एक अळी .

अरे काय खतरनाक सुंदर आहे हे..
तुमच्या हौसेला आणि पेशन्सला सलाम.
हे लेकीला दाखवतो नक्की. तिला बघायलाही आवडेल. आणि शक्य झाले तर असे पाठपुरावा करायलाही आवडेल. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

मस्त डीटेलिंग . तुम्हि प्रत्येक स्टेजचे फोटो काढून ठेवलेत ते चांगले केलेत.
हौसेला आणि पेशन्सला सलाम !

>>>>हे लेकीला दाखवतो नक्की. तिला बघायलाही आवडेल.
वन्स फादर ऑलवेज फादर हाहाहा
मला म्हणायचय की तुम्ही पटकन नेहमी मुलांचा विचार करता. हे चांगले आहे.

थँक्यू ऋन्मेष .
वन्स फादर ऑलवेज फादर हाहाहा >> ++१
नक्की दाखवा तुमच्या मुलांना .
थँक्यू जाई , सरल आणि वावे . Happy

सामो, जयू Happy

दाखवले तिला आताच. बघितले तिने आवडीने. पण मी तिला काहीतरी नवीन ज्ञान देतोय अश्या आवेशात दाखवत होतो त्याचा तिने पोपट केला. शेवटाला पोहोचायच्या आधीच म्हणाली, याचा बटरफ्लाय होतो माहीत आहे मला Happy
एक पिंक बटरफ्लाय होताना तिनेही पाहिला होता. तरी असे रोजच्या रोज फोटो काढण्याचे तिलाही कौतुक वाटले.

फारच छान..
फुलपाखरु होण्यापर्यंतचा प्रवास छान टिपलाय..
आमच्याकडे असाच एक बुलबुल दंपतीचा अंडी घालण्यापासून पिल्लं उडेपर्यंतचा प्रवास टिपता आला होता..